समाजात प्रत्येक व्यक्ती विशिष्ट विचाराचे उपाजक बनण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहे. ते विचार कधी घरातून तर कधी शाळेतून लादले जातात. विद्यार्थ्यांनी देखील अपेक्षित विचारांची पाऊलवाट चालावी म्हणून आपले शिक्षण काम करते आहे. मुळात विद्यार्थी घडवायचा असतो म्हणजे काय? तर त्याच्या विचाराची जडणघडण करण्यासाठी प्रयत्न केला जात असतो. शिक्षणातून विचाराचे उपासक व्हावेत म्हणून प्रयत्न केले जात असतात. खरेतर आपण एका विचाराच्या मागे लागलो, की इतर विचारांचे काय? असा प्रश्न निर्माण होतो. माणसांला विचार करायला शिकवणे महत्वाचे आहे. त्याला विचार करता आला आणि त्यातून विवेक, शहाणपणाचा परीपोष शिक्षणातून निर्माण झाला तर त्याला योग्य विचाराचा मार्ग निवडता येईल. कोणत्याही एका विचाराच्या मागे लागले तर तो विचार मस्तकी घेऊन जगता येईल; पण त्यातून नात्यातील ओलावा आटत जाईल. आपण कोणत्याही एका विचाराची वाट चाललो, की संघर्ष वाढत जातात. मुळात इतरांच्या विचाराचे स्वागत करता यायला हवे. विचार लादणे बंद झाले तर समाजातील संघर्ष कमी होऊ शकतील. माणसांला विचार करण्यासाठी स्वातंत्र्य हवे आहे ती वाट जेथे असेल तीच वाट चालण्याची गरज आहे. विचाराचे स्वातंत्र्य म्हणजे सृजनाची वाट आहे.
आज माणसं विचाराचे अनुकरण करतात.त्यामुळे विचार करण्याची गरज पडत नाही.आपण जो विचार स्वीकारला आहे त्या विचाराचे पाईक झाले, की मग त्या विचाराच्या संबंधाने कोणताही विचार पुढे आला की तो स्वीकारला जातो. असे घडत गेले तर विचार करण्याची क्षमता आपण गमावण्याची शक्यता अधिक होते. जीवनप्रवासात विचाराच्या अनुकरणात बरेच काही गमावणे घडते आहे. विचाराचे अनुकरण करू लागलो की इतरांच्या विचारांची वाट संपुष्टात येते मग तो विचार कितीही चांगला असला तरी. मस्तकातील एका विशिष्ट विचारांचे पाईक झाल्यामुळे आपण माणसांमाणसात प्रेमाचे नाते बांधू शकत नाही. मुळात माणसांमाणसात प्रेमभाव रूजविण्यासाठी माणसाला कोणत्याही विचाराशिवाय निर्मळतेने स्वीकारता आले पाहिजे. अंतरिक निर्मळता जीवनात अधिक महत्वाची आहे. प्रेमभाव असेल तरच नाते दृढ होण्यास मदत होते.कृष्णमूर्ती म्हणतात की, “विचाराचा गुणधर्म विभाजन करणारा आणि विध्वंसक आहे” आपण ज्या विचारांचे आहोत त्या विचारावर प्रेम करण्याची वृत्ती असणे साहजिक आहे. आपण ज्या विचाराचे पाईक आहोत आणि तोच विचार कसा उत्तम आणि सत्य आहे हे सांगण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. त्यामुळे दुस-यांच्या विचारांचा आपोआप व्देष, मत्सराचा भाव निर्माण होतो. तो विचार मनात निर्माण झाला, की माणसांमधील प्रेम, ममत्वाचा भाव कमी होईल.
