प्राण्याचे एक सुप्रसिध्द संग्रहालय होते.. संग्रहालयात जगभरातील विविध स्वरूपाचे प्राण्यांना बंधिस्त केले होते. पाळीव प्राण्याबरोबर हिंस्त्र प्राण्यांना देखील संग्रहालयात ठेवण्यात आले होते. संग्रहालयाचा आकार वर्तुळाकार तयार करण्यात आला होता. संग्रहालय पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकासांठी एकाच प्रवेशव्दारातून प्रवेश दिला जात होता. ज्या मार्गाने प्रवेश केला, त्याच व्दारातून बाहेर पडण्याची संधी होती. या संग्रहालयात प्रत्येक प्राण्यासाठी स्वतंत्रपणे एक निवारा कक्ष तयार करण्यात आलेला होता.त्या कक्षात त्या प्राण्याकरीता लागणारे अन्न, पाणी तेथे ठेवण्यासाठी माणसाची नियुक्ती करण्यात आली होती. त्या प्रत्येक प्राण्याच्या निर्धारित कक्षाच्यावर त्या प्राण्याबददलची वैशिष्टये सांगणारी माहिती नमूद केले होती. प्राणी काय खातात… कोठे राहतात… ते शाकाहारी आहेत की मांसाहारी.. त्यांची शास्त्रीय दृष्टया आवश्यक असणारी माहिती देखील त्या फलकावर लिहिली होती. अनेक जन प्राणी पहाण्यासाठी आनंदाने जातात तसा एक दिवस मुल्लाही त्या प्राणी संग्रहालयात गेला होता. प्रसिध्द अशा प्राणी संग्रहालयास भेट दिल्याचा आऩंद मुल्लाच्या मनात होता. अनेक प्राण्याची माहिती मिळाल्याचा आनंदाने तो सामावलेला होता. या संग्रहालयातील अंत्यत वैशिष्टयपूर्ण अशा माहितीचे त्याला अप्रुप वाटत होते.
मुलांच्या चेह-यावर देखील तो भाव स्पष्टपणे दिसत होता. पाहता पाहता तो बाहेर पडण्याच्या मार्गाचे जवळ आला होता. शेवटी एक निवारा होता.सर्व पाहून झाल्यावर त्या कक्षाजवळूनच सर्वांना जावे लागत होते. त्या कक्षावरती पडदा लावण्यात आलेला होता. तेथे अत्यंत सुक्ष्मतेने पाहिले तरी कोणत्याच बाजूने आतील प्राण्याचे दर्शन घडत नव्हते. त्यामुळे आत कोणता प्राणी आहे याची उत्सुकता प्रत्येकाची ताणली जात होती. कोणताच प्राणी नाही म्हणून त्या कक्षाच्यावर कोणती माहिती आहे हे पाहावे म्हणून त्यांने कक्षाच्यावर असलेल्या फलकावरील मजकूर किमान वाचावा म्हणून त्यांने मान वर केली.त्या फलकावर लिहिले होते. जगातील अंत्यत, लबाड.. सोईने वागणारा.. बदमाश, अविश्वासू, हिंस्त्र प्राणी आहे हा. हे वाचून मुल्लांची उत्सुकता आणखी वाढली. त्याला आतला प्राणी कसा असेल.. ? या उत्सुकतेत त्यांने कक्षाच्या व्दारावरील पडदा दूर केला.आत पाहतात तर तो कक्ष पूर्णता रिकामा होता.. तेथे कोणताच प्राणी नव्हता.सर्व कोप-यात त्यांनी नजर टाकली. अधिक डोळे ताणून बारकाईने पाहिले तरी कोणताच प्राणी काही दिसेना.. मात्र या कक्षात मागील बाजूला एक मोठा आरसा होता. त्या आऱशाच्या पलीकडे काहीच दिसत नव्हते. त्या कक्षात डोकावून पाहिले की फक्त बाहेरून पहाणाच्या चेहरा त्या आरशात दिसायचा. आपलाच चेहरा त्या आरशात पाहील्यावर वरची माहीती कोणत्या प्राण्याची असा प्रश्न त्यांला पडला.. तेव्हा बाजूला उभा असलेला प्राणी संग्रहालयातील माणूस तेथे उभा होता.. तेव्हा मुल्ला त्याच्या जवळ गेला आणि त्याला विचारले, येथे तर कोणताच प्राणी नाही मग वरील माहिती कोणत्या प्राण्याविषयी आहे..? मुल्लाला वाटले होते की, अगोदर एखादा प्राणी येथे असावा. त्या प्राण्याचे निधन झाले असावे.. म्हमून वरील माहिती नोंदवली गेली आहे.. मात्र तेथे प्राणी नाही.. पण त्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी प्राणी संग्रहालयातील सुरक्षा रक्षक पुढे आला आणि म्हणाला.. “काय राव..? त्यात कोणताच प्राणी नाही.. पण आपला चेहराच्या आत दडलेला एक प्राणी आहे आणि त्याचे दर्शन या कक्षात गेले की लगेच दर्शन घडतेच ना. वरील फलक आपण वाचला पण तेथे कोणीच दिसले नाही. मात्र आपण तेथे दिसलो ना, मग येथील माहिती दुसरी कोणाची नाही तर आपल्यातील प्राण्याची ही माहिती आहे” हे ऐकल्यावर मुल्लाला धक्का बसला.
