Monday, May 27, 2024
Homeब्लॉगआव्हान निपुणचे...

आव्हान निपुणचे…

भारत सरकारने ऱाष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 जाहीर केल्यानंतर देशभर शिक्षण व्यवस्थेत परिवर्तनासाठी पावले पडू लागली आहे. अनेक बदल धोरणात सूचित केले आहे.संस्थांची पूनर्रचना अपेक्षित आहे.आकृतीबंधात बदल होतो आहे. त्या सर्व बदलापैकी गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या विचारासाठी सरकारने अभियानाची घोषणा केली आहे.विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे म्हणून निपुण भारत अभियानास केंद्र सरकारने आरंभ केला आहे.देशातील प्रत्येक बालकाला सन 2026-27 पर्यंत भाषा आणि गणित विषयाची किमान पायाभूत क्षमता प्राप्त करून देण्याचे शिवधनुष्य पेलण्याचे आव्हान निपुणमध्ये आहे.केंद्राने समग्र शिक्षा अंतर्गत निपुण भारतचे आव्हान पेलण्यासाठी पावले टाकण्यास सुरूवात केली आहे.पायाभूत स्तरासाठी निश्चित ध्येय आणि प्रत्येक इयत्तेसाठीची किमान अपेक्षित क्षमता निश्चित करण्यात आ्ल्या आहेत.त्यामुळे किमान प्रत्येक मुलाला निश्चितपणे भाषा आणि गणिताच्या क्षमता प्राप्त होण्यासाठीचा प्रवास अधोरेखित करण्यात आला आहे.निपुणसाठी केंद्रापाठोपाठ राज्य सरकारने देखील पावले टाकत शिवधनुष्य पेलण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.त्या प्रयत्नाला अपेक्षित यश मिळाले तर भविष्य अधिक उज्जवलतेच्या दिशेने प्रवास करू शकेल.

आपल्याकडे गेले काही वर्ष विविध सामाजिक संस्था आणि सरकारने केलेली विविध स्वरूपाची संपादणूक सर्वक्षण अहवाल प्रसिध्द होता आहेत.यातील सरकारी अहवाल तर अध्ययन निष्पत्ती आधारित आहेत.त्या सर्वच अहवालाचा अभ्यास केला तर देशातील अनेक बालकांना त्या त्या इयत्तांच्या भाषा आणि गणिताच्या अपेक्षित मूलभूत क्षमता प्राप्त नसल्याचे दर्शित होत आहे.राष्ट्रीय शिक्षण धोरणातही पाच कोटी मुले शिक्षणाच्या प्रक्रियेत सहभागी असूनही त्यांना भाषा व गणिताच्या मूलभूत क्षमता प्राप्त नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.त्यामुळे जोवर भाषा आणि गणिताच्या पायाभूत स्वरूपाच्या क्षमता प्राप्त होत नाही तोवर विद्यार्थी शिक्षणाच्या प्रक्रिेयेत सहभागी होऊ शकणार नाही.पायाभूत स्तरावर जर मूलभूत क्षमता प्राप्त झाल्या नाहीत तर पुढील शिक्षणाच्या पाऊलवाटा आपोआप काटेरी बनत जातात.त्यातून मुलांचा आत्मविश्वास हरवला जातो.आत्मविश्वास हरवला की शिक्षणापासून दूरावणे घडण्याची शक्यता अधिक निर्माण होते.त्यामुळे निश्चित अशा अभियांनाची गरज अधोरेखित होत होती.आजवर अभियाने झाली नाही का ? तर त्याचे उत्तर होय असे आहे.मात्र हे अभियान राबवत असताना निश्चित असा कालखंड आणि निश्चित अशा अध्ययन निष्पत्ती मांडण्यात आल्या आहेत.त्याच बरोबर प्रत्येक टप्प्यावर उद्दीष्टांची निश्चिती करण्यात आली आहे. र्अथात आता अभियान आले आहेच मात्र अभियानाची किती प्रभावी आणि परिणामकारक अमलबजावणी होते यावर अभियानाचे यश अवंलबून असणार आहे.आपल्याला 2026-27 पर्यंत इयत्ता तिसरीपर्यंतच्या प्रत्येक मुलाला क्षमता प्राप्त करून द्यायच्या आहेत.त्याच बरोबर वरच्या वर्गात देखील अनेक विद्यार्थी असे असू शकतील की, त्या विद्यार्थ्यांना तिसरीपेक्षा वरच्या वर्गात असूनही निपुणने निश्चित केलेल्या क्षमता प्राप्त नसतील.त्या विद्यार्थ्यांना क्षमता प्राप्त करून देण्यासाठी जाणीव पूर्वक प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. यापूर्वी महाराष्ट्रात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची अमलबजावणी करण्यात आली होती.या कार्यक्रमात देखील कोणतेही मुल मागे राहणार नाही असे ध्येय राखण्यात आले होते.अर्थात कोणताही कार्यक्रमाला चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले की त्याचा परिणाम प्रत्यक्ष दिसतो हे या निमित्ताने देखील समोर आले होते.त्यानंतर झालेल्या असरच्या अहवालात राज्याच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख उंचावलेला आपण अनुभवाला आहे. एखादा कार्यक्रम जेव्हा लोकांचा होऊन जातो तेव्हा त्यात निश्चित यश मिळते हा आजवरच्या विविध कार्यक्रम,चळवळ,अभियानातून अनुभवले आहे.सरकारने अत्यंत महत्वाचे अभियान म्हणून निपुणकडे पाहण्यास सुरूवात केली आहे.त्यासाठीची पावले पडू लागली आहे.सरकारी पातळीवर अपेक्षित असेलेले प्रयत्न वेगाने घडता आहेत.त्याचे स्वागत करायला हवेच.