कृष्णमूर्ती म्हणतात, की “कोणताही विचार हा प्रेम, ममत्व घडू शकत नाही. सौंदर्याची गुणवत्ता आणू शकत नाही. आपण जेव्हा विचांरासोबत जगतो तेव्हा आपण जीवनाची महान सखोलता गमावतो. कारण विचार उथळ असतो. आपण कितीही खोल वर विचार आहे असे सांगत असलो तरी त्या साधनाला मुळात मर्यादा आहेत” आपल्यात ममत्वाचा विचार दृढ करायचा असेल तर हदय अधिक उंचावलेले असायला हवे. विचार सोबत घेतले, की प्रेम, ममत्व, वात्सल्याचा भाव कमी होऊ लागतो. आपल्याला जो प्रवास करायचा आहे त्या मानवी संबंधात दृढता हवी आहे. जीवनात प्रेम आणि ममत्व उंचवायला हवे. ती आपली माणूसपणाची वाट आहे मात्र त्यात विचार आड येतात. आपल्या समाजात जे भेद आहेत ते अज्ञानातून आहेत. त्या पलिकडे विचारांनी देखील समाजात भेद निर्माण केले आहेत. समाजात राजकीय विचारधारा भिन्न असतील, तर त्या त्या विचाराचे उपासना करणारे जे लोक आहेत ते आपापले गट निर्माण करतात. त्यामुळे समाजात एकात्मतेपेक्षा वेगवेगळ्या विचारात राहणे पसंत केले जाते. त्याच प्रमाणे धर्म हाही एक प्रकारचा विचार आहे. आपण ज्या धर्माचे आहोत तो धर्म जो विचार देतो त्या विचारावर आपण प्रेम करतो त्यामुळे आपोआप असे विचार करणारे लोंकामध्ये गट पडायला सुरूवात होते. त्यातून विविध धर्माचे लोक तयार होतात. ते आपलाच धर्म कसा खरा आहे हे सांगत समाज विभागला जातो.अनेकदा एकाच धर्मातही वेगवेगळे प्रवाह असतील तर त्यांचेही गट तयार होतात.. आणि मग त्यातून नवा संघर्ष विचारातून उभा राहतो. समाजातील असलेले संघर्ष विचाराच्या मतभेदातून निर्माण झाले आहे. समाजात एकाच जातीतही अनेक गट असतात.सेवेत काम करणा-यांचे गटही भिन्न असतात. विविध संर्वगात काम करणा-याचेही गट भिन्न आहेत. आपण माणूस म्हणून समान आहोत.मात्र तरी सुध्दा आपल्यात विविध कारणांनी भेद आहेत. एकमेकाचे धर्म भिन्न असले म्हणून आपण एकमेकावर प्रेम नाही करू शकत का? खरतर माणूस आणि त्याची माणूसकी अधिक उंचावलेली असेल तर प्रेमाचे नाते उभे राहते. मात्र आज माणूसकी, माणूसपणापेक्षा विचार अधिक मोठे ठरतात. माणसांच्या आयुष्यात धर्माचे विचार मोठे ठरतात आणि माणूस लहान ठरतो आहे कारण येथे प्रत्येकाचे धर्म विचार भिन्न आहेत.अनेकदा एखादा विचार चांगला असतो, मात्र त्या विचारापेक्षा सांगणारी व्यक्ती कोणत्या विचाराची आहे त्यावर त्या चांगल्या विचाराचे चांगुलपण अवंलबून असते. त्यामुळे आपले जीवन विशिष्ट विचारापासून दूर जायला हवे. आपण शुन्यत्वाला पोहचलो की अपेक्षांचे ओझे संपुष्टात येते. कोणताही एका विचाराची वाट अडचणीची आहे. आपण कोणत्याही विचाराचे नसणे याचा अर्थ विचाराचा अभाव असणे असा होत नाही. आपल्याला त्या क्षणी जे जे भावेल त्याच्यातील माणूसपण लक्षात घेता प्रेमात पडता येणे महत्वाचे आहे. आपणाला जेव्हा एखादी व्यक्ती आवडते, आपण प्रेम करतो तेव्हा तीचे विचार कोणते आहेत हे महत्वाचे ठरत नाही तर त्याच्यातील माणूसपणाचा धागा अधिक महत्वाचा आहे. प्रेमाने विचारांवर मात केली जाते, पण विचाराने आपण प्रेम केले तर त्यात आनंद गमावणे घडेल. आपल्याला निर्मळतेने प्रवास करता यायला हवा. आपल्यातील स्नेहाचा अभाव आहे याचे कारण विचार. माणसं विचार करतात आणि त्या विचाराच्या मस्तीत जगत असतात.आपण कोणी तरी आहोत हा भाव मनात विचाराने घर करत असतो. त्यामुळेच भेद आणखी पक्के होत जातात. जितके विचाराची दृढता असेल तेवढा समाज विभाजित होत जातो.मुळात विचारात विभाजनाची शक्ती आहे. त्याचवेळी विंध्वसकतेची शक्यता देखील अधिक असते. विभाजन झाले की हिंसा जन्म घेते. माणसं जितकी विचाराने बांधले जातील तितका हिंसा उद्रेक करते. आज आपल्या समाजात कटटरतावाद हा त्याचेच तर प्रतिक आहे.त्यामुळे समाजात माणसांमाणसाचे नाते तुटते आहे. आपण विचार मस्तकी घेतले की आपल्या भोवती कितीही चांगले घडले, सुंदरता असली तरी विचाराची कास आहे म्हणून त्या बददल बोलू शकत नाही.
