Sunday, November 24, 2024
Homeब्लॉगपुस्तके घडवतील मस्तके

पुस्तके घडवतील मस्तके

राज्य शासनाने गेले काही वर्षापूर्वी सत्कार समारंभात बुके ऐवजी बुक द्यावेत असा शासन निर्णय जारी केला होता. शासन निर्णय जारी केल्यानंतर आरंभी अंमलबजावणी सुरू झाली. खरंतर या निर्णयाने पुस्तकाचे मोल अधोरेखित करण्याच प्रयत्न झाला. हाती पुस्तके आली की माणसांचे जीवन बदलू शकते यावर जगातील विचारवंताचा विश्वास आहे. अनेकांच्या आय़ुष्यात ती वाट सापडली आहे. त्यामुळे शासनाच्या सर्वच विभागाने हिच पाऊलवाट चालण्याची गरज आहे. ज्यांच्या हाती पुस्तके दिसतील त्यांची मस्तके अधिक उत्तमतेने घडवली जातात. पुस्तकातून घडणा-या मस्तकामुळे अनेकाचे आयुष्य बदलले आहे. जो समाज पुस्तकांच्या सोबतीने चालतो ते राष्ट्र अधिक उत्तमतेच्या दिशेने प्रवास करत असते. आज पुस्तके हाती देणारी पालक हरवले आहे. बालकांच्या आयुष्यातून पुस्तके हरवली आहेत. त्यामुळे माणसांच्या उंच्या हरवल्या आहेत. जेथे माणसांची उंची कमी होत जाते तेथे समाजाची उंची तरी कशी वाढणार? हा खरा प्रश्न आहे.

आपल्याला आपला भोवताल जेव्हा भकास वाटू लागतो तेव्हा त्याचे कारण असते रिकामी मस्तके. रिकामी मस्तकांची माणसे म्हणजे समाज नाहीच.. तर ती केवळ गर्दी असते. त्यामुळे आपल्या मस्तकाधारित समाज हवा असेल तर आजच मुलांच्या हाती उत्तम खेळणी देण्याबरोबर उत्तम गणवेश देण्यासाठी पालक जितके आग्रही असतात तितक्याच प्रमाणात पुस्तके हाती देण्यासाठी आग्रही भूमिका पालकांनी घेतली तर कदाचित मुलांचे मार्क कमी होतील, पण मुलांच्या गुणांचे मात्र संवर्धन झालेले आपणास अनुभवास आल्याशिवाय राहणार नाही. जगाच्या पाठीवर ज्यांनी इतिहासाच्या पानावर आपले नाव कोरले आहेत अशा अनेक महापुरूषांच्या आयुष्यातील परिवर्तन पुस्तकांनी केले आहे. महात्मा गांधी, महात्मा ज्योतीबा फुले, लोकमान्य टिळक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन, भारताचे माजी राष्ट्रपती ड़ॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम यासारख्या अनेकांचे आयुष्य हे केवळ पुस्तकांनी बदलवले आहे. हे त्यांनी आपल्या जीवन चरित्रात अभिमानाने नोंदवले आहे.

- Advertisement -

अँरिस्टॉटल यांनी म्हटले होते की, “माझ्या आयुष्यातील माझ्या फक्त तीनच गरजा आहेत. त्या म्हणजे पुस्तकं, पुस्तकं आणि पुस्तकं”. हे पुस्तकाचे मोल आहे. त्यांनी पुस्तकांनी जीवनाची वाट सापडली ती वाट आपल्याही पाल्याला सापडू शकते. मात्र त्यांच्या पालकांनी मुलांच्या मार्कासाठी आग्रही भूमिका न घेण्याची गरज आहे. पालकांनी मुलांच्यामध्ये गुण रूजावीत म्हणून प्रयत्नाची भूमिका घेण्याची गरज आहे. आज पालक मुलाना गुण नसले तरी चालतील मात्र मार्कासाठी आग्रही भूमिका घेऊन आहेत. मार्क मिळवण्याच्या नादात आपण मुलांच्या आय़ुष्याकडेच दुर्लक्ष करत जात आहोत हे लक्षात घेणार की नाही हा खरा प्रश्न आहे. पुस्तके केवळ माहिती देत नाही तर जीवनाची प्रकाशमय वाट दाखवत असतात. ग्रीक तत्वज्ञानात म्हटले आहे, की “ग्रंथालय ही आमची औषधालये आहेत”. हा विचार अगदीच खरा आहे. माणसांची मने निर्मळ ठेवण्याचे काम तर पुस्तकेच करत असतात. पुस्तकाच्या वाचनातून आनंद मिळत असतो. पुस्तकांनी जीवनातील व्देष,मत्सर,राग कमी होत जातो. निर्मळता उंचावत जाते.माणसांच्या जीवनाचे मोल लक्षात आणून देण्यास मदत करत असते. मन निर्मळ झाली की, मन आणि शरीरावरील ताण तणाव कमी होत जातो. पुस्तकांमुळेशरीर अधिक आनंदी राहते .मनही प्रसन्न राहते. त्यामुळे आजारपणापासून शरीर आपोआप दूर जाते. त्या अर्थाने माणसांच्या निराशेच्या छायेला पुस्तक हे मोठे औषध आहे. पाश्चात्य देशात अगदी कमी कायदे आहे. राज्यघटना अत्यंत कमी कलमांची आहे. काही नियम तर अलिखित आहे तरी तेथे लोक नियम पाळतात. गुन्हेगारी कमी आहे. याचे कारण तेथीला लोकमानसवर पुस्तकांचा मोठा प्रभाव आहे. पुस्तकांमुळे तेथील लोकांनी मने घडली आहेत. त्यामुळे स्वहितापेक्षा समाज व राष्ट्र हित अधिक महत्वाचे मानले जाते.

आपल्याकडे देखील बंगाली माणसं एकत्र आली तर पुस्तकांवर चर्चा करताना दिसतात.आपण ती वाट केव्हा चालणार हा प्रश्न आहे. शब्दसंपत्ती ही तर वाचनाने प्राप्त होते.वादविवादाची शक्ती मिळेल पण केव्हा वाद घालायचा आणि केव्हा संवाद करायचा याचा विवेकी विचारही वाचनातून विकसित होत असतो.कोणाबरोबर वाद संवाद करायचा याचाही विवेक वाचनातून विकसित होत असतो.त्या अर्थाने विवेक व शहाणपण वाचनातून मिळत असेल तर तेच पूर्णत्व आहे.वाचनातून माणसांच्या जीवनाला आकार मिळण्यास सुरूवात होत असते.वाचनाने दृष्टीकोन निर्माण होतो.व्यक्तीमत्वाला आकार देण्याचे काम वाचनामुळे घडते.त्याचवेळी लेखन कौशल्यांचा विचारही त्यातून गतीमान होत असतो.वाचन असल्याशिवाय लेखनाचा समग्र प्रवास घडत नाही.त्यामुळे लेखनाचा विचार पुढे न्यायचा असेल तर पुस्तक वाचनाला कोणताही पर्याय नाही.लेखन हे भाषेचे सर्वात शेवटचे कौशल्य आहे.ते सहजसाध्य नाही त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात.त्यासाठी प्रवास अधिक उत्तम घडावा असे वाटत असले तर वाचनाशिवाय पर्याय नाही.वाचनाचे मोल सांगताना एचमॅन लेखन म्हणतात,की पुस्तके नसलेले घर म्हणजे खिडक्या नसलेली खोली आहे.ज्या घराला खिडकी नाही तेथे प्राणवायू कसा येणार.प्राणवायू नाही म्हणजे जगणे तरी कसे होणार ? त्यामुळे खिडकी म्हणजे प्राणवायूचे व्दार आहे.आज तर आपल्याभोवती लाखो रूपये गुंतवणूक करत महालांची निर्मिती करण्यात आली आहे.त्या महालात सर्व प्रकारच्या सुविधा आहेत मात्र पुस्तकासाठीची खोली तर सोडा एखादे कपाटही आस्तित्वात नाही.मग हे सारे महाल म्हणजे अंधा-या खोल्याच आहेत.अंधारात वाट सापडत नाही.अंधारात तसेही काही दिसत नाही..त्याप्रमाणे जीवनातही आपल्या हाती पुस्तके नसतील तर जीवनात वाट सापडत नाही.निर्णय घेता येत नाही.मनात व्दंद निर्माण होते.त्यामुळे पुस्तकांशिवाय जीवन म्हणजे जीवनाला अंधकारात लोटणे आहे.त्यामुळे घर म्हणजे केवळ भिंती नाहीत तर तेथे पुस्तकांचे आस्तित्व अधिक महत्वाचे आहे.आपण मुलांचे संगोपण करताना त्यासाठी मोठा खर्च करत असतो.त्याच्यासाठी शाळा निवडताना स्मार्ट स्कूलची निवड करतो.उत्तम इमारत आपल्याला हव्या असतात.उत्तम वातावरण हवे असते..संगणक माहिती तंत्रज्ञानाच्या सुविधा हव्यात.त्यासाठी लाखो रूपये मोजले जातात..पण त्या शाळेत समृध्द ग्रंथालय आहेत का ? याचा विचार केला जात नाही.मुलाला चांगल्या शाळा हव्या आहेत याचा अर्थ त्या शाळेत ग्रंथालयाची सुविधा किती प्रभावी आणि परिणामकारक उपयोगात आणली जाते हे अधिक महत्वाचे आहे.मात्र शाळा, महाविद्यालयातील ग्रंथालयाचे स्थान अलिकडे हरवत चालले आहेत.आहेत त्यांना वाचकांची प्रतिक्षा आहे.आज घरात बालकाला हव्या त्या सुविधा पुरविण्यासाठी पालक पावले टाकत आहेत.त्याच्यासाठी स्वतंत्र सायकल दिली जाईल.त्याला स्वतंत्र बेडरूम असेल.त्याला हवे ते खाण्यास आणि हवे ते महागडे वस्त्र दिले जातील..मात्र त्याची गरज पूर्ण झाली असे घडत नाही तर त्यासोबत आपण पुस्तकेही देण्याची गरज आहे याचा विचार करणार की नाही हा खरा प्रश्न आहे.आपण हाती पुस्तके दिली तर पुन्हा आय़ुष्यात वेगळ्या संस्काराच्या वाटा धुंडाळण्याची गरज पडणार नाही.शिकवणी लावण्याची गरज नाही ,पण बालवयातच पुस्तके हाती देण्याची गरज आहे.वयाच्या 11 वर्षाच्या आत मुलांच्या हाती पुस्तके आली तर भविष्यात मुलांच्या हाती पुस्तके टिकण्याची शक्यता आहे.नंतर आपण कितीही प्रयत्न केले तरी पुस्तके हाती येण्याची शक्यता नसते.त्यामुळे भविष्यातील धोके लक्षात घेऊन त्यावर त्यावेळी मात करण्याचा विचार करण्याऐवजी आजच मुलांच्या हाती पुस्तके देण्यासाठी पालक आणि शिक्षकांनी जाणीव पूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे.

पालकांनी मुलांबाळांचे संगोपन करताना अन्न,पाण्याबरोबर मुलांची पुस्तकांची गरज भागवायला हवी.मुलांना अन्नाची गरज असते त्याप्रमाणे त्यांना पुस्तके वाचनांची देखील भूक असते.घरात पुस्तके नसणे म्हणजे एक प्रकारे कुटुंबावर केलेला अन्याय ठरतो. पुस्तके अवतीभोवती असली की मुलांच्यामध्ये पुस्तके वाचनाची गोडी आपोआप विकसित होण्यास मदत होत असते.घरातील मंडळी एकत्रित बसून दूरदर्शन संच पाहत असतात त्याप्रमाणे बालकही दूरदर्शनसंच पाहणे पसंत करतात.त्याप्रमाणे घरातील मोठयांनी घरात रोज किमान एक तास पुस्तक वाचनाचा प्रयत्न केला तर निश्चितच मुलेही पुस्तके वाचताना आपोआप दिसतील. शिक्षण शास्त्राच्या सिंध्दातानुसार मुले सांगून फार शिकत नाही तर ते पाहून अधिक शिकत असतात.आज घरात पुस्तके वाचनारी माणसं हरवत चालली आहेत म्हणून मुले पुस्तके हाती घेत नाही.आपले शिक्षक पुस्तके वाचतील तर भविष्यात शाळांमधील मुले पुस्तकांची वाट चालण्याची शक्यता अधिक असते. वाचनातूनच ज्ञानार्जनाची रूची उत्पन्न निर्माण होते.त्यामुळे तरूणमने विद्याविनय संपन्न बनतात.तरूणांच्या मनात विद्या अभिरूचीचा विचार रूजला की मग तरूणांची मने व्यसने,विकार,विलासासारख्या फालतू नशेत रमत नाहीत.एका अर्थाने पुस्तके ही अधोगतीला घातलेला अडसर आहे.आज आपण मुले वाममार्गाला जाताना पाहतो त्यापासून परावृत्त होण्यासाठी मोठे प्रयत्न केले जातात.मात्र ते सारे प्रयत्न पुरेसे ठरत नाही.काय कराव आणि काय करू नये हे कळण्यासाठी विवेकाची व शहाणपणाची गरज असते.तो विवेक वाचनातूनच विकसित होण्याची शक्यता अधिक असते.त्यामुळे पुस्तके हाती दिली गेली तर बालकांचे आयुष्य देखील परिवर्तनाची वाट चालेल..समाजातील जो भ्रष्टाचार आहे तो देखील पुस्तके वाचनाने कमी होण्याची शक्यता आहे.पैसा हे जीवनाचे सर्वस्व नाही.पैशापेक्षा माणसं अधिक महत्वाची आहेत.पैशाने समाधान विकत घेता येत नाही हे एकदा लक्षात यायला हवे.त्यासाठी तर पुस्तके हाती यायला हवीत ना…आज हाती असलेल्या मोबाईल ऐवजी पुस्तक हाती आले तर बालकांच्या आय़ुष्यातील आणि पालकांच्या चिंतेची अनेक प्रश्न निकाली निघतील यात शंका नाही.गरज आहे विचार करण्याची.

_ संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या