Monday, November 25, 2024
Homeब्लॉगसत्याची वाट...

सत्याची वाट…

आपल्या भोवती काही चुकीचे घडते आहे .काही बरोबर घडते आहे , पण त्या चुकीच्या मागे जाण्यात धोका नाही आणि बरोबर असलेले सत्य आहे त्यामागे जाण्यात पुन्हा संघर्ष आहे. म्हणजे ते चुकीचे आहे तरी त्याला विरोध करावा वाटत नाही. आपण कशाला त्यात पडायचे. अशी भावना त्यातून सार्वत्रिक होते आहे. आपल्या जीवनात आपल्या प्रथा, पंरपराची वाट चालत राहिले की बरेच प्रश्न सुटतात. त्या वाटा माणसाला जगण्यासाठीच्या संघर्षातून मुक्त करत असतात. आपण का असा प्रश्न विचारला की आपल्यावर हल्ला होण्याची शक्यता असते, कधी काळी आपण चुकीचे आहोत हे सिध्द होण्याचा धोका असतो. आपल्याला अशा प्रकारे संघर्षाची शक्ती मुळात शिक्षणातून पेरली जात नाही. सत्याच्या वाटेने जाताना त्रास होणारच असतो.. म्हणून ती वाट शिकलेल्या माणसांनी सोडून द्यावी असे नाही. त्याउलट ती वाट चालत राहणे म्हणजे सुशिक्षत होणे आहे. आज आपल्या समाजात नव्या वाटांचा प्रवास म्हणजे जीवनात अस्थिरता निर्माण करणे आहे.

आपले जीवन अधिक अस्थिर करणे आहे.. वरवर ज्याला सुख वाटते आहे ते नाकारत जीवनात दुःख निर्माण करणे आहे. त्यामुळे अधिकाधिक सुरक्षित जीवन कवच प्राप्त करण्याचा विचार शिक्षणातून पेरला जातो.. शिक्षणाने लढण्याची हिम्मत गमवली आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास पाहिला तर देशातील अनेक विद्यार्थी आंदोलनाच्या प्रक्रियेत सहभागी झाले होते. विद्यार्थी दशेत लढण्याची हिम्मत मिळाली होती. त्यावेळी प्राण देण्याची तयारी दाखवली होती. सत्यासाठी प्राणाची आहूती गेली तरी चालेल पण मागे हटत नव्हते. आता त्या वाटा चालण्याचा विचारही मनात पेरला जात नाही. आपले शिक्षण जीवन परिवर्तनाच्या दिशेने प्रवास करण्यापेक्षा पंरपरेच्या वाटा चालण्यासाठी अधिक पसंती देताना दिसते आहे. कारण त्या वाटा चालण्यास विचाराचे बंड नाही आणि समजासाठी प्रश्न नाही. ज्यांनी ज्यांनी प्रश्न विचारण्याची हिम्मत केली ती माणसं इतिहासाच्या पटलावर नाव कोरून गेली.. पण त्याचे तत्कालीन वर्तमान म्हणजे जीवन संघर्ष, समाजाशी दोन हात करणे होते. आज समाजात भ्रष्टाचार आहे.. पण तो थांबवता येणार नाही का? जरूर थांबवता येईल मात्र त्यासाठी शिक्षणातून प्रश्न विचारण्याची आणि विवेकी वाट चालण्याची शक्ती, प्रेरणा निर्माण करण्याचे मोठे आव्हान आहे. कृष्णमूर्ती शिक्षणाचा हेतू सांगताना म्हणतात की, चुकीचे शिक्षण व काही किंमत नसलेले आदर्श यांच्या माध्यमातून जुनी पिढी नव्या पिढीला नष्ट करत असते. ही मालिका तोडणे हा शिक्षणाचा मूळ हेतू आहे. शिक्षणाने नवी पिढी निर्माण करायची असते.. जुनी पिढी आणि नवी पिढी यांच्यातील विचाराचे अंतर असायला हवे.. जगात जे संशोधने होता आहेत त्याचा परिणाम नव्या पिढीच्या विचार प्रक्रियेत व्हायला हवा, पण तो परिणाम शिक्षण आणि शिक्षणातील पदव्या घेऊनही होताना दिसत नाही. त्यामुळे आपण नव्या पिढी उंचावलेल्या निर्माण करण्याऐवजी खुरटलेल्या निर्माण करण्यात धन्यता मानत आहोत. असे घडणे म्हणजे शिक्षण नाही हे लक्षात घ्यायला हवे.

- Advertisement -

शिक्षण प्रक्रियेत चुकीचे शिक्षण देण्यासाठी नाही तर त्यातून सदसद विवेक, शहाणपणाचा विचार रूजायला हवा आहे. आपल्या देशात कधीकाळी सतीची चाल सुरू होती.. विधवा महिलांचे केशवपन सुरू होते. बालविवाह सुरू होते.. त्या पंरपरेला विरोध करणारी मंडळी आपल्याकडे निर्माण झाली पण ती सर्व मंडळी शिक्षण विचारातून निर्माण झाली आहेत. शिक्षणाचा खरा विचार त्यांच्या मनात पेरला गेला होता. त्यांनी त्या पंरपराना विरोध न करता हजारो सालाच्या त्या पंरपरा आपल्या पूर्वजांनी निर्माण केल्या आहेत त्या आपण स्वीकारायला हव्यात. त्यांना विरोध कशासाठी करायचा असा प्रश्न केला असता तर समाजात परिवर्तनाचे चाक कधीच फिरले नसते. मुळात समाजाचा विचार प्रवाह सुरू असतो तेव्हा त्यातील पंरपरा, रूढी हा तत्कालीन प्रभाव असतो.. पण समाजात विचाराचे परिवर्तन जेव्हा होत जाते तेव्हा तरी परिवर्तन दिसायला हवे. जगाच्या पाठीवर विचारवंत, सुधारक हे ज्या पध्दतीने विचार करता आहेत त्याचा परिणाम समाजमनावर होण्याची गरज असते. त्यासाठीची मने शिक्षणातून निर्माण करायची असतात. स़ॉक्रेटीस सारखा विचारवंत हा सत्याची धारणा घेऊन लोकांमध्ये शहाणपणाची पेरणी करत होता.. म्हणून त्यांना कितीतरी त्रास झाला होता.. सत्याची वाट चालू नये म्हणून तत्कालीन प्रस्थापित सत्तेने त्यांच्यावरत प्रचंड दबाव आणला.. तुम्ही सत्याची वाट सोडा.. तुम्हाला जीवनदान मिळेल असे सांगण्यात आले.

पण सत्याची वाट सोडणे म्हणजे अशिक्षित असल्याचे लक्षण नाही का? मग सत्यापासून दूर जात जीवन जगण्यापेक्षा मृत्यू काय वाईट हा विचार त्यांच्या मनात निर्माण झाला आणि सत्यासाठी विषाचा पेला पिणे पसंत केले मात्र सत्य नाही सोडले.. चुकीच्या दिशेने घेऊन जाण्यास जे प्रेरित करत नाही ते खरे शिक्षण असते.शिक्षणाची वाट प्रचंड शक्तीची असते.गॅलिलिओने बायबल जे काही सांगत होते त्या विरोधात विज्ञानाच्या आधारे सिध्दांताची मांडणी करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा परिणाम त्यांना कितीतरी सोसावा लागला.पृथ्वी सूर्य पृथ्वीभोवती फिरतो हा विचार चुकीचा आहे हे त्यांनी शास्त्रीय दृष्टया मांडणी केली होती..पण या मांडणीमुळे तत्कालीन पोप संतापले होते.त्याबददल त्यांना नजरकैदेत ठेवण्याची शिक्षाही देण्यात आली होती.त्यांनी केलेली मांडणी सत्य होती..पण पंरपरेच्या विरोधात जाणारी होती..पण ती स्वीकारताना प्रचंड विरोध झाला होता.अगदी त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे स्मारक देखील उभे राहिले नाही.शंबर वर्ष तसा प्रयत्न झाला नाही कारण तसे केले तर पोप रागावेल..सत्याची मोठी ताकद असते आणि भिती देखील असते.सत्य पचणे अवघड असते.मात्र तरीसुध्दा याच वाटा चालण्यासाठी प्रेरणा,विवेक,शहाणपण शिक्षणातून पेरले जाण्याची गरज असते.कृष्णमूर्ती म्हणतात की,असे चुकीचे शिक्षण देण्यात आज धन्यता मानली जात आहे.फक्त चरितार्थासाठी उपयोग होईल अशा ताकदवान स्मृतीची जोपासना करणे हा शिक्षणाचा उददेश नाही.

