Sunday, November 24, 2024
Homeब्लॉगसाराच खोटयांचा बाजार हा...

साराच खोटयांचा बाजार हा…

चारशे वर्षापूर्वी लिहिलेल्या तुकोबांची ग्रंथ गाथा त्या दिवशी सहजपणे वाचत होतो. मनाची अस्थिरता असली की संताचे साहित्य अधिक जवळचे वाटू लागते. संताचे अभंग म्हणजे जीवनाचे वास्तवाचे दर्शन आहे. जीवनांचे सार सागंणा-या अऩेक कविता अस्थिर असलेल्या मनाला स्थिर करीत होत्या… खरेतर संताचे अभंग हे एक प्रकारे कविता आहेत…. पण तरी त्या कविताचे अभंग झाले. त्यांच्या कवितेला काळाच्या मर्यादा नाही आणि असत्याचा स्पर्श नाही. त्यामुळे त्यांनी मांडलेले विचाराचे दर्शन काळ कितीही पुढे गेला आणि आपण कितीही प्रगत होते गेलो तरी ते अखंड टिकणारे आहेत. आता हेच पहाना… संतानी लिहिलेल्या अभंग, ओव्या, भारूड, श्लोक लिहून बराच काळ लोटला आहे. वर्तमान काळाला मागे सारत बराच भूतकाळही उलटून गेला आहे.. त्या काळातील अऩुभवांची मांडणी करत ते अनुभव शब्दात नेमकेपणाने पकडत वास्तवाचे दर्शन त्यांच्या कवितेत घडताना दिसते आहे. त्यांचे अभंग वाचताना ही माणसं किती द्रष्टे होती याची पुन्हा पुन्हा जाणीव होत राहते. त्या काळात व्यक्त केलेले विचार आजच्या वर्तमानालाही लागू पडतात. संताची अभंग म्हणजे त्यांनी त्याकाळात आपल्या अवती भोवती जे काही घडते आहे त्या सर्व प्रसंगाचे केलेले सुक्ष्म निरिक्षण होते. त्यांची निरिक्षणे आणि केलेली शब्दातील मांडणी आजही सत्य वाटत जाते. ही माणसं द्रष्टे होते. त्यांनी केलेल्या निरिक्षणाबरोबर अनुभवातून त्यांच्या विचाराची जडणघडण झालेली होती. त्यांच्या विचारामागील द्रष्टेपण काव्यात प्रतिबींबीत होत असल्याचे आजही सहजपणे जाणवत राहाते. त्यामुळे त्यांचे विचार काळाच्या कितीतरी पुढे होते हे पुन्हा पुन्हा अधोरेखित होत जाते.

संतानी जे विचार प्रतिपादन केले आहे ते मनाला नेहमीच पटते असे नाही, पण एखाद्या प्रसंग अनुभवास आला की, त्यांचे विचार मन स्वीकारत जाते. आज माणसं नात्याने अधिक बांधली जाता आहेत आणि त्याच वेळी नात्यात गैरविश्वास देखील अधिक प्रमाणात वाढतो आहे. माणसांचे नाते कितीही भक्कम असले तरी त्या नात्यातील वास्तवता व सत्यता आपण जी समजतो ती तरी खरी आहे काय..? माणसं प्रेमाचा आणि नात्याचा अधिक देखावा करू लागली आहे. नात्यातील ओलावा खरा आहे असे दाखविण्यासाठी जणू स्पर्धा आहे. अनेकदा खरेतर तो केवळ आभास असतो. नात्यातील ओलावा जेव्हा शब्दांनी व्यक्त करावा लागतो तेव्हा तो खोटा आहे असे समजावे. नात्यातील ओलावा हा हदयांने व्यक्त होत असतो. माणसे अनेकदा हदयाने एकमेकाशी जोडलेली असतात. त्यातून होणा-या संवेदना नात्यातील ओलावा सांगत असतात. विवेकानंद जेव्हा गेले ते भगिनी निवेदिता कित्येक कोस दूर होत्या. मात्र त्याच क्षणी जीवनातील आपण खूप काही गमावले आहे असे आपोआप वाटू लागले होते. त्यावेळी प्रसार आणि संदेशाचा कोणतेही माध्यम नव्हते तरी ते जाणणे होते. याचे कारण हे हदयाशी असलेले नाते होते. आजही खरे प्रेमाचे नाते असेल तर हदय एकमेकाशी इतकेच गुंतलेले असतात.. मात्र अशी नाते किती हा ही प्रश्न आहे. आज तर नात्यात कोरडेपणा आलेला आहे.. तुकोबा सहजपणे सांगून गेले “जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे/ अंत काळीचे कोणी नाही../ झाल्या हिन शक्ती नाक डोळे गळती../ सांडूनिया पळती रांडा पोरे..//” हा अभंगातील विचार ऐकताना माणसांच्या भोवती जोडली जाणारी नाते ही अखेर दिल्या घेतल्याचीच असतात. नात्यात देणारे हात असतील तर नाते अधिक सुखाचे असतात आणि जेव्हा नात्यात दिले जात नाही तेव्हा त्या नात्यातून दुःखच निर्माण होत असते. सुख आणि दुःखाचे नेमके कारण संत सांगता आहेत. कदाचित हा विचार सत्य नसेल असे म्हणणारी काही माणसं आपल्या भोवती असतीलही पण.., अनुभव आणि वेळ आली की हे विचार सत्य वाटू लागतात… संत असू दे नाहीतर फकीर… अन्यथा देवदूत… त्यांच्या मुखातील शब्द हे अखेर त्रिकालाबाधित सत्य असतात. त्यांना जीवनात अर्थाचा शोध लागलेला असतो.

