Saturday, May 4, 2024
Homeब्लॉगखऱ्या स्वातंत्र्याच्या शोधात...

खऱ्या स्वातंत्र्याच्या शोधात…

शिक्षण म्हणजे स्वातंत्र्याची वाट दर्शवणारी व्यवस्था आहे. ज्याला जीवनात स्वतःला सृजनशीलतेची वाट चालायची आहे त्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात स्वातंत्र्याचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. स्वातंत्र्याचा विचार घेऊन पुढे जाणारी व्यवस्था म्हणून लोकशाहीचा विचार केला जातो. स्वातंत्र्य हिरावून घेणारी व्यवस्था म्हणून हुकूमशाहीचा विचार केला जातो. व्यवस्था कोणतीही असली तरी माणूस स्वातंत्र्य प्रिय असतो. माणूस खरचं जन्मतः स्वातंत्र्य प्रिय असतो का? आणि समजा आहे असे मानले तर त्याला नेमके कशापासून स्वातंत्र्य हवे असते? स्वातंत्र्य जे हवे आहे ते नेमके कशासाठी हवे आहे? स्वातंत्र्याची नेमकी व्याख्या तरी काय आहे? आपल्या मनात येईल त्या गोष्टी स्वतःच्या इच्छेने करता येणे म्हणजे स्वातंत्र्य आहे का? आपल्याला आपल्या मना प्रमाणे सर्व गोष्टी करता आल्या की आपण स्वातंत्र्य आहोत असे मानले जाते. मात्र हा काही विचार खरा नाही.स्वातंत्र्याचा विचार म्हणजे स्वैराचार आहे का ? स्वातंत्र्य म्हणजे आपल्या हव्या त्या दिशेचा आणि हवा तसा प्रवास आहे का…? विचारवंत सांगतात त्या पाऊलवाटा चालत राहाणे म्हणजे स्वातंत्र्य आहे का? कृष्णमूर्ती म्हणतात, की “ जेव्हा आपल्या इच्छा नाकारल्या जातात तेव्हा द़डपून टाकल्याची भावना दृढ होते”.

पण ही भावना योग्य आहे का? आपल्या भावना दडपल्या गेल्या, की आपला राग अनावर होतो. राग आला की संघर्षाला जन्म होतो. स्वातंत्र्य संघर्ष निर्माण करते का? अनेकदा लोक स्वातंत्र्याचा अर्थ आपल्या सोईने घेताना दिसतात. अनेकदा स्वातंत्र्याचा अर्थ असतो, की मनात ज्या भावना उंचबळून येतात त्या भावनांना आहे तसे सामोरे जाणे.अनेकदा संयमानी सामोरे न जाता त्या भावनेला उत्तेजन दिले जाते. आपल्याला यश मिळण्यासाठी जे जे करावे वाटते ते करू देणे हे स्वातंत्र आहे असे मानले जाते. त्या उलट भावनाचे दमन करणे म्हणजे स्वातंत्र्यापासून दूर जाणे असे म्हटले जाते. आपण जो विचार करतो तो विचार म्हणजे खरच स्वातंत्र्याचा प्रवास आहे का ? बंधनापासून मुक्तता म्हणजे स्वातंत्र्य आहे. ती बंधने कोणती? हा प्रश्न आहे.त्यामुळे या बंधनाचा विचारही करण्याची गरज आहे. आपल्या विचारांनी स्वातंत्र्याची भरारी मिळायला हवी. ती वाट जीवनानंदाची आहे, पण हे घडायला हवे.आपण जी वाट चालणार आहोत ती वाट निश्चित करण्यासाठी विवेक आणि शहाणपणाची गरज आहे. स्वातंत्र्याचा नेमका अर्थ विवेक आणि शहाणपणाशिवाय जाणता येणार नाही. त्यामुळे शिक्षणातून विवेक आणि शहाणपण रूजविण्यासाठीचे प्रयत्नांची निंतात आवश्यकता आहे.आपण ती वाट निवडली तर स्वातंत्र्याची वाट चालणे सहज शक्य आहे.

