शाळा महाविद्यालयांचे आस्तित्व हे मुळात माणसांच्या अंतकरणात शुध्दता निर्माण करणे, शहाणपण, विवेक पेरण्यासाठी निर्माण झाले आहे. शिक्षणामुळे समाजात संवादांची प्रक्रिया गतीमान करण्याची अपेक्षा आहे. समाज मनातील भेदाभेद संपुष्टात आणण्यासाठीचा विचार शिक्षणातून रूजायला हवा. शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीत अपेक्षित परिवर्तन झाले तर आपल्या समाजातील संघर्ष संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणाचे मूलभूत कार्य काय आहे हे स्पष्ट करताना कृष्णमूर्तीं सारखा विचारवंत म्हणतात की, “आपल्या जीवनातील प्रत्येक कृत्यामागच्या मनोव्यापाराचे स्वरूप समजून घेण्यास मदत करणे हे शिक्षणाचे कार्य आहे” दुर्दैवाने शिक्षण घेत असताना केल्या जाणा-या कृत्यामागच्या मनोव्यापार जाणून घेण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट आपापल्या सोईने जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
शिक्षण घेतलेल्या प्रत्येकाच्या अंतकरणात चांगले आणि वाईट या संदर्भातील विचार सुस्पष्ट असायला हवेत.मात्र माणसां माणसाला जाणून घेण्याचा प्रयत्न केला तरी तसे घडत नाही.माणसं आपल्या मनोव्यापाराच्या संदर्भाने स्वतःलाही जाणून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही.त्यामुळे त्या दिशेने शिक्षणाचा प्रवास सुरू झाला तर मूलभूत परिवर्तन शक्य होईल.प्रत्येकाने आपल्या मनाच्या स्वरूपाचे सूक्ष्म अवलोकन करणे, जीवनाच्या कुठल्याही एका अंगाला अवास्तव महत्त्व न देता जीवनाचे समग्र दर्शन घडवणे हे शिक्षणाचे काम आहे.आपल्याकडे शिक्षणाचा विचार हा केवळ लेखन,वाचन,गणन पुरता केला जातो.या क्षमता प्राप्त झाल्या की शिक्षण झाले असे मानले जाते.मात्र शिक्षणातून समग्र आणि समृध्द विकासाचे चित्र जाणून घ्यायला हवे आणि शिक्षणातून जीवनाचे समग्र दर्शन घडायला हवे.
शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची विकासाची प्रक्रिया ही समग्र असल्याचे दिसत नाही , तर त्या उलट ती एकांगी असल्याचे दर्शन घडते. शिक्षण हे माणसांच्या आनंदाच्या वाटा निर्माण करण्यासाठी आहे.व्यक्तीच्या विकासाच्या दृष्टीने शिक्षणाचे उपयोजन अपेक्षित असतेच.विद्यार्थ्यांच्यामध्ये द़डलेल्या सुप्तगुणांचा विकास अपेक्षित आहे.विद्यार्थ्यांच्यामध्ये ज्या क्षमता आहे त्या क्षमतांचा विकास शिक्षणातून व्हायला हवा.एखादया विद्यार्थ्याला संगितात अभिरूची आहे त्याच्या अभिरूचीचा विचार शिक्षण प्रक्रियेत कितपत केला जातो हा प्रश्न आहे.आपल्याकडे मुळात असणा-या विविध कला गुण विकासाची प्रक्रिया शिक्षणाचा भाग बनायला हवा.विद्यार्थ्यांचे कलागुण हे जीवन विकासाचे भाग मानले जात नाही. एखादा विद्यार्थी उत्तम चित्र काढतो,कोणी तरी उत्तम गातो,कोणी तरी उत्तम वाद्य वाजवतो,कोणी अवांतर वाचन करतो..कोणी उत्तम माती काम करते,कोणी उत्तम काष्ठ काम करते..कोणी उत्तम अभिनय करते या गुणांचा विकासासाठी शाळांमध्ये किती संधी उपलब्ध होते हा खरा प्रश्न आहे.आपले शिक्षण समग्र विकासासाठी पुरेशा प्रमाणात प्रयत्न करताना दिसत नाही. समाज मनालाही त्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या बौध्दिक विकासाची प्रक्रियाच अधिक अपेक्षित आहे.त्यामुळे शिक्षण मार्ककेंद्रीत झाले आहे.परीक्षेत अधिक मार्क मिळायला हवेत.विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या इतर गुणांमुळे विद्यार्थी हुशार ठरण्याची शक्यता नाही. परीक्षा दिलेल्या विषयात त्याला जर उत्तम मार्क मिळाले तर त्याचा विकास झाला असे मानण्यात येते..मग त्याच्यामध्ये असलेल्या इतर सुप्त गुणांचे काय असा प्रश्न उरतोच.आज आपल्याकडे शिक्षण घेतल्यानंतर व्यक्तीला अनेक कौशल्य समाजात जाऊन शिकावे लागतात.शाळेतील शिक्षण हे पुस्तक केंद्रीत आहे.त्यामुळे जीवनात निर्माण होणा-या प्रश्नांची उत्तरे पुस्तकात शोधण्याचा प्रयत्न केला तर त्याची उत्तरे मिळत नाही.विनोबा म्हणतात त्याप्रमाणे कागदाची होडी कोणाला तारत नाही.प्रत्यक्ष जीवन व्यवहारात कोणी पाण्यात बुडू लागला तर कागदाची होडी तयार करता आली तरी ती पाण्यापासून संरक्षण करू शकणार नाही.आपल्या जीवनातील समस्या या भिन्न स्वरूपाच्या आहेत.जीवनाच्या आनंदाचे मार्ग भिन्न आहेत.जीवन समृध्दतेच्या वाटा भिन्न आहेत.मात्र त्या समृध्दतेच्या आणि उन्नतीचा विचार मात्र शिक्षणातून होताना दिसत नाही.