खरे शिक्षण विद्यार्थ्याला तांत्रिक विषयातील परिक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी हातभार लावण्यासाठी नाही. मात्र आज तर त्यापलिकडे काहीच होताना दिसत नाही.जीवनाचा विचार शिक्षणात होताना दिसत नाही.आपल्याला काय व्हायचे आहे..? आपण कोण आहोत…? आपले कर्तव्य काय आहे..? आपल्या जीवनाचा नेमका अर्थ काय आहे..? जीवनाचे ध्येय काय आहे ? याचा थोडाही विचार शिक्षणात नाही.कारण इतर विषयात वाचन,लेखन,गणन आणि इतिहासातील लढाया,शोध जाणून घेण्यात आपले शिक्षण गुंतले आहे.नवे काही करण्यापेक्षा आपल्या पूर्वजानी जे काही केले आहे ते जाणून घेणे म्हणजे शिक्षण आहे.भूतकाळ शिकायला हवा पण त्यापलिकडे भविष्याचा वेध घेण्याची हिम्मत शिक्षणाने पेरायला नको का ? पण आपले शिक्षण मार्कांच्या आलेखात गुंतले आहे.विचार कसा करावा,काय विचार करावा हे शिकण्याची गरजच वाटत नाही.जीवनाची उन्नतीचा मार्ग नेमका कोणता हे शोधावे ,जाणावे वाटत नाही.शिक्षणाचा विचार केवळ विषयातील माहिती शिकणे एवढया पुरता आहे.आपण जे काही शिकतो आहे हे नव्या विज्ञानाच्या आणि विवेकाच्या वाटेवर पडताळून पाहण्याची गरजही वाटत नाही.अरिस्टॉटल यांनी मांडलेल्या अनेक सिध्दाताला पुढे अनेक वैज्ञानिकांनी आव्हान दिले होते.त्यातून त्यांचे काही सिध्दात चुकीचे असल्याचे समोरही आले..मात्र त्या वाटांचा प्रवास करावा असे त्यांच्या मनात निर्माण झालेल्या भावनांमुळे नव्या पिढीला सत्याची वाट चालता आली..

