Monday, November 25, 2024
Homeब्लॉगसहकार्याने साधेल विश्वात्मकता

सहकार्याने साधेल विश्वात्मकता

आपल्या समाजाचे वर्तमान अधिक चिंताजनक बनत चालले आहे. आपल्या भोवतालमध्ये अधिकाधिक हिंसा होताना दिसत आहे. माणसं एकमेकावर धर्म, जात, पंथ, पंरपरेच्या नावाखाली हल्ले करता आहेत. माझा धर्म मोठा की तुझा धर्म मोठा या संघर्षाने आपल्या समाजात मोठी हिंसा उभी करण्याचा प्रयत्न होतो आहे. समाजातील काही घटक विविध कारणे पुढे करत अधिक हिंसक बनत आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळवताना सर्व धर्मीय, जाती, पातीचे लोक एकसंघतेने लढली होती. त्यावेळी इंग्रज हे शत्रू होते. आज आपण स्वातंत्र प्राप्त केल्यानंतर सारे भारतीय आहोत आणि आपल्यामध्ये बंधुत्वाचे नाते बांधले जाण्याची गरज होती.

शिक्षणातून तसा विचार पेरण्याचा प्रयत्न करण्यात आलाही. रोज प्रतिज्ञा म्हणत आपण तो विचार रूजवण्याचा निंतात प्रयत्न केला. आपण एकमेकाशी भारतीय बंधू म्हणून एकत्रित नांदायला हवे होते. सहकार्याच्या भावनेने प्रवास घडायला हवा आहे. मात्र आज आपल्या समाजात सहकार्य आणि बंधुत्वाचा अभाव सातत्याने जाणवतो आहे. समाज माध्यमांवर जे काही प्रसारित केले जाते आहे त्यातून व्देषाची पेरणी अधिक होते आहे का? शिकलेल्या माणसांमध्ये देखील व्देषाचा विचार असल तर शिक्षणाचा तो पराभव आहे. समाज म्हणून आपल्यात असलेली नात्याची वीण दिवंसेदिवस सैल होते आहे. अशा परीस्थितीत आपण नवा भारत, नवा समाज कसा निर्माण करणार? हा खरा प्रश्न आहे. आपण कुटुंब म्हणून जसे आपले विचार, ज्ञान, शिक्षण, दृष्टीकोन इतर सदस्यांपेक्षा भिन्न असले तरी कुटुंबात एकत्र राहतो. त्या नात्यात प्रेमाचा नातेबंध असतो. वर्तमानात आपल्या समाजातील प्रेमाचा नातेबंध आटत चालला आहे. त्यामुळे आक्रमता वाढते आहे. जेथे आक्रमता असते तेथे सहकार्याचा अभाव असतो. जेथे सहकार्याचा अभाव असेल तर आपल्याला समाज व राष्ट्र म्हणून प्रवास कसा बर करता येईल? कृष्णमूर्ती म्हणतात, की “सहकार्य आणि आक्रमकता कधीही एकत्र राहू शकत नाही”. आपल्याला प्रगती साध्य करायची असेल. आपल्याला महान राष्ट्र व्हायचे असेल तर सहकार्य आणि प्रेमाच्याच वाटा चालण्याची गरज आहे.

