Friday, May 3, 2024
Homeब्लॉगस्वतःला कधी ओळखणार?

स्वतःला कधी ओळखणार?

शिक्षण म्हणजे नेमके काय? असा प्रश्न फारसा कधी कोणाला पडत नाही आणि त्या संदर्भाने फारसे कोणी कोणाला कधीच विचारत नाही. असा प्रश्न आपण जसा इतरांना कधी विचारत नाही त्याप्रमाणे स्वतःला देखील असा प्रश्न विचारत नाही. प्रश्न पडत नसल्याने आपल्याला जे भोवती दिसते आणि अनुभवतो तेच शिक्षण अशी आपली धारणा पक्की होत चालली आहे. त्यामुळे शिक्षणाचा व्यापक अर्थ असताना देखील तो अत्यंत मर्यादित करण्याकडे आपला कल दिवंसेदिवस वाढत जाताना दिसत आहे.

आपण शिक्षणाचा जो अर्थ घेतला आहे तो केवळ लेखन, वाचन आणि गणन क्रियेपुरता मर्यादित आहे. त्यापलिकडे शाळा, महाविद्यालय स्तरावर असलेले वेगवेगळे विषय शिकणे म्हणजे शिक्षण असे आपण मान्य केलेले आहे. वेगवेगळे विषय शिकणे म्हणजे तरी काय असते? साधारण आपण जे विषय शिकतो ते विषय फारसे कोणी स्वतःहून शिकत नाही आणि स्वतःहून शिकण्याची इच्छा असतेच असे नाही. त्या विषयाच्या संदर्भाने पाठयपुस्तकातील पाठांचा, घटकांचा कोणीतरी अभ्यास करते आणि ते वर्गात येऊन आपल्याला शिकवते.त्यांनी जेवढे स्वतःला समजले तेवढे समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून जेवढे आपल्याला समजले तेवढेच शिक्षण.खरचं असा प्रकारे होणारे शिकणे हे शिक्षण असते का ?

