Monday, November 25, 2024
Homeब्लॉगशिक्षणाच्या बाजारात माणूस हरवलाय...

शिक्षणाच्या बाजारात माणूस हरवलाय…

शिक्षण गुणवत्तापूर्ण असावे असा विचार सातत्याने प्रतिपादन केला जातो. गुणवत्तेची मागणी ही समाजातील प्रत्येकाची जशी आहे तशी ती शिक्षण व्यवस्थेतील प्रत्येकाची आहे. आपल्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळायला हवे असे शिकणा-या समूहाची देखील मागणी आहे. इतिहासात आपण डोकावून पाहिले भूतकाळापासून तर वर्तमानापर्यंत शिक्षणाची अपेक्षित गुणवत्ता कधीच साध्य झाली नाही असे सतत विविध सर्वेक्षण आणि अहवाल सांगता आहेत. गुणवत्तेवर सतत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. गुणवत्ते संदर्भाने वर्तमानात ज्या अपेक्षा केल्या जाता आहेत त्या ख-य़ा शिक्षणाच्या अपेक्षा नाहीत. आपल्या अपेक्षा फार वरवरच्या गुणवत्तेच्या आहेत. त्या फक्त अक्षऱ साक्षरतेपुरत्या मर्यादित आहे. ज्ञान नसले तरी चालेल, पण किमान माहिती हवी इतकी ती अपेक्षा आहे. ज्ञान हा सत्याचा प्रवास आहे. त्यामुळे शिक्षणातून सत्याची पेरणी अपेक्षित आहे. शिक्षणातून मस्तके घडवले जातात. शिक्षणाने मस्तके जितक्या सक्षमतेने घडवली जातील तितक्या मोठया प्रमाणावर समाजात परिवर्तन होत जाणार आहे.

माणसं खरंच शिक्षणाने कुचकामी होताना दिसता आहेत का? शिक्षणाने जे परिवर्तन व्यक्ती आणि समाजात घडायला हवे तसे काही घडताना वर्तमानात दिसत नाही. वर्तमानात शिक्षण घेणारी माणसं वाढली आहे, पण ते शिक्षित माणसं अपेक्षित शिक्षण विचार मस्तकी घेऊन कार्यरत असताना दिसत नाही. खरंतर आपल्याकडे शिक्षण देणारी व्यवस्था अंत्यत मोठी आहे. गावोगावी नाही तर अगदी वस्ती, पाडयावर देखील शाळा स्थापन झाल्या आहेत. शाळांना शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी पुस्तके आणि अभ्यासक्रम आस्तित्वात आहेत. पर्यवेक्षकीय यंत्रना देखील देशभर आस्तित्वात आहेत. एकीकडे सर्व सुविधा उपलब्ध असताना शिक्षणाची किमान अपेक्षित उद्दीष्ट साध्य झालेली नाहीत. माणसं शिकता आहेत मात्र शिक्षणाचा परिणाम साध्य होताना दिसत नाही. अपेक्षित परिवर्तन होताना दिसत नाही. गर्दीचे समाजात रूपांतर होत नाही हे एकीकडे वास्तव आहे.

- Advertisement -

शिक्षणातून मानवाचे माणसात रूपांतर करण्याची अपेक्षा केली जात असते. प्राण्याचे मनुष्यात रूपांतर करण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. अशावेळी आपण शिक्षणाच्या पदव्या घेऊनही शिक्षणातून माणूस म्हणून उभे करू शकलो नाही हे वास्तव स्वीकारायला हवे. एका अर्थाने शिक्षण कुचकामी ठरले आहे. कृष्णमूर्ती आपले शिक्षण विचारात निरिक्षण नोंदवताना म्हणतात, की “सरकारला देखील खरी माणसं नको आहेत. त्यांना विशिष्ट कौशल्य अंगी बाणून घेतलेली मानवी यंत्रे हवी आहेत फक्त. संघटीत धर्म आणि सरकार यांना ख-या माणसांचा अडथळा वाटत असतो. त्यांच्या पासून आपल्याला धोका आहे असं भय संघटीत धर्माला आणि सरकारला वाटत राहत” कृष्णमूर्ती जे म्हणता आहेत त्याचा अर्थ व्यवस्थेला देखील शिक्षणातून खरी माणूस निर्मिती नको आहे. लाओत्से देखील म्हणाले होते ,की “शिक्षणातून सत्याची आणि गुणवत्तेची पेरणी झाली तर ती माणसं सरकारला गिंळकृत करतील. त्यामुळे शिक्षणात गुणवत्ता आली की गुणवत्ता आणणा-या सरकारचा बळी जाण्याची शक्यता अधिक असते” त्यामुळे कोणत्याही व्यवस्थेला गुणवत्ता नको आहे असा तो विचार प्रतिपादन केला गेला होता. गुणवत्ता माणसाच्या मस्तकात विवेक पेरत असते. विवेक म्हणजे सत्याचा प्रवास आहे. त्यामुळे त्यातून आव्हान देण्याची भाषा घडत असते. ती माणसाला जगण्यासाठी समर्थ बनवत असते. त्यामुळे कृष्णमूर्ती जो विचार व्यक्त करता आहेत तो अधिक महत्वाचा आहे. आपल्या व्यवस्थेला उत्तम गुणवत्तेची, वेळ प्रसंगी प्रश्न विचारणारी, सत्याची वाट चालणारी माणसं नको आहेत. या वाटेचा प्रवास केला गेला तर त्यातून बंडखोरीची पेरणी होण्याची शक्यता अधिक आहे. कोणतीही गुणवत्ता ही असत्याला विरोध करणारी आणि अन्यायाच्या विरोधात लढणारी असते. त्यामुळेच ख-या शिक्षणाच्या वाटा कोणालाही नकोच असतात.

कृष्णमूर्ती म्हणतात, ती जगभरातील धर्ममार्तडांना देखील या वाटा नकोच आहेत. धर्ममांर्तडांना सत्याची भिती वाटत असते. विवेकाना चालणारी माणसं त्यांची शत्रू ठरतात. आपले तेच सत्य असे काही सांगण्याची हौस त्यांच्यामध्ये असते. त्यांच्यामध्ये अंहकार ठासून भरलेला असतो. त्यांचा अंहकाराचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांना असत्याची वाट चालणे अधिक महत्वाचे वाटते. खरा धर्म लोकांना कळाला तर धर्ममार्तंडाची दुकाने चालणे बंद होईल. त्यामुळे शिक्षणातून शहाणपण आणि विवेक पेरला जाणार नाही याची काळजी घेतली जाते. रजनीश म्हणतात ,की शिक्षकांनी खरा शिक्षण विचार पेरू नये म्हणूनच शिक्षकांना समाजाकडून जपले जाते. त्याला सन्मान दिला जातो. तो बंडखोरी न पेरता अनुकरणाच्या वाटा त्यांनी चालण्यासाठी काम करावे ही अपेक्षा असते. शिक्षकांनी बंडखोरी आणि प्रश्न विचारणारी पिढी निर्माण केली तर समाज शिक्षकांना विषाचा प्याला हाती देईल. लोकांमध्ये शहाणपण पेरण्याचे काम केले म्हणून सॉक्रेटीसला विषाचा प्लाला राजसत्तेने दिला होता. शहाणपण पेरणारा कोणीच राजसत्ता आणि धर्मसत्तेला नकोच असतात. शिक्षकांनी प्रामाणिकपणे शिक्षणाचा विचार पेरला तर समाजात असत्याच्या वाटेने सत्तेच्या स्थानी पोहचणा-यांचा बळी जाऊ शकतो, म्हणून खरे शिक्षण दिले जाणार नाही याची काळजी धर्ममार्तंड आणि समाजातील धुरीन घेत असतात. आपल्याकडे गार्गी, मैत्रीय यासारख्या विदूषी यांनी प्रश्न विचारण्याची हिम्मत दाखवली. आपला पराभव होतो आहे हे लक्षात य़ेताच त्यांना शाप देण्यात आला आणि त्यांना प्रश्न विचारण्याची हिम्मत काढून घेण्यात आली. आपल्या शिक्षणाच्या प्रक्रियेतही प्रश्न विचारण्याची हिम्मत कोणी करणार नाही याची काळजी घेतली जाते. मात्र खरे शिक्षण तर त्या पलिकडे सुरू असते. खरे शिक्षण नेहमीच प्रश्न विचारण्याची हिम्मत पेरत असते. आज आपण विचार केला, तर शिकलेल्या प्रत्येक माणसांने मनातील प्रश्न विचारण्याची हिम्मत दाखवली तर व्यवस्थेला योग्य मार्गावर चालण्याशिवाय कोणताच पर्याय असणार नाही. त्यामुळे आपल्याला शिक्षणाचा विचार करताना उत्तराच्या मागे न जाणारा आणि प्रश्न विचारणारी व्यवस्था उभी करण्याची गरज आहे. जेथे प्रश्न विचारले जातात तेच राष्ट्र आणि समाज पुढे जात असतो.कदाचित प्रश्न विचारणारा समाज वाढला तर सरकारमध्ये अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता असते.

खरेतर कोणालाही प्रश्न विचारलेले चालत नाही. प्रश्न विचारण्याची भिती वाटावी अशी परीस्थिती आपल्या समाजात आहे. प्रश्न विचारले जाणारच नाही याची काळजी घेतली जाते. शिक्षणही प्रश्न न विचाराणारी पिढी निर्माण करत असते कारण ती समाजाची मागणी आहे. प्रश्न विचारणा-या प्रत्येकापासून भिती वाटत असते. त्यामुळे शिक्षणातून माणूस घडविण्याऐवजी विशिष्ठ कौशल्य बानणारी यंत्र निर्माण करण्याचा विचार केला जातो. आज माणसं यंत्रासारखी काम करता आहेत. यंत्रासारखे कोणत्याही प्रकारचा विचार आणि प्रश्न विचारला जाणार नाही याची काळजी घेतली जाते. माणसं यंत्र झाली की गतीने काम करतील पण माणसाचे जे वैशिष्ठये आहे, की तो विचार करतो.. तो मस्तकातील विचार हरवला जाणार आहे. माणसाने विचार करण्याचे थांबवले की त्याचे आस्तित्व संपलेच म्हणून समजा. आज माणसं यंत्रासारखे बनले आहेत. यंत्र बनले आहे याचा अर्थ कामाचा वेग प्राप्त झाला आहे असे असले तरी त्या पलिकडे माणूस विचारशुन्य झाला आहे हे लक्षात घ्यायला हवे. ही विचारशुन्यता शिक्षणाला अंधाराच्या दिशेने घेऊन जाईल यात शंका नाही. विचारशुन्य समाज निर्माण झाला तर आपण प्रगतीचे पावले कशी टाकणार हा खरा प्रश्न आहे. विकासाचा आलेख कितीही उंचावला तरी तो विकास काही उंच उंच इमारती आणि रस्त्याच्या अंतर आणि दर्जावर मोजला जात नाही. शेवटी हा भौतिक विकास जो झाला आहे तो आपण ज्या समूहासाठी केला आहे तो समूह जोवर मानसिक आणि वैचारिक दृष्टया विकसित होत नाही तोवर आपण प्रगतीचे पंख लेवू शकणार नाही. त्यामुळे माणसांची मन आणि हदय अधिक विकसित करण्याची गरज आहे. त्यासाठी शिक्षण हाच एकमेव राजमार्ग आहे. आज आपण भौतिक विकासाच्या मागे लागलो आहोत मात्र हा विकास उपभोगण्याची जी इच्छा असते त्यासाठी मानसिकता निर्माण करण्यात आपल्याला अपयश आले तर तो उत्तमतेने भोगला जात नाही. मुळात आपल्याला विवेक असल्याशिवाय कोणताही विकास पचनी पडत नाही. आज आपल्याकडे आंदोलने केली जातात तेव्हा तो मार्ग शांततेचा असायला हवा अशी अपेक्षा असते. जगाला शांततेच्या मार्गाने आपला हक्क मागता येतो त्यासाठी अंहिसेचा राजमार्ग देणारा मार्ग भारतातील महात्मा गांधीनी दाखवला आहे. त्या मार्गाने प्रवास करण्यासाठी शहाणपण असावे लागते.

जगाने ज्या गांधीना स्वीकारले, त्यांनी दाखवलेल्या मार्गाने आफ्रिकेसारखे राष्ट्र चालले आणि स्वातंत्र्य झाले. आज तोच मार्ग जगाला खात्रीचा आणि शाश्वत वाटत आला आहे. त्यामुळे त्या वाटा आपण चालण्याची गरज असताना आपल्याच देशात आंदोलनात पहिला घाला तर देशातील सरकारी मालमत्तेवर घातला जातो. त्यात आपण आपलेच नुकसान करत असतो. आपले नुकसान आहे आपल्याला कळू नये याला काय म्हणावे? असे असताना देखील आपल्यात ते शहाणपण येऊ शकलेले नाही. अशा परीस्थितीत लोकांची ती चूक आहे असे नाही, तर ती चूक शिक्षणातील विचाराचा अभाव हेच कारण आहे. शिक्षणातून आपण नेमकेपणाने काही उत्तमतेचा विवेकशील विचार पेरू शकलो नाही हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे आपल्याकडे सरकारी मालमत्ता आपली वाटत नाही. सरकारी मालमत्तेचे नुकसान करताना काहीच वाटत नाही. आपण शिक्षणातून मूलभूत विचाराची पेरणी करू शकलो असतो तर बरेच प्रश्न निकाली निघू शकले असते. शिक्षणातून जर मस्तके घडली गेली नाही तर त्याचा विपरित परिणाम समाजाला भोगावा लागतो हे वास्तव आपल्या समाजात आपण अनुभवत आहोत. ख-या शिक्षणाचा अर्थ मस्तकात भरला गेला नाही तर धर्माचा खरा विचार देखील रूजवण्यात अपय़श येते हे वास्तव भोवतालमध्ये आहे. ख-या शिक्षणाचा अभाव म्हणजे धर्ममार्तडांची चलती असा त्याचा अर्थ असतो. शिक्षणा अभावी माणसं मस्तवाल निघतात हे लक्षात घ्यायला हवे. कृष्णमूर्ती म्हणतात, की त्यामुळे समाजातील काही संस्था शिक्षण पध्दतीच्या सगळ्या दो-या आपल्या हाती राहव्यात यासाठी अखंड निकराचा प्रयत्न करत असतात. त्यात त्यांचे हित सामावलेले आहे. शिक्षण हातातून गेले तर आपल्याला हवे त्या मार्गाने प्रवास करता येणार नाही.. आणि आपला हेतू साध्य होणार नाही त्यामुळे शिक्षण सोडले जात नाही.

कृष्णमूर्ती आणखी एक इशारा देत आहेत. शिक्षण संस्थाचे व्यावसायिकरण झाले ,की शिक्षणाचा मुळ उददेश रसातळाला जायला वेळ लागत नाही.व्यवसाय म्हणून किंवा अर्थार्जन करून देणारे कारखाने म्हणून शिक्षण संस्था निर्माण झाल्या ,की त्यातून बाहेर पडणारे उत्पादनही तशाच प्रकारची असतात.ही उत्पादने म्हणजे विशिष्ट क्षेत्रातले तज्ज्ञ आणि अशा शिक्षणसंस्था काही समाजात प्रेमभावना निर्माण करू शकत नाहीत.माणसांमाणसात आंतरिक जिव्हाळा उत्पन्न करणे दुरापास्त होऊन बसते.आज जागतिकीकरण झाल्यानंतर आपल्या देशातही शिक्षणाचे झालेले व्यावसायिकरणामुळे शिक्षण महाग झाले आहे.मोठया प्रमाणावर शिक्षण संस्था उभ्या राहिल्या आहेत.मात्र त्या शिक्षण संस्थामधून समाजाचे कल्याण व्हावेत म्हणून नागरिक निर्माण करण्याचा,मूल्य पेरण्याचा विचार पेरला जात नाही.शिक्षण संस्थामधून अधिकाधिक पैसा प्राप्त व्हावा यासाठीच प्रयत्न केले जातात.त्यातून शिक्षण महाग होते आहे.शिक्षण महाग झाले की शिक्षणाची दरवाजे गरीबांना बंद होतात.त्याच बरोबर शिक्षणाच्या सुविधांचा विचार केला तर त्यातून मोठया प्रमाणावर विषमता पेरली जाण्याची शक्यता अधिक असते.या संस्था राष्ट्र,समाज निर्मितीवर लक्ष केंद्रित करत नाही तर अधिकाधिक नफा मिळावा यासाठीच प्रयत्न करत असतात.राष्ट्र बांधनी करणारी संस्था म्हणून त्याकडे न पाहता पैसा देणारा कारखाना म्हणून त्याकडे पाहिले जाते..जेथे शिक्षणाचे व्यावसायिकरण होते तेथे शिक्षणाचे पावित्र्य आपोआप नष्ट होते हा इतिहास आहे.त्यामुळे अशा शिक्षण संस्थामधून बाहेर पडणारी विद्यार्थी देखील त्याच स्वरूपाची असणार यात शंका नाही.निसर्गाचा नियम आहे जे पेरले आहे तेच उगवते या न्यायाने आपण विवेकी आणि शहाणपणाचा समाज निर्माण करण्यात आपण फारसे यशस्वी होऊ शकलो नाही हे लक्षात घ्यायला हवे.शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याने समाजात प्रेमभाव निर्माण करण्यात अपयश आले आहे.माणसं माणसांशी असलेले नात्यातील धागा सैल झाला आहे.माणसं जोडली जाणे हे शिक्षणाचे ध्येय आहे.मात्र आपण माणसं एकमेकापासून दूर जात आहोत याचे कारण शिक्षणाचे झालेले बाजारीकरण हे त्याचे कारण आहे.आपण जर शिक्षणाच्या मूळ हेतून काम करू लागलो तरच विकासाचे चित्र अनुभवास मिळेल…अन्य़था शिक्षणाचा प्रवास म्हणजे बाजार ठरण्याची शक्यता आहे.

_संदीप वाकचौरे

(लेखक-शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे.)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या