Monday, November 25, 2024
Homeब्लॉगशिकणं आनंदाचा झुला

शिकणं आनंदाचा झुला

शिकणं हे माणसांसाठी आनंदाचा प्रवास आहे. त्यामुळेच शिकलेली माणसं अधिक संपन्न आणि आनंदी असायला हवे असतात कारण शिक्षणाचे नाते आनंदाशी आहे. शिकणा-या माणसांचे जीवन ही आनंदाची अनुभूती असते. जीवन आनंदमय करण्यासाठी जीवनभर माणसं विविध मार्गाने कष्टत असतात. कष्ट करत स्वतःला झोकून देत पैसा, संपत्ती मिळवण्यासाठी पाठपुरावा करत सतत चालत राहतात. इतकं सार करूनही त्या प्रवासात माणसं आनंदी होतात का? त्याचे उत्तरे नाही असेच असते. माणूस आनंदी केव्हा होतो? तर जेव्हा त्याच्या अपेक्षा पूर्ण होतात. मात्र माणसांला एकदा हवे ते मिळाले की, पुन्हा पुढील प्रवासाच्या दृष्टीने असलेला प्रवास थांबतो.

आपण प्राप्त केलेली एखादी गोष्टी ही जीवनभर आनंद देणारी नसते.ती जेव्हा प्राप्त होते तेव्हा त्या क्षणाला आनंद प्राप्त होतो, पण पुन्हा पुढील प्रवासाच्या दृष्टीने अपेक्षा उंचावत जातात.त्या पुन्हा पूर्ण झाल्यातर पुन्हा आनंद निर्माण होतो.आपण केवळ क्षणभर तुप्ततेचा आनंद प्राप्त झाला , तर जीवनभराचा आनंद कसा मिळणार ? म्हणून जीवनभर आनंद हवा असेल तर जीवन शिकण्याचा प्रवास अत्यंत आवश्यक आहे. असा शिकण्याचा प्रवास जेव्हा थांबतो तेव्हा जगणे थांबलेले असते.जगण्यात नवे काही नसेल तर त्या जगण्याचा कंटाळा येणारच.रोज नवे काही शिकणे झाले तरच जीवनात आनंद प्राप्त करणे शक्य आहे.त्यामुळे शिकणे म्हणजे साक्षरता नाही तर आनंदाचे डोई आनंद तरंगचा अनुभव घेणे आहे.

- Advertisement -

जगणे म्हणजे केवळ प्रपंच,संपत्ती,धन,दौलत,गाडी,माडी प्राप्त करणे नाही.हे सारे प्राप्त करणे म्हणजे जीवनाची समृध्दता नाही. जीवनभऱ अध्ययन करत राहणे ही खरी जीवन समृध्दतेची व्याख्या आहे.जी माणसं सतत शिकत राहतात ती माणसं जीवनात आनंद अनुभव घेत राहतात.आनंद प्राप्तीचे साधन म्हणजे शिकत राहणे आहे.आपल्याला जीवनात सुख,समाधान मिळत नाही याचे कारण निरंतर शिक्षणाचा विचार आपल्यात प्रतिबिंबीत होत नाही. अनेकदा शिकलेली माणसं जीवनात अत्यंत दुःखी दिसतात , मग अशिक्षित माणसं विचारतात ,की शिकणे हे जर आनंददायी असेल तर जी माणसं शिकली आहेत, पदवी,पदव्यूत्तर पदवी धारण केली आहे ती माणसं तर अधिक आनंदी असायला हवी आहे. मात्र शिकलेली माणसं तर अधिक दुःखी असल्याचा अनुभव आपल्या भोवती दिसतो आहे मग शिकणं आनंदी कस? शिकण्यात आनंद आहे मात्र एकदाच शिकले आणि जीवनभर आनंद असे काही घडत नाही.

सतत शिकत राहीले तरच सतत आनंदाचा अनुभव येत राहील. आज शिकलेली माणसं अखंड ज्ञानाची साधना करत नाही. त्यामुळे शिकूनही आपल्या जीवनभराचा आनंद त्यांना प्राप्त करून घेता आलेला नाही.आपण जेव्हा शिकत असतो तेव्हा ते शिक्षण का ? असा प्रश्न पडतो तेव्हा त्याचे उत्तर असते , की जीवनातील समस्यांचे निराकरण करण्याची सक्षमता निर्माण व्हावी ही त्यामागील अपेक्षा असते.शिकल्यानंतर निश्चितपणे काही प्रमाणात समस्येचे निराकरण करण्यात यशही मिळते. शिकत असताना आपण जी माहिती अथवा ज्ञान प्राप्त करतो त्या आधारे जीवनात आनंद मिळत असतो.आपण जर जीवनात शिकण्याचा विचार सातत्याने केला नाही तर आनंदातही सातत्य राहत नाही.शिकणे थांबते तेव्हा जीवनात दुःखाचा उदय होण्यास प्रारंभ होत असतो.शिकणे म्हणजे जीवन चैतन्याचा प्रवास आहे.कृष्णमूर्ती म्हणतात , की शिक्षण थांबले की माणसं यंत्र बनून जातात.आपण यंत्राला समजावून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला हे दिसते ,की यंत्र कार्यरत राहते मात्र त्याच्यात कोणताही भाव असत नाही.एखादे यंत्राने अधिक चांगले काम केले,त्याने अधिक उत्पादन तयार केले म्हणून त्याच्या आनंदाचे भाव निर्माण होत नाही.एखाद्यावेळी चुकीच्या पध्दतीने काम यंत्राने केले म्हणून त्या यंत्राला दुःखाचा भाव निर्माण होत नाही.भावशुन्यता हे यंत्राचे वैशिष्टये आहे. तसे माणसाचे आयुष्याचा प्रवास घडण्याची शक्यता आहे.जीवन यंत्रासारखे झाले तर प्रेम कसे निर्माण होणार ? माणसांचे बंध कसे निर्माण होणार..? नात्याची वीण घटट कशी होणार ? हे प्रश्न निर्माण होतात.यंत्रासारखे जीवन ज्याच्या वाटयाला येते त्याच्या आय़ुष्याला कोणताही अर्थ प्राप्त होणार नाही.यंत्रासारखे जीवन म्हणजे निराशाच असते.त्यामुळे शिक्षणातून माणूस घडवायचा असतो..यंत्र नव्हे हे लक्षात घ्यायला हवे.

माणसाला यंत्रासारखे जगता येत नाही आणि त्याने कितीही ठरवले तरी तो जगू शकत नाही.माणूस हा समाजशील प्राणी आहे.त्यामुळे त्याला समाजात राहण्याशिवाय कोणताही पर्याय हाती राहत नाही.त्याच्या समाजशीलतेच्या दृष्टीने प्रवास घडावा यासाठी शिकणे महत्वाचे आहे.जीवनात औपचारिक शिकणे म्हणजे शिक्षण नाही.प्रत्येक टप्प्यावरती जीवनाचा प्रवास महत्वाचा असतो.त्यामुळे त्या त्या टप्प्यावरती शिकत राहीलो तरच आपल्याला उत्तम कौशल्य प्राप्त होण्याची शक्यता आहे.जो मामूस जीवनभर शिकत राहतो तोच माणूस जीवनभर आनंदाने जगत राहतो.सातत्याने शिकण्याचा प्रवास केल्यांने तो ज्ञानाने श्रीमंत बनत जातो.माणसं जितकी ज्ञानाने श्रीमंत होतील तितक्या मोठया प्रमाणावर त्यांचे जीवन आनंदाने भरून जाईल.अनेकदा भौतिक संपत्तीत सुख शोधणा-या माणसाला ज्ञानाच्या साधनेत आनंद वाटणार नाही..पण ज्याला ज्ञानाची ओढ आहे त्याला इतर कशातही समाधान वाटणार नाही.ख-या आनंदाच्या वाटा या शिकण्यात दडलेल्या आहेत हे लक्षात घ्यायला हवे.आपल्या इतिहासाच्या पानावरील मजकूर जाणून घेण्याचा प्रयत्न केला , तर त्यात अनेक फकीर असलेली माणसं आनंदाची श्रीमंती अनुभवत होती.ज्यांच्याकडे अधिक पैसा होता ती माणसं तो अधिकचा मिळविण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या आनंदाला पारखे होत होती. ज्यांच्याकडे एक रूपया असतो त्यांना शंभर रूपयाची अपेक्षा नसते, मात्र ज्यांच्याकडे नव्यान्नव रूपये आहेत त्यांना मात्र एक रूपयाची अधिक अपेक्षा असते. त्या एक रूपयाचा पाठलाग करत आपल्याकडे असलेल्या नव्यान्नव रूपयाचे सुख माणूस गमावून बसतो. त्यामुळे सुखाचा शोध ज्ञानाच्या दिशेने असेल तर ज्ञान जसे जसे उंचावत जाईल त्याप्रमाणात आनंदाची वाटही समृध्द होत जाते.

ज्ञानाच्या वाटेचा प्रवास आजवर ज्यांनी केला त्या सर्वांनाच जीवनात आनंदाची अनुभूती आलेली आहे.जगप्रसिध्द विचारवंत,तत्वज्ञ,वैज्ञानिक यांना कधीच पैशाच्या श्रीमंतीचा मोह झाला नाही.जेव्हा रेडीअमचा शोध लागला तेव्हा जगभरातील अनेकाना आनंद झाला होता.पुढे त्याचा उपयोग कॅन्सरवर उपचार करण्यासाठी केला जाऊ लागला.त्यामुळे अनेकांचे प्राण वाचण्यास मदत झाली होती.तेव्हा मादाम क्युरी आणि पेरी क्युरी यांनी सदरच्या संशोधनासाठी अनेकांनी पेंटट घेण्याचा आग्रह केला होता.तसे घडले असते तर क्युरी परीवाराला कोटयावधी रूपये मिळाले असते , मात्र त्यांनी पैशासाठी पेंटट घेण्यास नकार दिला होता. मानवाचे कल्याण महत्वाचे आहे हे त्यांनी स्वीकारलेले तत्व होते.त्यांच्यासाठी पैसा महत्वाचा नव्हता तर ज्ञानाची साधना महत्वाची होती.त्यांना कोणत्याच पुरस्काराचा मोह देखील झाला नाही.अनेक पुरस्कार मिळूनही त्यांना त्यामुळे फारसा परिणाम त्यांच्या जीवनावर झालेला दिसून येत नाही.जीवनात काय महत्वाचे आहे हे त्यांनी जाणले होते.शिकत राहिल्याने माणसात परिवर्तन होत हे आजवर अनेकांच्या जीवन प्रवासात दिसून आले आहे.शिकल्यानंतर परिवर्तन झाले नसेल तर तो काही शिकण्याचा दोष नाही तर जो शिकला आहे त्याचे शिक्षण होऊ शकले नाही.

आपल्याकडे आजही अनेक संत, ऋषी, मुनी आपण पाहतो तेव्हा त्यांच्या चेह-यावर दिसणारा आनंद पाहिला, की तो आनंद कोठून येतो असा प्रश्न पडतो.त्यांच्याकडे कोणतीही गाडी नाही, घर नाही की महाल नाही.प्रतिष्ठा,सन्मानाची अपेक्षा देखील नाही.त्यांचा प्रवास म्हणजे केवळ पायपीट असते.जीवनात कोणतीही संपत्ती नसताना देखील एखादा फकीराच्या चेह-यावर आनंदाच्या श्रीमंतीचे कसे दर्शन घडते ? असा प्रश्न अनेकदा कोणालाही पडू शकतो.अशी ज्ञानाची श्रीमंत लाभलेली अनेक माणसं आपल्या भोवती दिसतात.त्यामुळे शिक्षणाचा प्रवास म्हणजे केवळ पदवीपर्यंत शिक्षण नाही.शिकणे म्हणजे पदवीला अधिक गुण मिळवत नोकरी प्राप्त करणे नाही .आपण जेव्हा शिक्षण घेत असतो तेव्हा प्रत्येक माणसाच्या अंतकरणात जीवनाच्या प्रवासात जीवनभर शिकत राहणे महत्वाचे आहे.ज्या माणसांच्या आयुष्यात जीवनभर शिकण राहण्याची प्रेरणा निर्माण झाली त्याचेच खरे शिक्षण झाले असे म्हणायला हवे. असा शिक्षणाचा प्रवास किती जनाच्या वाटयाला आला हा खरा प्रश्न आहे. निरंतर शिक्षणाची प्रेरणेचा शिक्षण विचार ज्यांच्या वाटयाला आला आहे त्या माणसांचे जीवन म्हणजे आनंदाचा झुला बनून जाते. जेव्हा जीवनात आनंदाचा अनुभव येत नाही याचा अर्थ शिक्षण थांबले आहे असे समजावे.

आपण जेव्हा आपल्या भोवतीच्या अनेक माणसांना अनुभवतो, त्यात महान कवी, चित्रकार, संगीतकारांना जाणत असतो. ही माणसं आपल्या क्षेत्रात करत असलेल्या साधनेने एका उंचीवर पोहचलेली असतात. त्यांनी पुढील जीवनासाठी हवे ते सर्व मिळवलेले असते, पण तरीसुध्दा ही माणसं स्वतःच्या केलेल्या कामावर कधीच संतुष्ट असत नाही.त्यांच्या मनात सर्वोच्च अशा ज्ञानासाठीची अतृप्तता कायम असते.त्यांना असे काही अव्दितीय प्राप्त करायचे असते की,त्यासाठी ते सतत साधना करत शिकत असतात.त्याउलट आपल्या सामान्यांचा जीवनाचा प्रवास सुरू असतो.शिक्षण घेत असताना शिकायचे कुठपर्यंत तर केवळ परीक्षा होईपर्यंत.परीक्षा झाल्यावर,कामधंदा झाल्यावर शिकणे आपोआप थांबून जाते.कृष्णमूर्ती म्हणतात , की आपले शिक्षण परीक्षा झाल्या की आपोआप थांबते . ख-या अर्थाने शिकणे कधीच थांबता कामा नये.जे थांबते ते खरे शिक्षण नाही .ज्यांने शिक्षण घेतले आहे त्याच्यामनात शिकण्याची ओढ निर्माण होत असते. शिक्षणामुळे जीवनात चैतन्य निर्माण होत असते.अध्ययन करणे,स्वअभ्यास करणे ही अत्यंत जोमदार व चैतन्यदायी प्रक्रिया आहे.जेथे स्वअभ्यासाची वृत्ती माणसाला जगण्याची उमेद निर्माण करत असते.आपल्याला पुस्तकाच्या बाहेर जाऊन अभ्यास करण्याची गरज आहे.अभ्यास म्हणजे केवळ पाठयपुस्तकांचा अभ्यास किंवा औपचारिक शिक्षणापुरता विचार नाही.जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर यशासाठी अभ्यास करण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे.असा सातत्याने अभ्यास सुरू ठेवला तरच व्यक्तीमत्वाला पैलू पडू शकतील.त्यामुळे व्यक्तीमत्वाच्या अत्यंत लहान लहान गोष्टींचा अभ्यास करण्याची गरज व्यक्त होते.आपल्याला समृध्द व्हायचे असेल तर कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालत नाही.प्रत्येक गोष्ट महत्वाची असते हे लक्षात घ्यायला हवे. शिकणे याचा अर्थ विशिष्ट संस्कारातून मुक्त होणे आहे. आपण जेव्हा अभ्यास करत नाही तेव्हा आपल्याला कोणी काही सांगते तेच खरे ही भावना दृढ होते.त्यामुळे आपण सत्यापर्यंत पोहचत नाही.सत्याची ओळखही होत नाही.सत्यापासून दूर गेलो तर आपण योग्यवाटेचा प्रवास करू शकणार नाही.त्यामुळे आपण परंपरा,रूढीचे पाईक बनत जातो.आपल्या वाटा समृध्दतेच्या होण्याची शक्यता नाही.महात्मा फुले, सयाजीराव गायकवाड,ड़ॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सारखी माणसं पंरपराच्या चौकटी मोडत नव्या माणूसपणाच्या विचारधारेवर स्वार होत माणूसपण पेरत गेले . ते केवळ सातत्याने सुरू असणा-या अभ्यासामुळे.अभ्यासाची सवय माणसाला अधिक प्रकाशमय वाटांचे दर्शन घडवत असते. जगातील माणसं सर्वच समान आहेत असे मानले जात असताना देखील जगामध्ये माणसं भारतीय,अमेरिकन,ब्रिटीश,रशियन ,चिनी असे संस्कार झाल्याने जग विभागले गेले आहे.आपण सारे एक आहोत.हे विश्वची माझे घर अशी भावना विकसित करण्याची गरज आहे.आपण एक आहोत ही भावना आपण जसे शिकत जातो त्याप्रमाणे ती भावना दृढ होत जाते.शिक्षणाच्या अभावामुळे आपल्याला आपला धर्म,जात महत्वाची वाटते.आपण आपला धर्माचे तत्वज्ञान शिकत गेलो तरी आपल्या मनात इतर धर्माबददलचा वाईट विचार आणि व्देषभावना निर्माण होत नाही.आपल्या धर्माचा चांगला उपासक बनने म्हणजे इतर धर्माचा चांगला उपासक बनने आहे.त्यामुळे जीवनात जी माणसं सतत शिकता आहेत ती माणसं सत्याच्या वाटेने जाणे पसंत करतात.त्यांना व्देष,मत्सर,लोभ,राग यांचा लवलेशही मनात निर्माण होत नाही. आपल्यातील शिक्षणाच्या अभावामुळे भेदाभेद निर्माण होऊन जगात युध्द होता आहेत.युध्दात हजारो लोक मारले जाता आहेत.युध्द म्हणजे क्रुरता आहे , दुःख आहे.त्यामुळे कृष्णमृर्ती म्हणतात ,की “जेव्हा शिक्षक व शिकवला जाणारा विद्यार्थी हे दोघेही शिकणे या शब्दांच्या सखोल अर्थानिशी शिकत आहे.जेव्हा दोघेही शिकत असतात तेव्हा शिकवणारा नसतो.फक्त शिकणे असते.शिकणे मेंदूला व विचाराला प्रतिष्ठा,सन्माननिय स्थान,सामाजिक दर्जा यापासून मुक्त करणे.शिकणे माणसांमाणसात समता प्रस्थापित करत असते ” .आपल्याला हवी असलेली प्रतिष्ठा ,सन्मानाची अपेक्षेची भावना संपत जाते.जी माणसं ज्ञानी असतात ती अत्यंत सामान्यांन सारखे जगताना दिसतात.त्यांच्या मनात कोणताही भाव असत नाही.आपण माणूस आहोत हीच भावना महत्वाची वाटत जाते.आपल्या आयुष्यात आपणाला माणूसपणाच्या उंचीवर पोहचण्याचा प्रयत्न शिकलेली माणसं सातत्याने करत असतात.

शिकत असताना स्वतःकडे पाहा.स्वतःकडे प्रतिक्रिया आणि प्रतिकाराशिवाय पाहता तेव्हा ते पाहणे कार्यरत होते.तुमचा भ्रम,खुळचटपणा,अग्नीप्रमाणे भस्म करून टाकते.शिकणे थांबलेला मेंदू यंत्रवत होतो.तो काम करतो पण विचार करत नाही.स्वःविचाराची भावना संपुष्टात आलेली असते.तो दोरीला बांधलेला जनावरे प्रमाणे असतो.केवळ दोरीच्या लांबीच्या क्षेत्रात फिरतो.आपले तसेच आहे.आपण त्या अदृश्य दोरीच्या भोवती फिरत असतो.जी माणसं स्वतःचे सुख,समाधान,स्वतःची आवड,इच्छा,स्वतःच्यामध्ये व्यग्र असतो.ते खुप मर्यादित असून त्यामुळे जीवन दुःखात गुंतलेले आहे.शिकण्यापासून दूरावल्याने माणसांचे विचारविश्वही मर्यादित होते.विश्व जितके छोटे तितके नुकसान अधिक असते.त्यामुळ आपल्याला शिक्षणाची वाटच अधिक समृध्दतेने जगण्याचा अनुभव दिल्याशिवाय राहणार नाही.ती वाट आपल्याला समाजात समतेची वाट दाखवेल.जग एका शांततेच्या अनुभवाशी नाते सांगू लागेल.माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा शिकलेल्या माणसांमध्ये अधिक असते..तेच शिकण्याचे ध्येय आहे.

संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या