Monday, June 24, 2024
Homeब्लॉगआत्मपरिक्षणाची वाट चालायला हवी...

आत्मपरिक्षणाची वाट चालायला हवी…

शिक्षण हे वाघिनीचे दूध आहे ते पिणारा गुरगुरतो असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते. या अर्थाचे विचार आणि भूमिकी अनेक विचारवंतानी व्यक्त केली आहे. जगाच्या पाठीवर शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करताना तोच विचार शिक्षणतज्ज्ञांनी केंद्रस्थानी ठेवला होता. त्या दिशेचा विचार करत ज्यांनी पेरणी केली त्या देशात त्याचा सकारात्मक परिणाम अनेक देशात झाला. राष्ट्र बदलताना त्या देशातील अनेक नागरिकांच्या जीवनातही परिवर्तन झाले. त्याच प्रमाणे अनेक राष्ट्रांमध्ये देखील विकासाची प्रक्रिया गतीमान झाली. ज्यांना शिक्षणाचे मोल कळाले त्या अनेक देशांनी शिक्षणावरील गुंतवणूक वाढवली आहे. त्यांनी शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता उंचावण्यासाठी जाणीव पूर्वक प्रयत्नही केले आहेत. केवळ पैसा गुंतवला म्हणजे परिणाम साधेल असे घडत नाही त्यासाठी तितक्याच गुणवत्तेचे मनुष्यबळही हवे असते. अशा परीस्थितीत आपल्या देशातही शिक्षणाचा प्रसार करण्याचा प्रयत्न झाला. त्यादृष्टीने आजवरच्या अनेक सरकारांनी धोरणही घेतले.

- Advertisement -

गावागावात आणि वाडी वस्तीवर शिक्षण पोहचले. त्याचा परिणाम आज स्पष्टपणे दिसू लागला आहे. स्वातंत्र्याच्यावेळी असलेल्या साक्षरतेच्या प्रमाणाचा विचार करता आज त्या साक्षरतेचा टप्पा अनेक पटीने उंचावला आहे. आज आपण जवळपास 90 टक्क्याच्यावर साक्षरतेवर पोहचलो आहोत. उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांचा सहभागाचा टप्पाही आपण 30 टक्केपर्यंत पोहचवला आहे. प्राथमिक स्तरावरील पटनोंदणी महाराष्ट्रात नाही म्हटले तरी 98 टक्क्यावर पोहचली आहे. आपल्या भोवती असलेला शिक्षणांचा टक्का उंचावला असला तरी शिक्षण हे वाघिनीचे दूध आहे, मग त्या दूध पिल्यानंतर त्या दूधाची शक्ती शिकणा-यांच्या मनात निर्माण झाली आहे का? त्याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण वर्तमानात शिक्षण घेऊनही विवेकी,शहाणपण आणि समाज व राष्ट्र म्हणून जो विचार केंद्रस्थानी असायला हवा असतो तसा विचाराची माणसं कमी होत चालली असल्याचे वर्तमान दिसते आहे.

या देशातील प्रत्येकालाच शिक्षण मिळायला हवे आणि ते शिक्षण प्रत्येकालाच शासनाने द्यायला हवे. त्यामुळे देशात शिक्षणाचा हक्क मिळायला हवा यासाठी आजवर अनेक चळवळी पुढे आल्या. त्याअर्थाने देशात शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करण्याचे मोठे काम आजवर झाले आहे. आजवर शिक्षणाचा विचार, प्रसार करण्याचा प्रयत्न केला. शिक्षणाचा आज तर मोठा विस्तार झाला आहे. भारत हा जगातील सर्वाधिक मोठी शिक्षणाची व्यवस्था असणारा देश आहे. मात्र शिक्षणातून जे मूलभूतपणे विचार पेरले जाण्याची गरज होती ती विचारांची शक्ती आणि हिम्मत पेरली गेली नाही हे वास्तव आपण लक्षात घ्यायला हवे. आज शिक्षणामुळे जर अपेक्षित परिवर्तन होत नसेल तर त्यामागे शिक्षणाचा दोष नाही तर दिले जाणारे शिक्षणच हिनकस आहे असे मानायला हवे. त्यामुळे शिक्षण अधिक कसदार होण्याची गरज आहे.त्यासाठी शिक्षण प्रक्रियेत काम करणा-या प्रत्येकानेच विचार करण्याची गरज आहे. मुळात शिक्षणात सर्वाधिक विचार करण्याची गरज आहे ती शिक्षकांची. शिक्षक जितके विचारवंत, सृजनशील आणि नवनिर्मिताचा ध्यास घेणारी असतील तितक्या मोठया प्रमाणावर समाजातून आपल्याला अपेक्षित फलनिष्पत्ती अनुभवता येणार आहे. आपल्याकडे मनुष्यबळाच्या बाबतीत अधिक विचार करण्याची वेळ आली आहे. परवा परवा पुण्यात पुण्याचे पालकमंत्री ना.चंद्रकात दादा पाटील म्हणाले, की शिक्षक शाळांमध्ये किती तासिका घेतात, शिकवण्यासाठी किती तयारी करतात,अद्यावत तंत्रज्ञान किती मिळवतात अशा काही मुदद्यावर बोट ठेवत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या संदर्भाने मोदीजी शिक्षकांना कामाला लावतील असंही मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी जे काही मत प्रतिपादन केले आहे त्यासंदर्भाने शिक्षण क्षेत्रातील मनुष्यबळाने सर्वाधिक विचार करण्याची गरज आहे. तो तर आत्मपरिक्षणाचा विचार आहे. ते चुकीचे असेल तर जाहीर भूमिका घेऊन त्यावर चर्चा व्हायला हवी.. पण ते बरोबर असेल तर आत्मपरिक्षण करत मार्ग बदलण्याची गरज आहे.

मुळात असे बोलण्याची वेळ तरी का यावी हा खरा प्रश्न आहे. समाजातील आणि तेही राज्याच्या महत्वाच्या पदावरील व्यक्ती बोलते तेव्हा चिंता करायलाच हवी. शिक्षणाचा विचार करत भूमिका घेतली गेली तर बरेच काही चित्र बदलू शकते याचाही विचार करायला हवा. त्याशिवाय आपण शिक्षणातून बदल नाही घडू शकणार. आपल्याकडे शिक्षण म्हणून जो सुक्ष्म विचार करण्याची गरज आहे तो विचारच मुळात होताना दिसत नाही. शिक्षणाच्या धोरणात धरसोड वृत्तीचा परिणामही आपल्याला शिक्षणात दिसते आहे. जगाच्या पाठीवर जी राष्ट्र प्रगत आहेत त्यातील बहुतांश राष्ट्रांच्या शिक्षण धोरणात एका प्रकारचे सातत्य आहे. सत्ता बदलली आणि कोणताही पक्ष सत्तेत आला तरी तेथील शैक्षणिक धोरणात बदल होताना दिसत नाही. त्यामुळे तेथील प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावलेला अनुभवास येतो. शिक्षणाचा व्यापक परिणाम हवा असेल तर त्यादृष्टीने विचार करण्याची गरज आहे. जेष्ठ निसर्गवादी विचारवंत रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या शांती निकेतन आश्रमात बालवाडी सुरू केली होती. त्यांनी बालवाडीसाठी शिक्षक नियुक्त केला होता. तो शिक्षक अमेरिकेत शिक्षणशास्त्र विषयातील पी.एच.डी धारक होता. खंरतर आपल्याकडे प्राथमिक शाळा असेल किंवा अगदी अंगणवाडी असेल तर त्यासाठी शिक्षक हवा आहे.. पण त्यासाठी शिक्षक उच्च शिक्षित असायला हवेत असं वाटत नाही.आपल्याकडे शिक्षक उच्च शिक्षित असणारी माणसं कमी नाही पण त्यांचा व्यापक विचार शिक्षणाच्या प्रक्रियेत होताना दिसत नाही. शिक्षण क्षेत्रात जी माणसं अधिकाधिक शिकायला हवी आहे त्यासाठी प्रेरणा आणि प्रेरक वातावरण निर्माण करायची गरज आहे. आज आपण उच्च शिक्षित माणसं शिक्षणाच्या प्रक्रियेत अधिकाधिक सक्रीय केली तर काही प्रमाणात शिक्षणाच्या गुणवत्तेचे निश्चित चित्र बदलले आपणास अनुभवास मिळेल. टागोरांसारख्या माणसांना बालवाडी साठी पीएचडी धारक व्यक्तीची निवड केली त्यामागे सारे आले. आपण असा विचार करत सर्वच स्तरावर अधिकाधिक गुणवत्तापूर्ण आणि उच्च शिक्षित माणसं सर्व ठिकाणी येतील यासाठीचे धोरण घेण्याची गरज आहे.असे घडले तर परिवर्तनाची वाट चालता येईल.. अन्यथा प्रवास सुरूच आहे..

_ संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या