Tuesday, May 21, 2024
Homeब्लॉगमालक नव्हे पालक व्हायला हवे..

मालक नव्हे पालक व्हायला हवे..

पालकांना आणि शिक्षकांना आपला विद्यार्थी हा आपल्या कल्पनेप्रमाणे घडावा अशी अपेक्षा असते. शिक्षकांच्या मस्तकातही आपला विद्यार्थ्यासंदर्भातही काही कल्पना असतात आणि त्या कल्पनेने मुलांना घडविण्याचा मार्ग ते अनुसरतात. पालकांच्या मनात काही स्वप्न असतात त्या स्वप्नांच्या परीपूर्तीसाठी पाल्यांवर काही लादणे घडत जाते. आपण मुलांना नैसर्गिक रित्या घडविण्याचा आणि घडू देण्याचा प्रयत्न कधीच करत नाही. खरंतर शिक्षण म्हणजे लादणं नाही..शिक्षण म्हणजे फुलवणे आहे.. बहरवणे आहे.. पण वर्तमानात मात्र असं काही घडतांना दिसत नाही. आपल्याला आपली मुले म्हणजे स्वप्न पूर्ण करणारी यंत्रना वाटत आली आहे. आपल्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याचे ते माध्यम वाटत आले आहे.. पण त्यामुळे मुलांच्या आय़ुष्यातील आनंद हिरावून घेतला जातो हे लक्षात घ्यायला हवे. जीवन आनंद मुक्त असेल तर जीवनाला कोणताच अर्थ उरत नाही. शिक्षण हे आनंददायी आहे त्यामुळे शिक्षणात असलेल्या प्रत्येकाच्या चेह-यावर आनंद फुलून यायला हवा. आपण शिक्षणासंदर्भाने प्रतिष्ठेबददलच्या व्याख्या निर्माण केल्या आहेत. त्यामुळे ख-या शिक्षणापासून दूर जाणे घडत जाते.

परवा मित्रांकडे सहजतेने बसलो होतो. त्याचे अत्यंत गोड,गोंडस आणि अवघ्या सात आठ वर्षाचे मुल स्नेहसंमेलनाची तयारी करत होते.. शाळेत स्नेहसंमेलनाचे वातावरण सुरू झाले होते.त्यामुळे मुलं घरी देखील काही करू पाहत असतात.. पण त्याची नृत्याची तयारी पाहून आई त्याला म्हणाली “ जरा, अभ्यास कर… नाचून काही मिळणार नाही.नाचन्यापेक्षा अभ्यासाकडे लक्ष दे. नाचणे वगैरे याचा काही उपयोग नाही जीवनात.. उपाशी मरावे लागेल..तुला बापासारखे डॉक्टर व्हायचे आहे हे लक्षात घे..” आता तर मलाही प्रश्न पडला होता. मुलाचे वय अवघ 8 वर्षाचे आहे. या वयात त्याला कुठे आपले जीवन कळणार आहे..? त्याला तर फक्त जेथे आनंद मिळेल अशा गोष्टी करण्यात त्याचा रस असणार होता. आनंद हेच कोणत्याही व्यक्तीसाठी जीवनाचा मार्ग आहे.तसेच बालकांचेही जीवन म्हणजेच आनंद.. तोच एकमेव मार्ग असतो. खरतंर मुलासाठी आपण कोणत्या वाटा निर्माण करतो त्याचा विचार करायला हवा.कदाचित मुलांला डॉक्टर बनविण्यात आईला अधिक उत्तम, श्रीमंत जीवन हवे असेलही. मुलांच्या व्यवसायातील पाऊले ही समाजाची सेवा असा उद्देश असतो की पैसा कमवणे असतो याचाही विचार करण्याची गरज आहे. अर्थात डॉक्टर होण्यात समाजाची सेवा असा विचार असण्याची शक्यता देखील फार कमी होत चालली आहे. खरंतर मुल स्वतः काय करते हे जाणून घेणे महत्वाचे आहे. त्याच्या वाटा त्याला निवडण्याचे स्वातंत्र्य त्याला मिळू दिले तर त्याला जीवनभरासाठीची आनंदाची वाच सापडण्याची शक्यता अधिक उंचावते.उत्तम नृत्य करणारा विद्यार्थी देखील लोकांच्या जीवनात आनंद पेरू शकतो. समाजात तुम्ही कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहात यावर प्रतिष्ठा नाही.. तर आपल्या मुलाच्या आयुष्यात किती आनंद पेरता याचा विचार करायला हवा. बालक कोणत्याही क्षेत्रात गेले तरी त्यातूनही सेवा घडणार असतेच. त्यातूनही पैसा मिळू शकतो. पण आपल्याकडे कलेला फारशी प्रतिष्ठा नाही. कलेचा विचार म्हणजे जणू काही भिकारपणाचे लक्षण आहे. आपण सिनमा, नाटक पाहातो तेव्हा आपल्याला त्यातील कलाकांराचे मोठेपण वाटतेही. पण आपली मुलं कलेच्या दिशेने जाऊ नये.. त्यात करीअरचा विचार करू नये असेही पालकांना आतून वाटत असते. हिंदी सिनेमा सृष्टीतील विशिष्ट घरे आजही कलेला वाहून घेतलेली आहेत.तेथे मोठी स्पर्धा आहे.. पण सामान्य माणसांच्या मनात आजही कलेबददल प्रेम असले तरी व्यावसायिक अंगाने त्याकडे पाहण्याची दृष्टी नाही हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे कलेचा विचार उच्चतम पातळीवर केला जात नाही हेही वास्तव आहे. आपल्या मुलांने कला शिकावी पण ती उदरनिर्वाहाच्या दृष्टीने नाही तर केवळ छंद म्हणून..

