Monday, May 27, 2024
Homeब्लॉगशिक्षणातून माणसं की यंत्र हवी?

शिक्षणातून माणसं की यंत्र हवी?

शाळा, महाविद्यालयांचे आजचे वेळापत्रक पाहिले तर आपल्याला त्यात एक प्रकारचे तेच तेच स्वरूप आले आहे असे जाणवते. वेळेत शाळा महाविद्यालय भरणार आणि वेळेत घंटा होऊन सुटणार. त्या काळात शिक्षक येणार नेमलेले अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकांतील पाठ, पाठयांश, घटक, उपघटकासंबंधीचा आशय शिकवणार. जितके तास संबधित विषयाला मिळाले आहेत तितक्या तासात पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्या तासिका पूर्ण झाल्यानंतर विशिष्ट काळांने परीक्षा होणार. त्या परीक्षांचा निकाल लागणार. विद्यार्थी पुढच्या वर्गात जाणार. या वेळापत्रकात तसा फारसा फरक पडत नाही. हे शिक्षण प्रक्रियेतील सार्वत्रिक नियोजन आहे. हे सारे काम यंत्रासारखे सुरू झाले आहे. शिक्षक वर्गात जेव्हा अध्यापन करत असतात तेव्हा ते नेमके काय घडत असते? पाठयपुस्तकातील माहिती विद्यार्थ्यांपर्यत पोहचविण्याचा प्रयत्न केला जात असतो. वर्तमानात विद्यार्थ्यांच्या मस्तकी माहिती लादली जात असते. कधीकधी त्या माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्याचा प्रयत्न केला जातो. मग ते निर्माण होणारे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवले की आपले काम झाले असे मानले जाते.

ज्ञान मुलांपर्यत पोचवणे एवढेच शिक्षकाचे कार्य आहे का? अनेकदा असे मानले जाते आम्ही तर पुस्तकाच्या पलिकडे तरी काय देणार? अध्यापनातून मनामनात चैतन्य भरण्याची अपेक्षा असते. त्यातून चिंतनाची वृत्ती विकसित करण्याची गरज आहे. आज अध्यापन केले जाते तेव्हा त्यातून विविध विषयांची माहिती देण्यावर अधिक भर दिला जात आहे. पाठयपुस्तकात सामावलेली माहिती पोहचवली, की त्या वर्षाचे शिक्षण झाले असे मानले जाते. काही शिक्षक पुस्तकात दडलेल्या संकल्पना, त्या अनुषंगाच्या कल्पनांचा विस्तार करणे, पुस्तकात असलेल्या विविध सिंध्दाताची विविध अंगाने चर्चा करण्याचे काम घडत असते. एखाद्या गोष्टीची कल्पना विस्ताराने सांगतली जात असते. अध्यापन म्हणजे या पलिकडे तसे फार काही नाही इतकात काय त्याचा अर्थ आहे. शाळा महाविद्यालयात एवढेच घडणार असेल आणि या पेरणीतून विद्यार्थी जगण्यासाठी माहिती संपन्न होऊन समर्थ होणार आहे का? कृष्णमूर्ती या संदर्भाने प्रश्न विचारतात, की एवढचे शिक्षकाचे कार्य आहे का? खरंतर त्यांना यापलिकडे शिक्षणातून आणि शिक्षकांकडून बरेच काही अपेक्षित आहे.. वर्तमानात जे काही घडते आहे ते म्हणजे पुरेसे शिक्षण नाही.त्यामुळे मुळ हेतूने शिक्षणाचा प्रवास झाल्याशिवाय शिक्षणाची गोड फळे आपणासा चाखता येणार नाही.

- Advertisement -

शिक्षण म्हणून पुस्तक आणि पुस्तकातील माहितीचे विश्लेषण केले जाणार असेल आणि तेवढेच विद्यार्थ्यांना शिकवणार असेल तर त्याकरीता जीवंत शिक्षकांची गरज नाही. असे काम केले जात असेल तर हे काम संगणक यंत्रासारखे आहे. जीवंत शिक्षक आणि यंत्र यांच्यातील कामात मूलभूत फरक दिसायला हवा. कृष्णमूर्ती म्हणतात की, यापेक्षा शिक्षकाचे काम आणखी वेगळे आहे. शिक्षकाला आचरण, मनुष्याच्या जगण्यातील क्लिष्टता, मानवी जीवन बहरणे आणि मानवी जीवन जगण्याची रीत याबददल तळमळ असायला हवी. आपल्या विद्यार्थ्यांची भविष्याची वाट आणि त्यांच्या भवितव्याविषयीची चिंता शिक्षक म्हणून असायला हवी. जीवन उन्नतीचा मूलभूत विचार शिक्षणातून पेरला जाणार नसेल तर ते शिक्षण कुचकामी आहे. मुळात विद्यार्थ्याच्या आचरणात परिवर्तन करणे हे शिक्षणाचे काम आहे.मानव हा प्राणी आहे.. पण त्याचे सामाजिककरण होण्यासाठीचा विचार शिक्षणातून पेरला जातो. त्यामुळे प्राण्यांमध्ये दिसणारे गुण शिकलेल्या माणसात प्रतिबिंबीत होणार नाही याची काळजी घेण्याची गरज असते. व्यक्तीचे आचरण हे अधिक महत्त्वाचे मानले जाते. शिक्षणातून आपले आचरण बदलले तर जीवनात आनंदाचे वारे वाहू लागतील. आज शिक्षणात आचरणाचा विचार फारसा प्रतिबिंबीत होत नाही. केवळ शिस्त या एका नावाखाली आपण आचरण घडू शकत नाही त्यासाठी मस्तकातील विचारात परिवर्तनाची गरज आहे. आपले जीवन आनंदी करताना इतरांच्या जीवनातही आनंद पेरला जाईल.. आपली समृध्द वाट चालताना समाजाची वाटही समृध्द होईल यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. शिक्षणातून व्यक्तीच्या आचरणात परिवर्तनासाठी विचाराची कास अधिक महत्तवाची आहे. आज आपले शिक्षण मार्कांच्या स्पर्धेत दडले आहे. एकवेळ शिक्षणातून माणूस घडल नाही तरी चालेल.. व्यक्तीला जगण्यासाठी समृध्द वाट नाही सापडली तरी चालेल, मात्र परीक्षेत अधिकाधिक मार्क मिळण्याची गरज आहे. शिक्षण आणि माणूस घडवणे यांचे असेलेले नाते सैल होत चालले आहे. शिक्षणातून माणूस घडवण्यापेक्षा स्वतःचा आर्थिक उध्दार करू शकेल अशा अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल यासाठीचा मार्कांची स्पर्धा सुरू आहे. मार्काभोवती असलेले शिक्षणातून माणूस घडण्याची शक्यता नाही. त्यामुळे शिक्षणाचे बाजारीकरण होण्यास अधिक हातभार लागत आहे. यशस्वी शिक्षणाच्या आणि गुणवत्तेच्या व्याख्याही आता बदलत चालल्या आहेत.

पैसा मिळून देणारी पदवी अधिक महत्वाची ठरते आहे. शिक्षण हे जीवन उन्नतीसाठी नाही तर केवळ भविष्यात अधिकाधिक पैसा मिळून देईल त्यासाठी असेल असाच विचार करून शिक्षणाचा विचार पेरला जाणार असेल तर त्यातून आपण मोठे परिवर्तन साधू शकणार नाही. त्यामुळे विवेकानंद म्हणाले होते चारित्र निर्माण करणारे शिक्षण अधिक महत्वाचे आहे, पण आज त्यापेक्षा चारितार्थ चालू शकते तेच शिक्षण महत्वाचे ठरत आहे. मानवी जीवन बहरणे आणि फुलण्याचा विचार शिक्षणातून दृढ होण्याची गरज असते.. मात्र ते फुलणे आणि बहरणे घडण्यापेक्षा कोमजण्याची वाट अधिक मोठी होते आहे. शाळेत शिकणारे विद्यार्थी निकाल, परीक्षेचा ताण, भिती यामुळे स्वतःला संपवण्याचा विचार करू लागले आहे. आज शिकलेल्या मंडळीमध्येच आत्महत्येचे प्रमाणात वाढ झालेली आपण पाहात आहोत. मुळात जीवन आनंदाने जगण्यासाठी आहे. त्या जीवनाचा आनंद घेता येण्याची दृष्टी शिक्षणातून पेरण्याची गरज आहे. जीवनाचा अर्थ शोधण्याचा प्रवास आय़ुष्यात घडायला हवा. आपले जीवन निश्चितच क्लिष्ट आहे. त्या क्लिष्टतेचा अर्थ आणि त्यामागील कारणाचा शोध घेता यायला हवा. त्यामागील कारणाचा विचार करत त्यावर मात करण्याची दृष्टी शिक्षणातून पेरण्याची गरज आहे. आज शिक्षणातून जीवनाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. जीवन आणि शिक्षण यांचे नाते तुटत चालले आहे. जीवनाचा प्रवास आभासी व्यवहारात अधिक होतो आहे. वास्तवाचे भान आणि प्रश्न जाणून घेण्याची हिम्मत हरवत चाललो आहोत. आपल्याला शिक्षणातून दीर्घ प्रवासाची अपेक्षा आहे. उद्याचे भविष्य उज्ज्वल व्हावे म्हणून प्रयत्न होण्याची गरज असताना आपण तात्कालिक गरजांकडे अधिक लक्ष देऊ लागलो आहे. आजचा प्रश्न सुटल तरी खुप झाले ही धारणा पक्की होत चालली आहे. तात्कालिक प्रश्नांच्या भोवती आपण जर केंद्रीत होऊ लागलो तर उद्याचे भविष्य काय असेल याचा विचार न केलेला बरा. असे घडत गेले तर समाज आणि राष्ट्राचे भविष्य उज्ज्वल कसे होणार? हा खरा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांच्या पोटाची चिंता शिक्षणातून भागेल असा विचार केला गेला तर तो वाईट आहे असे नाही; पण मस्तकाची भूक भागवली जाईल अशी व्यवस्था शिक्षणातून उभी करणार की नाही? हा खरा प्रश्न आहे.त्यामुळे शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता शिक्षकाने वाहायला हवी. जे शिक्षण भविष्याचा विचार न करता प्रवास चालू ठेवते त्या शिक्षणाने ना समाज, ना राष्ट्राचे परिवर्तन घडते. त्यामुळे शिक्षण प्रक्रियेने किती गंभीरतेने विचार करत प्रवास घडवायला हवा याचा विचार करायला हवा. अन्यथा शिक्षण कुचकामी होण्याची शक्यता आहे.शिक्षणाच्या प्रक्रियेत नेहमी दिर्घकालीन परिवर्तनाची अपेक्षा आहे. उदयाचे भविष्य अधिक उज्ज्वल असायला हवे ही धारणा काही चुकीची नाही; पण त्यासाठी शिक्षणातून अपेक्षित वाट चालण्याची गरज आहे.. उद्याच्या भविष्याची चिंता जे शिक्षक वाहत नाही त्यांना कोणत्याच प्रकारचे भविष्य असत नाही.

आज आपण जो विचार करतो आहोत तो केवळ तात्कालिक समस्यांच्या निराकरणाचा विचार आहे.आज जगभरात प्रचंड क्रांती होते आहे.माहिती तंत्रज्ञानाने माणसाला गुलाम केले आहे.माणसांचा प्रवास यंत्रावत होऊ लागला आहे.सारेच जीवन गतीमान झाले आहे.आपले आस्तित्व उद्या राहील की नाही ? असा प्रश्न उपस्थिती केला जात आहे. माणसांचे आयुष्य यंत्राच्या हाती गेले आहे.अशावेळी माणसांचे भवितव्य काय आहे ? याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.आज आपल्याला आपल्याच जाणीवाचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.आज माणसांच्या आयुष्यातच अधिक गोंधळाचे चित्र आहे. भोवताल अस्थिर आहे आणि त्यामुळे सा-या जीवनात अस्वस्थता आहे.जीवनात विस्कळीतपणा आलेला आहे.माणसांचा बाहय संघर्ष आहेच ; पण त्याच बरोबर अंतरिक संघर्ष देखील मोठा आहे. स्वतःशी सुरू असणा-या संघर्षातून बाहेर प़डण्यासाठीची हिम्मत शिक्षणातून पेरली जाणार नसेल तर जीवनाला प्रकाशाची वाट कशी सापडणार ? हा खरा प्रश्न आहे .आज नवनविन संशोधने होता आहेत.प्रयोगशाळेत मानव निर्मितीचा प्रयोग सुरू आहे.कृत्रिम बुध्दिमत्तेचा विचार आता उंचावला आहे..अशा वेळी मानवी आयुष्याचे भवितव्य काय ? आज असणारा आपला संघर्ष असाच चिरकाळ सुरू राहणार आहे का ? मानवी जीवनातील वेदना आणि दुःख असेच कायम राहणार का ? मानवाने असेच जगले पाहिले का ? आपल्या भविष्याची वाट काय असणार आहे ? जीवनाच्या सुखाची नेमकी वाट कोणती ? या सर्व गोष्टींबददल शिक्षक विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकला नाही , तर शिक्षक फक्त एक हुशार जीवंत यंत्र बनवत आहे.जो आपल्या सारखी आणखी काही यंत्राची भर टाकत आहे इतकेच काय ते शिक्षण.बाकी सारा प्रवास जीवनाला ना दिशा दिला जाईल, ना जीवन फुलण्याची शक्यता आहे.

त्यामुळे शिक्षणाच्या बाबतील आता पुनर्विचार करण्याची गरज आहे.आपले जीवन उन्नत आणि उत्तमतेने जगण्यासाठी लागणा-या विचारांनी मस्तके उभी करण्याची गरज आहे.तो विचार अधिक कसा रूजेल याचा विचार करण्याची वेळ आली आहे.यंत्रे माणसांची गुलाम व्हायला हवीत पण आज माणसं यंत्रासारखीच वागू लागली आहे.त्यामुळे शिक्षणाने विवेक आणि शहाणपणाची पेरणी केल्याशिवाय आपल्याला शिक्षणाची प्रकाशमय वाट सापडण्याची शक्यता नाही.शिक्षणातून प्रकाशाची वाट सापडली नाही तर जीवनाची उन्नती तरी कशी होणार हा खरा प्रश्न आहे.त्यामुळे आपल्यालाच शिक्षणाबददल विचार करत नव्या वाटा शोधाव्या लागणार आहेत. त्या वाटा आपल्याला उन्नतीच्या दिशेने घेऊन जाण्यास मदत करणार आहे.

_संदीप वाकचौरे

(लेखकशिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

- Advertisment -

ताज्या बातम्या