Monday, October 14, 2024
Homeब्लॉगशिक्षक दिन हवाच पण....

शिक्षक दिन हवाच पण….

उद्या पाच सप्टेंबर शिक्षक दिन साजरा होईल. शिक्षक दिनाचे निमित्ताने काही ठिकाणी शिक्षकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत गौरव केला जाईल. एकिकडे कृतज्ञता आणि त्याचवेळी या पेशात असलेले शिक्षक आणि त्यांचे प्रतिनिधीत्व करणा-या शिक्षक संघटना काळ्या फिती लावून अशैक्षणिक कामाच्या संदर्भाने निषेध नोंदविणार आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांनी नाराजी व्यक्त करण्याचा विचार करायला हवा. जगभरात शिक्षकांच्या प्रति समाज सातत्याने कृतज्ञता व्यक्त केली जात असते. खरंतर हा पेशा अत्यंत नोबेल स्वरूपाचा आहे. वर्गातील अध्ययन अध्यापनाच्या पलिकडे शिक्षक बरेच काही करत असतो. त्यांने पेरलेल्या विचारांवर उद्याचे राष्ट्र घडत असते. त्यांने काही चुकीचे पेरले तर उद्या भोवती देखील असेच चुकीचे उतरले जाण्याची शक्यता आहे. मुळात या पेशाकडे व्यवस्थेने अधिक गंभीरपणे पाहण्याची गरज आहे.

शिक्षकी पेशात काम करणा-या प्रत्येकाला या पेशाचा आत्मसन्मान हवाच, पण त्याचवेळी समाज व राज्यकर्ते यांनी देखील शिक्षकी पेशासंदर्भाने सन्मान प्रदान करण्याची गरज आहे. शिक्षकाला सन्मान मिळाला तर उद्याची पिढी अधिक समृध्द होण्यास मदत होईल. राष्ट्र निर्मितीस मदत होईल. आज शिक्षक हा राष्ट्रनिर्माता, समाज निर्माता ही केवळ सार्वजनिक सभेच्या ठिकाणी बोलायची गुळगुळीत झालेली वाक्य बनली आहे. शिक्षकांचे सरकारीकरण हे कितीही लाभदायी मानले गेले तरी त्यामुळे आपण उद्याची सक्षम पिढी घडू शकणार नाही. सरकारी करणाची मानसिकता समाज विकासाच्या प्रक्रियेला अडथळे ठरणारी आहे. त्यामुळेच देशातील शिक्षक आनंदी असतील तरच उद्याचा देश आनंदी असण्याची शक्यता आहे अन्य़था निराशेच्या छायेतील पिढी उभी केली जाईल. शेवटी निराश असलेल्या शिक्षकांच्या मनातून आनंददायी पिढीचा विचार कसा काय पेरला जाईल? आपल्या जवळ जे आहे तेच दिले जात असते. त्यामुळे शिक्षकी पेशाची प्रतिष्ठा अबाधित ठेवण्याचे काम शिक्षकांनाच करावे लागणार आहे. त्यासाठी राधाकृष्णन यांनी चाललेली ज्ञानाची वाट चालण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. ज्ञानाची वाट माणसाला स्वाभिमानाच्या दिशेने घेऊन जात असते. शिक्षक ही लाचार बनवला गेला की समाजही त्याच दिशेची वाट चालत असतो.. त्यामुळे स्वाभिमानी शिक्षक हीच उद्याच्या व्यवस्थेची गरज आहे.

- Advertisement -

खरंतर शिक्षकी पेशाची पंरपरा आपल्या देशात अत्यंत प्राचीन आहे. आपल्या पंरपरेने ज्ञानदान करणा-या प्रत्येकाला सन्मान दिला आहे. राज्यव्यवस्थेच्या सर्वोच्चस्थानी बसलेला राजाही आपल्याला ज्ञानदान देणा-या गुरूच्या चरणावर नतमस्तक होत होता हा इतिहास आहे. गुरूच्या स्थानी असलेला शिक्षक पुढे मास्तर झाला. मास्तर म्हणजे आईच्या स्थानी त्याला स्थान देण्यात आले. शिक्षकाजवळ आईचे मातृत्व, वात्सल्य असायलाच हवे ही त्यामागील धारणा. त्यादृष्टीने शिक्षकाला आईचे स्थान देण्यात आले. पुढे गुरूजी झाले आणि आता सर होण्यापर्यंतचा प्रवास घडतो आहे. हे परिवर्तन केवळ शब्दांचे नाही तर त्यामागे असलेल्या विचार प्रक्रियेचे देखील परिवर्तन आहे हे लक्षात घ्यायला हवे. कदाचीत वरवर हे शब्द बदलले आहे असे वाटेल, पण त्या शब्दांच्या सोबत असलेला अर्थ त्या त्या काळात शिक्षणात रूजला गेला आहे हे देखील लक्षात घ्यायला हवे. शब्द हे कधीच अर्थहीन असत नाही.त्यामुळे हे परिवर्तन होत असताना आत्मपरिक्षण करण्याची गरज निर्माण झाली हे कसे विसरता येईल? आजच्या शिक्षकदिनी सन्मान होत असताना आत्मपरिक्षणाची वाटही चालावी लागणार आहे.

शिक्षक दिनांच्या निमित्ताने शिक्षकांनी आम्हाला शिकू द्या या एका मागणीच्या निमित्ताने काळया फिती लावून निषेध नोंदविण्याचा निर्णय़ घेतला आहे. खरंतर एखाद्या देशात आमचे काम आम्हाला करू द्या असं सांगण्याची वेळ यावी हे निश्चित चिंता करायला भाग पाडणारी व्यवस्था आहे. त्यात शिक्षकांनी तशी मागणी करावी हे आणखी चिंताजनक आहे. शिक्षक केवळ शिकवत नसतो तर उद्यासाठीची प्रकाशमय वाट निर्माण करत असतो. आता त्यांने प्रकाशच पेरायचा नाही म्हटल्यावर उद्या चारही बाजूंनी अंधाराचे साम्राज्य दाटून आले तर दोष कोणाला द्यायचा हा प्रश्न आहे.सध्या शिक्षण विभागात मोठया प्रमाणावर अशैक्षणिक कामाचा भरणा आहे. मोठया प्रमाणावर ऑनलाईन कामे लादली जात आहे असा शिक्षक संघटनाचा आक्षेप आहे.खरतर दोन दशके मागे गेले तर शिक्षण विभागात अवघ्या दोन तीन कागदांवर महिना अखेर माहिती दिली की भागायचे. सध्या शिक्षण विभागाची बहुतांश माहिती ऑनलाईन झाली आहे. माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग मोठया प्रमाणावर वाढला आहे. अशा वेळी एकदा माहिती नोंदवली की पुन्हा पुन्हा त्या माहित्याच मागवल्या जाता कामा नये अशी अपेक्षा शिक्षकांची आहे.अशावेळी ती अपेक्षा काही चुकीची नाही. माहिती तंत्रज्ञान हे माहितीचा बोजा कमी करण्यासाठीचे साधन बनायला हवे आहे.आज मात्र ते तंत्रज्ञान माहिती ओझे बनू लागले आहे.आपल्या देशात आजही मोठया प्रमाणावर सुविधा नाही. आंतरजालची व्यवस्था नाही.अशा परीस्थितीत शिक्षक आपापल्या परीने ती कामे करत असतली तर माहितीचे ओझे कमी करण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.शिक्षकांनी माहितीचे कागद हाती देऊन शिक्षकाचे सत्व कसे जपले जाणार आहे.माहिती तंत्रज्ञानाच्या साधनाव्दारे माहिती मिळवायची. पुन्हा त्या माहितीची हार्डकॉपी द्यायची. हा साराच प्रवास वेळ खाणारा आहे अशी शिक्षकांची भूमिका आहे.खरेतर माहितीसाठी राज्यभर एकच धोरण घ्यायला हवे. एकदा माहिती नव तंत्रज्ञानाच्या आधारे घेतली की त्यावरत प्रक्रिया करण्याची गरज आहे.. पण आज माहिती घेतली गेली तर प्रक्रिया करत माहिती मिळवण्याऐवजी पुन्हा नव्याने माहिती मिळवली जात आहे त्यामुळे शिक्षकांना या मागणीसाठी रस्त्यावर उतरावे लागले आहे.. या मागणीचा अधिक गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.आज हा विचार केला नाही तर उद्या आपल्या हाती काहीच असणार नाही..सारीच वेळ गेलेली असेल… म्हणून विचार करण्याची हिच वेळ मानायला हवी.

खरेतर नव्या युगाशी नाते सांगायचे असेल आणि उद्याच्या पिढया अधिक सृजनशील व्हायच्या असतील तर शिक्षकांच्या हाती पुस्तके देण्याची गरज आहे.नव संशोधनाशी जोडले जाण्याची गरज आहे..शिक्षक समृध्द करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.शिक्षकांची मस्तके घडवली गेली तरच उद्याच्या भारताची मस्तके चार भिंतीच्या आत शिक्षक घडवू शकतील.शिक्षकांनी समृध्दतेच्या वाटा चालाव्यात म्हणून प्रयत्न होण्याची गरज आहे.आज आपल्याकडे शिक्षकांना समृध्द करणा-या समृध्द वाटा निर्माण करण्याचे मोठे आव्हान आहे.शिक्षकांचे सरकारीकरण केले तर वेळ भरून निघेल मात्र उद्याच्या भारतासाठीचे ते स्वप्न पेरू नाही शकणार.त्यामुळेच आपल्याला नव्या भारतासाठी नव्या भारताचे आव्हान पेलणारे गुरूजी निर्माण करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.त्यासाठी शिक्षकी पेशातील सृजनशील पिढी निर्माण करावी लागणार आहे.शिक्षकांना शिकू द्या असे म्हणत असताना ,शिकवणे हे कोठे मोठे अवघड काम आहे ? असेच लोकांना वाटू लागले आहे.कर्मचा-यांचा संप सुरू होता तेव्हा सर्व शासकीय कार्यालय बंद होती.मात्र शाळा चालविण्यासाठी काही हात पुढे आली होती.शिकवणे यात काय मोठे काही आहे का? असाच तो प्रश्न होता.कोणीही करू शकेल असे सोपे काम म्हणून त्याकडे पाहिले गेले होते.अशावेळी काही शाळा सुरू झाल्या होत्या.शिकवण्यासाठी लागणारी बैठक लोकांना दिसत नाही.शिकवणे म्हणजे केवळ पुस्तकातील ओळी पूर्ण करणे नाही. त्या पलिकडे शिक्षण असते हे आता ओरडून सांगण्याची वेळ आली आहे.त्यामुळे त्यादृष्टीने आपण काही प्रयत्न करायला हवेत.

जागतिकीकरण,उदारीकरण आणि मुक्त अर्थव्यवस्थेच्या काळात शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे.त्यामुळे शिक्षक हा शिक्षणाच्या बाजारातील विक्रेता ठरू लागला आहे.विद्यार्थी हा ग्राहक ठरत असताना नात्यावरही त्याचा परिणाम होत असल्याचे समोर येते आहे.त्यामुळे विद्यार्थी,शिक्षक,पालक,संस्था चालक यांच्या नात्यातील बंध हरवत चालले आहे.त्याचा परिणामही शिक्षण व्यवहारावर दिसत आहे.शिक्षक वेतन घेऊन शिकवतात त्यामुळे एका अर्थाने ते कर्मचारीच ठरले आहे त्यामुळे नात्यातील आदर,ओलावा कमी होतो आहे हे वास्तवही लक्षात घ्यायला हवे.शिक्षण संस्था विचार,मूल्य पेरण्यापेक्षा पैसा मिळवण्याचे साधन बनले आहे.अशावेळी पालक व शाळां यांच्या नात्यालाही व्यवहाराचे रूप आले आहे.त्यामुळे पालक संघटना न्यायालयात दाद मागत आहे.संस्था चालक ज्ञानदानापेक्षा नफा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यामुळे शिक्षणाच्या प्रक्रियेला व्यवहाराचे स्वरूप प्राप्त झाल्याने पावित्र्य नष्ट होताना दिसत आहे.अशावेळी हे बदलले स्वरूपातून आपण खरच माणूस उभा करू शकू का ? असा प्रश्न आहे.

पुन्हा एकदा आपल्याला शिक्षणाच्या मूलभूत हेतूचाच विचार करावा लागणार आहे.शिक्षणातून जेव्हा माणूस घडविण्याचा विचार केला जाईल तेव्हाच शिक्षणाचे मूल्य समाजमनावर प्रतिबिंबीत होण्यास मदत होईल.आज हरवलेल्या मूल्य व्यवस्थेत पुन्हा शिक्षकाची प्रतिष्ठा प्रस्थापित करायची असेल तर पुनर्विचाराची गरज निर्माण झाली आहे.शिक्षक दिनांच्या निमित्ताने गौरव होत असताना सर्वांनीच व्यापक अंगाने विचार करण्याची गरज आहे.तो विचारच उद्याच्या -हासापासून वाचवू शकणार आहे.शिक्षकांनी ठरवले तरच परिवर्तनाची वाट सापडेल अन्य़था चाचपडत प्रवास करावा लागेल..

_ संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या