- Advertisement -

समाजात विशिष्ट प्रकारच्या नोकरीला अधिकाधिक प्रतिष्ठा आहे. समाजमनात सरकारी सेवेबददल अधिक आकर्षण आणि प्रतिष्ठा आहे. त्याचवेळी डॉक्टर, वकील यापेशांबददलही मोठी प्रतिष्ठा आहे. साधारणपणे ज्याला प्रतिष्ठा आहे त्या दिशेनेच विद्यार्थ्यांनी प्रवास सुरू ठेवावा अशी साधारण पालकांची अपेक्षा असते.आपल्या मुलाने काय व्हावे ही घरातील मोठे माणसं ठरवत असतात. मुलांचा भविष्याचा पाया तेच पालक घालत असतात.. मग त्या पायासाठी मुलांच्या मनाची तयारी, त्यासाठीची कौशल्य, क्षमता आहेत की नाही याचा विचार करायला हवा असतो. पण येथे तर पालकच ठरवतात.. कारण त्यांना मुलाच्या आनंदापेक्षा पैशातील सुख महत्वाचे वाटत असते. बालकांच्या आयुष्याचे यश फक्त पैसे मिळवण्यात नसते.पैसा हे जीवनाचे सर्वस्व नाही. त्यामुळे पालक म्हणून आपण बालकांचा आनंद की श्रीमंतीची वाट यातील नेमकी निवड कशाची करायची याचा विचार करायला हवा आहे. साधारणपणे मुलांच्या अंगी अनके कौशल्य असतात.त्याच बरोबर विविध क्षमता देखील असतात. त्यांचा विचार न करता आपण शिक्षणाचा विचार नेमका कोणत्या दिशेने करतो आहोत याचा विचार करण्याच वेळ आली आहे. देशात दरवर्षी हजारो विद्यार्थी आत्महत्या करतात. नुकतेच केंद्र सरकारने देशातील उच्च शिक्षणातील गळतीबददलची आकडेवारी जाहीर केली आहे. विशेषता उच्च शिक्षण क्षेत्रातील नामांकित संस्थामधील होणारी गळती अधिक चिंताजनक आहे. यातील सर्वच विद्यार्थी केवळ गरीबी म्हणून शिक्षण सोडता आहेत असे नाही. त्यामागे मुलांना आपल्याला आवडणारे मनपंसत अभ्यासक्रम नसणे हे देखील कारण असणार आहे. कोटा या ठिकाणी गेले सहा महिन्यात चाळीसच्या आसपास विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची बाब समोर आली तेव्हा मुलांची होणारी घुसमट ही अधिक चिंताजनक आहे. असं असताना पालकांच्या अपेक्षा आणि वर्तमानातील शिक्षणाचा बदलत चाललेला अर्थ, शिक्षण व्यक्तिमत्व विकासापेक्षा ते अधिक उपजीवेकाचा भाग बनत चालले आहे. त्यामुळे जे शिक्षण आनंददायी आहे ते शिक्षणच निराशेच्या छायेत दडलेले आहे. ही निराशा अधिक चिंता करायला लावणारी आहे.त्यादृष्टीने आपण विचार करायला हवा. शेवटी जीवन जगायचे असेल तर पैसा हवा.. पण त्यापेक्षा अधिक आनंद देखील मिळायला हवा..याचाही विचार करायला हवा. पालकांनी आपल्या पाल्याचा कल, अभिरूची, बुध्दिमत्ता, क्षमता, कौशल्य यांचा विचार करून त्याला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात प्रवास घडवायला हवा. तसे घडले तरच जीवनाची नवी वाट चालण्याचा आनंद पाल्यात भरला जाण्याची शक्यता आहे. मुलांनी काय करावे यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी मदत करावी.. आपण मुलांचे मालक नाही तर पालक होण्याची गरज आहे.. आज आपण मालक झालेलो आहोत ही अधिक चिंताजनक गोष्ट आहे.. त्यावर मात करण्यासाठी पालक आणि शिक्षकांनी अधिक प्रयत्न करायला हवेत… अर्थात ही वाट कठीण आहे हे लक्षात घ्यायला हवे.

_ संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या