- Advertisement -

कोणी तरी प्रक्रिया करून ज्ञान प्राप्त केलेले असते. त्यांच्या अनुभवाची मांडणी त्यांनी विविध स्वरूपात केलेली असते.त्यांच्या अनुभवाची मांडणी ही माहिती स्वरूपात पुस्तकात येते.ती माहिती वाचणे, कोणीतरी ती आपल्याला सांगणे, मग ती आपण लक्षात ठेवणे आणि परीक्षेत कोणी विचारले तर त्याची उत्तरे माहिती स्वरूपात देता आली, की आपले शिक्षण झाले असे म्हटले जाते. किती माहिती पाठ केली आहे त्यावर मार्क अवलंबून असतात.जितके मार्क अधिक तितके शिक्षण गुणवत्तापूर्ण झाले असे मानले जाते. वर्तमानात शिक्षण म्हणजे केवळ माहिती असेच शिक्षणाचे स्वरूप झाले आहे. जो विद्यार्थी अधिकाधिक माहिती संकलित करेल आणि वाचलेले लक्षात ठेवेल तो विदयार्थी शिक्षणाच्या प्रक्रियेत हुशार मानला जाईल.मात्र ही माहितीची हुशारी हेच शिक्षणाचे उद्दीष्ट आहे का ? माहिती मिळवणे हे तर सारे बाहेरचे शिकणे आहे हे शिक्षणाचे उददीष्टे नाहीत.अशा स्वरूपाच्या माहितीने आपण व्यक्तीच्या व्यक्तीमत्वात अथवा समाजात फार काही परिवर्तन करू शकणार नाही. शिक्षणाने स्वतःला स्वतःमध्ये डोकावण्याची प्रक्रिया घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते.तसा दृष्टीकोन आणि दृष्टीची पेरणी करण्याची गरज असते. त्यामुळे आपण आपल्या आत डोकावणे कधी करणार आहोत हा खरा प्रश्न आहे.आत डोकावण्याचा मार्ग दाखवणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. शिक्षण म्हणजे बाहय प्रदर्शनाची भूक नाही तर अंतरिकतेच्या दर्शनाची ओढ लागणे आहे. शिक्षण म्हणजे स्वतःला ओळखणे आहे, आपला भोवताल जाणणे आहे.आज आपला भोवताल आस्तित्वात असला तरी आपल्या मनातून हरवला आहे.आपण स्वतः विषयी बोला असे म्हटले तर आपल्याला स्वतःविषयी फार काही बोलता येत नाही.आपण स्वतःविषयी कधीच विचार केलेला नाही. स्वतःविषयी ते काय बोलायचे असा प्रश्न असतो.आपण स्वतःला जाणण्याचा प्रयत्न कधीच केलेला नाही.आणि स्वतः विषयी फार काहीच जाणत नाही आहोत. आपल्याला स्वतःची ओळख करून घेण्याची कोणतीच व्यवस्था शिक्षणात नाही.अगदी मानवी अवयव शिकायचे म्हटले तरी तेही प्रतिकृतीचे.जे अवयव आपल्याला आहेत ते शिकण्यापेक्षा समोरील प्रतिकृतीकडे बोट दाखवत शिकवणे आणि शिकणे करण्यात आपल्याला अधिक रस आहे. पुस्तकाती आलेले जगणे देखील स्वतःशी जोडून शिकण्यापेक्षा केवळ माहिती शिकण्यापुरते मर्यादित असते.पुस्तकातील माहितीपेक्षा आपल्या जीवनाचे पाठ शिकण्याची गरज का वाटत नाही ? हा खरा प्रश्न आहे ? विनोबांनी सतत शिक्षण जीवनाभिमुख असावे असे म्हटले आहे.राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये देखील शिक्षणाचा विचार जीवनाभिमुख असावा असेच म्हटले आहे.शिक्षणाचे नाते जगण्याशी असण्याची गरज सातत्याने व्यक्त करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्ष जीवन अनुभव घेणे असेल किंवा स्वतःला जाणून घेणे असेल असे शिक्षणाच्या प्रक्रियेत घडताना दिसत नाही.आज शिक्षणातील विविध विषयांमुळे आपल्याला बाहेरील जग माहीत आहे. आपल्याला नाईल नदी सांगता येते ,मात्र गावातील नदीविषयी माहिती सांगता येत नाही.लेखकाचे जीवन सांगता येते पण स्वतःचे जीवन अनुभवाची मांडणी करता येत नाही.आपल्याला रोमन संस्कृती सांगता येते ,मात्र आपल्याला स्थानिक संस्कृतीची ओळख नसते.आज आपल्याला कदाचित सोबतचे माणसं माहीत असतील, पण आपण स्वतःच स्वतःला माहीत नाहीत याला काय म्हणावे ? दुर्दैवाने स्वतःची ओळख करून घेण्यात आपल्याला शिक्षण शिकवत नाही. शिक्षण आपल्याला बाहेर पाहायला शिकवते का ? आपल्या समाजातील प्रश्नांच्या मुळाशी जाऊन आपण विचार केला तर सहजतेने हे लक्षात येईल , की आपण सतत बाहेर डोकावत असतो. आपण सतत बाहेर डोकावत असल्यानेच आपले व्यक्तीगत आणि सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहे.प्रत्येकाने स्वतःत डोकावण्यास सुरूवात केली तर अनेक प्रश्न आपोआप कमी होण्यास मदत होईल.

