Thursday, June 13, 2024
Homeब्लॉगज्ञानाच्या अनंत वाटा...

ज्ञानाच्या अनंत वाटा…

शिक्षणासाठी शाळा निर्माण करण्यात आल्या. शाळांनी ज्ञानाची पेरणी करावी माणसं अधिक शहाणी करावी ही अपेक्षा आहे. त्यासाठी शाळामंधून शिक्षणाची प्रक्रिया केली जात असते. त्या प्रक्रियेतून ज्ञानापर्यंतचा प्रवास घडत असतो. आज शाळांमधून दिले जाणारे शिक्षण म्हणजे काय, तर पुस्तकात प्राचीन, भूतकाळातील ज्ञान सामावलेले आहे ते जे काही सामावले आहे ते समजावून घेणे. पुस्तकात अक्षरांच्या माध्यमातून जी माहिती जमा केली आहे ती जाणून घेणे म्हणजे शिक्षण असे मानले जाते. आपल्याकडील पुस्तकात जे काही सामावलेले आहे तेवढेच खरे शिक्षण असेल तर जगात त्या पलिकडे जे काही आहे त्या ज्ञानाचे काय करायचे? त्याला ज्ञान नाही म्हणायचे का? खरंतर आपण अनुभवाचा विचार केला तर पुस्तकांपलीकडेच ज्ञानाचा मोठा विस्तार आहे. त्यामुळे आपण आज जो पुस्तक केंद्रित ज्ञानाचा जो विचार करतो आहोत तेवढाच शिक्षणाचा एवढाच मर्यादित अर्थ आहे का? शिक्षण म्हणजे पुस्तकातील माहिती वाचने असेल तर आपल्याभोवती असलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरे पुस्तकातून मिळायला हवी. तसे असते तर उच्च पदवीधर झालेल्या प्रत्येक तरूणाईला आपल्या जीवनातील प्रश्नांचे निराकरण करण्याची हिम्मत मिळायला हवी आहे.

- Advertisement -

ज्ञान तर जीवनातील वाट सुलभ करण्यासाठी आहे. जीवनातील संघर्ष संपुष्टात आणण्याची वाट शिक्षणात सामावलेली आहे. मात्र आज शिक्षणातून जीवन व्यवहारातील प्रश्नांचे निराकरण करण्याची शक्ती मिळत नाही हे वास्तव आहे.याचा अर्थ शिक्षण कुचकामी आहे का? असा प्रश्न उपस्थिती केला जातो. खरेतर शिक्षणात प्रचंड मोठी शक्ती सामावलेली आहेच. त्यामुळे शिक्षण कुचकामी नाही आहे तर शिक्षणाचा प्रवास ज्या दिशेने घडतो आहे तो प्रवास चुकीच्या दिशेचा आहे त्यामुळे शिक्षण अपेक्षित शक्ती पेरण्यात अपय़शी ठरत आहे. आपल्या भोवतालमधील घडणा-या घटनांचा विचार करता शिक्षण विचाराची पेरणी करण्यात अपय़शी ठरले तर ते शिक्षण अपेक्षित समाज परिवर्तन करू शकणार नाही. समाजात ज्या प्रमाणे परिवर्तन करण्यात अपय़श येईल त्याप्रमाणे व्यक्तीगत जीवनातही शिक्षण परिवर्तन आणू शकणार नाही हे वास्तवही लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे शिक्षणात प्रचंड मोठी शक्ती सामावलेली आहेच… मात्र त्यासाठी शिक्षणाचा अर्थ जाणून घेत प्रवास घडविण्याची गरज आहे. त्याशिवाय आपल्याला शिक्षणात प्रकाशमय वाटाच निर्माण करता येणार नाही. कृष्णमूर्ती तर आपल्याला ज्ञानासाठीचे अनेक मार्ग दर्शित करता आहेत. त्या मार्गाचा विचार केला गेला तरच आपल्या वाटा ज्ञानमय बनण्याची शक्यता आहे.

आपल्याकडे शाळा, महाविद्यालयात आपण जे काही विषय शिकवले जातात. मग ते विषय विज्ञान, समाज अभ्यास, गणित,मानशशास्त्र. तत्वज्ञान यापैकी काही असले तरी त्या सर्वांमध्ये भूतकाळातील ज्ञान सामावलेले आहे हेच आपल्या लक्षात येईल. त्यामुळे शिक्षणातून ज्ञान म्हणून जे काही सांगितले जाते ते सारे ज्ञान हे बहुतेक भूतकाळात जे मिळवले आहे तेच सारे आहे.. आणि विशेषता ते भूतकाळातील ज्ञान हे पुस्तकातच सामावलेले आहे. कधीकाळी आपल्याकडील ज्ञान हे पुस्तकांच्या बाहेर होते. महाभारतात तर ज्ञानासाठी गुरू जंगलात भटकंती करण्यासाठी पाठवत असे. तेथे प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे शिष्य ज्ञान मिळवत असे.. तेथील ज्ञान हा स्वानुभवाचा भाग होता.. तेव्हा पुस्तके नव्हती.. आपले गुरूजी ज्ञान संपन्न होते.. ते काही सांगत असे. पण याचा अर्थ अनुभवापासून तुटणे घडत नव्हते. माणसं मुखोद्गगत स्वरूपात ज्ञानाची देवाणघेवाण करत होती. म्हणजे ज्ञान असे साठवलेले नव्हते.. ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न सातत्याने केले जात होते. आज आपण सारे ज्ञान पुस्तकात आहेच असे मानले जाऊ लागले आहे त्यामुळे जे पुस्तकात सामावले गेले आहे तेवढेच ज्ञान असे स्वरूप आल्याचे दिसते आहे. वर्तमानात आपल्याकडील धर्म, तत्वज्ञानांचा विचारही पुस्तकातच सामावलेला दिसत आहे. आपली संस्कृती, जीवन तत्वज्ञान, विचार हे पुस्तकातच प्रतिबिंबीत झालेले आपणास दिसत आहे. पुढे शोध लागत गेलेले माहिती तंत्रज्ञानाचा विचारही पुस्तकात सामावलेला आहे.आपण वर्तमानात जे काही अनुभवतो आहोत.. आपणास जे काही ज्ञान विविध जीवन प्रवाहात उपयोजनासाठी हवे असते ते ज्ञान देखील पुस्तकातच सामावलेले आहे असे म्हटले जाते. वर्तमानात आपल्याला ज्ञानाचा शोध घेण्याचे पुस्तक हे एकमेव साधन आहे असे मानले गेले आहे.

वर्तमानात ज्ञान आणि पुस्तक यांचे नाते अधिक दृढ होत चालले आहे.आपण शाळेत जातो तेव्हा शाळेत का जातो? असा प्रश्न विचारला तर अर्थातच त्याचे उत्तर ज्ञान हेच येते. ज्ञानासाठीच शाळांचे आस्तित्व निर्माण झाले आहे. अर्थात आपण ज्ञान कितीही विशाल आहे असे म्हणत असलो तरी एका अर्थाने ते मर्यादितच असते. ज्ञानाचा प्रस्फोट होत असला तरी आणि ज्ञान विस्तारत असले तरी ज्ञानाच्या कक्षा अधिक मर्यादित होत चालल्या आहेत. पुस्तके हे काही एकमेव ज्ञान प्राप्तीचे साधन नाही हे आपण जाणून घेण्याची गरज आहे. ज्ञानासाठी अनेक मार्गांचा विचार केला जात असतो. आपण आपल्या भोवतलाचे, परीसराचे आणि अगदी स्वतःचे देखील निरिक्षण करता येण्याची गरज आहे.या मार्गाने प्रवास करणे म्हणजे आपण ज्ञानाची वाट चालणे आहे. हे देखील शिकण्याचे महत्वाचे साधन आहे हे लक्षात घ्यायला हवे. शिकण्यासाठी, ज्ञानप्राप्तीसाठी आपल्याला कोणत्याही मार्गाचे बंधन असत नाही. आपल्या भोवती इतक्या घटना घडत असतात, पण त्या सा-या घटनांचा कार्य़कारण भाव आपल्याला ज्ञात असतोच असे नाही. जगातील प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचा प्रवास हा ज्ञान साधनेचा प्रवास ठरेल. त्यामुळे ते ज्ञात करून घेणे हे सुध्दा निरिक्षणचाच भाग आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्या अवतीभोवतीच्या घटनांचे सुक्ष्म निरिक्षण करत अनेक अनुमान नोंदवले आहेत. पक्षांच्या घरटयांच्या रचनेवरून पाऊस किती पडणार याचा अंदाज बांधला आहे. काही प्राचीन ग्रंथात दुष्काळांसंदर्भाने निरिक्षण नोंदवले आहे. निसर्गाचे अभ्यासक मारूती चितमपल्ली यांनी जंगलातील निरिक्षणे मांडत कितीतरी नवनविन ज्ञानाची निर्मिती केली आहे. आपल्या भोवती कितीतरी घटना आहेत.. पण आपण त्याचे निरिक्षण करत ज्ञानाचा प्रवास करण्याची वाट चालत नाही. आपल्याभोवती पाऊस पडतो अथवा पाऊस पडत नाही यांच्या कारणाचा विचार फारसे करत नाही. कधीकाळी पुस्तकात कारणे नोंदवले जात होते.. आज तीच उत्तरे दिली जातात.पुस्तकातील ज्ञानावर विश्वास ठेऊन आपण चालत असतो… आपण त्या संदर्भाने नव्याने विचार करत नाहीत. निरिक्षण नोंदवत नाही म्हणून ज्ञानाच्या संदर्भाने भर पडत नाही. अशा परीस्थितीत आपण निरिक्षणाचा विचार करण्याची गरज आहे.प्रत्येक घडणारी गोष्ट का घडते? असा प्रश्न पडत गेला तर आपल्याला ज्ञानाचा प्रवास करणे शक्य आहे. जमिनीतील पाण्याचा शोध घेणारी पाणीशोधक असलेली माणसं केवळ विशिष्ट स्वरूपाच्या वनस्पती आपल्या भोवतालमध्ये उगवल्या असतील तर तेथील रानात पाणी आहे असे निरिक्षण आणि अनुभवातून प्राप्त ज्ञानाच्या आधारे सांगता आहेत. याचे कारण आपल्याभोवती जे काही आहे त्याचे केलेले निरिक्षणे माणसांच्या ज्ञानात भर घालता आहेत. आपल्या भोवतीचा निसर्ग पाहतो आहोत त्यातून कुतूहल निर्माण होते.. कुतूहल निर्माण झाले की जिज्ञासेची वाट चालणे घडते..आणि मग तो प्रवास आपोआपच ज्ञानाच्या वाटेने घडत जातो. त्यादृष्टीने आपण शिक्षणातून विविध ज्ञानाचे मार्ग अनुसरण्याची गरज आहे.शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकातील ज्ञान नाही तर त्यापलिकडे असलेल्या विविध ज्ञान वाटांचा शोध घेण्याची गरज आहे. आपण केव्हा तरी स्वतःचाही शोध घेण्याची गरज आहे. आपण स्वतःचा विचार कधीच करत नाही. आपल्याला आपल्या अभिरूची सांगता येणे कठीण होत जाते.सांगता आली तर ती का? याचे उत्तर मिळत नाही. आपल्या आस्तित्वाचा विचार नेमका काय आहे..? आपण का जगतो आहोत..? आपणाला आनंद देणारी मार्ग कोणती..? दुःख देणारी वाटा कोणत्या..? आपण कोणत्या दिशेने गेले म्हणजे जीवन प्रवास अधिक आनंददायी होईल असे वाटते अशा वाटाही नेमक्यापणाने सांगता येत नाही. मुळात आपणच आपल्याकडे देखील शोध म्हणून पाहत नाही. आपल्याला आनंद देणा-या असलेल्या वाटांचा शोध आपण शिक्षणातून घेऊ शकत नाही.. हे वास्तव आहे.त्यामुळे शिक्षणाचा विचार सखोलतेच्या पातळीवर करण्याची गरज निर्माण झाली आहे. आपण खरंतर स्वतंत्रपणे जगणारे नागरिक म्हणून जेव्हा जगत जातो तेव्हा ज्ञानाच्या वाटा तुडवणे घडत जात असते. मात्र जेव्हा बंधिस्तपणे जीवन व्यवहार करतो तेव्हा आपण ज्ञानापासून दूर जात असतो. आपण बंधिस्त आहोत याचा अर्थ मनाने जे काही स्वीकारले आहे ते स्वीकारले की मग नवे काही स्वीकारण्याची गरज उरत नाही. त्यामुळे शिक्षणातून नवा विचार स्वीकारण्याची हिम्मत पेरण्याची गरज आहे. आपण नवे स्वीकारणाच्या विचार शिक्षणातून पेरण्यासाठी आपला भोवताल सतत शोधत राहणे आणि पुस्तकापलिकडे असलेला ज्ञानाचा विचार करत राहणे महत्वाचे आहे हे लक्षात घ्यायला हवे. आपण मुक्ततेचा विचार केला की ज्ञानाच्या अनंत दिशा खुल्या होत जातात.. आणि बंधीस्त झालो की ज्ञानाच्या वाटा अधिक अरूंद होत जातात. त्यामुळे एकतर ज्ञानाच्या वाटांचा शोध घेण्याची गरज आहे. ज्ञान हे जीवन आहे त्यामुळे त्या वाटा आपण चालण्याची गरज आहे. त्याशिवाय जीवनाचे मोल आपल्याला सहजतेने जाणता येणार नाही.

_ संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या