जगातील सर्व प्राण्याबददल माणसाला विश्वास आहे.. आणि तरी एवढा हिंस्त्र, अविश्वासू असलेला हा एकमेव प्राणी आहे का? माणूस खरच इतका वाईट आहे काय…? त्याचे उत्तर अर्थात हो असेच आहे. खरेतर मानव म्हणून जन्माला आलेला प्रत्येक सजीव हा विज्ञानाच्या परीभाषेत प्राणीच आहे. त्याचेवरती होणारे संस्काराने तो माणूस बनतो. असे संस्कार करण्यासाठी शाळा आहेत. तेथे तर वर्तमानात तर मोठी मार्काचीच स्पर्धा आहे. तेथे समजावून घेणे, जाणून घेणे, शिकू देणे. विचार करण्यास प्रवृत करणे. आत जे दडले आहे ते बाहेर काढणे. प्रेमाची भावना विकसित करणे. या सारख्या अनेक गोष्टी करणे अभिप्रेत आहे. त्या करण्यासाठीचा मार्ग वर्तमानात आपल्या भोवती नाही. येथे केवळ पुस्तक, परीक्षा आणि स्पर्धा, पास नापास यातच आपले शिक्षण हरवत चालले आहे. आई बाबांनी मुलाले काय बनवायचे आहे..? तर त्याचे उत्तर जेव्हा “माणूस” असे मिळेल तेव्हा आपण माणूस बनण्याबरोबर समाज म्हणून विकसित होण्यास मदत होईल.त्याकरीता शाळा मूल्य पेरण्याची व्यवस्था करतील तेव्हा समाजव्यवस्था उत्तम स्वरूपात आस्ति त्वात येईल. आजच्या स्पर्धेत सर्व घडते आहे.मुले पैकीच्या पैकी मार्क मिळवत आहे.फक्त अपवाद गुणांचा आहे. त्यामुळे प्राण्यामधील हिंस्त्रता मानवात येते. असे नाही तर माणूस जन्मजात प्राणी आहे आणि प्राण्याचे सर्व गुण त्याच्यात आहेच. म्हणून त्या प्राण्यांचे गुणाचे निराकरण करण्यासाठी शिक्षणाची पेरणी महत्वाची आहे.. आज दुर्दैवाने त्या स्वरूपाची पेरणी होताना दिसत नाही हे दुर्दैवी आहे. आज शिकलेली माणसं अधिक लबाड आहे.
अधिक भामटेपणा, अमानवता, हिंस्त्रता आणि दुस-याला छळण्याचा विचार हा माणसामध्ये अधिक आहे. माणूस हा अधिक कृतघ्न आहे.त्यांने उपकाराची फेड अपकारने करताना त्याला दुःख होत नाही. आपले काही चुकले आहे असे त्यालाही वाटत नाही.. आपल्या चुकांचेही तो समर्थन करतो हे आणखी वाईट आहे. प्राणी आपल्यावर हल्ला झाला तरच ते इतरांना हल्ला करतात.त्यांचे पोट भरले तर ते भविष्यासाठी हिंसेने कमवण्याचा प्रयत्न करत नाही. त्यांची संग्रही प्रवृत्ती नाही. मात्र येथे माणसांची प्रवृत्ती ही सतत संग्रहाची आहे.. आपल्या स्वार्थापुढे इतरांचे हित अजिबात पाहिले जात नाही. आपल्या हिता आड कोणी आले तर त्याचा बळी देण्यास कमी अधिक प्रयत्न तो करत असतो. खरतर माणसं जितकी शिकली आहे तेवढे हिंसक आणि क्रुर बनत चालली आहेत का? असा प्रश्न पडतो आहे.. आपण शिक्षणाने विचारी बनायला हवे.. त्यासाठी या संस्था उभ्या राहिल्या आहेत मात्र त्या संस्थाच्या मधून पेरणी करूनही अपेक्षित काही उगवताना दिसत नाही. उगवत नाही याचे कारण बीजात समस्या आहेत.त्यामुळे बीज हे विचाराचे आहे.. त्या विचारात शुध्दता नाही म्हणून उगवत नाही. जोवर शिक्षणातून पेरणी सुयोग्य पध्दतीने होत नाही तोवर समाजातील समस्या कायम असणार आहे.आपल्या अवतीभोवती आपण पाहिले तर आपल्याला सतत मोठया प्रमाणावर हिंसा होताना दिसते आहे..कोणाचा तरी बळी दिला जातो आहे.. त्या बळी जाण्यावर लोक राजकारण करता आहेत. आपल्या संवेदना आपण गमवल्या आहेत. संवेदनाचा बाजार मांडला जात आहे..लोक राजकारण करण्यात पटाईत आहे.. ते राजकारण त्यांच्या जीवनात प्रतिबिंबीत होताना दिसते आहे.. लोक सरळ सरळ प्रचंड खोटा व्यवहार करता आहेत. आपल्या संवेदनात संवेदना नाहीत मात्र ख-या असल्याचा भास निर्माण करता आहेत. पोकळ शब्दांनी आपल्या भावना व्यक्त करता आहेत त्यामुळे त्या भावना समोरच्याच्या हदयाशी पोहचत नाही. माणसांच्या भावनांचा व्यापार झाला आहे.. समाजमाध्यमामुळे आपण अधिक असंवेदनशील झालो आहोत असं वाटावे असा आपला भोवताल आहे. एका शिकलेल्या, उच्च शिक्षित तरूणांनी अंत्यत क्रूरपध्दतीने पत्नी आणि दोन मुले यांची हत्या केली ही बातमी वाचली आणि ती बातमी वाचतांना अंगावर शहारे आले .माणूस असा असू शकतो? हे पाहिल्यावर आपण कोठे चाललो आहोत? असा प्रश्न पडतो. शिक्षणातून माणूस उभा करण्याचे राहून गेले असेच वाटून जाते.जंगलातील प्राण्यांने शिकार करावी इतक्या हिंस्त्रतेने हे घडते आहे. माणसांतील क्रृरता पाहून बहिनाबाई म्हणाल्या होत्या…
माणसां माणसां तुझी नियत बेकार..
तुझ्याहून बरी गोठयातील जनावर..
विंचू साप बरे त्याले उतारे मंतर..
बहिनाबाईंचे निरीक्षण मनाला खरच भावून जाते…. वर्तमान हे असच काहीसे झाले आहे. अखेर शिक्षण घेतलेला माणूस काहीही बनेल.. तो अधिकारी होईल.. नेता बनेल.. उद्योजक होईल… डॉक्टर होईल.. वकील होईल.. इंजिनिअर होईल.. आर्कीटेक्ट बनेल, उद्योजक बनेल… राजकारणी बनेल… नेता बनेल, पण तो माणूस बनण्याची गरज आहे.त्याला माणूस बनण्यासाठी शिक्षणाची पाऊलवाट निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी घरातील आजी नातवांचा… आईबाबां आणि मुलांचा हरवलेला संवाद.. नात्या नात्यातील सैल झालेली विन.. आर्थिक समृध्दतेकरीता सुरू असणारी जीवघेणी धावाधाव पाहिली की, शेवटी आय़ुष्यात सर्व मिळविता येईल… हरवलेली भौतिक साधने मिळविता येतील पण, हरवेलेले माणूसपण प्राप्त करणे काहिसे कठिणच आहे.. म्हणून गरज आहे… माणूसपण पेरण्याची.. माणूसपण जगण्याची.. माणूसपण राखण्याची.. चला तर पेरते होऊया.. मनापासून पेरले तर खात्री आहे निश्चितपणे उगण्याची.. यासाठी वेगळे काही करण्याची गरज नाही.. फक्त आपली हदयात माणूसपण झिरपण्याची गरज आहे.. आज ते शब्द हदयातून येत नाही म्हणूनच सारा पोरकेपणा आहे.. आपण रस्त्यावर उभे राहून सहवेदना प्रकट करतो… त्या सहवेदना अंतरिक नाही तर केवळ औपचारिकता असते..त्यामुळे या खोटया व्यवहाराने आपल्यातील आपण सत्व, तत्व आणि माणूसपण गमावल्याचे निदर्शक आहे… म्हणून शिक्षणातून माणूसपणाची पेरणी करण्याची गरज आहे. आपण जोवर सत्याची वाट चालत नाही तोवर पोरके पणा सतत जाणवत राहील यात शंका नाही.
_ संदीप वाकचौरे
(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)