आपण जेव्हा मनोव्यापाराचा विचार करतो तेव्हा त्यातील सुख दुःखादी व्यापार, राग,,भूक,प्रीती, स्मरणशक्ती,आकलन, कल्पनाशक्ती,अनुमान ,अवधान दृढनिश्चय यांचा समावेश होते.यांच्या विकासाबाबत आपण किती जागृत आहोत हा प्रश्न आहे.आपल्याला या संदर्भातील किती जाणीवा शिक्षणातून निर्माण करून देण्याचा प्रयत्न होतो.आपल्या मनोव्यापाराबाबतचा फारसा विचार वर्तमानातील शिक्षणात नसल्यानेच जीवन आणि शिक्षण यांचे नाते तुटले आहे.आज शिक्षण घेऊन जीवनाची उन्नती होईल यावर कोणाचा भरवसा नाही , फार तर नोकरी मिळेल,त्यातून पोट भरेल पण जीवनाचा आनंद आणि समग्र प्रगती साधली जाईल असे कोणी सांगू शकणार नाही.कृष्णमूर्ती म्हणतात ,की शिक्षणाने व्यापक आणि समग्र विकासाबाबत अधिक दक्ष असायला हवे आहे.आज ती दक्षता शिक्षणात दिसते का ? याचा विचार करायला हवा.
आपल्या जीवनात अनेक व्दंद आहेत.आपल्याला अनेकदा योग्य निर्णय घेताना अडचणी येतात.कोणता निर्णय योग्य आहे हे ठरविणे अवघड जाते याचे कारण मनात व्दंद आहे.मुळात कोणताही निर्णय घेताना त्याच्या मुळाशी विवेकाची बांधणी असावी लागते.जो निर्णय घ्यायचा आहे त्यात स्वहितापेक्षा राष्ट्र व समाजाचे हित अधिक महत्वाचे आहे हा विचार केंद्रस्थानी असावा लागतो.विवेक असेल तर स्वहीत बाजूला पडते आणि समाज व राष्ट्र केंद्रस्थानी येते. शिक्षणाचे मूलभूत कार्य व्यक्तीव्यक्तीत विवेक आणि शहाणपणाची पेरणी करणे आहे.त्यामुळे कृष्णमूर्ती म्हणतात ,की मी आणि माझे या द्वद्वांच्या पलीकडे नेणे हे शिक्षणाचे मूलभूत कार्य आहे. आज आपल्या समाजात माणसांची गर्दी आहे.माणसं एकमेकाशी बोलता आहेत , पण त्या बोलण्यात संवादाचा भाव नाही. केवळ औपचारिकते पुरते बोलणे होते आहे. कार्यालयात असेल किंवा घरी असेल साराच प्रवास संवादाशिवाय सुरू आहे.बोलणे हा काही संवाद नाही..संवादात प्रिती असते.ओलावा असतो..त्यात अंतरिक भाव असतो..आज संवादाची नितांत गरज आहे त्यासाठी आपल्या भोवती माणसं आहे, पण तो संवाद होताना दिसत नाही.माणसं संवादाच्या माध्यमांचा उपयोग करता आहेत..पण त्यात संवादाची शक्ती नाही.समाज माध्यमात विचार व्यक्त झाली , की अंगठ्यांची चिन्ह दाखवली जात असली तरी त्यातून जिव्हाळा दर्शित होत नाही.लोक रतीब घालावित त्यापध्दतीने अंगठे दाखवत जातात.त्यामुळे ते अंगठे हदयापर्यंत पोहचत नाही.माणसं खरच अंतिरक ओलावा हरवून बसली आहे.संवादासाठीची हदये गमावून बसली आहे..संवाद फक्त मस्तकातून होत नाही.त्यासाठी हदयेच असावी लागतात..आज ती हदये हरवली आहेत..त्यामुळे शब्द मस्तकातून येतात , पण त्या शब्दांच्या सोबत येणारा जीव्हाळा,प्रेम मात्र शब्दात प्रतिबिंबीत होत नाही.त्यामुळे शब्द असूनही संवाद होत नाही.अनेकदा शब्दाशिवाय देखील संवाद होत असतो..