- Advertisement -

या अभियानाच्या माध्यमातून भाषा आणि गणिताचा विचार केला आहेत. भाषा विषयाची अपेक्षित क्षमता प्राप्त करण्यासाठी विविध घटकांची निश्चिती करण्यात आली आहे.भाषेच्या अनुषंगाने भाषिक कौशल्याचा विचार करण्यात आला आहे.तीन ते सहा वयोगटातील विद्यार्थ्यांचा प्रारंभिक भाषा विकासाच्या दृष्टीने मौखिक भाषा विकास, समजपूर्वक ऐकणे,त्याचे आकलन,मुद्रणशास्त्र,उच्चारशास्त्र यांच्या विकासाची जाणीव आणि लेखन कौशल्याचा विकास होणे गरजेचे आहे असे नमूद केले आहे.मुळात निपुणमध्ये शाळा स्तरावर असलेल्या अनेक विषयांपैकी केवळ दोन विषयांचा समावेश करण्यात आला आहे.त्यात प्रथम भाषेचा विचार केला आहे. भाषा हे शिक्षणाचे सर्वात महत्वाचे साधन आहे.शिक्षणाच्या प्रक्रियेत भाषा शिक्षण किती प्रभावी होते त्यावर इतर विषयाचे शिकणे अवलंबून असते.भाषा उत्तम स्वरूपात प्राप्त झाली तर इतर विषयाची प्रगती सहजतेने साध्य होऊ शकते हे आजवर सिध्द झाले आहे.त्यामुळे प्राथमिक स्तरावर भाषेला अधिक महत्वाचे स्थान आहे.मातृभाषा उत्तम आली की, इतर भाषा देखील अधिक चांगल्यापध्दतीने शिकण्यास मातृभाषेची मदत होत असते.इतर विषय शाळा स्तरावर शिकणे घडत असले तरी ते विषय शिकण्यासाठीचे माध्यम म्हणून मातृभाषेचाच उपयोग केला जात असतो.त्यामुळे मातृभाषेचे आकलन जितके चांगले असेल तितकेच इतर विषयाचे शिकणे देखील परिणामकारक होत असते.त्यामुळे प्राथमिक स्तरावर भाषा शिक्षण अधिक महत्वाचे ठरते.त्यामुळे निपुणसाठी भाषा शिक्षणाचा विचार अधिक गंभीरपणे केला आहे.मुळात प्राथमिक स्तरावर भाषा शिक्षणात प्रमाणभाषेचा विचार केला जातो..पण त्यापलिकडे बोली भाषेचा विचार अधिक महत्वाचा ठरू लागला आहे.राष्ट्रीय शिक्षण धोरणात बोलीभाषेचा विचार प्रतिपादन करण्यात आला.मुलाची घरची भाषा आणि शिक्षणाची भाषा वेगळी असेल तर मुलांच्या शिक्षणावर त्याचा विपरित परिणाम होत असतो.त्यामुळे बोलीभाषेतून प्राथमिक स्तरावर आणि विशेषता पायाभूत स्तरावर अधिक जोडणे घडायला हवे.मुलांच्या भाषेत शिक्षणाचा आरंभ झाला तर मुलांचे शिक्षण अधिक चांगले होते हे जगभरात समोर आले आहे.आपल्या देशातील अनेक राज्यांनी देखील हा विचार सिध्द केला आहे.ओरिसाने बोली भाषेतील शिक्षणाचा प्रवास सुरू केला आणि त्याचा खूप सकारात्मक परिणाम साधला गेला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच मुलांची भाषाच प्रारंभिक स्तरावर तरी शिक्षणाचे माध्यम होण्याची गरज आहे.मुलाची भाषा आणि शिक्षणाची भाषा भिन्न असेल तर मुलाच्या शिक्षणात अडथळा निर्माण होण्याची शक्यता अधिक असते.त्यामुळे मुले शिक्षणाच्या प्रक्रियेतून दूर जाण्याचा धोका संभवतो.त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होत जातो.त्यामुळेच भाषा शिक्षणाचा विचार प्रारंभिक स्तरावर तरी अधिक प्रभावी पणे होण्याची गरज आहे.हे लक्षात घेऊन निपुणमध्ये भाषेला स्थान देण्यात आले आहे.त्यामुळे भाषा शिक्षण घडावे यादृष्टीने सुरू केलेले प्रयत्नामुळे चित्र बदलेल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.

निपुणमध्ये प्रथम भाषेबरोबरच गणित विषय देखील समाविष्ट केला आहे.त्याचे कारण व्यक्तीच्या जीवन हे समस्यांनी भरलेले आहे. जीवनात प्रश्नांशिवाय माणूस अशी कल्पना करवत नाही.त्यामुळे प्रश्न सोडविण्यासाठी क्षमता गणितातून मिळत जाते.गणितातून तार्किक क्षमताचे विकसन होत असते.त्यादृष्टीने गणिताचा विचार करणे गरजेचे आहे.निपुण अभियानात संख्या पूर्व व संख्या कल्पनेचा विकास,तुलना करण्याचे ज्ञान व कौशल्य,क्रमशः मांडणी करणे, आकृतीबंध, संरचना ओळखणे व वर्गीकरण करणे या गोष्टींचा समावेश आहे.अर्थात पायाभूत स्तरावर गणिताच्या दृष्टीने हे अधिक महत्वाचे मानले गेले आहे. त्या घटकांचा समावेश आणि विद्यार्थ्यांच्या गणिती क्षमताचा विकास यांचे काही नाते आहे.त्यामुळे पायाभूत स्तरावर गणिताची तयारी झाली तरच पुढील काळात गणिताचे आकलन अधिक चांगले झालेले आपणास अनुभवता येईल.त्यामुळे या दोन्ही विषयाचे स्थान शिक्षण प्रक्रियेत अधिक महत्वाचे मानले गेले आहे.त्यादृष्टीने निपुण अभियान अधिक महत्वाचे ठरणार आहे.

खरंतर वर्तमानात निपुण अभियानाचा विचार करता त्याची गरज या पूर्वी देखील वेळोवेळी अधोरेखित झाली आहे.वेळोवेळी शासनाने पावलेही टाकली होतीच.कोणतेही अभियान यशस्वी करायचे असेल तर नियोजन सुक्ष्म असायला हवे.त्याच बरोबर अमलबजावणी प्रभावी असायला हवी असते.शिक्षक जे काही प्रयत्न करता आहेत त्या प्रयत्नांना योग्य दिशा देण्याच्या दृष्टीने शिक्षकांना मार्गदर्शनाची प्रभावी व्यवस्था असायला हवी.अर्थात या संदर्भाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून अभियानासाठी अमलबजावणी सुरू आहे.त्यादृष्टीने साहित्य निर्मिती केली जात आहे.शिक्षकांचे प्रशिक्षण नियोजित केले जात आहे.त्याचवेळी विद्या समिक्षा केंद्राच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक वर्ग,शाळा,केंद्र,बीट,तालुका आणि जिल्हा आणि प्रत्येक विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी कोणत्या स्तरावर आहे हे जाणून घेण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल टाकले जात आहे.परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांना आपला वर्ग,विविध विषयातील विद्यार्थी नेमके कोणत्या स्तरावर आहेत ,कोणत्या अध्यययन निष्पत्तीत विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहे हे जाणून घेता येणार आहे.त्यामुळे शिक्षकांना वर्गातील आंतरक्रिया प्रभावी करण्याच्या दृष्टीने,अध्ययन अनुभवाचे नियोजन करता यावे यासाठी शिक्षकांना आधार होणार आहे.एका अर्थाने पर्यवेक्षकीय व्यवस्थेला देखील या सारख्या माहितीचा उपयोग होणार आहे.त्यामुळे निपुणच्या दृष्टीने आपल्याला जे उद्दिष्ट साध्य करायचे आहे त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची गरज आहे.शासन प्रयत्न करत असले तरी शेवटी ही साध्यता तर वर्गात प्रत्यक्ष काम करणारे शिक्षकच साध्य करू शकतील.शाळा स्तरावर शिक्षकांच्या जरूर समस्या असतील ,त्या समस्या जाणून त्यावर मात करण्याचे उपाय पर्यवेक्षकीय यंत्रणेच्या मदतीने सोडवणे शक्य आहे.त्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन करावे लागेल.शिक्षक प्रयत्न करता आहेत,मात्र तरी सुध्दा यश मिळत नसेल तर त्यासाठी नेमक्या उपाययोजना काय हे सांगण्याची गरज आहे.शिक्षकांना स्थानिक पातळीवर मार्गदर्शक उपलब्ध झाले तर निश्चित परिवर्तन होण्याची शक्यता आहे.स्थानिक पातळीवर केंद्रप्रमुख हे एका अर्थाने मार्गदर्शक आहेत.शिक्षणात मनुष्यबळाला दिशा देण्यासाठी स्थानिक पातळीवर मार्गदर्शन ही महत्वाची गोष्ट आहे.त्यामुळे आपण किती प्रयत्न करतो आणि शिक्षकांना कितपत आधार देतो यावरच निपुणचे यश अवलंबून असणार आहे.

_ संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या