एखाद्या सन्याशी व्यक्तीला निसर्गाने निर्माण केलेल्या एखाद्या सुंदर मूर्ती निर्माण केली तरी त्याबददल मनातील विचार बोलता येणार नाही, कारण ती व्यक्ती सन्याशी आहे. सन्यस्ताने सौंदर्य, आस्वाद, भोग यापासून दूर राहायचे असते.नैसर्गिक सौंदर्याबददल बोलणे म्हणजे आपण जो विचार स्वीकारला आहे त्याकडे दुर्लक्ष करणे आहे. अनेकदा आपल्याला त्याग करायचा आहे,विरक्त जगायचे आहे म्हणून मनाला भावलेले, निसर्गाच्या निर्मितीकडे देखील आपण दुर्लक्ष करत असतो. एका अर्थाने जीवन जगण्याचा, जीवनाचा आस्वाद घेण्याच्या वृत्तीपासून दूर तर जात नाही ना? असा प्रश्न निर्माण होतो. भेदाभेदाची धारणा सौंदर्याची गुणवत्ता आणू शकत नाही.सौंदर्याकडे निर्मळतेने पाहता येण्याची गरज असते.. पण विचार मस्तकात तयार झालेले असतात आणि मग आपण त्या विचाराच्या मागे जातो. आपल्या भोवती निसर्गाने फुलवलेल्या नैसर्गिक सौंदर्याकडे दुर्लक्ष करतो. विचारामुळे जीवनाची ध्येय, उद्दीष्टांमध्ये बदल होतात. मग त्या विचाराचा पाठलाग करत असताना आपण अधिकाधिक विचारांच्या जवळ जातो आणि त्यामुळे निसर्गाकडे दुर्लक्ष होते. जीवनातील सौंदर्याचा भाव हरवतो. आपल्याला सौंदर्याची गुणवत्तेचा विसर पडतो. आजही आपल्या भोवती निसर्ग फुललेला आहे. पहाटे उठून फिरायला जाताना पक्षी गुंजन करत असतात. वेली फुललेल्या असतात.. सुंदर रंगीबेरंगी फुले नटलेले असतात.. अनेकदा नदिचे पाणी झुळझुळ वाहत असते. धबधब्याचे प्रपात अंगावर झेलेणे सुरू असते.. आपल्या भोवती कोणी तरी बाळ रांगत असते.. बोबडे बोलत असते.. मात्र हा भोवतालचा सौंदर्य निसर्गाचा अनुभव आपल्याला खुणावत नाही याचे कारण हे घडत असते. आपण विचाराची कास धरून प्रवास सुरू ठेवत असल्याने यासारख्या छोटया छोटया गोष्टीकडे लक्ष द्यावे वाटत नाही. विचार मस्तकी असलेले की आपली दृष्टीकोन तयार होतो आणि नैसर्गिकतेची दृष्टी हरवली जाते. आपल्याला आपल्याच आयुष्याकडे सुंदरतेने पाहत यायला हवे असते. आयुष्याचा आनंद घेता यायला हवा. प्रेमात ओलेचिंब भिजता यायला हवे. जीवानचा आस्वाद घेत जगणे हा आनंदाचा प्रवास आहे. मात्र आपण ती वाट चालत नाही कारण आपल्यावर विचारांचे अधिराज्य असते.आपण आय़ुष्याकडे निर्मळतेने आणि सौंदर्य़ाने पाहू लागलो, की आपलेच आयुष्य आपल्याला मनमोहक दिसायला लागते. जगण्याची धुन सापडली की आय़ुष्याची रंगत आपोआप वाढत जाते. त्यासाठी आपल्याला या आयुष्याची सुंदर वाट सापडायला हवी.आपलेच जीवन उन्नत,समृध्द होण्याची गरज असते. आपणच आपली वाट चालण्यासाठी स्वतःच्या वाटा निर्माण करण्याचा प्रयत्न करायला हवा. आपण जेव्हा विचाराची कास धरतो तेव्हा जीवनात सौंदर्याची गुणवत्ता आणू शकत नाही. आपण जेव्हा विचांरासोबत जगतो तेव्हा आपण जीवनाची महान सखोलता गमावत असतो. खरंतर आपलेच जीवन आपल्याला उलगडून पाहता यायला हवे. जीवनाची सखोलता, व्यापकता आणि अर्थपूर्णता केवळ विचार मस्तकी घेऊन जगता येणार नाही.