शब्दांविने संवादू असं संतानी म्हटले आहेच ,की..पण आज शब्द आणि चिन्ह असले तरी ते भाव हदयापर्यंत पोहचत नाही.कारण संवादासाठीची हदये उरली नाहीत.माणसांना कोरडेपणा आला आहे. माणसं सारी मस्तकानेच विचार करू लागली आहे. नात्यात प्रेमा ऐवजी व्यवहार होऊ लागले आहेत.व्यवहारिक नात्यामुळे शब्दांनी देखील आपले मोल गमवले आहे.त्यामुळे आज फक्त शब्दांचा पसारा आहे, पण त्यातील भाव मात्र दिसत नाही.त्यामुळे नात्यातही आता गोडवा नाही आणि त्यातही बंध जडत नाही. सारेच जणू दिल्या घेतल्याचे झाले आहे.जेव्हा कोणताही लोभ आणि अपेक्षा असत नाही तेव्हा शब्दांसह आणि शब्दांशिवाय संवाद अधिक समृध्द होतो. मात्र स्वार्थाचा विचार असेल तर शब्दांनी केला तरी संवादाचा भाव आणि अर्थ योग्य पध्दतीने पोहचत नाही.व्यक्तीच्या मनात सुसंवाद कसा निर्माण करता येईल ही शिक्षणापुढील मुख्य समस्या आहे.त्यामुळे त्या दिशेचा प्रवास करणे कठीण काम बनू पाहते आहे.
शिक्षणाने परिवर्तन करणे अपेक्षित आहेच , पण त्यासाठी व्यक्तीच्या मनात मूलभूत परिवर्तन घडून येण्याचा विचार करावा लागतो.मनात परिवर्तनाचा आरंभ करणे हाच शिक्षणाला खरा प्रारंभ आहे.शिक्षणामुळे ख-या धर्माची ओळख होते.धर्माचा हेतू आणि उद्दीष्टांची जाणीव होते.धर्माच्या कार्याची ओळख होते.त्यामुळे धर्म, पंथ, वाद – कसलेही कारण असो त्यासाठी युद्ध माजवणे घडत नाही.आज शिकलेली माणसंच जणू अधिक अशिक्षित आहेत.देशात धर्म,पंथ,जाती पातीच्या नावाखाली जितके म्हणून विष पेरले जात आहेत त्यात शिकलेली माणसं देखील कमी नाहीत.लोकांचा शिकलेल्या माणसांवर अधिक भरवसा असतो.त्यामुळे ते काही सांगतील ते बरोबर असेल अशी त्यांची धारणा असते. मात्र ही मंडळी जेव्हा धर्माचा चुकीचा अर्थ घेऊन दोन समाजात फुट पाडते माणसांमाणसात अंतर निर्माण करतात तेव्हा तो शिक्षणाचा पराभव असतो.धर्माधर्मात भेद उभे राहतात तेव्हा शिकलेल्या माणसांनी पुढे येत अधिक जबाबदारीचे पालन करण्याची गरज असते.गांधीजी नेहमी म्हणायचे “ तुम्ही ज्या धर्मात जन्माला आला आहात त्या धर्माचे अंतरिक शुध्दतेने पालन करा..तुम्ही हिंदू असाल तर तुम्ही चांगले हिंदू बना..म्हणजे आपोआप तुम्ही चांगले मुस्लीम आणि चागंले ख्रिश्चन बनलेला असाल..” आज दुर्दैवाने आपण ज्या धर्मात जन्माला आलो आहोत त्या धर्माचा खरा विचार आपल्या अंतरकरणात पोहचत नाही.आपण धर्मनिरपेक्ष आहोत म्हणजे धर्मशुन्य आहोत असे नाही..तर आपण आपला धर्म अधिक चांगला समजून घेणे आहे.आपल्या धर्माचा अधिक चांगला अभ्यास करणे आहे.धर्माचे पालन करणे आणि आपल्या धर्माप्रमाणे इतर धर्माचे देखील आदर करणे आहे.आपला धर्म आपण जेव्हा अंतरिकपणे जाणून घेतो तेव्हा धर्माचा खरा विचार आपल्या हदयाला स्पर्श करून जातो. भेद असे उरतच नाही.