Thursday, September 19, 2024
Homeब्लॉगमाणसांचे ढंग पाहूनिया....

माणसांचे ढंग पाहूनिया….

माणसं फारच बदली आहेत. आमच्या काळात असे नव्हते. अशी म्हणणारी एक पिढी आपल्या भोवती सतत असते. ती सतत जुने ते सोने अस मानत आलेली अलके. तीचा तो विचार काही प्रमाणात खरा असेलही. मात्र तो विचार काही त्रिकाल बाधित सत्य आहे असे मात्र नाही. जीवन प्रवासात काळ वेगाने पुढे जात आहे. समाजात आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक व्यवस्थेत मोठया प्रमाणावर बदल होतो आहे. त्याचा परिणाम माणसांच्या जगण्याच्या आदर्शवादी भूमिकेवर, तो ज्या वाटेने चालतो आहे त्या रूढी, परंपरां, संस्कृती, लोकव्यवहारावर देखील होतो आहे. ते बदल कोणी सकारात्मकतेने घेतात तर कोणी नकारात्मकतेचा पाढा वाचत चालत राहतात. बदल हा कोणत्याही व्यवस्थेचा अपरिहार्य भाग आहे.जे बदलतात ते काळाच्या ओघात टिकतात. जे बदलांना सामोरे जाण्यासाठी मानसिक तयारी करीत नाही ते संपतात. त्यामुळे आपल्याला टिकायचे असेल तर सर्वच बदलांना जाणून घेत संवाद सुरू ठेवला पाहिजे. आजही आपल्या भोवती असलेल्या अनेक नामवंत कंपन्या आहेत.. त्यातील ज्यांनी बदल स्वीकारले त्या कंपन्या टिकल्या आणि प्रगतीचे पंख लेवून विस्तारल्या देखील. मात्र ज्यांना ते बदल टिपता आले नाहीत त्या कंपन्या बंद पडल्या.अगदी त्या कंपन्या जागतिक मानांकनातील आहेत हे देखील विसरता येत नाही. तसेच माणसांच्या आयुष्याचे देखील आहे.

- Advertisement -

अलिकडे समाजात माध्यम अधिक वेगाने बदलता आहेत.कधी काळी वर्तमान पत्रात येणारी बातमी आठ दहा दिवसापूर्वीची असायची..कारण बातम्या टपालाने पाठविल्या जात होत्या.त्यानंतर महत्वाच्या बातम्या तारेने पाठवल्या जात होत्या.पुढे फॅक्स मशीन आली आणि आता इमेल वर बातम्या पाठवल्या जाऊ लागल्या..हे सर्व घडताना 24 तास प्रतिक्षा असायची पण अलिकडे बातमी घडली की ब्रेकींगच्या नावाखाली लगेचच बातमी संकेतस्थळावर पाहावयास मिळते हा माध्यमांमधील बदल कितीतरी वेगाने झाला आहे.तसेच बदल जगातील सर्वच क्षेत्रात झाले आहेत.मात्र हे बदल स्वीकारणे अपरिहार्य आहे..अलिकडे विविध माध्यमांवर जगात घडणा-या बदलांना विरोध करणारे आणि समर्थन करणारे अनेक संदेश सतत विविध माध्यमातून आपल्या पर्यंत येत असतात. सततच्या पडणा-या संदेशाच्या पावसात बोचरा गारवा वाचकांना विचारशुन्यता देत असतो.त्यातील शब्दांच्या थेंबांचे सत्व हरवून बसले आहे.आलेले संदेशही फारसे कोणी वाचत नाही.काही जन तर न वाचता विशिष्ट शब्दांचे उपयोजन करत प्रतिक्रिया देत असतात.अगदी सारेच खोटे खोटे करण्यात अधिक रस दाखवतात.त्यामुळे माध्यमांमधील संदेश मनावर घेण्याचा प्रश्नच येत नाही.काळ बदलला आहे.अशा परीस्थितीत मात्र एखादा संदेश मनावर खोलवर परिणाम करून जातो.त्या दिवशी भ्रमणध्वनीच्या पटलावर असाच एक संदेश आला आणि त्या संदेशांने मनावर खोलखोल विचार करावा लागला “ पूर्वी लोक अऩ्नाच्या शोधासाठी भंटकती करायची.आता लोक खालेले अन्न पचावे म्हणून भटकंती करता आहे.पूर्वी चोरापासून संरक्षण व्हावे म्हणून घराच्या बाहेर कुत्रे बाहेर असायचे..आता मात्र कुत्रे पिंज-यात असते कारण घराच्या बाहेर असेल तर बिबटयाची भिती असते. पूर्वी शौचास बाहेर जायचे आणि घरी जेवन करायचे.आता लोक घरात शौचास जातात आणि खाण्याकरीता बाहेर जातात.पूर्वी गाडीत माणसांसाठी जागा असायची..आता तेथे माणसांऐवजी कुत्रे बसू लागले आहेत.पूर्वी माणसं एकत्रित यायची आणि मनसोक्त संवाद व्हायचा.आता एकतर माणसं एकत्रित येत नाही आणि आली तर प्रत्येक जन माना खाली घालून बसलेली असतात. त्यांच्या मनावर मोबाईलचे साम्राज्य सुरू असते.माणसांशी होणारा एकमेकाशी असलेला संवाद आता हरवला आहे.

निर्जीव वस्तूशीं संवाद वाढतो आहे.कधीकाळी माणसांची आर्थिक परीस्थिती गरीबीची आहे म्हणून कमी वस्त्रात लोक राहायची.आता जमाना बदलला आहे.पैसे असूनही लोक कमी वस्त्र वापरू लागले आहेत.पूर्वी लोक दर्शनीय होती आता प्रदर्शनिय बनत आहे “ अस बरच काही बदलल्याचा तो संदेश होता..वाचून धक्काच बसला..पण हे बदलतय हेही खरे होते .हे बदल काळाच्या ओघात होता आहेत.गत अडीच दशकात जागतिकीकरणांची प्रक्रीया बरीच पुढे गेली आहे.तिचे स्वागत करताना आर्थिक प्रक्रीयेत बदल होतील असे वाटत होते.तशी चर्चाही चर्चेत होती.त्यामुळे काहिंनी स्वागत केले..अऩेक द्रष्टया विचारवंतांनी या बदलांचा समाजजीवनावर परिणाम होवू शकतो..असा इशारा दिला होता.त्यावेळेस त्याचा विचार केला गेला नाही.आज कस हळूहळू बदलू लागले आहे.हे पाहीले की त्यांचा इशारा किती खरा होता हे सहजपणे लक्षात येते.माणसांच जगण ..खादय संस्कृती बदलली.पाश्चात्य देशापासून अगदी शेजारच्या देशातील अनेक पदार्थ येथील हातगाडीवर मिळू लागले आहेत.या पदार्थांच्या भाऊगर्दीत आमची पुरणपोळी..सारभाताची लज्जत हरवत चालली आहे.पिज्जाही गावागावात पोहचला आहे.आमच्या भेळ..भजी..पेक्षाही चायनीजची रंगभरी सत्वहीनतेची चव भारी वाटू लागली आहे.वस्त्र संस्कृती बदलली.आपली नववारी आता केवळ व्रतासारखी अधूनमधून घरात डोकावते.तीला अंगावर लेनेही जड होते आहे..आमच्याच संस्कृतीचे वस्त्र अंगावर लेतांना मदत घ्यावी लागते आहे..काय ना जमाना बदलला अस म्हटले की…आपल काहीही हरवले तरी चालते.आपली भाषाही बदलली आहे.कधीकाळी भाषा सत्व,शुध्दतेचा आग्रह केला जायचा..वहीवर अनेक वर्तुळ करीत गुरूजी शुध्दतेचा आग्रह धरायचे..माध्यमही भाषा जपण्याकरीता आग्रही होती.जे बोलायचे ते शुध्दच बोला.उच्चार,लेखन,बोलण्याचा आग्रह जशा शुध्द असायचा..तसे वर्तन शुध्दतेची मागणी असायची.आज पोरही “ घ्या संभाळून सर . पहिली काय आणि दुसरी काय फरक पडतो…लिहितात ना मराठी.तुम्ही फार आग्रह केला तर मराठीचा कोणी अभ्यास करेल काय.. ? ” हे असे काही ऐकले , की आपणाला शिकायची वेळ आली आहे काय..? असं मनाला वाटून जाते.आज भाषेचीही भेळपूरी झाली आहे.मराठी बोलताना त्यात कितीतरी वेगवेगळ्या भाषांतील शब्दांचे आधार घेऊन मराठी बोलावी लागते.एक मराठी वाक्य बोलायचे असले तरी त्या एका वाक्यात किमान एक तरी इंग्रजी शब्द घातल्याशिवाय मराठीचे वाक्यच पूर्ण होत नाही.ती आपल्याला भाषेची लज्जत वाटू लागली आहे.त्या नादात आमची भाषा ,समृध्द होते की सत्व गमावून बसते याचा कोणताही विचार मनाच्या तळाशी येत नाही.आता असे होणार हो..जागतीकीकरण आहे.तुम्ही बदलला नाहीतर तुम्हीही काळाच्या ओघात गडप व्हाल..रेटाच तेवढा आहे..असा आवाज कानी येतो..तेव्हा माणूस फारच बदलला याची जाणीव होते.माणसांनी परिवर्तनाचे वारकरी व्हावेच…बदलांना सामोरे जायला हवे..पण ते बदल म्हणजे आपले सत्व गमावणे नाही.आज माणसं जीवनाच्या व्यवहारात बदलली आहेतच.मात्र तो बदल म्हणजे व्यक्तिगत जीवनातील मूल्यांचा हरवलेला विचार आहे.त्या बदलात भूमिका नाही तर केवळ स्वार्थाचा विचार आहे.त्यामुळे माणसांचा बदलाना गांभीर्य़ांने घेण्याचा प्रयत्न होत नाही..त्या बदलांनाही वास येतो आहे..मग फ.मु .शिंदे सरांसारख्या कवीच्या अंतकरणातील वेदनांचे झालेले शब्द आठवतात..

बदलेना आता सरडाही रंग..माणसांचे ढंग पाहूनिया..म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून माणसं अधिक विचाराच्या दिशेने घेऊन जाण्याची गरज आहे.माणसांना विचार करायला शिकवल्याशिवाय आपल्याला भविष्यासाठीच्या परिवर्तनाच्या वाटा चालता येणार नाही..

_ संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या