समाजाला अथवा व्यक्तिला विकसित व्हायचे असेल, प्रगती साधायची असेल तर जीवनात शिस्तीची वाट चालायला हवी असे म्हटले जाते. शिस्तीशिवाय जीवन नाही असे मानले जाते. वर्तमानात आपण जेव्हा शिस्त संकल्पनेचा विचार करतो तेव्हा त्यात पंरपरची अनुकरणप्रियता अपेक्षित असते. शाळेत शिस्त आणणे म्हणजे कोणी तरी वयाने मोठी असलेली व्यक्ती काही सांगते आहे, त्यांनी सांगितलेल्या वाटेचा प्रवास करणे आहे. शिक्षक, घरातील मोठयांनी सांगितलेली वाट ही आपल्या हिताची असते असा आपल्या सर्वांचा समज असतो. ती वाट केवळ चालत राहाणे आणि त्यांनी सांगितलेल्या वाटेच्या संदर्भाने मनात निर्माण झालेला अथवा त्यासंदर्भाने कोणताही प्रश्न न विचारणा विद्यार्थी शिस्तबध्द आहे असे मानले जाते. असे शिस्तबध्द विद्यार्थी शाळेत घडवणे अपेक्षित केले जाते आहे. आज जे शाळेत घडते आहे तेच घरात आणि तेच समाजात घडणे अपेक्षित आहे असे मानले जाते. समाजात कोणालाच आव्हानाची भाषा नको आहे. कोणत्याही परीस्थितीत प्रश्न विचारणारी पिढी नको आहे.प्रश्न विचारणे म्हणजे शिस्त मोडणे आहे.
जग कितीही प्रगत झाले तरी प्रत्येकाने शेकडो वर्षांच्या पंरपरेच्याच वाटा चालण्याची अपेक्षा समाज, समजातील धुरिण करत असतात. त्या पंरपरेच्या वाटा विचारांना धक्का देणा-या नसतात. त्या वाटा धर्म,धर्मव्यवस्थेचे पाईक, राजकर्ते यांच्यासाठी त्यातून कोणताही धोका नसतो. त्यामुळे त्याच वाटा चालण्यासाठी एक प्रकारची व्यवस्था उभी केली जात असते आणि त्याच वाटेचे आग्रह ती व्यवस्था करत असते. जगभरातील धर्म व्यवस्था देखील परिवर्तनाची वाट चालण्याऐवजी पंरपरेच्या वाटा चालणे पसंत करते. त्यासाठी माणसांच्या मनावर विविध मार्गाने पगडा निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात असतो. अलिकडे तर अशा पंरपरेच्या वाटांमध्येच संस्कार आहेत असे वाटणारी पिढी उभी राहते आहे. कोणत्याही प्रकारे विचार न करता मोठयांनी निर्माण केलेल्या वाटांनी चालत राहाणे म्हणजे संस्कारशील वर्तन. आपण का चालतो आहोत? खरंतर एखादी गोष्ट केली जात असेल तर आपण ती का करतो आहोत असा प्रश्न कोणालाच विचारायचा नाही. त्याउलट अनुकरणाच्या वाटा चालत राहाणे म्हणजे संस्कार, अनुकरण प्रियतेची वाट पंसत करणे म्हणजे शिस्तीचा विचार अशी धारणा पक्की केली जात आहे. शिक्षणातून चुकीच्या गोष्टासाठी देखील आव्हानांची भाषा करण्याची हिम्मत पेरली जात नाही. घरातून प्रश्न न विचारण्यासाठीची मानसिकता पेरली जाते.. आणि या वाटा चालत राहाणे म्हणजे संस्काराची शिदोरी ठरते. या वाटांचा प्रवास करणारा समाज प्रगतीची पावले कधीच चालू शकत नाही.
अनेकदा पालक, शिक्षक आणि समाजातील प्रत्येकालाच आज्ञाधारकपणाच्या वाटेने चालणारा पाल्य, विद्यार्थी, तरूण हवा असतो आणि राज्यकर्त्यांना अनुकरणप्रियतेचा मार्गाने जाणारा नागरिक हवे असतात. अनुकरण प्रियता व्यक्तीचे विचारांचे स्वातंत्र्य हिरावून घेत तर नाही ना? समाज व्यवस्थेत हुकूमशाही व्यवस्थेतील राज्यकर्ते किंवा जुलमी पालक यांनी भितीच्या माध्यमातून शिस्त आणण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. त्या वाटेने चालणे अधिक हितावह असते. आपल्याही शिस्त हवी आहे. शिक्षणातून शिस्त पेरण्याचे काम केले जाते. शिस्तीचे मोल सांगण्यात येते. शिस्त म्हणजे विचार करण्याची प्रेरणा मारून टाकणे नाही. विचारशुन्यतेने चालणे म्हणजे शिस्त असे घडता कामा नये. विचारांचे स्वातंत्र्य उपभोगणारी व्यक्ती म्हणजे बेशिस्तपणा असं काही समजले जाते.. पण खरचं मनापासून प्रत्येकाला शिस्त हवी आहे असे वाटते का? जगाच्या पाठीवर हजारो वर्षापासून सुरू असणा-या पंरपरा, रूढी असल्या तरी आजही त्याचे पालन करणे महत्वाचे वाटते. आपण जेव्हा त्या पंरपराचे अनुकरण करतो तेव्हा शिस्तीत आहोत असे समजले जाते. त्या पंरपरे विषयी प्रश्नचिन्ह उपस्थिती करतो तेव्हा ती बंडखोरी म्हणजे बेजबाबदारपणा, संस्कारहिनता मानली जाते. असा प्रश्न विचारणारा विद्यार्थी अरोगंड, अहंकारी मानला जातो. त्यामुळे शिस्तीची व्याख्या नेमके पणाने करण्याची गरज आहे. आपणाला जी शिस्त हवी आहे ती का हवी आहे..? त्यातून समाजाचे, राष्ट्राचे नेमके काय भले होणार आहे..? समाजाच्या विकासासाठी शिस्त हवी असेल तर ती शिस्त म्हणजे केवळ लादणे आहे का? अनेकदा धाक, दडपशाही, हुकूमशाहीच्या मार्गाने शिस्त लादली जात असेल तर त्या शिस्तीने फार काही साध्य होण्याची शक्यता नाही. त्यातून ना व्यक्तिचे भले होते, ना समाजाचे भले होत असते. आज एखादी गोष्ट लादली जात असेल तर ती लादणे म्हणजे शिस्त नाही.
शाळा, महाविद्यालयात शिकणा-या मुलांच्यावर शिस्तीच्या नावाखाली जे काही लादले जात आहे. त्या लादल्या जाणा-या शिस्तीच्या बडग्याच्या अनुषंगाने प्रश्न निर्माण करण्यात आणि विचारण्याची हिम्मत विद्यार्थ्यांच्यामध्ये तयार झाली तर ते शिक्षणाचे यश म्हणायला हवे. मागील आठवड्यात एन.सी.सीच्या काही विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली, पण त्या गटप्रमुख मारहाण का करतो आहे? असा प्रश्न विचारण्याची हिम्मत त्या तरूणांनी केली नाही. सोशिकता हेच शिक्षण आहे का? समाजात आजही मोठे प्रश्न आहेत.. कृष्णमूर्ती म्हणतात, की कुटुंब, धार्मिक स्थळे, प्रशासन वर्षानुवर्ष स्वीकार, आज्ञापालन व अनुवर्तनावर भर देत आली आहेत. पालकांना देखील अनुवर्तन हे शिस्त आणेल असे वाटते. त्यांच्यासाठी आज्ञापालन हिच शिस्त आहे. आज्ञापालन करण्यात समाजाचे हित आहे असे वाटते, पण तो मार्ग कोणाच्याच हिताचा नाही. आज्ञापालनाची वाट व्यक्तीला सृजनशीलतेपासून दूर घेऊन जात असते. त्यामुळे शिक्षणातून आज्ञापालनचा, अनुकरणाचा विचार करण्यापेक्षा विचार करायला शिकवण्याची गरज आहे. आज्ञापालन म्हणजे स्वातंत्र्याचा मार्ग नाही ती विचारशुन्यतेची वाट आहे. मुळात आज्ञापालनाची सवय अंगी रूजली तर आपण विवेकी, शहाणपण असलेला समाज निर्माण करू शकणार नाही. आज्ञापालनामुळे विचार करण्याची क्षमता हरवली जाते. प्रत्येक वेळी दुस-यावर अवलंबून राहाण्याची सवय अंगी निर्माण होते. आपण एखादी वाट चालत असू तर ती का चालतो आहोत? असा विचार केला जात नाही. त्यापेक्षा मोठी माणसं म्हणता आहेत त्या वाटेने चालत राहाणे ही धारणा पक्की होत जाते. सतत दुस-यावर अवलंबून राहाण्याची वृत्ती उंचावत जाते. अनुकरणाच्या वाटेने जाणारी मुलं ही केवळ सांगकामी होतात. ती माणसं लोकशाही व्यवस्थेला बळकट करण्यासाठी सक्षम नाही. असा अनुकरणाच्या वाटेने जाणारा समाज ना स्वातंत्र्य अबाधित ठेवेल.. ना धर्माचा खरा विचार रूजवतील. त्यातून धर्माचे देखील नुकसान आहे. धर्माचा अर्थ विवेकी, शहाणपणाने समजून न घेता केवळ अनुकरणाने चालत राहिल्याने आपण किती तरी अधिक नुकसान करत असतो हे लक्षात घ्यायला हवे. शिक्षणाचा विचार हा नेहमीच माणसाला हिम्मतीने पुढे जाण्यासाठी प्रेरित करण्याचा असायला हवा. आज माणसं तुझ्याशी सहमत असे म्हणून चालत राहातात.. पण यातून आपण मनाला विचारापासून परावृत्त करत आहोत हे लक्षात घ्यायला हवे. आपल्याला व्यवस्था उत्तम हवी आहे. आज कोणतेही व्यवहार चांगले असायला हवेत म्हणून तेथील कार्यालयात व्यवस्थापनात शिस्त असायला हवी प्रयत्न केले जातात. कोणत्याही प्रकारची अंगी बानवली जाणारी शिस्त ही भितीतून असता कामा नये. जेव्हा आपल्या जीवन व्यवहारात मनात भिती असते म्हणून आपण शिस्तीची वाट चालत असतो तेव्हा त्यातून संघर्षच जन्माला येत असतो.
आपल्याला संघर्षाशिवाय पुढे जायचे असेल तर त्या व्यवस्थेत स्वातंत्र्याचा विचार अगोदर असायला हवा. व्यक्तिच्या अथवा समाज जीवनात शिस्त हवी, पण ती स्वातंत्र्यातूनच यायला हवी. ती लादलेली असेल तर ती शिस्त आनंद देऊ शकणार नाही. खरंतर जेथे शिस्त असत नाही तेथे स्वातंत्र्य असू शकत नाही. कृष्णमूर्ती म्हणतात, की “ शिस्त म्हणजे शिकणे. शिकण्यासाठी सक्रीय मन हवे. आज आपण माहितीच्या साठयाला शिकणे असं म्हणतात. त्या साठयातच आपण अधिक भर घालत आहोत आणि त्यालाच शिकणे असे म्हटले जात आहे. असं मन शिकण्यासाठी पूरक ठरणार नाही. माणसांमध्ये अनुवर्तनाची, अनुसरणाची अत्याग्रही गरज आहे. जी सदगुणाला थारा देत नाही. नैतिकता म्हणजे प्रथा नव्हे याची जेव्हा जाणीव होईल. तेव्हात वर्तन आणि आचरणाच्या स्वरूपात चांगुलपणा म्हणून सदगुण बहरू शकेल. भिती नेहमीच आक्रमकतेला आणि प्रतिकाराला जन्म देते. त्यात व्यवस्था कधीच असत नाही”. आपल्याला शिकणे महत्वाचे आहे. मात्र ते शिकणे हे लादणे नाही तर मनाची सक्रीयतेचे ते पाऊल आहे. खरंतर माहिती म्हणजे शिकणे नाहीच.. पण आज दुर्दैवाने माहितीलाच शिकण्याचे स्वरूप आले आहे. माहिती प्राप्त झाली की शिकणे झाले असे मानले जाते. पण ज्ञानाची प्रक्रिया शिक्षणातून होईल तर विद्यार्थी सृजनशील, स्वातंत्र्यप्रिय आणि अधिक शिक्षित होतील यात शंका नाही. आपल्या कोणत्या वाटांनी जायचे आहे हे एकदा ठरवायला हवे.. आज आपण ज्या वाटा तुटवड आहोत त्या वाटा अनुकरणाच्या असल्याने नवनिर्मितीच्या वाटांचा प्रवास घडत नाही. जगाच्या पाठीवर पाश्चात्यांनी नवनविन विचार, संशोधन निर्माण केले आहे. वैज्ञानिक, सामाजिक संशोधनाचा विचार करता अधिक शोध तिकडे लागले आहेत. याचे कारण तेथील शिक्षण पंरपरेची वाट न चालता प्रश्न विचारण्याची हिम्मत पेरत असते. जगात जे जे म्हणून चांगले आहे त्याचा स्वीकार करणे. जे जे म्हणून परिवर्तनाची वाट दाखवेल असा विचार पंरपरेच्या विरोधात असेल तर ते स्वीकारण्याची हिम्मत निर्माण करण्याचे आव्हान शिक्षणातून पेरण्याची गरज आहे. शिक्षणाने हिम्मत दिली नाही तर अनुकरणाचीच वाट चालणारी पिढी आपण निर्माण करत जावू.त्याने फार काही परिवर्तनाची शक्यता नाही.
_ संदीप वाकचौरे
(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)