आपल्याला कोणी चुकीच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तर काय चुकीचे आहे याची जाणीव होण्यास मदत होते.काय चुकीचे आहे ही जाणीव शिक्षणाने निर्माण केली पाहिजे.सत्याची ओळख करून देणे हे शिक्षणाचे काम आहे.सत्याची वाट चालण्याची हिम्मत शिक्षणाने दिली तर बरेच प्रश्न सुटू शकतात ही जाणीव अनेकदा आपल्याला होत जाते म्हणून शिक्षणाची जबाबदारी अधिक आहे हे लक्षात घ्यायला हवे.आज समाजात सर्वाधिक भेद धर्म आणि जातीने उभे राहता आहेत.शिकलेल्या माणसांमध्ये देखील तेच भेद आहेत.त्यामुळे या भेदांचा विचार आपण शिकलेल्या माणसांनी विवेकाच्या अंगाने करण्याची गरज आहे. शिक्षणामुळे प्रत्येकाच्या आतली असलेली प्रज्ञा जागृत होण्याची गरज आहे. मनातील गोंधळ संपून सुसंवादाची प्रक्रिया शिक्षणातून निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असतो. अशा तऱ्हेने शिक्षणच खऱ्या अर्थाने नवी संस्कृती, नवे जग निर्माण करू शकेल. मुक्त आणि निर्भय मनाच्या व्यक्ती निर्माण करणे हा खऱ्या शिक्षणाचा हेतू आहे. आज शिकलेली माणसं देखील पराभूत असतात..ते आतून घाबरलेले असतात..ते अधिक आसक्त असतात..त्यामुळे शिक्षणाने निर्भयता येत नाही..ती यावी म्हणून शिक्षणातून मूलभूत प्रयत्न होताना दिसत नाही.
तसा प्रयत्न झाला तर व्यक्तीच समाजजीवनात सहकार्य आणि सुसंवाद निर्माण करू शकतील. खरे शिक्षण आपल्या जिव्हाळ्याचा विषय कोणता हे शोधून काढण्यास विद्यार्थ्यास मदत करेल मात्र आज विद्यार्थ्यांच्या जीव्हाळ्याचा विषय देखील माहीत नसतो..त्या उलट अधिक मोठया प्रमाणावर मागणी तसा पुरवठा या न्यायाने हा शिकण्याचा प्रवास सुरू असतो. शिक्षणाचा मूलभूत विचार पेरला हेला तर मानवी संस्कृती निर्माण करण्याबरोबर नवा माणूस निर्माण करण्यात शिक्षणाची भूमिका महत्वाची असेल. अशा प्रकारचा विचार रूजायला हवा असेल तर त्याबददल देखील कृष्णमूर्ती आपला दृष्टीकोन व्यक्त करतात.त्यासाठीच्या शिक्षण देणाऱ्या संस्था आणि शाळा कशा असाव्यात तेही कृष्णमूर्ती सांगतात. वेगवेगळ्या पद्धतीचे साचे वापरणाऱ्या मोठ्या शाळांपेक्षा जिथे जीवनाचे प्रत्यक्ष दर्शन झालेले शिक्षक आहेत आणि थोडीशीच मुले आहेत अशी शाळा महत्त्वाच्या आहेत. मूलभूत मूल्ये असलेली कोणतीही गोष्ट आजच्या मोठमोठ्या संस्थांतून दिल्या जाणाऱ्या गर्दीच्या शिक्षणाने साध्य होणार नाही. त्यासाठी शिकणाऱ्या व्यक्तीचे मन, तिच्या प्रवृत्ती, तिचे संस्कार या साऱ्या गोष्टी जागरूकतेने समजून घेतल्या पाहिजेत. अशा तऱ्हेने शिक्षण देण्याची गरज कृष्णमूर्ती व्यक्त करतात. शिक्षण संस्था स्मार्ट करून फार काही हाती लागणार नाही तर त्या पलिकडे शिक्षण आणि शिक्षक अधिक स्मार्ट करण्याची निंतात गरज आहे.
_संदीप वाकचौरे
(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे.)