माणूस शिक्षण का घेतो? असा प्रश्न आपण कोणालाही विचारला तरी त्याची उत्तरे कदाचित भिन्न स्वरूपाचे असेत. शिक्षणातून काही कौशल्य प्राप्त करायचे आहेत. ज्ञान मिळवायचे आहेत. त्यातून आपल्याला नोकरी हवी आहे. त्याच बरोबर धन, संपत्ती हवी आहे. हा सारा प्रवास सुखासाठी आहे. शिक्षणातून मिळणा-या ज्ञानातून मिळणारा आनंद हा चिरंतन आहे हेही खरे आहे, मात्र त्या आनंदाच्या वाटा शिक्षण घेतलेली किती माणसं तुटवडतात हा खरा प्रश्न आहे. खरतर शिक्षण घेतलेल्या माणसांच्या जीवनप्रवासात त्याला जे काही करावे वाटते आणि तो जे काही करतो आहे त्यामागे त्याच्या जीवनात त्याला सुख मिळावे ही एकमेव अपेक्षा असते. त्या सुखासाठी माणूस जीवन भर धावाधाव करत असतो. स्वतःच्या सुखासाठी आपण हवे ते करण्यास मागे पुढे पाहत नाही.
माणूस आपल्या जीवनात जी काही धावपळ करत असतो ती देखील स्वतःच्या सुखासाठीच असते. आपल्या जीवनात दुःख मिळावे असे कोणालाही वाटत नाही. तसे वाटण्याची शक्यता देखील नाही. शिक्षणाचा विचार मुळात सुखासाठी केला जातो. आपण कधी कोणाशी बोललो तर लोक सांगतात, बाबारे, जरा शिक म्हणजे आयुष्य कसं सुखात जाईल. अर्थात यातील सुखाच्या कल्पना कदाचित भिन्न असतील. आपण ज्याला सुख मानतो अशा अनेक गोष्टी आपण शिक्षणाच्या. सुखाचे मार्ग भिन्न असले तरी सुख मिळविण्याचा मात्र शिक्षण हा एकमेव राजमार्ग आहे. शिक्षणातून सुख मिळवता येते यावर अनेकांनी शिक्कामोर्तब केले आहे.अर्थात ते सुख प्राप्त करताना आपण कोणते मार्ग निवडतो हे अधिक महत्वाचे. स्वतःच्या सुखासाठी इतरांच्या सुखाची होळी झाली तरी चालेल मात्र स्वहित महत्वाचे आहे अशी वाढत जाणारी मनोवृत्ती अधिक चिंताजनक आहे. आपल्याला जे सुख हवे आहे ते सुख देखील निर्मळतेच्या वाटेनेच मिळवायला हवे.आपल्या सुखात इतरांना सुख हवे आणि इतरांच्या सुखात आपले सुखाचे दर्शन घडायला हवे ही कल्पना खरच एका उत्तम समाजाच्या निर्मितीकडे घेऊन जाणारा हा प्रवास आहे.असा समृध्द विचाराचा समाज घडविणे हे शिक्षणाचे उद्दिष्टे आहे.. खरंतर शिक्षणाचा मार्ग मुळात हा स्वसुखासाठीच नाही.शिक्षण घेता घेता आपल्याला सुख मिळत असेल तर स्वसुखासाठी शिक्षण असा त्याचा अर्थ होत नाही.शिक्षण घेताना मिळणारे सुख केवळ त्या प्रवासाचा एक भाग आहे इतकेच.आज माणसं जगात स्वसुखासाठी जे जे मार्ग निवडता आहेत त्या सर्व मार्गांचा आपण जेव्हा विचार करतो आहोत तेव्हा अनेकदा मत्सर,व्देष,आसूया,राग भरलेला आहे..त्यातून हिंसा वाढते आहे..समाजात एक प्रकारच्या विध्वंसक वाटेचा प्रवास घडविला जात आहे . अशावेळी ही वाट कोणालाही विकासाच्या दिशेने घेऊन जाणारी नाही हे कृष्णमूर्ती जाणीवपूर्वक सांगता आहे.या हिंसेच्या वाटेचा प्रवास सुखाचा वाटत असला तरी त्यापासून परावृत्त करण्यासाठी शिक्षणाची गरज आहे.शिक्षणातून हिंसामुक्त आणि आनंदी समाज निर्माण करण्याची अपेक्षा आहे.त्यावाटा दिवसेंदिवस अधिक अंधारमय बनत चालल्या आहेत.
जीवनात आपल्याल सुख हवे आहे यासाठी आपली धडपड सुरू असते.आज आपण स्वसुखासाठी जो मार्ग निवडला आहे तो नैतिक आहे का ? याचा विचार करण्याची वेळ आली आहे.आपला समाज जेव्हा विविध मार्गाने सुख मिळावे यासाठी धडपड करतो आहे तेव्हा निश्चित परीस्थिती चिंताजनक आहे असेच म्हणावे लागेल. आपण जेव्हा आपल्या सुखासाठीची वाट निवडली आहे, त्या वाटेने जाताना इतरांना त्यांच्या सुखापासून दूरावत तर नाही ना ? याचाही विचार करायला हवा.कृष्णमूर्ती यांनी जगातील वाढत्या अधःपतनाच्या मागे असलेल्या कारणांची मिमांसा केली आहे. माणसं सुखासाठी जी वाट निवडता आहे ती वाट मुळात स्वसुख देणारी असली तर समाजात दुःख पसरविणारी आहे हे लक्षात घ्यायला हवे.आपण जेव्हा शिक्षणाचा विचार करतो तेव्हा शिक्षणाची वाट बदलण्याची गरज वर्तमानात अधिक वेगाने अधोरेखित होते आहे.
खरतर आपण जगाचा विचार करतो तेव्हा अवघ जग आता युध्दाच्या सिमेवर उभे आहे.माणसं अधिक हिंसक बनत आहे.गोळ्या घालून माणसं मारली जाता आहेत.सिमारेषांवर माणसांची होणारी कत्तल,बाँब टाकून माणसं आणि मानवाने निर्माण केलेली संपत्ती नष्ट करण्याचा केला जाणारा प्रयत्न पाहिले की आपण शिक्षण आणि ज्ञानाच्या जोरावर केलेल्या संशोधनातून नेमके कशासाठीचा प्रवास करू पाहातो आहोत असा प्रश्न पडतो.कृष्णमूर्ती म्हणतात ,की जगभर माणसांचे कमी अधिक प्रमाणात अधःपतन चालू आहे. हे अधःपतन होताना मानवी मूल्यांचा होणारा -हास हा अधिक चिंताजनक आहे.माणसं लैंगिक सुखासाठी जे जे काही करता आहेत ते कितीतरी चिंताजनक आहे.त्यातून बलत्कार होता आहेत.महिलांचा विनयभंग काळजी करावी अशी परीस्थिती आहे.स्वतःच्या लैंगिक सुखासाठी छोटया छोटया मुलींचा होणारा उपयोग हा तर माणसांच्या निर्दयीपणाचा कळस आहे.लैंगिक सुखाच्या बाजारात महिला विकल्या जाता आहेत.जगाच्या पाठीवर महिलांना आपले स्वत्व विकावे लागत आहे.त्यांना बाजारात उभे करून तीच्याशी केवळ स्वसुखासाठी होणारा बाजार आपल्या समाज व्यवस्थेच्या मूल्याधिष्ठित व्यवस्थे संदर्भाने प्रश्नचिन्ह निर्माण करतो आहे.आपला समाज बुध्दिवान आहे.मूल्याधिष्ठित आहे म्हणून प्राण्यापेक्षा आपण वेगळे आहोत असे म्हटले जाते..मात्र आज जगाच्या पाठीवर लैंगिक सुखासाठी होणारी हिंसा चिंताजनक नाही का? भारतात दरवर्षी लाखो महिंला आणि मुलींवर बलत्कार घडत असल्याचे गुन्हेगारी संबंधीचे सरकारी अहवाल सांगता आहेत.त्याचवेळी गेले काही वर्षात देशात पॉस्कोचा कायदा आस्तित्वात आल्यानंतर दाखल होणा-या गुन्ह्यांचे प्रमाण पाहाता..अगदी लहान मुलींचे आयुष्य स्वसुखासाठी उध्दवस्त केले जाते आहे अधिक चिंताजनक आहे.अशावेळी माणसांच्या मनात असलेली ही विकृती सुखाची वाट नष्ट करण्यासाठी अधिक चांगल्या शिक्षणाची गरज आहे.लैंगिक सुखात स्वसुखाचा विचारातून बलत्कारासारख्या घटना समोर येता आहेत म्हणून शिक्षणावर प्रश्नचिन्ह आहे.