कृष्णमूर्ती म्हणतात, की विचार उथळ असतो.आपण फार खोलवर विचार करतो आहोत,आपली मांडणी फार चिंतनशील आहे असे म्हणत असलो तरी त्याला काही अर्थ नाही. आपण कितीही खोल वर विचार आहे असे सांगत असलो तरी त्या साधनाला मुळात मर्यादा आहेत.आपण ज्या विचाराची कास धऱतो तो जगात आस्तित्वात असलेल्या अनेक विचारांपैकी एक विचार आहे. त्यामुळे आपण जगातील अनेक गोष्टींपासून दूर जात नाही ना? आपण आज ज्ञान म्हणून विचाराची वाट चालत असतो. विचार म्हणजे ज्ञान असे असेलही मात्र भविष्यकाळ हा भूतकाळातून जन्मलेले असतो हे लक्षात घ्यायला हवे. विचार निर्मित असलेली गोष्ट माणूस स्वीकारतो त्याचा त्या विचारधारेवर विश्वास असतो. ज्ञान हे स्मृतीचे भांडवल आहे हे लक्षात घ्यायला हवे. आपण जे विचार, ज्ञान प्राप्त केले आहे ते काही अंतिम सत्य नाही. मुळात जगात प्रचंड ज्ञानाचा प्रस्फोट होत असताना आपणाला ठाऊक असलेले ज्ञान म्हणजे विश्वातील एक बिंदू आहे. आपल्याला ज्ञात असलेल्या ज्ञानापेक्षा पलिकडे असलेल्या विश्वाच्या शोधासाठी ज्ञातापासून मुक्ती हवी आहे. कुठल्याही बंधनाशिवाय, स्वतःच्या अनुभवाच्या, निष्कर्षाच्या आणि स्वतःवर जे काही लादले आहे त्या सर्वांच्या मोहाशिवाय स्वतंत्र असायला हवे आहे तरच आपल्याला विश्वातील ज्ञानाचा शोध घेता येईल.ज्ञानाचा शोध ही वाट परमानंद स्वरूपाची आहे. आज आपण विचारांचे पाईक झाल्यामुळे स्वतःवरच कितीतरी बंधने लादून घेतली आहे. अनेकदा आपण जीवनभर स्वतःच्या अनुभवाशी नाते सांगत स्वतःचीच धारणा पक्की करत असतो. आपला अनुभव म्हणजे अंतिम सत्य नाही.आपल्याला त्यावेळी जो अनुभव आला आहे तो प्राप्त परीस्थितीचा परिणाम असेल आणि ती परीस्थिती कायम असेल असेही नाही. त्यामुळे अनुभवाने बध्द विचारही आपल्याला एकांगी बनवत असतात. आज आपल्या हाती असलेल्या निष्कर्षाच्या जोरावर आपण जो विचार घेऊन प्रवास करत असतो तोही विचारही अंतिम नाही. त्यामुळे या बध्द विचारातून आपण ज्ञानापासून दूर जात असतो. आपण साठवलेले ज्ञान एवढेच सत्य वाटू लागते. ज्ञानाचा प्रवास थांबतो. त्यामुळे जीवन अधिक कंटाळवाणे बनते. रसहीनतेकडे प्रवास सुरू होतो. त्यामुळे या विविधतेने बध्द असलेला विचाराशी नाळ तोडल्याशिवाय कोणताही पर्याय आपल्या हाती नाही.ती तोडणे कठीण आहे मात्र अशक्य असे नाही. ज्ञान हे बध्द असता कामा नये.. बध्दता हे ज्ञानाचे लक्षण नाही.. जगात ज्ञानाच्या दिशेने प्रवास करण्यासाठी जीवनभर ज्ञान दिशेचा प्रवास करायला हवा.विविध दिशा आपल्याला जीवन समृध्दतेची वाट दाखवतील.. पण एकांगी विचाराने प्रवास केला तर ज्ञानाचा प्रवासही थांबेल. माणसांने जगातील आस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या विचाराला मुक्तता हवी असते. ती मुक्तता योग्य ज्ञानापर्यंत पोहचविण्यास मदत करेल. त्यामुळेच माणसांने ज्ञानाची वाट चालताना आनंद देणा-या विचाराच्या वाटा चालत राहायला हव्या.बध्दता माणसांला कुंठीत करते.मुक्तता माणसाला ज्ञानाच्या शिखरावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असते.. त्यामुळे मुक्तता हाच आनंदाचा मार्ग आहे.. कधीतरी स्वतः मुक्त होऊन जगण्याचा प्रयत्न करून पाहायला काय हवे..
आपले शिक्षण बुध्दि, विचार आणि ज्ञान यांच्या जोपासणेवर आधारित आहे. रोजच्या जीवन व्यवहारात त्याची आवश्यकता आहे. मात्र आपल्या परस्परांशी असलेल्या मानसिक संबंधात त्याला स्थान नाही. विचारांचा गुणधर्म हा विभाजन करणारा व विध्वंसक आहे. जेव्हा आपल्या आचरणावर आणि परपस्पर संबंधावर विचाराचे साम्राज्य असते तेव्हा तो विचार हिंसा, दहशत, संघर्ष व दुखाचे जग निर्माण करत असते. शाळांमधून विचारांचे वर्चस्व हा कळकळीचा विषय असायला हवा.
संदीप वाकचौरे
(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे )