शिक्षणाविषयी जेव्हा चिंतन केले जाते तेव्हा शिक्षणातून मूलभूत स्वरूपाचे परिवर्तन अपेक्षित असते. हे परिवर्तन व्यक्तीगत जीवनासोबत सामाजिक देखील अपेक्षित असते. शिक्षणाने मानवाचे माणसात रूपांतर करण्याची अपेक्षा असते. माणसांच्या आत जे दडले आहे त्याला बाहेर काढणे आणि त्याच्या विकासाची अपेक्षा असते. शिक्षणातून स्वतःला जाणून घेण्याची प्रक्रिया घडायला हवी असते. स्वतःचा शोध शिक्षणातून अपेक्षित असताना शिक्षणाची प्रक्रिया स्वतःला शोधण्यात अपय़शी ठरली आहे. वर्तमानातील शिक्षण माणसाला आत्मशोध घेण्यास प्रेरित करत नाही. जेथे आत्मशोधची वाट चालणे घडत नाही तेथे समस्या निर्माण होत असतात.
वर्तमानात समाजात ज्या म्हणून समस्या निर्माण झालेल्या आहेत त्यांच्या मुळाशी ख-या शिक्षणाचा अभाव हेच कारण आहे.त्यातूनच विविध प्रश्नांची निर्मिती झाली आहे. व्यक्तीला शिक्षणातून स्वतःचा शोध घेता आला तर बरेच प्रश्न सुटू शकतात.शिक्षणाने माणसाला आत डोकावण्यास प्रेरित केले नाही तर त्याऐवजी सतत बाहेर डोकावण्यास प्रेरित केले आहे. बाहय ओढ ही माणसाच्या मनात सतत अतृप्तची भावना निर्माण करते.बाहयतेचे प्रदर्शन तृप्तता नाही तर अतृप्ततेची भूक निर्माण करत असते.ही भूक माणसाला लोभाच्या दिशेने घेऊन जाते. मनात लोभाचा भाव निर्माण झाला की, भ्रष्टाचाराचा जन्म होण्यास मदत होते. मात्र ज्यांना शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचा अंतरिक परिचय झाला त्यांच्या वाटयाला लोभाचा स्पर्श देखील आला नाही.जेथे लोभ नाही तेथे आनंद,सुख,समाधान ठरलेले आहे.आपले कर्तव्य नेमके काय आहे ? याची जाणीव झाल्याने तो मार्ग चालणे पसंत केले जाते.शिक्षणातून प्रतिष्ठा,सुरक्षितता अपेक्षित नाही तर त्यापलिकडे शिक्षणाची वाट आहे ती चालण्यासाठी स्व ची ओळख महत्वाची ठरते.कृष्णमूर्ती म्हणतात , त्याप्रमाणे “ शिक्षण व्यवस्थेच्या प्रचंड मोठया यंत्रातून ठराविक साच्याची माणसं बाहेर पडता आहेत.त्यातून सुरक्षिततेच्या हव्यासाने लोक पछाडलेले आहे.लौकिक प्रतिष्ठा प्राप्त करणे हेच माणसांचे ध्येय बनत चालले आहे ”.जी वाट शिक्षणाची नाही तीच वाट चालत राहिल्याने जीवन परिवर्तनाची वाट चालणे घडत नाही.आपण शिक्षणातून जे अपेक्षित नाही तेच अपेक्षित करत असू तर ते चुकीचेच मिळण्याची शक्यता आहे.
कृष्णमूर्ती यांनी पारंपारिक शिक्षणावर आक्षेप नोंदवले आहेत.त्यांनी जे आक्षेप नोंदवले आहेत. त्याचा विचार केला तर वर्तमानात आपल्याला जे काही भोवतालमध्ये नकारात्मक आणि वाईट दिसते आहे ते शिक्षणाच्या प्रक्रियेतील मूळ हेतूच्या अभावाचे कारण आहे.त्यांनी शिक्षणातील दोष दाखविताना त्याचे परिणामही विषद केले आहे. आपण जर शिक्षणातील दोष दूर करण्याचा प्रयत्न केला तर समाजाचे उत्थान झालेले निश्चितच अनुभवास य़ेईल.शिक्षण व्यवस्था व्यक्तीच्या बुध्दीला कितीप्रमाणात स्वातंत्र देते हा खरा प्रश्न आहे.आज शिक्षणात स्वतंत्रपणे विचार करायला किती शिकवतो ? हा खरा प्रश्न आहे.साधारण पणे आपल्या पारंपारिक शिक्षणातील वाटा या अनुकरणाच्या आहेत.आपण विद्यार्थ्यांना नवा विचार करायला फारशी संधी देत नाही. प्रश्न आणि त्याची ठराविक साच्यातील उत्तरे देता यायला हवी हिच वर्तमानातील शिक्षणाची अपेक्षा आहे.त्या चौकटीच्या बाहेर जाऊन आपल्याला विचार करता यायला हवा असा विचार पेरला जात नाही.कोणीतरी शोधलेल्या वाटांचा अभ्यास करणे इतकेच काम जणू उरले आहे.त्या वाटांच्या पुढे जाण्यासाठीचा विचार देखील करणे घडत नाही.यापूर्वी लोक ज्या वाटेने गेले आहेत त्याच वाटेने चालत राहा असे सांगत शिक्षणाचा प्रवास सुरू राहतो. स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी आणि त्या वाटा चालण्यासाठी प्रेरणा,शक्ती देण्याची व्यवस्था वर्तमानात नाहीत हे वास्तव अनेकदा अनुभवले आहे.उलट वेगळा विचार करणारा विदयार्थी आपल्या शिक्षणात बंडखोर वाटतो.त्याला व्यवस्था स्वीकारत नाही.असा बंडखोर विद्यार्थी एखाद्या शिक्षकाच्या वाटयाला आला तर त्याच्याही मनात निराशा येते.उलट असा वेगळा विचार करणारा आणि त्याच मळलेल्या वाटेने जाणा-यांपेक्षा नव्या वाटा धुंडळणा-यांचे स्वागत करणारी व्यवस्था उभी करण्याची गरज आहे. अशा नव्या वाटांचा प्रवास नकोच असतो.पृथ्वी सूर्याभोवती फिरते असा सिध्दांत मांडणारे कोपरनिकस यांना किती त्रास सोसावा लागला हे सर्व जग जाणते.नवा विचार विज्ञानाच्या सिंध्दाताने जरी मांडला गेला असला तरी पंरपरेच्या वाटेच्या विरोधात होता.त्यामुळे अशा वाटा चालणा-यांना नेहमीच त्रास सोसावा लागला आहे.ती वाट सत्याची असली तरी त्रास ठरलेलाच असतो.आपल्या व्यवस्थेला स्वतंत्रपणे विचार करणारी व्यवस्थाच मुळी नकोशी आहे.कोणातरी स्वतंत्र विचार करत असले तर त्याला नाकारण्यासाठी अनेक जन पुढे येतात.एकदा एक तरूण म्हणाला ,की मुली जर मुलांचे गणवेश घालत असतील तर मी मुलींचा गणवेश घालणार असे घरातील लोकांना सांगितले.पुरूष असलेल्या तरूणाने मुलींचा गणवेश घालणे हे धक्कादायकच होते. याने असे केले तर लोक काय म्हणतील असे त्यांना वाटू लागले. घरच्यांनी त्याच्या भूमिकेला विरोध केला, पण विरोध का ? असा त्याने सवाल केला. मुली मुलांचा गणवेश घालत असतील तर आम्ही मुलांनी का मुलींचा गणवेश घालायचा नाही ? या प्रश्नांला तसे कोणतेच उत्तर नव्हते.त्यामुळे त्या तरूणाने अखेर विरोध नाकारत आपली भूमिका कायम ठेवली.घरचेही आपल्या भूमिकेवर ठाम होते.आता या संघर्षाला कोणतेही उत्तर मिळत नव्हते. मुलांला विरोध झाल्याने त्यांने मग घरच्यांना सरळच सांगितले ,की तुम्ही मुलीचा गणवेश घालू देणार नसाल तर मग मी कोणताच गणवेश घालत नाही असे त्यांनी बजावले. आता घरच्यांच्या समोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा घरच्यांनी विचार केला आणि त्यांनी अनुमती देण्याचा निर्णय घेतला. काहीच घालणार नसाल तर त्यापेक्षा किमान मुलींचे गणवेश तरी घालतो आहे ना मग किमान ते तरी घालू द्यावे असं ठरवत त्यांनी माघार नोंदवली होती.तरूणाचा प्रश्नही साधाच होता. कर्मवारी भाऊराव पाटील यांच्या आय़ुष्यातही असे प्रसंग आले होते.त्यांनी देखील ज्या नियमांना कोणताही तात्विक आधार नाही त्याचे पालन करायचे नाही असे जाहीर केले होते.जे करायचे ते का ? असा प्रश्न पडणे म्हणजे शिक्षणाचा आऱंभ असतो.पण असे प्रश्न विचारायचे नसतात अशीच पेरणी होत असते.प्रश्न विचारण्याची वृत्ती ही स्वतंत्र विचाराकडे जाणारा प्रवास असतो. असा स्वतंत्र विचार आपल्याला चालतो का ? असा प्रश्न आपणच आपल्याला विचारायला हवा.शिक्षणात असा विचार करणे म्हणजे जणू धोक्याची वाट समजली जाते.आपण जे काही करू पाहतो आहोत,ज्या पंरपरांच्या वाटा चालू पाहतो आहोत त्या का चालायच्या ? हे विचारण्याची किमान हिम्मत पेरण्याची गरज आहे.मात्र दुर्दैवाने ही हिम्मत पेरण्यात फारसे यश मिळू शकले नाही हे देखील वास्तव आहे.
कृष्णमूर्ती म्हणतात , की पंरपरेने चालत आलेल्या साचेबंद शिक्षणपध्दतीमुळे स्वतंत्र बुध्दीने विचार करण्याची शक्ती आपण खुरटून बसलो आहोत. हा विचार हरवल्याने नवे काही निर्माण करण्यात आपल्याला फारसे य़श मिळाले नाही.आपल्याला स्वातंत्र्याच्या वाटा चालण्याची नेहमीच भिती वाटत आली आहे. आपले शिक्षण आपली वर्तमानकालीन असलेली परीस्थिती , व्यक्तीच्या जीवनावर असलेले अनुवंशिक संस्काराने कसे जखडले जाते हे समजनू घेण्यास कोणत्याही प्रकारे साहाय्य करत नाही.आपण जे काही करतो आहोत ते का करायचे हे शिकणे हे शिक्षण आहे.संस्काराच्या नावाखाली जे काही सुरू असते त्यासंदर्भाने आपण असे प्रश्न उपस्थितीत करत व्यवस्थेला विचारायचे नसतात असेच काही बिंबवले गेले आहे.शिक्षणाचा प्रवास व्यापक व सर्वांगीन विकासाच्या प्रक्रियेने होताना दिसत नाही.आपले शिक्षण पोटासाठीचे कौशल्य विकसित करण्यासाठीचा कल दर्शवते आहे.आपल्या पदवी शिक्षणातून कोणत्या तरी एका विषयाचे कौशल्य प्राप्त झालेले असते.अर्थात त्या विषयाचे देखील पुरेसे ज्ञान नसतेच.त्या विषयातील एखाद्या घटकाचा देखील पुरेसा अभ्यास नसतो असे दुर्दैवाने चित्र आहे.त्यामुळे आपली पदवी,पदविका ज्या विषयाची आहे त्या विषयाचे देखील पुरेसे ज्ञान शिक्षण व्यवस्था देऊ शकत नाही मग समग्रतेने विकासाची प्रक्रिया कशी घडणार ? शिक्षणातून ज्ञानाची निर्मिती घडते का असाही प्रश्न विचारला गेला तर त्याचे उत्तरही नकारात्मकच येते.आपला सारा प्रवास हा ज्ञानाऐवजी माहितीच्या दिशेनच घडतो आहे.त्यामुळे शिक्षणातून अपेक्षित आनंद निर्माण होण्यात आपल्याला अपय़श आले आहे. आपले शिक्षण एकांगी स्वरूपात प्रवास करते आहे . एकांगी शिक्षण हे नेहमीच दुःख आणि संघर्ष यांचीच निर्मिती करत असते. शिक्षणातून केवळ एखादे विशिष्ट कौशल्य प्राप्त करणे एवढाच अर्थ शिक्षणाला प्राप्त झाला आहे.व्यक्तीची प्रज्ञा जागृत करण्याऐवजी तिला एखाद्या विचाराची गुलामगिरी पत्कारायला शिक्षण शिकवत आहे.त्यामुळे समग्र व्यक्तीमत्वाचे साकल्याचे दर्शन घडताना दिसत नाही.वर्तमानातील शिक्षणाचे अत्यंत यथार्थ वास्तवाचे दर्शन कृष्णमूर्ती त्यांच्या विचारातून दर्शित होत असते.शिक्षणातून आपण विद्यार्थ्यांची बुध्दिमत्ता मापन करण्याचा प्रयत्न करत आहोत. वर्तमानात परीक्षा आणि पदव्यांची फुटपटटयांनी आपण माणसांची बुध्दिमत्ता मापू लागलो आहोत. या मापन पटटया खरच विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे मापन करण्यास सक्षम आहेत का ? आजच्या या मापन पटया विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाचा शोध घेता आहेत का ? त्याच्या व्यक्तीमत्वाची शोध घेण्यास त्या सक्षम आहेत का ?.आपली मूल्यमापन पटटी ही कोणत्याही विद्यार्थ्याच्या व्यक्तीमत्वाचे पुरेशे आणि व्यापक असे मूल्यमापन करू शकत नाही.वर्तमानातील होणारे मूल्यमापन देखील मर्यादित आहेत.बुध्दिमापनाच्या खोटया कसोटयांचा स्वीकार केल्याने आत्मवंचना करणारी धूर्त,हिकमती मनेच आपण पैदा करत आहोत.त्याचे परिणाम समाज म्हणून आपण भोगत आहोत.आपल्या सा-या जीवनाची उंची आपण हरवून बसलो आहोत.आपले जीवन आणि जीवनाचे मोलही आपण हरवलो आहोत.जीवनाला भिडून जीवनाचा अर्थ जगण्याची कुवत म्हणूनच आपल्या ठिकाणी राहिलेली नाही याचे कारण आपले शिक्षण व्यापकतेचा आणि शिक्षणाचे ध्येयाच्या दिशेने प्रवास करू शकलेले नाही हे समाजाचे वास्तव समजावून घेण्याचा प्रयत्न केला की पुन्हा पुन्हा समोर येते.
समाजात वाईट घडते आहे.व्यक्तीमत्वाला खुजेपण आले आहे.त्या खुजेपणात बरेच काही हरवले आहे. अशा परीस्थितील शिक्षणातील अनुभवाची व्यापकता वाढवणे,स्वातंत्र्याचा विचार रूजवणे आणि जीवनाचा व्यापक अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न न करता संकुचित पणाचा जो प्रवास सुरू आहे त्यामुळे आपल्या समाजाचे भलेपण हरवले आहे.त्यामुळे सुधारणा करायची असेल तर प्रत्येक माणसांवर सुधारणेचे प्रयोग करण्याऐवजी शिक्षण व्यवस्थेवरच प्रयोग करण्याची गरज आहे.व्यवस्था सुधारली तर समाजात परिवर्तन होण्याची शक्यता अधिक असते.त्यामुळे शिक्षणाशिवाय आपण कोणतेही परिवर्तन करू शकणार नाही हे लक्षात घ्यायला हवे.
– संदीप वाकचौरे
(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)