माणसांच्या मनोवृत्तीचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा अनेकदा काही माणसं हे स्वतःचेच खरे ठरविण्याच्या प्रयत्नात अधिक सुख असल्याचे मानतात.खरंतर आपले तेच खरे अशी वृत्ती असण्याऐवजी सत्य ते आपले अशी मोनवृत्ती असायला हवी.आज समाजात माझे ते खरे या वृत्तीने हुकूमशाहीचा जन्म होत असल्याचे दिसते आहे.जीवनात श्रवण करण्यातही शहाणपण असते.आपण जितकी श्रवण भक्ती करू तितक्या मोठया प्रमाणावर शहाणपण उंचावत असते.अनेकदा लोक स्वतःची भूमिका सोडत नाही.भूमिका कोणतीही असली तरी ती सत्याचीच असायला हवी असते.त्यामुळे माझे तेच खरे अशा प्रकारच्या मनोवृत्तीमुळे समाजात कोणाला तरी दुःखाची वाट चालावी लागते आहे.सर्वांनीच माझे खरे असे म्हटले तर संघर्ष ठरलेला आहे. त्यामुळे स्वतःचेच खरे ठरविण्याच्या नादात आपण इतरांचे खोटे ठरविण्याचा प्रयत्न करत असतो.यातून आपल्या अंहकाराला सुखावत असतो.हे सुखावणे आपल्याला आनंद ,सुख देणारे असले तरी त्यात समाजाचे कल्याण सामावलेले नाही हे लक्षात घ्यायला हवे.उत्तेजित होण्याचे सुख,स्वतःमध्येच रस घेण्याचे सुख,सतत स्वतःच्या सुखाची पूर्ती करण्याची मागणी हे वैयक्तिक सुख हे आयुष्यातील महत्वाचे सुख ठरते आहे.या वाटानी चाललेली गर्दी उंचावत गेली , की समाजाच्या वाटयाला दुःख येते.त्यातून संघर्ष जन्म घेतो मग व्देषाचा जन्म होतो आणि अखेरचा प्रवास हिंसेवर थांबतो हे लक्षात घ्यायला हवे.अस घडत गेले की तेथे अधःपतन निश्चित असते.
