Monday, November 25, 2024
Homeब्लॉगशिक्षक म्हणजे सजीव संगणक नव्हे...

शिक्षक म्हणजे सजीव संगणक नव्हे…

शाळा महाविद्यालय म्हणजे ज्ञान साधनेची केंद्र आहेत. ही ज्ञान केंद्र समाजातील धुरिणांनी निर्माण केली आहेत. त्यांची निर्मिती म्हणजे समाजाच्या उन्नतीची प्रक्रियेची धारणा आहे. ज्ञानकेंद्रामुळे समाज ज्ञानमय बनण्याची प्रक्रिया सुरू होते. जो समाज ज्ञानाची साधना करतो त्या समाजाची समृध्दपणे वाटचाल होत राहते. जी व्यक्ती ज्ञानाची वाट चालते त्याचा प्रवास मुक्ततेचा असतो. व्यक्तीच्या जीवनाचे अंतिम ध्येय मुक्तता हेच आहे. अशी मुक्ततेची वाट सापडावी म्हणून शिक्षणाचा विचार केला गेला आहे. त्यामुळे शिक्षण संस्था म्हणजे जीवन उन्नतीचे केंद्र आहेत असे मानले जाते. शिक्षण संस्थाशिवाय समाजाची प्रगतीची शक्यता नाही. मात्र त्या शिक्षण संस्थाचा प्रवास निश्चित केलेल्या ध्येयाच्या दिशेने होण्याची गरज आहे.

शिक्षण म्हणजे जीवन ध्येयाचा प्रवास आहे..मात्र आज दिल्या जाणा-या शिक्षणाचा संबंध खरच जीवनाशी नाते सांगते आहे का ? जीवनाची आत्मिक उन्नतीपेक्षा वर्तमानातील शिक्षण हे अधिक अर्थप्राप्तीच्या दिशेने प्रवास करते आहे.जे शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला अधिकाधिक अर्थलाभ होईल.ज्या शिक्षणातून अधिक नफा आणि धन संपत्ती प्राप्त करता येईल अशा पदवी,पदविकेचे शिक्षण अधिक महत्वाचे बनत आहे.शिक्षणाचा विचार माणूस घडविण्याचा आहे मात्र आज तो विचार मुळता हरवलेला दिसतो आहे.जे शिक्षण मानवाचे माणसात रूपांतर करते ते खरे शिक्षण.जे शिक्षण माणसाला जगण्यासाठी आनंद भरतो, ज्यात जीवन बहरण्याचा विचार असतो. ज्यामुळे जीवनात आनंदाच्या वाटा निर्माण होतात ते खरे शिक्षण.आपल्या शिक्षणाचा प्रवास या दिशेने घडताना दिसतो आहे का ? वर्तमानात आपल्या शिक्षणात आपण माणूस घडविण्याचा विचारही करत नाही हे वास्तव आहे.

- Advertisement -

आपल्या समाज व्यवस्थेतच शिक्षण घेतल्यानंतरही वाढत जाणारी क्रुरता,हिंस्रता,भ्रष्टाचार म्हणजे शिक्षण अभावाचे निदर्शक आहे. आपल्यामध्ये माणूसपणाचा मागमूसही नसेल तर मग आपल्या हाती पदवी असली तरी आपण अशिक्षित समजायला हवे.कोणतीही पदवी म्हणजे शिक्षणाचा पुरावा नाही.आपण किती संवेदनशील,प्रेममय आहोत हे महत्वाचे असते.आपल्यातील सहदयता,प्रेम शिक्षणातून रूजविण्याची गरज असते.आपण माणूसपणाची बीजे फार कमी पेरतो आहोत.आपण जे पेरण्याचा विचार करतो आहोत ते उतरताना दिसत नाही.कारण पेरणीचा केवळ विचार आहे.आपल्या शिक्षण प्रक्रियेत आपण खूपच आदर्शवादी विचाराचा प्रवास अपेक्षित करतो आहोत. समाजाला उत्तम दिशा मिळावी यासाठी उत्तम नागरिकांची निर्मिती अपेक्षित असते.त्यासाठी शालेय अभ्यासक्रमाचे नियोजन करताना गाभाघटक,जीवन कौशल्य,मूल्यांचा विचार रूजविण्याचा विचार अपेक्षित आहे.त्यासाठीच शिक्षणाचा सारा प्रवास केला जाण्याची अपेक्षा असते.आज मात्र तो प्रवास फारच दूरचा वाटू लागला आहे. जीवनात मूल्य आणि माणसांपेक्षा धनसंपत्ती अधिक महत्वाची वाटू लागली आहे.शिक्षणाचा प्रवास हा यंत्रासारखा घडू लागला आहे. शिक्षणातून मूल्यांची पेरणी होताना दिसत नाही. त्यामुळेच आपल्या समाजात शिक्षणाचा विस्तार होऊनही प्रश्न निर्माण झाले आहेत. कोणत्याही समाजातील वर्तमान हा शिक्षणाचा परिणाम असतो हे वास्तव आपण स्वीकारण्याची गरज आहे.आपले सारे शिक्षण केवळ साक्षरता केंद्रित झाले आहे. त्यामुळे ज्ञानाची वाट चालणे होत नाही आणि माहितीची वाट सुटत नाही.आपण माहितीने फार तर मार्क मिळू शकतो , पण त्यातून माणूस घडविला जाऊ शकत नाही.जे शिक्षण माणूस घडवू शकत नाही ते कुचकामी आहे हे लक्षात घ्यायला हवे.

शाळा,महाविदयालयातून घडणारा प्रवास म्हणजे ज्ञानाची वाट असण्याची गरज आहे. आता आपण शिक्षणाची जी वाट चालतो आहोत ती खरच ज्ञानाची वाट आहे का ? शिक्षकांनी सतत ज्ञानाची पेरणी करण्याची गरज असते..तरच शिक्षणातून समाज परिवर्तन शक्य आहे. वर्तमानात शिक्षक जे काही पेरतो आहे ते म्हणजे ज्ञान आहे का ? याचा शोध घेण्याची गरज आहे. शिक्षक म्हणून असलेली जबाबदारी पार पाडताना तो प्रवास घडत नाही. वर्तमानात शिक्षक जे कार्य करतो आहे तो ज्ञानाचा प्रवास आहे का ? शिक्षक सध्या जे काही कार्य करतो आहे तेवढेच शिक्षकाचे कार्य आहे का ? सध्या मुलांच्यापर्यंत माहिती पोहचवण्याचे काम शाळेत घडत असते.विद्यार्थ्याला त्या इयत्तेच्या पाठयक्रमानुसार माहिती दिली जात असते.पाठयपुस्तकात असलेला मजकूर मुलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जात असतो.त्या पुस्तकातील असलेली माहिती स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न केला जातो.पुस्तकात असलेल्या विविध संकल्पनांचे स्पष्टीकरण शिक्षण प्रक्रियेत केले जाते.एखादा घटक समजावून सांगण्यासाठी विविध प्रकारचे प्रयोग,प्रात्यक्षिक केले जातात.विविध प्रकारचे असलेल्या सिंध्दात समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जातो.शिक्षणाच्या दृष्टीने असलेले विविध पैलूंवर देखील चर्चा होत असते.यासोबत शिक्षक विविध प्रकारे वर्गात आपले अध्यापन करत असतो..मात्र यापध्दतीने प्रवास करत राहाणे म्हणजे अध्यापन करणे नाही.या गोष्टी तर अगदी यांत्रिक पध्दतीने घडत राहातात. कृष्णमूर्ती म्हणतात ,की एवढेच शिक्षक म्हणून जर आपले कार्य असेल , तर ते काम संगणक देखील करू करेल.जे काम संगणक करू शकते तेवढेच काम आपण करतो याचा अर्थ आपण एक सजीव संगणक आहोत एवढेच.त्यामुळे जे काम संगणक करू शकेल त्यासाठी जिवंत शिक्षकांची गरज काय ? असा प्रश्न निर्माण होतोच. त्यामुळे शिक्षणात सध्या जे घडते त्यापेक्षा अधिक वेगळी वाट चालण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे.त्याशिवाय शिक्षणाचा हेतूच साध्य होण्याची शक्यता नाही.

शिक्षक शिक्षण व्यवस्थेतच सध्या जे कार्य करता आहेत त्यापेक्षा कितीतरी महान जबाबदारी शिक्षकांवर आहे असे कृष्णमूर्ती नमूद करतात. शिक्षक म्हणून उपरोक्त स्वरूपाचे जे कार्य करायचे आहे त्यापेक्षा शिक्षकाला अधिक जबाबदारीचे कार्य करायचे आहे. त्यात प्रामुख्याने आचरण, मनुष्याच्या वागण्यातील क्लिष्टता, ज्यामध्ये बहरणे आहे अशी जगण्याची रीत ह्याबद्दल तळमळ असायला हवी. आपल्या शिक्षणातून माहिती देण्यावर अधिक भर आहे.शिक्षक हा शिक्षकच राहिला ,की समाजाचा -हासाला सुरूवात होते. शिक्षकांने केवळ पुस्तकापुरता मर्यादित विचार केला की आचार्यांपर्यंतचा प्रवास घडणे शक्य नाही.आपल्याला खरोतर परिवर्तन हवे असेल तर शिक्षकाचा प्रवास हा आचार्य पदापर्यंत होण्याची गरज आहे.देशभरातील शिक्षक ज्या दिवशी आचार्य पदाच्या दिशेचा प्रवास घडवतील त्यादिवशी समाजाचे व राष्ट्राचे उत्थान घडलेले आपल्याला अनुभवास आल्याशिवाय राहाणार नाही.केवळ पाठयपुस्तकातील माहितीचे अध्यापनाने जीवनात परिवर्तन होत नाही.त्यासाठी जीवनात अधिक ज्ञानमय वाट तुटवण्याची गरज असते. त्यामुळेच शिक्षकांनी आचरणावर अधिक भर देण्याची गरज आहे.ख-या शिक्षणात शिक्षक हेच विद्यार्थ्यांसाठीचे पाठयपुस्तक असते.त्या पाठयपुस्तकाच्या वाटचालीने मूल्य,ज्ञानाचा प्रवास घडणार असेल तर तेच रूजण्याची शक्यता अधिक आहे.पाठयपुस्तकांतील माहितीचा प्रभाव जितका म्हणून विद्यार्थ्यांवर होत नाही त्यापेक्षा अधिक प्रभाव शिक्षकांचा प्रतिमा आणि प्रतिभेचा होत असतो. शिक्षकाने मिळालेल्या जीवनाचा शोध घेण्याची गरज असते.आपल्या जीवनात अर्थपूर्णतेचा शोध त्याला घेता यायला हवा.जीवनाची सुलभ वाट निर्माण करता यायला हवी.जीवनातील क्लिष्टता जाणून घेता यायला हवी.जीवनातील बहरण्याच्या आणि फुलण्याच्या वाटा त्याला विकसित करता यायला हव्या.त्याशिवाय जीवंत उभ्या राहिलेल्या शिक्षकाचे कार्य झाले असे म्हणता येणार नाही.आपण या वाटा निर्माण करण्यात कमी पडलो तर शिक्षकांची गरज भविष्यात कमी होण्याची शक्यता आहे.त्यामुळे जीवंत शिक्षक आणि संगणक,यंत्र यांच्यातील अंतर अधिक अधोरेखित होण्याची गरज आहे. शिक्षकाला नेहमीच विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता आणि त्यांचा भविष्यकाळ कसा असणार हे जाणण्याची तळमळ असायला हवी.वर्गात असलेल्या विद्यार्थ्यांच्याबददल निश्चित चिंता असायला हवी.शिक्षण घेतलेल्या प्रत्येकाला त्याच्या जीवनात प्रकाशाची वाट सापडालया हवी. जगाच्या पाठीवर असलेल्या प्रत्येक माणसांचे भवितव्य काय ? ही जाणीव अंतकरणात असायला हवी.माणूस केवळ यंत्रासारखे काम करणार असेल आणि जसे होईल तसे होईल असे म्हणून प्रवास सुरू ठेवला तर त्याला अर्थच उरणार नाही.शिक्षण घेतलेल्या प्रत्येकाला माणूस म्हणून जगता यायला हवे. त्याशिवाय प्रत्येक नागरिकाता माणूसपणाची उंची उंचवायला हवी.आपल्या जाणीवा,माणसांमधील असलेला गोंधळ, अस्वस्थता,विस्कळीतपणा ,संघर्ष याबददल शिक्षणातून चिंतन व्हायला हवे.आपल्या जीवनातील विस्कळीत पणा कमी करण्याबरोबर संघर्ष कमी होण्याची गरज आहे. जीवनात संघर्ष असायला हवे असतात हे जरी खरे असले तरी संघर्षाची वाट सत्याची असायला हवी असते.तो संघर्ष स्वहितासाठीचा असता कामा नये.माणसांच्या जीवनाचे भवितव्य जाणून घेता यायला हवे. व्यक्तीच्या आयुष्यात सातत्याने असलेला संघर्ष, दुःख,वेदना, यातना आहेत. ह्या सगळ्या गोष्टींबद्दल शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्यासोबत संवाद साधायला हवा. हे जीवंत शिक्षकाचे कर्तव्य आहे.आपण माणसांच्या वेदनांचा हुंकार जाणू शकत नाही , तर केवळ पुस्तक शिकवत राहिलो तर स्वतः फक्त एक जिवंत, हुशार यंत्र बनून जाऊ.आपल्यातील माणूसपण संपलेले असतानाही यंत्रासारखे काम करत राहतो तो शिक्षक हा शिक्षणातून यंत्रच निर्माण करेल.ज्याच्यात माणूसपण सामावलेले असेल तोच शिक्षक फक्त माणूस घडवेल..जे आपल्या जवळ आहे तेच पेरले जाईल आणि जे पेरले जाईल तेच उगवेल.त्यामुळे शिक्षणात यंत्राची नव्हे तर माणसांची अधिक गरज आहे.

कृष्णमूर्ती शिक्षण आणि शिक्षकांबददलचे चिंतन मांडत असताना नेहमीच विचार करायला भाग पाडतात.त्यांनी निर्माण केलेल्या वाटा चिंतनासाठी मार्ग दाखवितात.शिक्षणाबददल चिंता करावी असेही अनेकदा वाटून जाते.त्यांच्या चिंतनाचा पाया माणूस घडविण्याचा आहे..आपल्या शिक्षणातून माणूस घडविण्याचा विचार जवळपास हरवला आहे.आज आपण ज्या वाटांनी चाललो आहोत तो काही शिक्षणाचा महामार्ग नाही.खरंतर आपण अजूनही ख-या शिक्षणांच्या पाऊलवाटेचा प्रवासही करू शकलो नाहीत.हे पुन्हा पुन्हा समोर आले आहे. कृष्णमूर्ती म्हणतात ,की मी एक मूलभूत प्रश्न विचारतो , शिक्षक असणे म्हणजे नेमके काय ? कदाचित हा पेशा जरी कमीत कमी प्रतिष्ठा असलेला व्यवसाय असला , तरी अध्यापन करणे हा जगातील सर्वांत महान व्यवसाय आहे. आज शिक्षक होण्यासारखे सोपे काही नाही ही समाजमनाची धारणा झाली आहे.वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना कोणीही शिकू शकतो असे अनेकाना वाटते.संप काळात गावात तलाठी कार्यालय,ग्रांमपंचायत सुरू झाल्या नाहीत मात्र शाळा सुरू होण्यासाठी कोणतीही पदवी नसताना काही लोक पुढे आले आणि शाळा सुरू केल्या होत्या.शाळेत शिकविण्यासाठी कोणत्याही शहाणपणाची गरज नाही हे जणून गृहीत आहे. खरे तर शिक्षकी पेशा हा महान व्यवसाय बनविण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये सामावलेले आहे. शिक्षक खोलवर, गंभीर तळमळ व्यक्त करत असेल तर तो मानवी मेंदू संस्कारापासून मुक्त करण्याचा प्रवास असतो.या निमित्ताने स्वतःचाच नव्हे तर विद्यार्थ्यांचा मेंदूदेखील तो मुक्त करत असतो.मुळात शिक्षणांचा विचार हा मुक्ततेचा प्रवास आहे.त्यामुळे मुक्ततेचा विचार देते ते खरे शिक्षण.आज शिक्षण व्यक्तिला मुक्त करण्याऐवजी अधिक बंधिस्त करण्याचा प्रयत्न होतो आहे. शिक्षणाचा प्रवास यंत्रवत झाला तर मुक्ततेचा विचार शिक्षणातून हददपार होईल.शिक्षण मुक्त करू शकले नाही तर शिक्षणात चैतन्य कसे येणार हा खऱा प्रश्न आहे.जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात मैत्रीचा बंध असतो.त्या नात्याने शिकण्याचा प्रवास अधिक समृध्द होत असतो.त्यातून ज्ञानाची वाट सहजतेने निर्माण होते.ज्ञानाचा प्रवास घडला की मुक्ततेचा प्रवास सहज शक्य आहे.शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यातील ओलाव्यामुळे एकमेकांना बंधिस्त संस्कारातून मुक्त करण्याचा आणि नम्रतेचा मूलभूत धागा असतो.संवेदनशीलता आणि प्रेम स्वाभाविक असते.आज प्रेमाचे बंध हरवत चालले असून त्या नात्यालाही व्यवहारिक स्वरूप प्राप्त झाले आहे.शिक्षक विद्यार्थी नात्यात आलेली व्यवहारिकता अधिक चिंताजनक आहे.त्यामुळे मुक्ततेचा प्रवास शक्य होत नाही. शिकणारा आणि शिकविणारा यांच्यातील असलेला परस्परसंबंध ही शिकण्याची प्रक्रिया आहे. संबंध ही स्थिर गोष्ट नाही, तर ती एक जिवंत प्रक्रिया आहे. त्याला एक प्रकारची गती असते.ती काल जशी होती तशीच ती आज नसते. जेव्हा संबंधांवर भूतकाळाचे वर्चस्व राहाते, तेव्हा संबंध काल काय होते तसेच आज राहतात, ते जिवंत नसतात.संबंध जीवंत असल्याशिवाय आपल्याला शिक्षणातून माणूस घडविण्याचा विचारही करता येणार नाही.

– संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)


- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या