- Advertisement -

कृष्णमूर्ती यांनी समाजमनाला जे तडे गेले आहेत त्याबददल अत्यंत मूलभूत कारणे नोंदवली आहेत. ते म्हणतात की, राष्ट्रीयता, धार्मिक श्रध्दा, आर्थिक तफावत, बौध्दिक उन्नती व अवनती या गोष्टीमुळे तडे गेले आहेत. आपल्या समाजात आपण आपल्या धार्मिक श्रध्देसंदर्भाने प्रत्येक धर्मियांनी मूलभूत विचार करण्याची गरज आहे. आपल्यासाठी आपल्या धर्माचा विचार महत्वाचा आहे, पण त्या पलिकडे आपल्या सोबत असलेल्या इतर धर्मियांचा विचार करायला हवा. आपल्याला आपल्या धर्माचे विचार स्वातंत्र्य आहे त्याप्रमाणे इतर धर्मियांना देखील असायला हवे. मुळात धर्म ही प्रत्येकाची खाजगी गोष्ट असायला हवी. धर्म कोणताही असो त्याचा उददेश हा माणूस जोडण्यासाठी असतो. आपण धर्माचा विचार माणसं तोडण्यासाठी करतो आहोत का? याचाही विचार करायला हवा.जो धर्म विचार माणसांमाणसात भेद निर्माण करतो तो विचार धर्म विचार असण्याची शक्यता नाही.आपल्या धार्मिक श्रध्दा जरूर भिन्न असतील..असायला देखील हव्यात.आपल्या धार्मिक पंरपरेत कोणी मूर्ती पूजक असेल कोणी अमूर्तीपूजक असेल म्हणून संघर्ष करण्याची गरज नाही.प्रत्येकाना आपली वाट चालत राहावी फक्त आपली वाट असत्याची नाही ना,आपली वाट समाजात व्देष पसरविणारी आणि भेदाभेद निर्माण करणारी नाही ना याची काळजी घ्यायला हवी.आपल्याकडे जगाच्या पाठीवर धर्मासाठी जितके युध्द झाली आहेत तेवढी युध्दे इतर कोणत्याही कारणासाठी घडलेले नसतील.धर्मासाठी युध्द म्हणजे आपल्याला धर्म न समजणे आहे.आपल्याकडे धर्माचा विचार माणसांमाणसात प्रेम निर्माण करण्यासाठी आहे.माणूस म्हणून प्रत्येकाला जगण्याची उमेद देण्यासाठी आहे.मानवाचे माणसात रूपांतर करण्याची ती व्यवस्था असायला हवी. धर्म म्हणजे शांततेचा प्रवास आहे..पण आज धर्मच अशांततेच्या वाटेचा प्रवास करत असेल तर जगाच्या पाठीवर कधीच आपल्याला उत्तमतेच्या दिशेचा प्रवास करता येणार नाही.आपल्या धार्मिक श्रध्दा या आपण व्यक्तीगत जीवनाचा भाग असायला हवा.धर्माचा विचार हा आपल्या कुटुंबापुरता करण्याची गरज आहे.त्या सार्वजनिक करणे, आपल्या वाटेने इतरांनी यावे अशी मनिषा आपण जेव्हा करत जातो तेव्हा मात्र समाज व राष्ट्राला पुन्हा मागे मागे नेत असतो हे लक्षात घ्यायला हवे.कार्ल मार्क्स म्हणाले होते ,की धर्म ही अफूची गोळी आहे.धर्मासाठी लोक काहीही करण्याची तयारी दाखवतात..धर्मासाठी मरण पत्करणारी माणसं जगात आहे..धर्मासाठी माणसं माणसांवर हल्ला करता आहेत.माणसं मारली जात आहेत.अशावेळी आपण धर्माचा चुकीचा विचार करत आहोत हे लक्षात घ्यायला हवे. धर्माविषयी श्रध्दांमुळे समाजात तेड निर्माण होते आहे.धर्म ही जीवन प्रणाली आहे.आपल्या जीवनाचा उध्दार करणे,जीवनाला योग्य दिशा दाखवणे,जीवनाला आनंदाची वाट दाखवणे,माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी समृध्दतेचा प्रवास घडवणे आहे,मूल्यांचा विचार रूजवण्याकरता धर्माचा विचार आहे हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे.धर्म हा माणसामाणसात भेद नाही तर घटट बंध निर्माण करण्यासाठी आहे.आपल्याच धर्माची माणसं आहेत आणि इतर धर्माची ती माणसं नाहीत अस माणले जाता कामा नये.सर्व धर्मातील माणसं ही माणसं आहेत म्हणून आपल्याला त्यांच्यावर प्रेम करता यायला हवं.संत ज्ञानेश्वर हे हिंदू धर्मीय होते, पण त्यांनी पसायदान मागताना ना भारतीयांसाठी मागितले , ना त्यांनी हिंदूधर्मियांसाठी मागितले.ते अत्यंत उदारतेने म्हणाले. “ जो जे वांछील ते ते लाभो प्राणिजात…” ही भावना ख-या धर्मोपासकाची असते.गांधी हे कटटर हिंदू धर्मिय होते त्यांच्या मनात धर्माबददल अभिमान होता, पण ते म्हणायचे मी अधिकाधिक चांगला हिंदू बनण्याचा प्रयत्न करत आहे.आपण ज्या धर्मात आहोत त्या धर्माचा खरा विचार जीवनात आचरणात आणण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आपण जगातील सर्व धर्माचे नागरिक बनने आहे.मदर तेरेसा हिंदू धर्मिय नव्हत्या तर त्या ख्रिश्चन धर्मिय होत्या ,पण त्यांनी अखिल मानवजातीसाठी रूग्नसेवेचा विचार केला होता.जगात धर्माचे खरे उपासक बनने म्हणजे जगाचा नागरिक बनने आहे.धर्माने आपल्या अधिक संकुचित केले असेल असे वाटत असेल तर आपण धर्माचा खरा विचार समजून घेण्याची गरज आहे.आपण धर्माच्या नावाखाली चुकीच्या वाटा चालत तर नाही ना ? असा प्रश्न स्वतःलाच विचारायला हवा.जी वाट व्देषाची,मत्सराची,असत्याची आहे ती वाट न चालण्याचा प्रयत्न आपण करायला हवा.