या गोष्टींबरोबर मानवी संबंध देखील महत्वाचे असतात.आपल्या संबंधात असलेली वीण अधिक घटट असायला हवी आहे.आज ती अधिक सैल होते आहे.आपले संबंध आता ते दिल्या घेतल्यावर निर्माण होता आहेत.त्यातील ओलावा आटत चालला आहे.माणसांना माणूस महत्वाचा वाटेनासा झाला आहे.माणसाचे मोल आता हरवत चालले आहे.त्यापलिकडे वस्तूंचे मोल वाढते आहे.आपले संबंध अलिकडे वरवरच्या सुखावर आधारित विकसित होता आहेत .जेव्हा संबंधात अंतिरक जिव्हाळा,नात्यात गोडवा आणि ओलावा असत नाही तेव्हा अधःपतन निश्चित असते. आपण आपले कर्तव्य बजावत असताना आपल्यातील जबाबदारी अधिक महत्वाची मानायची असते.आपली जबाबदारी म्हणजे एकप्रकारे स्वधर्माचे पालन आहे.जेथे स्वधर्माचे पालन असते तेथे सुख असते.आज ते सुख हरवले आहे.माणसांला जबाबदारी नको झाली आहे.त्यामुळे जेव्हा जबाबदारीला काहीही अर्थ राहत नाही तेव्हा अधःपतनाचा मार्ग नव्याने उभा राहिलेला असतो. समाजात माणसं अधिक खोटेपणाने वागता आहेत.एकत्रित राहाणारी माणसं देखील एकमेकासाठी गळ टाकता आहेत.आपण तुम्हाला कसे सहकार्य करण्यासाठी पुढे पुढे आहोत असा भाव एकीकडे निर्माण करायचा आणि दुसरीकडे मात्र त्या व्यक्तीच्या अहिताकडे अधिक लक्ष द्यायचे.माणसं पदावर असताना जेव्हा ढोंगीपणा करतात तेव्हा ते अधिक बेजबादारपणाचे लक्षण आहे.आपल्या पदाच्या अंहकारात वागताना आपल्यातील माणूसपणाचा ओलावा संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला जातो.खरंतर उच्च पदावर असलेल्या माणसांकडे अधिक प्रामाणिकपणा हवा आहे.अधिक कर्तव्य भावना हवी आहे.कारण त्यांच्या कर्तव्यभावनेकडे पाहूनच हाताखाली काम करणारी माणसं आपले वर्तन निश्चित करत असतात.तो अधिकारी अधिक बेजबाबदार असेल तर हाताखालील मंडळी आपोआप त्या वाटा चालणे पसंत करतात.मध्यंतरी माझा एक मित्र मला सांगत होता ,की माझा बॉस कार्यालयात बारा वाजता येतो आणि दुपारी जेवण करून तीन वाजता जातो.त्यामुळे पूर्वी मी नियमित जायचो पण आता त्यांची जबाबदारी असताना तेच जबाबदाराची जाणीव मनात ठेवत नाही मग आपण तरी का जबाबदारी घ्यायची असा प्रश्न पडतो.मग मी पण त्यांच्या अगोदर पंधरा मिनिटे जातो आणि ते गेले की मी पण घराची वाट धरतो.खरतर अस वागणे चुकीचेच आहे.अंतरिक प्रेरणेने त्यांना पूर्णवेळ थांबायला हवे असले तरी वरीष्ठ जबाबदार अधिकारी जेव्हा अधिक बेजबाबदार वागतात तेव्हा खाली त्याची लस आपोआप लागते.त्यामुळे असे काही घडले ,की जबाबदारीच्या पदावरील माणसांनी किती जबाबदारी वागण्याची गरज आहे हे अधोरेखित होते.त्यामुळे उच्च पदावरील माणसं ढोंगी असून चालत नाही . जेव्हा ती माणसं उच्च पदावर असूनही ढोंगीपणा करतात तेव्हा अधःपतनाची वाट सुरू झालेली असते.आपल्याकडे माणसं कमी अधिक प्रमाणात अप्रमाणिक वागताना दिसता आहेत.पैसा कमविण्याच्या आणि विशेषता नफा कमविण्याच्या नादात आपण वस्तूची गुणवत्ता हरवतो आहोत.आपण या निमित्ताने आपल्याच भारतीय बांधवाना फसवत आहोत.या फसविण्याच्या नादात माणसं अगदी माणसांच्या जीवाशी खेळता आहेत.दुधात युरीया मिसळणे असेल किंवा खाव्यात इतर काही मिसळणे असेल.किराणा दुकानात शेंगदान्यात खडे मिसळणे असेल.आपण विकत असलेला माल अत्यंत दर्जाहीन असला तरी त्यासाठी मात्र अधिक आणि अतिरिक्त पैसा जेव्हा घेतला जातो तेव्हा ही फसवणूक असते.त्या अर्थाने अशी व्यवस्था उंचावत जाते.आणि मानवी जीवन व्यवहारात जेव्हा अप्रमाणिकपणा येतो तेव्हा समाजाच्या अधःपतनाला सुरूवात झाली म्हणून समजावे. त्याच बरोबर जेव्हा असत्य हा जीवनाचा नित्य भाग असतो, जेव्हा थोडया लोकांची हुकूमशाही चालते तेव्हा आपण विकासाची फार मोठी झेप घेऊ शकणार नाही. असत्याची वाट प्रकाशाच्या दिशेचा प्रवास घडू शकत नाही .अशा अधःपतनाच्या काळात माणसांचे मोल कमी होते आणि फक्त वस्तू महत्वाचे स्थान घेत जातात.या वाटा तुडविताना बेईमानीचे काहीच वाटेनासे होते.जेव्हा जीवनात बेईमानी उंचावते तेव्हा ठार मारणे ही जीवनाची एकच भाषा उरते.जेव्हा सुख हे प्रेम समजले जाते तेव्हा माणसे जीवनाच्या सौंदर्यापासून,पावित्र्यापासून स्वतःला तोडून टाकत असतात.
जितके सुखाची अपेक्षा मोठी असते तितका अहंकार मोठा असतो. त्यामुळे आपले सुखाची वाट ही पाऊलवाटेची असावी म्हणजे आपला अहंकार हा आपोआप मर्यादीत राहण्यास मदत होईल.अंहकार उंचावत गेला की -हासाला आऱंभ होतो. त्यामुळे आपण आपला अंहकार वाढणार नाही या दृष्टीने विचार करायला हवा.त्याच बरोबर जेव्हा स्वसुखाचा पाठलाग केला जात असतो तेव्हा माणसं एकमेकाचे शोषण करत असतात.सुखासाठी जे नाते उभे राहते त्यात व्यवहार येतात.जेव्हा सुख नाकारले जाते तेव्हा राग,व्देष,मत्सर ,कडवटपणा येतो. हा पाठलाग केवळ स्वतःचे हित साध्य करेल पण त्यातून आपण जबाबदार नागरिक म्हणून नाही उभे राहू शकणार.त्यामुळे कृष्णमूर्ती म्हणतात ,की सुखाचा अखंड पाठलाग हा वेडेपणा आणि विवेकशुन्यता आहे.ही विवेकशुन्यता दिवसेंदिवस वाढत आहे हे आणखी दुर्दैव आहे.त्यामुळे शिक्षणाची जबाबदारी आणखी वाढते आहे.त्यादृष्टीने शिक्षणात परिवर्तनाची भूमिका सातत्याने मांडली जात आहे. आपल्याला उत्तम समाज हवा असेल तर सुख आणि स्वसुखावर आधारित नसलेली व स्वकेंद्रित नसलेली जीवनपध्दतीची शिक्षण प्रक्रियेतून ओळख होण्याची नितांत गरज आहे.जग हे विध्वंसक आणि अर्थहीन झाले आहे.तेव्हा शाळा ही प्रकाश आणि प्रज्ञेची केंद्र बनली पाहिजेत.शाळा या चांगुलपणाची केंद्र बनली पाहिजेत.धर्मशील मने घडली पाहिजेत असा विचार करत शिक्षणाचा प्रवास घडायला हवा.आज ही विधाने दिसायला अत्यंत सोपी वाटत असली तरी ती साध्य करण्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतील.त्यासाठीचा प्रवास कठीण आहे मात्र अशक्य नाही हेही लक्षात घ्यायला हवे.
_संदीप वाकचौरे
(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे )