Thursday, May 30, 2024
Homeब्लॉगस्पर्धेची अतृप्त वाट...

स्पर्धेची अतृप्त वाट…

आपण सातत्याने शिक्षणातून परिवर्तन घडविण्याची भाषा करत आहोत. व्यवस्थेत काम करणारी माणसं सतत गुणवत्ता उंचावण्यासाठीचा प्रयत्न करता आहेत. शिक्षणातून प्रत्येक व्यक्तीचा विकास आणि विचारात परिवर्तन आणू पाहाता आहेत. जन्माला आलेला मानवाला शिक्षणाच्या प्रक्रियेतून आपल्याला माणूस घडवायचा आहे. प्रत्येकालाच एका उंचीवर न्यायचे आहे ती शिक्षणाची जबाबदारी आहे. वर्तमानात प्रत्येकाला प्रचंड यश हवे आहे. ते य़श मग संपत्ती, सत्ता, प्रतिष्ठा अशा सर्व क्षेत्रात उंची गाठायची आहे. प्रत्येकाला सर्व प्राप्त करू देणे हे शिक्षणाचे काम नाही. शिक्षणातून भौतिक प्रगतीची मोठी अपेक्षा नाही तर मानसिक परिवर्तन आपल्याला हवे आहे.

शिक्षणातून मोठा बदल अपेक्षित आहे. आपण जगाच्या पाठीवर तत्वज्ञ,विचारवंत यांनी मांडलेल्या विचारातून असे लक्षात यते, की समाज व राष्ट्र हे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षापासून मुक्त हवे आहे. आपल्याला शांततेचा अनुभव हवा आहे. समाजात एक प्रकारची निकोपता हवी आहे. शिक्षणातून आपल्याला माणूस घडवायचा आहे. त्याला माणूस म्हणून जगता यावे या करीता शिक्षणातून प्रयत्न हवे आहेत. आपण माणसांशी माणसांप्रमाणे वागावे हे अपेक्षित असले तरी त्या पलिकडे देखील पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाशी स्नेहाचे नाते सांगत जगता यायला हवे. आज आपण माणसांशी माणसांसारख वागणे विसरलो आहोत. आपल्या भोवती तर कितीतरी मोठया प्रमाणावर हिंसा ठासून भरलेली आहे. शारीरिक हिंसा जितकी दिसते आहे त्या पलिकडे मानसिक हिंसेचा आपण विचारही करू शकत नाही. आज प्रत्येकामध्ये मानसिक पातळीवर सुरू असलेली तुलना. त्याच बरोबर स्पर्धा यातून निर्माण होणारा व्देष, मत्सर यामुळे तर हिंसा मनामनात जन्म घेते. विकाराचे साम्राज्य आपल्यावर अधिक राज्य करते आहे.

- Advertisement -

आपल्या सामाजिक भोवताल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर समाजात मोठा संघर्ष आहे. आपल्यात भेदाभेदाचे प्रमाण देखील अधिक आहेत. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विषमता देखील मोठी ठासून भरली आहे. समाजातील एक वर्ग प्रचंड उंचीवर आहे तर दुसरा कोणीतरी अत्यंत निम्मस्तरावर आहे. कोणाकडे प्रचंड अन्नसाठा आहे आणि दुस-या कोणाकडे तर खाण्यासाठीची पंचाईत आहे. सारे चित्रच प्रचंड विषमतेने भरलेले आहे. आपल्यातील भेदाभेदाचा विचारही मोठया प्रमाणावर आहे. मग ते भेद धर्माचे, जातीचे, आर्थिक वर्गाचे आहेत. हे भेद असतील तर आपण शिक्षणातून परिवर्तनाची वाट चालण्याची शक्यता नाही. जीवन सुखी,समाधान आणि आनंदाने भरलेले असायला हवे आहे. मात्र या आनंदाच्या वाटांचा प्रवास आपल्या जीवनात अभावाने घडतो आहे. आपले सारे जीवन दुःखाने भरलेले आहे. समर्थ रामदास देखील म्हणाले “जगी सर्व सुखी असा कोण आहे. विचारी मना तू शोधुनी पाहे..” असा सुखाचा सदरा घातलेला माणूस आपल्या भोवतालमध्ये का नाही? आपल्या भोवतालमध्ये. आपल्या जीवनातील दुःख अधिक आहे याला कोण बरे जबाबदार आहे? आपणच आपले दुःख निर्माण केले आहे. दुःख हे अविवेक आणि शहाणपणाच्या अभावाने आलेले असते. मग विवेक आणि शहाणपण प्रत्येकामध्ये रूजायला हवे आहे म्हणून समाजातील धुरीणांनी शिक्षणाचा विचार केला. शहाणपण आणि विवेकाच्या पेरणीकरीता शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही राजमार्ग नाही. समाजात शहाणपणासाठी शाळा, महाविद्यालयाची निर्मितीचे काम या देशातील सुधारकांनी केले. शिक्षणाची दरवाजे इतके सहजतेने खुली झालेले नाही. त्यासाठी कोणी तरी प्राणार्पण केले आहे हे लक्षात घ्यायला हवे. तर अनेकांनी गरीबांच्या घरापर्यंत शिक्षण पोहाचावे म्हणून आपले सारे जीवन दिले आहे. मात्र आज त्या शिक्षणाच्या वाटांचा महामार्ग होण्याऐवजी त्या वाटा शिक्षणानंतरही अधिक अरूंद होत चालल्या आहेत. शिक्षणातून अपेक्षित समाज परिवर्तन होताना दिसत नाही.. शिक्षण गुणवत्तापूर्ण करण्याचा सातत्याने प्रयत्न होता आहेत. गुणवत्ता केवळ मार्कांमध्ये मोजली जात आहे. मार्कांच्या गुणवत्तेसाठी इतके प्रयत्न होता आहेत मात्र त्याचवेळी शिक्षणातून माणूस घडविण्याचा विचार होताना दिसत नाही. आपण माणूसपणही पेरत नाही.. आणि माणूस घडविण्याचा विचारही केला जात नाही. आपण माणूस घडवतो अशी जाहिरात शाळांच्या जाहिरातीत फलकांवर दिसत नाही. तेथील जाहिरातीत शिक्षणाच्या मूळ ध्येयाशी निगडीत असलेली कोणतीच गोष्ट नाही आहे फक्त त्या भौतिक सुविधांच्या जाहिराती.

