शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी देशभरात सातत्याने प्रयत्न केले जात आहे. सरकार कोणतेही असले तरी गुणवत्तेसाठी सातत्याने विविध अभियान, योजनांव्दारे प्रयत्न केले जात असतात. राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर झाल्यानंतर निपुण भारत अभियानाच्या अनुषंगाने देशभरातील बालकांना पायाभूत क्षमता प्राप्त करून देण्यासाठी शासनाने अभियानाची प्रभावी अमलबजावणी सुरू केली आहे. त्याकरीता अभियानाचे आधारस्तंभ निश्चित करण्यात आले आहेत. त्यात ज्या घटकांचा विचार करण्यात आला आहे त्यात शिक्षकांच्या मदतीसाठी यंत्रणा उभी करण्याचा विचार करण्यात आला आहे. गुणवत्तेच्या दृष्टीने अगदी महत्वाचा हा उपघटक आहे.आपल्याकडे शिक्षणाच्या प्रक्रियेत शिक्षक हा अत्यंत महत्वाचा घटक मानला जातो. शिक्षणाच्या प्रक्रियेत दिंवसेदिवस बदल होता आहेत. शिक्षणाची प्रक्रिया,मानसशास्त्र, अध्ययन, अध्यापन पध्दती, मूल्यमापन, अभ्यासक्रम, बुध्दिशास्त्रातही वेगाने बदल घडता आहेत. शिक्षणाशी संबंधित विविध संशोधने घडता आहेत. ते सर्व बदल विविध प्रक्रियेचेव्दारे समोर येता आहेत पण त्या बदलाच्या अनुषंगाने शिक्षण प्रक्रियेत बदलांची नितांत गरज असते. होणारे बदल शिक्षणाच्या प्रक्रियेसाठी अधिक महत्वाचे आहेत. राज्यात शिक्षक आदिवासी, ग्रामीण, डोंगराळ क्षेत्रात काम करता आहेत अशावेळी त्यांच्यापर्यंत हे बदल पोहचण्यासाठीच्या आवश्यक सुविधा उपलब्ध असतील असे नाही त्यामुळे नव्या बदलांच्या दिशेने जाण्यासाठी शिक्षकांना व्यापक अर्थाने सतत मार्गदर्शन करण्याची गरज आहे. शिक्षकांना वर्गातील आंतरक्रिया, अध्ययन, अध्यापन प्रक्रियेसाठी मदतीची गरज असते. त्यासाठी किती प्रमाणात सर्वोत्तम मार्गदर्शन उपलब्ध होते यावर बरेच काही अवलंबून असते. त्यामुळे केवळ निपुण भारत अभियानापुरता या घटकाचा विचार करून चालणार नाही तर सातत्याने शिक्षकांना मार्गदर्शनाची गरज आहे. त्यासाठी कायमस्वरूपी सुविधा निर्मितीची गरज आहे. ज्या सुविधा आहेत त्या अधिक दर्जेदार असायला हव्यात.
आपल्याकडे शिक्षणाची गुणवत्ता उंचावणे आणि प्रशासकीय कामासाठी मोठी यंत्रणा कार्यरत आहे. केंद्र स्तरापासून तर राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत विविध संस्था आणि पदावरील माणसं कार्यरत आहे. केंद्र स्तर ते जिल्हा स्तरापर्यंत केंद्रप्रमुख,शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी ही पदे जशी आहेत तशी पूर्णतः शैक्षणिक मार्गदर्शनासाठी अधिव्याख्याता, जेष्ठ अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य ही सर्व यंत्रणा जिल्हास्तरापर्यंत कार्यरत आहेत. बी.आर.सी, यु.आर.सीमध्ये विषयतज्ज्ञांसाऱखे मोठे मनुष्यबळ कार्यरत आहेत. इतके मोठे मनुष्यबळ शिक्षकांना वेळोवेळी मार्गदर्शनासाठी कार्यरत आहे. राज्य शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे की, पर्यवेक्षकीय यंत्रणांनी वर्ग निरिक्षण, पर्यवेक्षण, प्रशिक्षण, पाठपुरावा, आढावा अभियानाचे उद्दिष्टे व अध्यापन शास्त्र याबाबत अद्यावत असायला हवे असे नमूद केले आहे. आपल्याकडे स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचा -मोठा विस्तार झाला आहे. आपल्याकडील प्रशासनाची व्यवस्था सुमारे 70-80 च्या दशकाच्या आसपास निश्चित केलेली आहे. त्यानंतर शिक्षणाच्या सार्वत्रकीकरणासाठी गाव, वस्तीवर शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. आता राज्यात एक लाख 10 हजार प्राथमिक शाळा आहेत. 28 हजार माध्यमिक विद्यालय आहेत. सुमारे सव्वादोन कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहे.प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आहे. शाळांचा वाढलेला विस्तार लक्षात घेता वर्तमानातील प्रशासनाची व्यवस्था पुरेशी आहे का? याचाही विचारही करण्याची गरज आहे. पर्यवेक्षणासाठी राज्यात जिल्हा स्तरावरील शिक्षणाधिकारी, तालुका स्तरावरील गटशिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य यांना शाळा भेटीसाठी किमान वाहनाची व्यवस्था असावी अशी गेली अनेक वर्ष सातत्याने मागणी आहे. मात्र अद्याप त्यांना वाहनाची सुविधा मिळालेली नाही. त्यामुळे शाळा भेटी करायच्या म्हटले तरी काही प्रमाणात निश्चित मर्यादा पडतात हेही लक्षात घ्यायला हवे. निरिक्षणासाठी प्रभावी यंत्रणा असायला हवीच. त्यासाठी सुविधा देखील असण्याची गरज आहे. पर्यवेक्षकीय यंत्रणेने वर्ग निरिक्षणावर अधिकाधिक भर देण्याची गरज सातत्याने व्यक्त करण्यात येत आहे. अर्थात शाळा स्तरावरील मुख्याध्यापकांनी दरमहा शाळेतील शिक्षकांचे निरिक्षण करत लॉगबुक भरणेबाबत सूचित केले आहे. गेले काही वर्षात प्राथमिक शाळांचा पट कमी होतो आहे. त्यामुळे पात्र मुख्याध्यापक असलेल्या शाळांची संख्या फारशी नाही. त्यामुळे बहुंताश शाळा या मुख्याध्यापकाविना आहेत. तेथे लॉगबुक भरले जाण्याची शक्यता नाही. जेथे मुख्याध्यापक आहे तेथे मुख्याध्यापकांना स्वतःच्या वर्गाचे अध्यापन आहे. त्याच बरोबर शाळा स्तरावरील प्रशासकीय कामकाजाची परीपूर्ती आहे. अशावेळी या शैक्षणिक कामकाजासाठी किती वेळ मिळत असेल हा प्रश्न आहे. त्यामुळे वर्ग निरिक्षणाचा विचार कितीतरी महत्वपूर्ण आहे, मात्र तरी सुध्दा सातत्याने घडत गेले तर शिक्षकाच्या वर्ग आंतरप्रक्रियेच्या माध्यमातून ज्या उणिवा असतील त्या समोर येतील. तसे घडले तर तेथे शिक्षकांना पर्यवेक्षकीय यंत्रणेची मदत होईल. गेले काही वर्ष राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र शैक्षणिक प्रशासन व नियोजन संस्था मुख्याध्यापक, बीआरसी, युआरसीच्या विषयतज्ज्ञासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करत आहेत. त्यात जाणीवपूर्वक वर्ग निरिक्षणाचा विविध अंगी दृ्ष्टीकोनाच्या विचाराची पेरणी करत आहे. वर्ग निरिक्षणाचे महत्व समोर आणले जात आहे. विविध स्तरावर अधिक समृध्दपध्दतीने वर्गातील आंतरक्रिया घडावी यासाठी प्रशिक्षणाचे नियोजन केला जात आहे. खरंतर प्रशिक्षणे व त्यासाठीचे अध्ययन साहित्य अत्यंत दर्जेदार असूनही त्याचा प्रभावी उपयोग प्रत्यक्ष क्षेत्रावर होण्याची गरज असते.. पण तसे होताना दिसत नाही. शासन निर्णयात जी अपेक्षा केली आहे ती वाट चालण्याची नितांत गरज आहे.त्यादृष्टीने सक्षम अशी व्यवस्था उभी करण्याची गरज आहे.
राज्यात सातत्याने शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी प्रशिक्षणे आयोजित केली जात असतात.यापूर्वी केंद्रसरकारच्या वतीने निष्ठा प्रशिक्षण करण्यात आले. राज्य सरकारच्या वतीने सध्या अध्ययन, अध्यापनाचे व्यवस्थापन व मूल्यमापन विषयी प्रशिक्षण सुरू आहे. यापूर्वी देखील गरजेप्रमाणे राज्य सरकार प्रशिक्षणे नियोजित करत असते. स्थानिक पातळीवर देखील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने गरजे प्रमाणे प्रशिक्षणे होता आहेत. या प्रशिक्षणातून जो विचार पेरला जातो आहे त्या विचाराची अमलबजावणी महत्वाची आहे. प्रशिक्षणातून जो दृष्टीकोन पेरला जातो त्याची वर्गातील पेरणी महत्वाची असते. त्यासाठी पर्यवेक्षकीय यंत्रणेने पाठपुरावा करण्याची गरज आहे. एका अर्थाने प्रशिक्षणातील भूमिका प्रत्यक्ष वर्गातील प्रक्रियेत प्रतिबिंबीत व्हायला हवी.ती झाली की नाही याचेही निरक्षणाची गरज आहेच. शिक्षकांना नेमकी काय समस्या येते याचा विचार करण्याची गरज आहे. शेवटी कोणत्याही गोष्टीची सक्ती केली तर त्याची अमलबजावणी होते पण परिणाम साधला जात नाही. ज्या गोष्टीची अमलबजावणी करण्यात येणार आहे त्यामागील तात्विक भूमिका आणि त्यातील सहजता, परिणामकारकता लक्षात आणून देण्याची गरज आहे. ती लक्षात आणून दिली नाही तर अंमलबजावणीत उणिवांवर मात करणे सहज शक्य आहे.. खरतर प्रत्येक गोष्ट का करायची हे सांगणे आणि ती केल्याने काय परिणाम साधला जाणार आहे लक्षात आणून देणे महत्वाचे आहे. त्यासाठी पाठपूराव्याची भूमिका अधिक महत्वाची आहे. प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक हे अधिक महत्वाचे असतात. खरंतर यासाठी कायम स्वरूपी यंत्रणा उभी करण्याची गरज आहे. प्रत्येक प्रशिक्षणासाठी वेगवेगळे मार्गदर्शक उपलब्ध केले जातात.तज्ज्ञाची गरज अधिक आहे. ते अधिक अभ्यासू असण्याची गरज आहे. त्यांना शिक्षणाचा आस व्यापक स्तरावर जाणता यायला हवा. शिक्षणाची प्रक्रियेचा खोल अभ्यास करता यायला हवा.शिक्षकांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे सक्षमपणे देता यायला हवेत. मात्र मला माहित नाही मला संभाळून घ्या अशी भूमिका घेणारी माणसं प्रशिक्षणे प्रभावीपणे कशी करतील हा प्रश्न आहे. तज्ज्ञाला किमान आपण ज्या विषयावर बोलणार आहोत त्याविषयाचे समग्रतेने विचार करता यायला हवा. जर तज्ज्ञाला त्याच्या विषयाचे ज्ञान नसेल तर समोरच्या श्रोत्यांनी त्यांना का ऐकावे… अनेकदा लोक ऐकतात पण केवळ प्रशासनाचा बडगा म्हणून.प्रशिक्षणाचे नियोजन झाले म्हणून डोक्याला डोके पाठवून संख्या पूर्ण करू शकतो पण त्यामुळे प्रशिक्षणे प्रभावी करू शकणार नाही. अधिक अभ्यासू माणसांचा शोध घेणे आणि त्यांना सुयोग्य प्रशिक्षणासाठी उभे करणे महत्वाचे आहे. अशी चांगली, प्रभावी, अभ्यासू माणसं उभी करता आली नाही तर कोणत्याही प्रशिक्षणाचा अपेक्षित परिणाम साधला जाणार नाही हे वास्तव आहे. प्रशिक्षणाचा विचार सर्वच स्तरावर अधिक गंभीरतेने करण्याची गरज आहे. कायम स्वरूपी प्रशिक्षण व्यवस्थेची गरज आहे. एकदा अध्ययन निष्पत्ती विषयावर प्रशिक्षण सुरू होते त्यावेळी समोरचा वक्ता जे काही सांगत होता त्याचा आणि त्या विषयाचा मुळतः काही संबंध नव्हता.. पण ऐकावे लागत होते.असे केल्याने वेळ भरून निघते आणि प्रशिक्षण पुढे जाते, पण शिक्षकांमध्ये जे काही बदल घडायला हवेत ते घडत नाही. शिक्षकांच्या मनामध्ये प्रशिक्षणाबददल अनास्था निर्माण होण्यास ही प्रक्रिया हातभार लावत असते.
निपुण भारत अभियानाचा विचार करता आपल्याला निपुणची जी काही उद्दिष्टे आहेत ती लक्षात घ्यायला हवीत. अभियानाची उद्दिष्टे लक्षात घेऊन त्या दिशेचे प्रवास करण्यासाठीचा विचारच अधिक महत्वाचा आहे. उद्दिष्टे लक्षात घेतली तरच आपल्याला योग्य दिशेने प्रवास करणे शक्य आहे. निपुण भारत अभियानामध्ये अधिक चांगल्या दिशेचा प्रवास घडावा म्हणून भाषा आणि गणिताची अध्ययन निष्पत्तीचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे वर्गात नेमके काय करायचे आणि कोणत्या दिशेने प्रवास करायचा आहे हे लक्षात घेऊन पावले टाकली तर प्रवास फारसा कठीण नाही. त्यामुळे शिक्षणात काम करणा-या प्रत्येकालाच अभियानाची उद्दिष्टे जशी ज्ञात आहेत त्याप्रमाणे त्या दिशेने प्रवास करण्यासाठी काय करायला हवे हे प्रत्येकाला माहित असायला हवे अर्थात ती गरजही व्यक्त करण्यात आली आहे. त्याचवेळी अध्यापन शास्त्राच्या बाबतीत अधिक अद्यावत असायला पाहिजे ही भूमिका अधिक महत्वाची. आपल्याकडे शिक्षणात फारसे वेगाने बदल घडत नाही असा आक्षेप सातत्याने नोंदवला जातो. त्यामुळे शिक्षणात बदल घडवायचे म्हणजे नेमके काय करायचे हा खरा प्रश्न आहे. आपण शिक्षणाची गुणवत्ता उंचवायची असेल तर प्रामुख्याने वर्गातील अध्ययन अध्यापन प्रक्रियेवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. भौतिक सुविधा उंचावण्याची गरज आहेच, पण त्यामुळे फार वेगाने गुणवत्ता उंचावते असे संशोधने सांगत नाही. त्यामुळे अधिक गंभीरतेने विचार करावा लागेल.शिक्षणाच्या प्रक्रियेत जगभरात संशोधने होता आहेत. अलिकडे बुध्दिशास्त्रात झालेली संशोधने हे सांगता आहेत की,प्रत्येक मुलांमध्ये दहा प्रकारच्या बुध्दिमत्ता असतात. या बुध्दिमत्तेचा विचार करता एका क्षेत्रात विद्यार्थी सर्वोच्च स्थानी असतो.. आणि इतर बुध्दिमत्ता कमी प्रमाणात असतात.त्यामुळे वर्गातील अशा विविध बुध्दिमत्तेच्या विद्यार्थ्यांना शिकवताना सब घोडे बारा टक्के या न्यायाने शिकवणे शक्य नाही. याचा अर्थ प्रत्येक बुध्दिमत्तेच्या विद्यार्थ्याला जवळचे वाटतील अशा स्वरूपाच्या अध्ययन अनुभवाचे नियोजन करण्याची गरज आहे.
वर्गातील अध्ययन, अध्यापन प्रक्रियेचा प्रवास हा वर्तनवादाकडून ज्ञानरचनावादाच्या दिशेने होतो आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात पूर्वानुभव अधिक महत्वाचे ठऱतो. विद्यार्थ्यांना मी हवा तसे घडवू शकतो असे म्हटले जायचे, पण आता विद्यार्थ्यांच्या शिकण्यावर त्याच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक परीस्थितीची परिणाम होत असतो हे लक्षात घेऊन विद्यार्थ्याच्या वर्ग अध्यापन प्रक्रियेत बदल करावा लागतो. त्यामुळे व्यापक बदलाच्या दिशेने होणारा प्रवास लक्षात घेऊन अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रिया अधिक अद्यावत ज्ञानाच्या पातळीवर पुढे घेऊन जाण्याची गरज आहे.
अध्यापनात सुधारणा करण्याचा विचार सातत्याने होत असताना त्याकरीता मूल्यमापनाचा विचार केला जातो आहे. मूल्यमापन म्हणजे केवळ मुलांची परीक्षा नाही किंवा पास नापास करण्यापुरता विचार म्हणून मूल्यमापनाकडे पाहिले जात नाही. त्या पलिकडे मूल्यमापन हे वर्गातील अध्यापन प्रक्रियेत सुधारणा घडवून आणण्यासाठी त्याचा विचार केला जात आहे. वर्गातील विद्यार्थ्यांची संपादणूक लक्षात घेतली तर वर्गात आपण अध्यापन प्रक्रियेसाठी जी पध्दती निवडली आहे, वर्गासाठी जे काही अध्ययन अनुभव निवडले आहे ते कितपत यशस्वी झाले आहेत ते जाणून घेण्यासाठी मूल्यमापन केले जात असते. त्यामुळे निपुण भारत अभियानासाठीची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, अध्यापनात सुधारणा करण्यासाठी ठराविक कालावधीने मूल्यमापन प्रक्रिया केली जात असते. विद्यार्थ्याची संपादणूक, अध्ययन स्तर शिक्षकाला व शाळा व्यवस्थापनाला समजण्यासाठी मूल्यमापन केले जात असते. आपण अनेकदा नैदानिक चाचण्या घेत असतो. अनेकदा अल्पकालिन चाचण्या घेत असतो. अर्थात विविध कारणांनी घेतल्या जाणा-या चाचण्या, केले जाणारे मूल्यमापन हे केवळ विद्यार्थ्यांचा स्तर जाणून घेण्यासाठी केल्या जात असतात. त्यातून शिक्षकाचे अध्यापन किती प्रभावी झाले हे लक्षात य़ेण्यास मदत होत असते. आपण 2017 ला प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमात अध्ययन स्तरनिश्चिती चाचण्याचे नियोजन केले होते. पहिली चाचणीत कोणते विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहे हे समजण्यास मदत होत असते. त्यानुसार वर्गाची तयारी कळते त्याप्रमाणे वर्गातील विद्यार्थ्यांचे विविध स्तरही लक्षात येत असतात. यामुळे वर्गात कोणत्या स्वरूपातील अध्ययन अनुभव देण्याची गरज आहे हे लक्षात येण्यास मदत होत असते. एका अर्थाने मूल्यमापन हे अध्यापनाला दिशा देण्यासाठीच असते हे लक्षात घ्यायला हवे.
_ संदीप वाकचौरे
(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)