आपल्या समाजात आर्थिक विषमता मोठी आहे.देशातील काही लोक जागतिक श्रीमंताच्या यादीत आहेत आणि काही लोक गरीबीची किमान रेषा देखील पार करू शकलेले नाहीत.ही आर्थिक दरी समाजात व्देष निर्माण करत आहेत.आर्थिक विषमतेने युक्त समाज कधीच प्रगती साध्य करू शकणार नाही.जे दीन आहेत त्यांना वर आणण्यासाठीचा विचार पेरला जायला हवा.आपल्या सोबतीने सर्वांचा प्रवास घडायला हवा ही धारणा आपल्याला अधिक बळ देत जात असते.समाजात एकसंघपणा निर्माण करत असते.समाजात एक वर्ग शोषन करतो आहे आणि दुसरा वर्ग प्रचंड शोषला गेला आहे..अशी विषमता आपल्याला सहकार्याच्या दिशेने घेऊन जाण्याची शक्यता नाही.त्यामुळे सहकार्याचा विचार अधिक गंभीरपणे करण्याची गरज जेव्हा जेव्हा व्यक्त होते तेव्हा विषमता नष्ट करण्यासाठीचे प्रयत्न अनिवार्य ठरतात.समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी योजना हे साधन नाही तर आपल्याला खरोखर विषमता संपुष्टात आणायची असेल तर शिक्षणाचा मूलभूत विचाराची पेरणी आणि योग्य दिशेने कौशल्यांचा प्रवास घडण्याची गरज आहे.शिक्षण कौशल्ययुक्त केले की विषमतेची बीजे कमी होण्यास मदत होत असते.माहिती संपन्न शिक्षण केवळ मार्क देईल पण कौशल्याधारित शिक्षण माणसाला जगण्यासाठी आणि पोटाची भूक भागविण्यासाठीची शक्ती आणि प्रेरणा देईल.म्हणून शिक्षणाचा विचार अधिकाधिक महत्वाचा आहे हे लक्षात घ्यायला हवे.

आपल्या समाजातीव बौध्दिक उन्नती साधलेली माणसंही समाजापासून दूरावता आहेत.माणसांच्या मनामध्ये अंहकार भरला जात आहे.शिक्षणाने मिळालेले ज्ञान अंहकाराने युक्त असेल तर ते कुचकामी म्हणायला हवे.समाजात आपल्याकडे बौध्दिक आणि शारीरिक श्रम करणारी माणसं अशी सरळसरळ भेद पडले आहेत.बौध्दिक श्रीमंती असलेल्या माणसांना शारीरिक श्रम करत घाम गाळणा-या माणसांच्याप्रति प्रेमाचा अनुबंध नाही.शिक्षणाने हे दोन भेद अधिकाधिक अधोरेखित करण्यात आले आहे.शिक्षित आणि अशिक्षित असे भेद निर्माण केलेले आहेत..असे भेद निर्माण होताना बौध्दिकतेचा एक वर्ग निर्माण केला आहे.तो वर्ग आज समाजापासून दूरावला आहे.ज्यांनी समाजाची जडणघडण करायची ती माणसं आज अंहकाराच्या सोबत उंचावता आहे.श्रीमंत आणि बौध्दिक उंचावलेली माणसं आज अशिक्षित असलेल्या समाजाला सहकार्य करण्यापेक्षा त्यांना लुटणे पसंत करता आहेत.त्यांचे शोषण होत असताना आपण अशांत असतो.समाज आपला आहे..माणसं आपली आहेत असे असताना देखील त्यांच्याबददल व्देष,मत्सर ठेवत असू तर त्या बौध्दिक विकासाचे काय करायचे.आपणच समाजात दोन वर्ग निर्माण करत विषमता पैदा करत आहोत.त्यातून सहकार्याचा अभाव स्पष्ट दिसू लागला आहे.मुळात जे जे घटक विषमता निर्माण करतात ते घटक समाजात सहकार्याची भावना निर्माण करू शकणार नाही.त्यातून समाज एकसंघ होण्याऐवजी समाजात तेड निर्माण होऊन विभाजन होणार असेल तर त्याबददल शिक्षणातून अधिक गंभीरपणे विचार पेरण्याची गरज आहे.आपल्यातील राष्ट्रीयत्वाची भावना दृढ हवीच , पण त्या भावनेचे बाजारीकरण होता कामा नये.आपल्या राष्ट्रीयत्वात राष्ट्र हित प्रथम हवे,समाजहित हवे.मात्र आपल्या राष्ट्रप्रेमाच्या पोटी आपण समाजात तेढ निर्माण करत नाही ना याचाही विचार करायला हवा..राष्ट्रप्रेमाची भावना देखावा न ठरता ती अंतरिक भावना असायला हवी.आपला देश अधिक समृध्द असायला हवा .आपल्या देशासाठी आपण समर्पणाची भावना ठेवायला हवी..मी माझा देश स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करेल.त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करेल ही भावना मोठी आहे.आपणापासून राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीयत्वाची भावनेची वृध्दी होण्याची गरज आहे.मात्र ही मूळची भावना जाणून न घेता आपण जर राष्ट्रप्रेमाचा देखावा करण्याचा प्रयत्न केला तर त्यातून इतरांनी देखील त्याच वाटेने चालावे असे वाटणे हे आपले दुर्दैव आहे.त्यामुळे आपल्या समाजात संघर्ष निर्माण होतो हे लक्षात घेण्याची गरज आहे.