शिक्षणातून माणूस घडवायचा आहे.शिकलेल्या माणसांच्या वाटयाला आनंद यायला हवा. शिक्षणाची ध्येय आणि उद्दिष्टे साध्यता प्रत्येकात दिसायला हवी. शिक्षित आणि अशिक्षित यांच्यामध्ये असणारा भेद स्पष्ट दिसायला हवेत. ते भेदाभेद अधिक अधोरेखित होण्याची गरज आहे. शिक्षण हे आनंद निर्माण करण्यासाठी असेल, तर ते शिक्षण आनंदाची पेरणी करू शकले का? आज शिकलेली माणसं तर अधिक अतृप्त आहेत. त्यांच्यामध्ये मोठी स्पर्धा आहे. त्या स्पर्धेचा परिणाम म्हणून अधिक दुःख आहे. शिक्षणातील तुलना आणि स्पर्धा हेच शिक्षणाच्या मूळ ध्येयापासून दूर नेते आहे. यातून अधिक लोभ निर्माण होतो आहे. निर्माण झालेली हाव त्यांना सुखापासून दूर नेत आहे. शिक्षणाचे जे जे उददीष्टे आपण निर्धारित केली होती ती तरी साध्य झाली का? याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. आपला भोवताल शिक्षणाने परिवर्तनाची जी वाट चालणे अपेक्षित होते ती वाट चालणे झाले का? या प्रश्नांचा शोध घेत पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. कृष्णमृर्ती यांनी आपल्या शिक्षणातून अपेक्षित परिवर्तन न होण्याची मिमांसा करताना म्हटले आहे की, “शिक्षणातून काय साध्य झाले याचे मापन करण्यांची अंतिम कसोटी ही परीक्षा आहे. परीक्षेचा परिणाम म्हणजे भिती आणि चिंता आहे. त्याचा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनावर विपरित परिणाम घडत गेला आहे. जेव्हा स्पर्धा आणि तुलना नसते तेव्हाच शाळेच्या संपूर्ण वातावरणात बदल घडून येतो”. आपले शिक्षण हे अध्ययन, ज्ञानप्राप्ती पेक्षा परीक्षा केंद्रीत झाले आहे. शिक्षणात शिकण्याच्या प्रक्रियेचा विचार गंभीरपणे करण्याऐवजी परीक्षांचे मार्क महत्वाचे ठरत आहेत. परीक्षा म्हणजे भिती हे समीकरण झाले आहे. माणसांचे वय कितीही वाढल तरी परीक्षेची भिती जात नाही. परीक्षा माणसांच्यामध्ये भेद निर्माण करते.ते विभाजन बालकांच्या मनावर विपरित परिणाम करते. परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रवास जाणता येत असतो. बालक काय शिकले हे जाणण्यासाठी परीक्षा असतात. मार्कांसाठी शिक्षण नाही हे लक्षात घेण्याची गरज आहे. मात्र आज परीक्षेचे मार्क शिक्षणांच्या केंद्रस्थानी आले आहे. त्या मार्कामुळे बालकांच्या मध्ये हुशार, ढ असे भेद निर्माण केले जातात. त्यातून स्पर्धा निर्माण होण्याचे प्रमाण अधिक आहे. ज्याला मार्क कमी आहेत त्यांना त्यांच्यापुढे असलेल्या बालकांच्या पुढे जाण्यासाठी प्रेरीत केले जाते आहे. ही प्रेरणा सकारात्मक, निकोप असेलच असे नाही. मात्र अनेकदा ही स्पर्धा व्देष, मत्सर निर्माण करण्यापर्यंत घेऊन जाते. मार्कांमुळे होणारी तुलना लक्षात घेतली तर आपण सरळ सरळ भेद पेरत आहोत. आज आपले शिक्षण वेगेवेगळ्या कारणांनी सतत तुलना करत असतो.आपले शिक्षण हे तुलनेच्या बाहेर नाही.शिक्षणाचा टप्पा कोणताही असू दे.. प्रत्येक टप्प्यावरती प्रचंड स्पर्धा सुरू आहे.आपण शिक्षणातून जे अपेक्षित केले होते त्या वाटेने जाताना शिक्षणात सुरू झालेली तुलना आणि स्पर्धेने आपल्या शिक्षणाच्या वाटा अधिक अंधारमय बनल्या आहेत.

जगाच्या पाठीवर तुलना ही कधीच सुख,समाधान आणि आनंद देऊ शकणार नाही.तुलना केली की दुःख ठरलेले आहे.वर्तमानात शिक्षणाचा विचार केला जातो तेव्हा तुलना,स्पर्धा जणू अपरिहार्य आहे असे म्हणावे लागेल.मात्र ख-या शिक्षणाचा हा विचार स्पर्धा आणि तुलना नाहीच. आपण शिक्षणातून सर्वांना एकाच वाटेने आणि एकाच गतीने घेऊन जात असू तर आपले त्या बालकाचे जितके नुकसान करतो त्यापेक्षा अधिक नुकसान समाजाचे देखील करत आहोत.आपण वर्तमानात सर्वांना एकाच वाटेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्वांना समान उंचीवर न्यायचे आहे.

त्यामुळे आपण शिक्षणातून माणूस घडविण्याऐवजी आणि मूळ शिक्षणांच्या संकल्पनेशी नाते सांगण्याऐवजी माहिती संपन्न दिशेने चालू पाहातो आहोत.शिक्षणात प्रवेशित विद्यार्थी हा आपल्या इच्छेप्रमाणे घडविण्याची मुळीच अपेक्षा नाही.मुळात तो जसा आहे तसा त्याचा स्वीकार करणे महत्वाचे आहे.आज आपण त्याचा आहे तसा स्वीकार करण्याऐवजी त्याला आपल्याला हवे तसे घडविण्याचा करत असलेल्या प्रयत्नात आपण शिक्षणाचे सत्वच गमावतो आहोत.शिक्षणाचा मूलभूत अर्थ आहे विद्यार्थ्यांच्या मध्ये जे काही आहे त्याचा विकास करणे आहे.आहे त्याचा स्वीकार आणि जे त्याच्यात दडलेले आहे त्याचा समग्र विकास करण्याची गरज असताना आपण वर्तमानात त्याच्यात काय द़डले आहे याचा विचार करण्यात फार रस नाही दाखवत आहोत.उलट त्याच्या मस्तकी बाहेरून लादण्याचा प्रयत्न करत आहोत.शिक्षणात बाहेरून ज्ञान लादले जाऊ शकत नाही..फार तर माहिती लादली जाऊ शकते.माहिती लादली गेली तर तात्पुरता परिणाम होईल..पण परिवर्तनाची वाट सापडण्याची शक्यता नाही.माहितीचा प्रवास मार्कांपर्यत आणि ज्ञानाचा प्रवास गुणापर्यंत घडण्याची शक्यता अधिक आहे.त्यामुळे समाजात कदाचित हुशार माणसं दिसती पण शहाणपणाचा अभाव असलेली माणसं मात्र अधिक आहेत हे लक्षात घ्यायला हवे.शहाणपण बाहेरून लादता येत नाही.त्यामुळे जे शिक्षण बाहेरून लादण्याचा विचार करते आणि प्रक्रिया अवलंबते ते शिक्षण माणूस घडविण्यापासून दूर जाणार यात शंका नाही.

संदीप वाकचौरे

(लेखक-शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे.)

- Advertisment -

ताज्या बातम्या