- Advertisement -

आज आपण स्वातंत्र्य आहोत असे मानले जात असलो, तरी आपण यंत्राचे गुलाम झाले आहोत. आपल्यावर इतर काही बंधने असले तरी विचार मात्र स्वतःच्या मेंदूने हवा तसा आणि हव्या त्या स्वरूपात करता येतो. आपले विचार आणि वर्तन यंत्रानी बंधिस्त झाले आहे. आजचे युग माहिती आणि तंत्रज्ञानाचे आहे. जगाच्या पाठीवर संगणकाने मोठी क्रांती केली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या जोरावर बराच मोठा प्रवास झाला आहे.या प्रवासात जीवन आनंद घेत असताना आपली बरेच कामे संगणक करू लागला आहे आपले सारेच जीवन व्यवहार संगणकांने व्यापले गेले आहे.आपल्या हाती मोबईल आहे. आपले शिकणे संगणकाच्या मदतीने होऊ लागले आहे. आपले मनोरंजनही संगणकाच्या मदतीने घडते आहे. व्यापार, प्रसार आणि प्रचारातही संगणक भूमिका घेत आहे. आपली अनेक कामे संगणक करत आहे. अलिकडच्या संशोधनात कृत्रिम बुध्दिमत्तचे स्थान उंचावत चालले आहे. येत्या काही काळात मानवाचे सर्वच काम कृत्रिम बुध्दिमत्तेच्या जोरावर केली जाऊ शकतील असे वास्तव आपल्या समोर येते आहे. माणूस जे कामे करतो ती सर्व कामे येत्या काही दिवसात संगणक करेल अगदी विचार करण्याचे कामही संगणक करू लागेल असे संशोधक सांगू लागले आहे. संगणक जेव्हा विचार करू लागेल तेव्हा माणसाला विचार करण्याची गरजच उरणार नाही. आपण विचार करण्याच्या प्रक्रियेपासून मुक्त होऊन जाऊ. आज शिक्षणात देखील माहिती तंत्रज्ञानाच्या जोरावर शिक्षकांशिवाय विद्यार्थी स्वतः शिकू लागली आहेत. शिक्षकांचा अभाव असला तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण घडते आहे. इकडे शिक्षक उच्च पदवी धारण करता आहेत. ते ज्ञानासाठी प्रचंड कष्ट सोसता आहेत आणि त्याचवेळी हे निर्जीव असलेले संगणक मात्र त्या शिक्षकांच्या जागेवर आपले स्थान मिळवता आहेत. हा प्रवास माणसांना व्यापक अंगाने विचार करता स्वातंत्र्य देत आहे. आपली बहुतांश सर्व कामे संगणक करू लागले आहेत त्यामुळे येत्या काही काळात माणसांच्या मेंदूचे काम आपोआप थांबण्याची शक्यता आहे. माणसांना विचार करण्याची गरजच उरणार नाही.आपले विचार करण्याचा मार्ग बंद होईल किंवा काही थोडाकाळ माणूस विचार करेल. हा विचार करण्याचा काळ कमी होत गेला तर माणसांचा मेंदूचे भविष्यातील स्थान काय असेल? असा प्रश्न विचारला जात आहे.कधी काळी मनोरंजनासाठी माणसं हवी होती, प्रत्यक्ष माणसांशिवाय मनोरंजन कल्पना ही कवी कल्पनाच वाटत होती. आज मनोरंजनाच्या सर्वच क्षेत्र माहिती तंत्रज्ञानाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. एकिकडे मनोरंजन कार्यक्रमाने माणसांवर गारूड केले आहे.त्यामुळे आपला भोवतील विचारशुन्य केला जात आहे का असा प्रश्न मनात निर्माण होतो. माणसांचा विचार मेंदूतून हरवत चालला आहे. या हरवलेल्या विचाराने माणसांच्या मेंदूचे कामही कमी होत जाणार आहे. मनोंरजन आणि माहिती तंत्रज्ञानाची साधने यामुळे माणसाला विचार करायला वेळच मिळत नाही. त्यासाठीची प्रक्रियाच मेंदूत होत नाही हे वास्तव आहे.अशावेळी स्वातंत्र्याचा विचार तरी सुचेल का? असा प्रश्न पडू लागला आहे. आपल्यावर चौहूबाजूनी यंत्राचेच राज्य आहे.. आपले जीवन यंत्राच्या शिवाय चालू शकेल का? असा प्रश्न केला तर त्याचे उत्तर नाही असे येते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जीवनात यंत्राचे स्थान अबाधित आहे. माणसांचे स्थान दिंवसेदिवस कमी होत चालले आहे. आज आपल्या यंत्रापासून स्वातंत्र्य हवे असेल, तर आपण जीवन जगू शकत नाही. सारेच यंत्राच्या आहारी गेले आहेत अशावेळी आपल्याला नेमके कशापासून स्वातंत्र्य हवे आहे याचाही विचार करायला हवा. मुळात कशापासून स्वातंत्र्य हाच विचार स्वातंत्र्यासाठी महत्वाचा आहे.. मात्र आज आपल्याला स्वातंत्र्य हवे आहे मात्र कशापासून याचा विचार मस्तकात नाही हे वास्तव आहे.. तेही लक्षात घ्यायला हवे..