- Advertisement -

सत्याची वाट सापडलेली असते.तो विचार अनेकदा मनाला भावतो पण त्यासाठी फक्त अनुभव यावे लागतात इतकेच.. आपल्या सोबत असणारी माणसं आपल्या सोबत फक्त बोलण्यापुरती असतात. त्यांना सुखात सहभागी होणे आवडत असेलही. अनेकदा केवळ परीस्थिती आहे म्हणून लोक तोंडदेखल्या संवेदना व्यक्त करतात.त्यासाठी ते ज्या शब्दांचे उपयोजन करतात त्या शब्दात भावना नसतातच त्यामुळे ते शब्द हदयापर्यंत पोहचत नाही. कोरडे शब्द हे लगेच जाणवत असतात. त्यामुळे आपण फक्त भावना व्यक्त केल्या इतकेच काय खोटे समाधान माणसांना मिळत असते. पण ज्या संवेदना व्यक्त केल्या जातात त्या व्यक्तीला नेमकेपणाचे भाव ओळखले जातात. तेवढे त्याला अनुभवाने कळत असते. अनेकदा अंतरिक मनही स्वतःशी बोलत असते आणि त्यातून ते जाणवत असते. माणसातील खोटेपणाच्या विचारामुळे माणसं तशी वागत असतात… आणि आपले समाधान करून घेतात.. उलट असे केल्याने आपला खोटेपणाच समोर येतो हे कळायला हवे. असत्याची नशी आली की माणसे विवेक गमावून बसतात हे सातत्याने समोर आले आहे.

संतांच्या अभंग गाथा वाचत जाताना जीवनाचे वास्तव दर्शन घडत जाते. त्यांचे अभंग म्हणजे एकप्रकारचा स्वसंवाद आहे. जीवन प्रवासात भेटणारी माणसं स्वार्थ्यांच्या विचारांने जवळ आले की, त्यांचा सहवास कधी कधी चांगला वाटतो.. स्वार्थाने उभ्या राहणा-या नात्याला ओलावा नाहीतर फक्त मुलामा आणि देखावा असतो. व्यक्तीवर कौतूकाची थाप पडली की, व्यक्तीला काहींसे मांस चढते, मात्र ते शब्द म्हणजे खरचं कौतुक असते की, स्वार्थ साधन्यासाठी निर्माण केलेली पाऊलवाट असते. अनेकदा असं खोटे खोटे केलेले कौतूक निरपेक्ष असते काय..? आपल्या अवतीभोवती जमा होणारी माणसं निरपेक्ष प्रेम करणारी असतील तर ठीक आहे मात्र अशी निरपेक्ष प्रेम करणारी माणसं आता कमी होत चालली आहे. बाहेरच्या वाटेतही माणसं सापडत नाही आणि नात्यातही तो ओलावा जाणवत नाही. अनेकदा एखाद्या नात्यात निरपेक्षता असेल असे वाटते, पण तेथेही निराशा झाली की मग सारेच नाते फोल वाटू लागते असे अऩुभवाला येत राहते. प्रत्येक नात्याला काहींना काही हवे असते. त्या नात्याची वीन तर देणेघेणेवर अवलंबून असते. जीवनाच्या प्रत्येक ठिकाणी कमी अधिक प्रमाणात परीस्थिती सारखीच असते. नाते कोणतेही असले तरी अनुभव सारखाच असतो.नेत्याला मतदान गोळा करणारी कार्य़कर्ते हवी असतात.. भ्रष्ट अधिका-याला पैसे गोळा करणारा पंटर हवा असतो.. सत्या ऐवजी असत्याची पूजा करणा-या माणसाला स्तूतीसाठी भाट हवे असतात.. पैसे खाणा-या साहेबाला आपल्या अवतीभोवती खोटया कामांचे कौतूक करणा-याचा समूह हवा असतो.त्यातून रोजची उठबस सुरू असते.असे पैसे गोळा करणा-या आणि कानाला ओठ लावणा-याचे भारी कौतूकही असते.त्यांची काही काळ भारी चलतीही असते. त्या नात्यात केवळ देवाणघेवाणीचा पुरता ओलावा असतो. गोळा करणा-या माणसांकडून पैशाचा स्त्रोत कमी झाला की, त्याच्या बददलची प्रिती कमी होऊ लागते. त्यातून नात्यातील गोडवा आटत जातो.इतर नात्यातही देणा-या बददल सन्मान आणि आदर असतो. तुम्ही श्रींमती असाल तर नात्यामध्ये आदर असतो. त्याच्यासाठी मोठी उठबस असते. फाटक्या नात्याला तो सन्मान मिळत नाही. जोवर तुम्ही गरीब असतात तोवर तुमच्या बददल ना प्रेम असते ना.. तुमच्या नात्याचा अभिमान.. कधी कधी कोणी माणूस उच्च पदावर पोहचला.. मग तो अधिकारी असू दे नाही तर.. पदाधिकारी… त्यांच्याशी नाते सांगणारे अनेक जन पुढे येतात.ते नाते कितीही दूरचे असले तरी त्या नात्याला नात्याशी जोडण्याची घाई असते. काही माणसं तर नाते जोडतांना काय सांगतात…ते कळणे देखील मेंदूला जड जाते.आमचा एक मित्र होता… त्याला एखाद्या माणसांचे नाव सांगायचे उशीर की, तो त्यांच्याशी असणारे नाते सांगायचा.. आम्हास त्याचे भारी कौतूक वाटायचे.. मग ते नाते अनेकदा आम्हाला लागत नसायचे. एकदा तो आम्हाला म्हणाला ती व्यक्ती आमच्या हिच्या….मावशीच्या जावयांच्या साडूच्या पुतणीच्या दिरांच्या सास-यांच्या मामांचे ते नातेवाईक आहेत….असे काही ऐकले की नाते आकलनाच्या पलीकडे जायचे.मात्र नाते जोडले जायचे.खरेतर या नात्याला गोडवा आहे तो अधिकार पदाचा. माणूस पदावर असला की त्याला नातेवाईकही खूप असतात. पदावरून दूर जाताच नातेवाईकही कमी होत जातात असा सार्वत्रिक अनुभव असतो.मात्र एखादा नातेवाईक गरीब असेल तर तो गरीब नातेवाईक जवळ येवून चहा पिण्याचा आग्रह करतो.. तेव्हा त्यांच्या त्या प्रेमाच्या विनंतीत असलेला गोडवा नात्यातही असतो. पैशाची नशा चढलेल्या त्या नशेला ते नाते मान्य नसते. तेव्हा नकारासाठी कितीतरी कारणे पुढे करीत नाकारणे घडते.नात्यालाही देण्याघेण्याने गोडवा येतो हे खरे, पण त्यासाठी परीस्थिती कारणीभूत असते. संत तुकाराम काय आणि इतर संत काय या सर्वांनीच कितीतरी सुक्ष्मतेने आपल्या अनुभवातील निरिक्षण नोंदविले आहे. अंतकाळी जेव्हा व्यक्ती असते तेव्हा कोणीच मदतीचा हात देत नाही. संत रामदास आणि शिष्य कल्याणी यांच्यातील संवादानेही हेच अनेकदा स्पष्ट केले आहे. जे जे आपले आहे असे वाटते.. ते आपले नसते.. त्यामुळे कर्माचा संवादच जीवनात आऩंदाने भरते आणील. त्या करीता अंभगाचा विचार समजावून.. जाणून घेतला तर जीवनही अभंग राहील.

तुकोबांचे तत्वज्ञान अऩुकरणचा प्रयत्न झाला तर आपली वाट अधिक विवेकी बनेल. जीवन शहाणपणाच्या अंगाने पुढे जाईल. त्यांनी केलेल्या आंतरिक संवादाला जाणण्याचा प्रयत्न केला तर सत्याची वाट सापडेल. त्यामुळे शाळा महाविद्यालयातील अभ्यासक्रमात संताचे अभंग आहेत. ते शिकणे म्हणजे जीवन आनंदाने फुलवणे आहे. ते अभंग केवळ मार्क मिळवण्याच्या हेतून अभ्यासक्रमात समाविष्ट केलेली नाहीत हे लक्षात घ्यायला हवे. त्या अभंगाच्या माध्यमातून जीवनाला मार्गदर्शन व्हावे ही अपेक्षा असते. अनेकदा संताचे अभंगाचा विचार मार्कापुरता केल्याने आपण आपले अधिक नुकसान करत असतो. संताचे अभंग म्हणजे सत्याच्या वाटेचे दर्शन आहे. अभंग म्हणजे शब्दांचा फुलोरा नाहीच. अभंग म्हणजे विचाराचे प्रदर्शन नाही तर ते जीवनाचे दर्शन आहे. म्हणून अभंगाचा विचार अधिक सखोल स्तरावर जाऊन होण्याची गरज आहे. तोच आपल्या उध्दाराचा राजमार्ग आहे. शिक्षणाने जीवनाच्या अर्थाचा शोध लागावा अशी अपेक्षा आहे.. ती अपेक्षा संताच्या साहित्यातून घडत जाते. त्यामुळे जीवनात संताचे साहित्य म्हणजे मार्गदर्शक आहेत हे लक्षात घ्यायला हवे.

_ संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या