अनेकदा काही माणसं खूप बोलत असतात.मात्र त्या बोलण्यात माहिती असते.त्यात स्वतःचा विचार नसतो,अनुभव नसतो.त्यामुळे ते बोलणे विचाराचे असण्याची शक्यता नाही.मौन धारण करणारी माणसं बोलत नाही असे आपल्याला सतत वाटत असते. मात्र मौन धारण करणारी माणसं सतत स्वतःशी बोलत असतात.त्यांचे बोलणे बाहय नाही इतकेच. त्यांच्या मौनात जे साठवलेले असते ते अंतरिक डोकावणे असते. आपण जेव्हा स्वतःत डोकावत जातो तेव्हाच आपल्याला आपलाच शोध लागत जातो. त्यामुळे आपल्यातील उणिवांची ,दोषाची जाणीव होण्यास मदत होत असते.आपल्या आस्तित्वापेक्षा आपली विचाराची व्यापकता जाणण्यास मदत होत असते.ही व्यापकता जाणता आली तर आपल्या मुखातून निर्माण होणारी शब्दांचा फापटपसारा कमी होण्यास मदत होत असते.आपण मात्र तसे करत नाही.त्यामुळे शब्द फुकाचे मुखावाटे पुन्हा पुन्हा बाहेर पडत राहतात.बोलणारी माणसं स्वतःच डोकावून पाहतील तर त्यांना त्यांचा शोध लागत जाईल.स्वतःत डोकावल्याने सत्याची ओळख होत जाते.सत्याची ओळख ही ईश्वराच्या आस्तित्वाची ओळख आहे.आपल्याला आपला शोध लागणे हेच खरे शिक्षण आहे.ज्यांना स्वतःचा शोध लागला होता ते बुध्द झाले.जगाच्या पाठीवर जे संत आहेत,ऋषी,मुनी आहेत त्यांना देखील स्वतःचा शोध लागला होता म्हणून त्यांना त्या वाटा सापडल्या.स्वतःच्या शोधामुळे त्यांना आपल्या मर्यांदाची जाणीव झालेली असते.त्याचवेळी स्वतःच्या विशालतेची ओळख होण्यास मदत होत असते.आज आपण आपल्याला जाणून घेण्यात कमी पडलो आहोत.शिक्षणातून स्वतःची ओळख करून घेण्याचा कोणताच मार्ग आस्तित्वात नाही. पुस्तकाबाहेर जे असते ते शिक्षण नाही असा समज आपला पक्का होत गेला आहे.तसा कोणी प्रयत्न केला तर त्यालाच मुर्खात काढण्याचा प्रयत्न केला जातो.त्यामुळे स्वतःला ओळखण्याच्या प्रक्रियेपासून तुटल्याने शिक्षण जीवनापासून तुटण्याची प्रक्रिया घडत आहे.शिकण म्हणजे दुसरे तिसरे काही नाही तर स्वतःची ओळख करून घेणे आहे.कृष्णमूर्ती यांनी म्हटले आहे ,की शिकवणे हा तर आपला व्यवसाय बनत चालला आहे.शिकवण्यात सतत विद्यार्थ्याला आत डोकावण्याचा मार्ग दर्शविण्याची गरज असते. दुर्दैवाने आज अध्यापन म्हणजे करमणुकीचा प्रकार बनत चालला आहे.शिकवण्यात ज्ञानाची भूक आहे.शिकण्याच्या प्रक्रियेतून सतत अतृप्ततेची ओळख आहे.ती भूकही आज लागत नाही.त्यामुळे माहितीचा पाठलाग करत आपली शिक्षण प्रक्रिया अधिक वेगाने पुढे पुढे जाते आहे.शिक्षणात माहितीची देवाणघेवाण होत असल्याने परिवर्तनाची वाट चालणे घडत नाही.माहिती माणसाला मार्क मिळवून देईल , पण गुणांचा परिपोष करता येणार नाही.माहिती परिवर्तनाची वाट दाखविणार नाही.माहिती माणसाला फार तर पोपटपंची करायला शिकवेल, पण शहाणपण आणि विवेकाची कास धरता येणार नाही.आज शिक्षण फक्त वाचन आणि लेखनापुरता विचार करते आहे.