मुळात आपण जे शिकतो ते अंतिम सत्य आहे ही धारणा त्यात आहे.कारण कोणी तरी मोठया माणसांनी त्याची मांडणी केली आहे.त्यामुळे आहे ते स्वीकारणे गरजेचे आहे.शिक्षणातील असा विचार हा अंधानुकरण आहे.आपण जे शिकतो त्य प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवण्यापेक्षा विवेक आणि शहाणपणाच्या वाटेवर आपण अधिक तपासून घेण्याचा विचार शिक्षणातून पेरायला हवा.जीवनाचा अर्थ जाणणे आणि जे अस्तित्वाचे सारे क्षेत्र आहे त्याची सर्वांगीण समज येण्यासाठी शिक्षणाचा विचार व्हायला हवा आहे.मात्र आज केवळ शिक्षणांचे एक अंग असलेल्या साक्षरतेचा आणि माहितीकेंद्रीत शिक्षणाचा विचार अधिक प्रमाणात होताना दिसत आहे.त्यामुळे शिक्षकांनी या संदर्भाने अधिक गंभीरपणे विचार करायला हवा आहे.त्यांनी विवेकवादी विचाराची पेरणीकरण्यासाठी शिक्षणाची वाट चालण्याची गरज आहे..पण फक्त शिक्षकांनेच नव्हे तर विद्यार्थ्यांने सुध्दा माहिती संपन्न शिक्षणापासून दूर जात ,नव्या विचाराचे आणि अधिक जीवन गुणवत्तेचे शिक्षणासाठीच्या वाटेच्या अशा प्रकारच्या शिक्षणाची मागणी केली पाहिजे त्याशिवाय समाजाची प्रगती होताना दिसणार नाही.आज आपण ज्या प्रगतीबददल बोलत आहोत ती सारी भौतिक प्रगती आहे.उंच उंच इमारती.गुळगुळीत रस्ते,विविध स्वरूपाच्या संस्था म्हणजे प्रगती नाही.हे सारे ज्या माणसांसाठी आणि समाजासाठी आपण करत आहोत त्यामाणसांना अधिक प्रगत आणि प्रगल्भ केल्याशिवाय भौतिक प्रगतीचा आनंद देखील घेता येणार नाही.आज हे सारे करूनही त्यात अनेक उणिवांचे दर्शन घडते आहे याचे कारण शिक्षणाचा मुळ विचार पेरला गेला नाही.शिक्षणाच्या प्रक्रियेत मनात निर्माण झालेल्या प्रश्नांना स्थान नाही.त्या प्रश्नांचा शोध घेण्याची वाट नाही.असे प्रश्न विचारले तर शिक्षकांना वेळ नाही..आणि ही सारी प्रश्न म्हणजे अभ्यासक्रमाबाहेरील विचार आहे..असे म्हणून दुर्लक्ष करता येतात.खरेतर जेथे प्रश्न निर्माण होतात ते खरे शिक्षण असते..आज आपल्याकडे प्रश्न निर्माण होणार नाही अशी व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.त्यामुळे शिक्षणाचा मूळ हेतू विचार करणे आणि शोध घेणे आहे हेच विसरले जात आहे.शिक्षणात निर्माण झालेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने चर्चा व्हायला हव्या असतात.आपल्या इतिहासात ज्ञानाच्या मुळाशी जाण्यासाठी चर्चा ही महत्वाची प्रक्रिया होती.त्यातून विचाराचे आदानप्रदान व्हायचे आज ही वाट जवळपास थांबली आहे.विदवानासोबत जाणे व्हायचे..त्यांच्या चर्चेच मस्तकात प्रकाश पडायचा..आज शिक्षणाती वाट एकेरी आहे..त्यामुळे शिक्षक बोलत राहतील आणि मुले ऐकत जातील.मग मनाला न पटणारी काही असले तरी ते स्वीकारयचे कारण मार्क महत्वाचे आहे. ज्ञानासाठी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यात अधिक स्नेह आणि प्रेम हवे.त्यांच्या नात्यानेच विद्यार्थ्याला ज्ञानाची वाट चालण्याची प्रेरणा निर्माण व्हायला हवी आहे.शिक्षकाची वाट चालत राहवी असे विद्यार्थ्याला वाटायला हवे..इतकी प्रेरणा निर्माण करण्याची गरज आहे. जेथे शिक्षक व विद्यार्थी यांच्या नात्यामध्ये अधिकाराला जागा असता कामा नये.त्यांच्यात मुक्त संवाद हवा आहे. शिक्षणाचा मार्ग आज जो आहे त्यातून माहिती आणि मार्क मिळतील पण त्यातून जीवनाचे यश प्राप्त करू शकणार नाही.शिक्षणाचा मूळ हेतू साध्य होईल अशा वाटा वर्तमानात आपण निर्माण करण्याची गरज आहे.सत्याची वाट टिकेल अशा गोष्टींमधून शिक्षण टिकले पाहिजे याकडे लक्ष दिले पाहिजे.आपण आज पंरपरेच्या वाटा चालण्याची मनोवृत्ती निर्माण केली तर कदाचित शांततेचे जीवन जगल्याचा भास निर्माण होईल..पण विद्यार्थ्यांच्या अंतरिक प्रश्न आहे त्याची उत्तरे न मिळाल्याने जीवनात त्याला आनंद उपभोगता येणार नाही. पंरपरेने आपण समाजात परिवर्तन आणू शकणार नाही.कोणत्याही पंरपरेच्या वाटा चालताना आपण चांगूलपणा फुलू शकत नाही आणि आपल्या पूर्वजांनी ज्या वाटा निर्माण केल्या आहेत त्या परंपरेच्या वाटा सातत्याने चालत राहणे हा चांगुलपणा नाही हेही लक्षात घ्यायला हवे.

संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या