आपल्या समाजात आपण अधिकाधिक आक्रमता ठेऊ लागलो तर सहकार्याचा विचारही मागे पडेल.शिक्षणातून सहकार्याचा भाव प्रेरित करायचा असतो.ती भावना शिक्षणातून निर्माण करण्यात आपल्याला अधिकाधिक यश मिळणे म्हणजे समाज व राष्ट्र अधिक एकसंघ ठेवणे आहे.आज दुर्दैवाने आपण सर्वदूर आक्रमतेने मांडणी करू पाहात आहोत.आक्रमता जेथे जेथे असते तेथे सहकार्य असण्याची शक्यता नाही.समाज आक्रमक आहे आणि तो समाज सहकार्यशील देखील आहे असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते विधान अगदी असत्य आहे.कारण आक्रमकता आणि सहकार्य या गोष्टी सोबतीने चालण्याची शक्यता नाही.समाजात एखादी व्यक्ती आक्रमक आहे असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा ते फार सहकार्य करणारे आहे असे म्हणणे म्हणजे असत्यच आहे.हे दोन्ही गुण एकमेकाच्या सोबतीने चालू शकत नाही हे लक्षात घेण्याची गरज आहे.त्यामुळे शिक्षणाने समाजातील भेद निर्माण करणा-या गोष्टींची पेरणी कमी करण्याची गरज आहे.आपली सारी व्यवस्था सहकार्यावर अवलंबून असणार आहे.त्यामुळे सहकार्याचा विचार दृढ करायचा असेल तर आपण प्रेमाचा बंध दृढ करण्यासाठी प्रयत्न करायला हवे.समाजात एकमेकाबददल जितके प्रेमबंध दृढ होत जातील तितके भेद कमी होत जातील. एकत्रित कुटुंब व्यवस्थेतील घरात माणसं अधिक असतात.त्यांच्या विचारात,शिक्षणात,दृष्टीकोनात बदल असतो..मात्र तरी सुध्दा घर एकसंघ असते याचे कारण त्यांच्यात भेद पाडणा-या ज्या गोष्टी आहेत त्यापेक्षा त्यांच्यात असलेले प्रेमाचे नाते अधिक दृढ असते.त्या नात्याला प्रेमाचा ओलावा आहे.तो अधिकाधिक उंचावेल यासाठी शिक्षणाने काम करण्याची गरज आहे. दुर्दैवाने शिक्षणही स्पर्धेच्यामागे लागले आहे त्यामुळे जिथे स्पर्धा आहे तिथे प्रेम कसे निर्माण होणार ? पण आपला प्रवास शिक्षणातून समाज निर्माण करण्यासाठी सुरू आहे हे लक्षात ठेऊन प्रवास करायला हवा.

संदीप वाकचौरे

( लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे )

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या