आपण बरेच काही बाहय निरिक्षणातून शिकत असतो. आपण बाहेर डोकावत असतो. माहिती, ज्ञान मिळविण्याचा सतत प्रयत्न करत असतो.आपण निरिक्षण करतो, पण ते तर बाहय आहे. आपण स्वतःचे निरिक्षणातून फार काही शिकत नाही. स्वतःचा विचार, निष्कर्ष, श्रध्दा, पूर्वग्रह, विचाराची सुक्ष्मता, संवेदनशीलता यांचे आपण निरिक्षण करण्याचा कधी प्रयत्न केला आहे का ? या प्रयत्नाचा भाग म्हणून कधीतरी स्वतःच्या आत डोकावून आत्मपरिक्षण करण्याचा प्रयत्न करण्याची गरज असते. आपण कोण आहोत ? काय आहोत ? याचा परिचय होण्याची गरज असते.आपण स्वतः कधीच स्वतःकडे पाहत नाही. आपले विचार कसे आहोत हे आपण जाणत नाही.अनेकदा आपण सतत दुस-याकडे बोट दाखवत असतो.सतत दुस-याच्या चुका काढत असतो…पण या चुका काढताना त्याच स्वरूपाच्या कितीतरी चुका आपणही करत असतो.आपण केलेल्या चुका आपल्याला कधीच आपल्या वाटत नाही.दुस-याच्या चुका काढण्या इतकी जगातील दुसरी कोणतीच सोपी गोष्ट नाही.बोली भाषेत नेहमीच म्हटले जाते आपल्याला दुस-याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण आपल्या डोळयातील मुसळ दिसत नाही.शिक्षणाने नेहमीच बाहेर पाहण्याची वृत्ती विकसित केली असल्याने हे घडते आहे.आपल्याला बाहेरील हिंसा दिसते पण मनात ठासून भरलेली हिंसा कधीच दिसत नाही.आपल्या आत हिंसेचा महापूर दाटलेला आहे.मुळात आपण बाहेरील हिंसेची जितकी काळजी घेतो आणि त्याबददल जितकी म्हणून चिंता व्यक्त करतो त्यापेक्षा अधिक चिंता तर आपल्या अंतरिक हिंसेच्या विचारांची करण्याची गरज आहे.आपण मात्र तसे काही करत नाही.बाहेरील हिंसा हे प्रतिबिंब आहे ते अंतरिक हिंसेचे.आपण जेव्हा अंतरिक हिंसा कमी करण्याचा प्रयत्न करू तेव्हा बाहेरील हिंसा आपोआप कमी झालेली आपल्याला अनुभवास येईल.मात्र आपल्या आत हिंसा आहे हे लक्षात येण्यासाठी सतत आत डोकावावे लागेल.आज तरी आपल्याला आत डोकावण्याची इच्छा नाही आणि आपले शिक्षण स्वतःत डोकावण्याचा प्रयत्न करू देत नाही.ती वाट चालण्यासाठीची कोणतीच वाट शिक्षणात नाही.आपल्याला सतत ज्ञानासाठी बाहेरचा मार्ग दाखविला जात आहे.त्यामुळे अधिक विचार करण्याची गरज आहे.

आपल्या शिक्षणाने निरिक्षणाचा विचार दृढ केलेला नाही.निरिक्षण करण्याची वृत्ती विकसित झाले तर बरेच काही हाती लागण्याची शक्यता असते.आपल्या पंरपरा,रूढी,संस्कृती,श्रध्दा यांच्याबाबत कधीच विचार करत नाही.आपण जे काही करतो ते का करतो याचा विचार मनात येत नाही.प्रत्येक गोष्टीमागे कार्यकारण भाव असतो असे शिक्षणाच्या प्रक्रियेत शिकतो.पण तरी सुध्दा प्रत्यक्ष जीवन व्यवहारात तो विचार प्रतिबिंबीत होताना दिसत नाही.याचे कारण शिक्षण आणि शिक्षणातील स्पर्धा आपल्याला केवळ बाहेर पाहण्यास शिकवते.त्यामुळे आपण त्याच त्याच पुराण्या वाटा चालणे पसंत करतो..शिकलेली माणसं नव्या वाटांनी चालण्याचा प्रयत्न करत नाही. कारण शिक्षण नव्या वाटा चालण्यासाठी शक्ती प्रदान करत नाही.त्यामुळे शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार झाल्यानंतर आपल्या परिवर्तनाची वाट सापडेल असे वाटत होते पण आज प्रसार होऊनही त्या दिशेचा प्रवास घडू शकलेला नाही.

संदीप वाकचौरे

(लेखक-शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे.)

- Advertisment -

ताज्या बातम्या