कृष्णमूर्ती म्हणतात, की प्रखर शिस्त, सुसंस्कृत नियंत्रणांची जबाबदारी म्हणजे स्वातंत्र्य. आपल्या जीवनात आपल्या शिस्तीत राहाणे म्हणजे गुलामी वाटते. आपल्याला मुळात शिस्त नको आहे अशावेळी आपण शिस्त म्हणजे गुलामीचा वाट असे समजू लागलो आहोत. मात्र खरच प्रखर शिस्तीची गरज आहे का? याचा विचार करण्याची गरज आहे. विविध कला, संग्रहालय, वाडःमय, चांगले अन्न यांची जाण म्हणजे सुस्कृंतपणा होय. आपल्या सुंसंस्कृतपणाच्या व्याख्या भिन्न आहेत. आपण फारच सोईंनी व्याख्या करत आहोत. आपल्याला जे जे हवे आहे त्यादृष्टीने करावयाचा प्रवास महत्वाचा वाटतो. ती वाट आपल्यासाठी सुसंस्कृतपणाची वाटत आली आहे. मात्र शिक्षणाने ख-या अर्थाने सुसंस्कृतपणा रूजविण्याचा प्रयत्न करण्याची गरज असते. सुसंस्कृतपणा हाच स्वातंत्र्याचा विचार रूजविण्यास आणि फुलविण्यास मदत करणारा आहे. माणसांमध्ये सुंसंस्कृतपणा जोपासण्यासाठी उत्तम कला, वाडःमयाचा विचार करण्याची गरज असते. आपल्या हाती उत्तम वाडःमय आले, की त्यातून मस्तक घडत जाते.मुळात पुस्तक वाचल्यामुळे मस्तकात विचारांची घुसळण जीवनाला अर्थ प्राप्त करून देत असते. गुणवत्तापपूर्ण कला, वाडःमय, साहित्य माणसांच्या मनाचे परिवर्तन करत असते. उत्तम विचारांची बीजे मनात पेरली गेली तर सुसंस्कृतपणाची वाट चालणे आपोआप घडत जाते. त्यामुळे साहित्याची उत्तम जाण आणि महत्व कळणे हा सुसंस्कृतपणाच आहे. साहित्य हाती आले, की स्वातंत्र्याचा विचार अधिक दृढ होत जातो. आपण जे मार्ग निवडू पाहात असतो ते मार्ग तरी ख-या स्वातंत्र्याचे आहेत का? याचा विचार सातत्याने करण्याची गरज आहे. स्वातंत्र्य आणि त्याची गहनता जाणून घेण्यासाठी आपल्याला अधिक प्रज्ञेची आणि प्रेमाची निंतात गरज आहे. ज्या स्वातंत्र्यात प्रेम आणि प्रज्ञेचा विचार आहे ते खरे स्वातंत्र्य. आपल्याला प्रज्ञेची वाट हवी असेल तर त्यासाठी सत्याची वाट चालावी लागते. जेव्हा सत्याची वाट चालणे घडेल तेव्हा निर्माण होणारी उर्जा माणसाला ख-या स्वातंत्र्यापर्यंत घेऊन जाईल.मग बाकीच्या बाहय प्रेरणा अथवा उर्जेची गरजच पडणार नाही. मुळात आपण स्वतःभोवती स्वातंत्र्यांच्या विचारासंबंधीचे जे कवच निर्माण केले आहे ते तोडण्यासाठीचे प्रयत्न होण्याची निंतात गरज आहे. सत्याचे आकलन हिच ख-या स्वातंत्र्याची वाट आहे. त्यामुळे जीवनात स्वातंत्र्य हवे असले तरी त्यासाठी सत्याची वाट चालणे आणि प्रज्ञेचा विचार महत्वाचा ठरतो. ती वाट आपण निर्माण करण्यासाठी शिक्षणातून विचाराची पेरणी करण्याचा विचार करायला हवा.अन्यथा स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार असा अर्थ घेऊन आपण चालत राहू आणि आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेणे आहे. स्वातंत्र्याचा विचार प्रत्येकाना आपापल्या परिने केला तर समाजात स्वैराचारी वर्तन घडेल. स्वैराचारी समाज हा आपल्याला कधीच प्रगतीची झेप घेण्यास समर्थ करू शकणार नाही. त्यामुळे स्वातंत्र्याचा विचार अधिक विवेकी आणि शहाणपणाच्या अंगाने करण्याची गरज आहे. तीच वाट आपल्या समाजाला प्रकाशाच्या दिशेने घेऊन जाईल. तो प्रकाश समाज व राष्ट्राचे उत्थान घडवून आणेल..

– संदीप वाकचौरे

( लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे )

- Advertisment -

ताज्या बातम्या