माणूस म्हणजे प्रचंड उर्जेचा सागर आहे. त्याच्या शक्तीचा फारसा अंदाजही अनेकदा येत नाही. माणसांने आपल्यातील शक्ती,उर्जेच्या जोरावर पृथ्वीच्या निर्मिताची शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या हजारो वर्षाच्या भूतकाळातील घडणा-या घटनांचा अंदाज घेत मांडणी केली जात. हजारो वर्षाचा हा इतिहास आहे.त्याची मांडणी सहज सोपी गोष्ट नाही. माणसांतील अफाट उर्जेमुळे जगभरात प्रचंड क्रांती झाली आहे. माणसांनी आपली उर्जा सकारात्मकतेने उपयोगात आणत त्यांने सागराच्या तळाशी जात आणि आकाशात उंच भरारी घेत आपल्यातील उर्जेचा उपयोग केला आहे. विधायक स्वरूपात उर्जेचा उपयोग करत मोठया प्रमाणावर बदल घडविण्याचा प्रयत्न झाला आहे. माणसांने आपल्या बुध्दीच्या जोरावर मारलेली झेप कौतुकास्पद आहे. माणसांने आकाशात भरारी मारण्याबरोबर सागराच्या तळाशी देखील बुडी मारत केलेल्या संशोधनातून माणसांच्या अफाट शक्तीचा अंदाज येऊ शकेल. आपल्या भोवतीच्या असलेल्या अनेक गोष्टींचा शोध घेत लाखो वर्षाच्या इतिहासात डोकावत त्यांने मारलेली झेप तोंडात बोट घालायला लावणारी आहे. माणसात असलेल्या उर्जेने विधायक बरेच काही घडले आहे.ती मोठी शक्ती आहे.त्याचा परिणाम म्हणून आजवरच्या प्रवासात मोठे परिवर्तन घडले आहे.
विधायकतेसाठी उर्जा उपयोगात आणली त्याप्रमाणे त्यांच्यात सामावलेली उर्जा विध्वसंक कामासाठी देखील वापरली गेली आहे. जगाच्या पाठीवर तीन हजार वर्षात पाच हजार युध्दे झाली आहेत. युध्दामध्ये लाखो माणसं मारली गेली आहे. स्टॅनिल यांनी एक कोटी आणि हिटलर यांनी साठ लाख लोक मारली होती. कधीकाळी घोडयावर बसून होणा-या लढाया करणारा माणूस आज अणुयुध्द,जैविकयुध्दापर्यंत पोहचला आहे. माणसाने यासाठी प्रचंड उर्जा वापरली. माणसांने स्वतःत सामावलेली उर्जेचा उपयोग बाहय विकासात प्रचंड स्वरूपात केला आहे. मात्र अंतरिक, मानसिक शोधासाठी ती उर्जा उपयोगात आणली नाही. ‘मी’च्या मर्यादित उर्जेतून स्वतःला मुक्त करण्याची गरज होती.आपण ‘मी’तून मुक्त झालो नाही तर शिक्षण काय कामाचे? ‘मी’तून मुक्तता हेच शिक्षणाचे काम आहे.
आज आपल्यातील उंचावलेला ‘ मी ’ शिक्षणातून कमी होण्याची गरज आहे. शिक्षण घेतलेली माणसं अधिक अंहकाराने फुलली आहेत.शिक्षण जणू अंहकार वृध्दीसाठीच आहे असे वाटावे असे चित्र आहे.अंहकार जेथे अधिक असतो तेथे सत्याचा प्रवास थांबतो.प्रेम आटते.संघर्षाची बीजे पेरली जातात.माणसांच्या नात्याची वीण सैल होते.अंहकार म्हणजे कोणतेही काम चांगल्या न होण्याचा मार्ग आहे.माणसं स्वतःच्या अंहकाराची जोपासणा करण्यासाठी स्वतःची मोठी उर्जा खर्च करत असतात.आपल्याकडे प्रचंड असलेली उर्जा आपण ‘ मी ’ या एकाच कार्यासाठी खर्च करत आहोत. ही उर्जा विधायक मार्गासाठी खर्च झाली तर समाजाच्या भल्याचा नवा मार्ग निर्माण होईल.आपला अंहकार संपुष्टात आणण्याचे काम शिक्षणातून घडण्याची गरज आहे.कृष्णमूर्ती म्हणतात ,की शाळा,महाविद्यालयांची निर्मितीच मुळात आपल्यात असलेला अंहकार संपुष्टात आणण्यासाठी झाली आहे.त्यामुळे समाजाची उन्नती आणि उत्थान घडवायचे असेल तर अंहकार संपविण्याचे काम करण्याची गरज आहे.शिक्षण घेऊन आपला अंहकार जोपासला जात असेल तर ते शिक्षितपणाचे लक्षण नाही.त्यामुळे समाजात काही लोक शिक्षणाच्या अपेक्षित वाटेने चालत राहतात.काही लोक शिक्षण घेऊनही कायमच अशिक्षित असतात.या वाटेचा प्रवास अधिक वेगाने आणि अधिक संख्येने होतो आहे हे मात्र दुर्दैव आहे.
शिक्षणातून चांगुलपणाची वृध्दी होण्याची गरज असते.शिक्षणाचे ध्येय मुळात माणसांतील पशुत्वाचा भाव संपुष्टात आणणे हेच आहे.माणसांत जे जे म्हणून वाईट आहे ते सर्वकाही संपुष्टात आणण्याची जबाबदारी शिक्षणाची आहे. मुळात शिक्षण काय करते ? असा प्रश्न विचारला तर माणसात जे जे म्हणून नकारात्मक,वाईट आहे ते मस्तकातून आणि मनातून हददपार करण्याचे काम शिक्षणातून होत असते.नको असलेला भाग काढला गेला ,की आपोआप चांगली मूर्ती घडली जाते, त्याप्रमाणे शिक्षणाने नको असलेला भाग काढला ,की चांगला माणूस शिक्षणातून घडण्याची प्रक्रिया सुरू होते. मानवी जीवनात माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोण ? तर तो आहे माणसांचा अंहकार. शिक्षणाने अंहकार संपवला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याची भूमिका अपेक्षित आहे.माणसात अंहकार फुलण्याची अनेक कारणे आहेत.कधी पदाचा अंहकार,कधी पैशाचा, तर कधी प्रतिष्ठेचा अंहकार असतो.आपण विचार करत जातो तेव्हा लक्षात येते ,की आपण ज्या पदावर काम करत आहोत ते पद अंतिम नाही.आपल्यापेक्षा कोणी तरी अधिक अधिकार असलेली व्यक्ती आहे आणि तिचे पदही आपल्यापेक्षा उच्च आहे.आपल्यापेक्षा अधिक वेतन घेणारे समाजात कोणी तरी आहे..आपल्यापेक्षा कोणाकडे तरी अधिक श्रीमंती आहे. या गोष्टी लक्षात आले की आपल्यातील दुःख वाढत जाते. अंहकार पोसला गेला की त्याचा परिणाम दुःख हाच आहे.मुळात आपल्याला ज्या गोष्टींचा अंहकार आहे तो आपल्यासाठी खोटा आहे. अंहकाराने काय घडते याचा अंदाज यायला हवा.त्याचा परिणाम जाणता यायला हवा.हे कळण्यासाठीची विवेकशीलता शिक्षणातून साध्य होण्याची गरज आहे.आपले पद सरपंचाचे असेल तर त्यापेक्षा सभापती मोठा असतो..मग अध्यक्ष मोठा असतो..अशी वरची श्रेणी कायमच असते.जगाच्या पाठीवर आपल्यापेक्षा कोणीतरी मोठे असतेच.आपल्या प्रवासात हे आपल्या लक्षात यायला हवे.मध्यंतरी एक मित्र सांगत होता ,की एका कनिष्ठ अधिका-यांकडे वरीष्ठ पदाचा पदभार देण्यात आला होता. मात्र त्या पदावर काम करताना संधी मानत काम व्हायला हवे असते.कायदयाचे नियम पालन करत ते घडले तर स्वागत व्हायला हवे..पण जेव्हा अधिकाराचा अंहकाराची झुल घेऊन प्रवास सुरू झाला तेव्हा माणसात मस्ती येते.त्या मस्तीत आपण काय करतो आहोत याचा अंदाज येत नाही.अंहकार मस्तीत जगायला भाग पाडतो.ती मस्ती माणसांच्या डोळयावर अधिकाराची पट्टी आली ,की माणसं चुकीच्या दिशेने प्रवास करतात.त्यातून स्नेहाचे नाते आटत जाते.अंहकार माणसाला धुंदीत जगायला भाग पाडतो.त्यातून पदावर आहे तोपर्यंत लोक नमस्कार करतात..मात्र त्यानंतर काय ? केव्हा तरी कोणी पदावर येणारच असते. त्या पदावर एखादी व्यक्ती रूजू झाली ,की लोकभावनेतील आदर संपतो.मग सत्तेवरून दूर होताच लोक नमस्कार करत नाही.त्यातून लोक पात्रता दाखवून देतात.तो सारा प्रवास दुःख देणारा आहे.मात्र अंहकार नसले तरच माणूस जीवनात त्या संधीचे सोने करू शकेल.त्यामुळे आहे त्या पदावर आपण कार्यरत असताना अंहकाराचा वारा लागू नये असा प्रयत्न झाला तर सन्मान मिळण्याची शक्यता अधिक आहे.अन्यथा अंहकार घेऊन जगणा-यांची माती होते हे लक्षात घ्यायला हवे. लोक सत्तेवर आहेत तोवर नमस्कार करतात आणि पायउतार झाल्यावर डोकाऊनही पाहत नाहीत.यात लोकांची चूक नसतेच मुळात..तो अंहकाराचा निषेध असतो.. कधी कधी समाजात असेही लोक असतात ,की जे म्हणतात मला अंहकार नाही, पण असे म्हणणे हा देखील एक प्रकारचा अहंकार आहे. असे मिरवत असणा-या माणसांचा अंहकार देखील किती मोठा आहे हे सहजतेने लक्षात येते.लोक समाजात समाज सेवा करत असतात, पण समाज सेवेचाही अंहकार मिरवत असतात.अंहकार हा एक प्रकारचा अंलकार बनू पाहत आहे.तो अंहकार मिरवण्यात अनेकाना धन्यता वाटते.त्यामुळे समाजात संघर्षाचा जन्म होतो.अंहकाराचे पोषण होताना सत्याची ओळख होत नाही.सोबत कोणी बुध्दीवान माणसं राहात नाही.सत्याची वाटही दर्शविणारे माणसं उरत नाही..आपल्या भोवती केवळ भाटगिरी करणा-यांचा जन्म होतो.त्यामुळे समाजाचे किती नुकसान होते यापेक्षा व्यक्तीगत होणारे नुकसान अधिक असते हे लक्षात घ्यायला हवे.
समाजात स्वहिताचा विचार अधिक प्रमाणात केला जात आहे. तो करणे चूक असे पण नाही..पण तो विचार किती केला जावा याचा तरी विचार केला जावा इतकेच.माणसांमध्ये ‘ मी ’ केंद्रस्थानी आहे. माणसांमध्ये प्रचंड उर्जा सामावलेली आहे.सामावलेली शक्ती,उर्जेचा अंदाजही येणार नाही.जगाच्या पाठीवर माणसांमध्ये सामावलेल्या अंतरिक शक्तीचा अंदाज येणार नाही.जगाच्या पाठीवर माणसांच्या मना इतकी उर्जा आणि वेग असलेले दुसरे काहीच सुध्दा नाही. आपल्यात सामावलेली इतकी शक्ती असलेली उर्जा आपण कधीच उपयोगात आणत नाही हे खरे आहे. मात्र त्याचवेळी आपण जी उर्जा उपयोगात आणतो ती देखील केवळ स्व..अर्थात ‘ मी ’ पुरतीच मर्यादित आहे. शिक्षणाची गरज येथे निर्माण होते.’ मी ’ पासून माणसांच्या उर्जेला मुक्त करणे हे शिक्षण आहे.त्या मुक्ततेचा प्रवास करण्यासाठी शिक्षणाची वाट हवी आहे.आज शिक्षणातून ‘मी’ च अधिक दृढ होताना दिसत आहे.आज समाजकारण,राजकारण,सांस्कृतिक,अर्थकारण आणि अगदी शिक्षण क्षेत्रात देखील ‘ मी ’ उंचावत आहे.’ मी ’ जेथे उंचावतो तेथे उत्तमतेचा शोधाचा मार्ग बंद होतो . अंहकारामुळे सात्विकतेने काही घडण्याची शक्यता नाही.आपला अंहकार आपले मस्तकावर राज्य करतो.मस्तकावर अहंकाराचे राज्य आले , की सत्याची वाटही संपते.जेथे ‘ मी ’ चा वरचष्मा उंचावतो तेथे समाजाचे आस्तित्व देखील संपुष्टात येते. ‘ मी ’ चा नाश होणे हे खरे शिक्षण आहे. ‘ मी ’ संपला तरच समाज आणि राष्ट्र उभे राहत असते.घरातही ‘ मी ’ आला की घरात दुःखाचा वारा वाहू लागतो.जीवनात चांगुलपणाचा नाश होताना जो दिसतो त्यामागे अहंकार हेच कारण आहे.व्यक्तीगत जीवनातही जे काही वाईट घडते आहे त्यामागे अंहकाराचा वारा आहे.आपल्या जीवनाचा विचार आपण जेव्हा करतो तेव्हा दुःख निर्माण होते.दुःख आहेच मात्र त्याचा उदगाता हा दुसरा तिसरा कोणी नाही तर तो ‘ मी ’ च आहे.त्यामुळे कृष्णमूर्ती यांनी आपल्याला स्व ची जाणीव करून देण्याच्या दृष्टीने शिक्षणाचा उपयोग करावा अशी सातत्याने भूमिका प्रतिपादन केली आहे.अंहकार हे दुःखाचे कारण आहे..मग तो अंहकार आपल्या विद्यार्थ्यांच्या आय़ुष्यात निर्माण होणार नाही यासाठी शिक्षणाची प्रक्रिया कार्यरत राहायला हवी.विद्यार्थ्याचे हित ज्यात सामावलेले आहे ती वाट निर्माण करण्याचे काम शिक्षक करत असतो.त्यामुळे ज्या वाटा दुःखाच्या आहेत त्या जीवनभरच आपल्या विद्यार्थ्याच्या वाटयाला येऊ नये यासाठी काळजी घेतली जाणे साहजिक आहे.शिक्षकाला अंहकाराचा परिणाम ज्ञात असेल तर त्या वाटा शिक्षक चालणार नाही..आणि त्या वाटेने इतर कोणी चालावे यासाठी देखील प्रयत्न करू देणार नाही.आपल्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात अमुलाग्र बदल घडविणे आणि जीवन आनंददायी राहणे हेच शिक्षकाचे कर्तव्य असते.त्यामुळे खरा शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला अहंकाराची वृध्दी होणार नाही यासाठीच प्रयत्न करेल.कृष्णमूर्ती म्हणतात ,की “ सर्व क्षेत्रातील शिक्षण हे माणसात सामावलेल्या उर्जेला संकुचित करते आहे.आपल्या जीवन प्रणालीत आपण काही तरी बनने आहे..किंवा काही न बनने असेल तर हा प्रवास म्हणजे उर्जेचा -हास आहे ”.त्यामुळे शिक्षणाचा पुनर्विचार करण्याची गरज आहे.शिक्षणाने हा पुनर्विचार केला नाही तर उद्याचा समाज हा कोणत्याही परीस्थितीत आनंदी होणार नाही.समाजात सुख,समाधान हवे असेल तर आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही.तो शिक्षणाचा प्रवास हा अधिक उन्नत असायला हवा..त्यामुळे कृष्णमूर्ती यांनी सूचित केलेल्या दिशेचा प्रवास आपण करू शकलो ,तर नव्या समाजाची निर्मिती शक्य आहे.तो समाज एका नव्या उर्जेने भरलेला असेल यात शंका नाही.त्या वाटेचा प्रवास समाजाची उन्नती घडवून आणेल.समाजाच्या कल्याणांचा मंत्र त्यात दडलेला आहे,पण दुर्दैवाने ती वाट अधिक चांगले वाटते..आणि त्या वाटेचा प्रवास करत आपण आपल्या वाटा काटेरी करत जातो..आपणच ठरवायला हवे.. आपण कोणत्या वाटेचा प्रवास घडवायचा आहे …
संदीप वाकचौरे
( लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे )