Friday, May 3, 2024
Homeब्लॉगआम्ही सारे समानच...

आम्ही सारे समानच…

शिक्षण प्रक्रियेत येणारी सर्वच मुले समान असतात; पण तरीसुध्दा त्यांच्या भाषा, विचार, आचार, संस्कार, वृत्ती या सर्वात भिन्नता असते. ती भिन्नता हिच शिक्षण प्रक्रियेचे बलस्थान आहे.शाळेच्या आवारात असलेल्या भिन्नतेतही एकता दडलेली आहे. निसर्गातही प्रचंड विविधता आहे तरी तो निसर्ग एकात्म आहे. आपला देश हा भाषा, प्रांत, जात, धर्माने भिन्नतेने नटलेला आहे तरी पण आपण भारतीय असतो.

तसेच काहीसे चित्र जगभरातील विविध शाळा शाळांमध्ये प्रतिबिबींत होते. ही भिन्नता जर नैसर्गिक असेल तर मानव म्हणून आपण त्यात काही बदल घडू शकत नाही. आपण त्याचा स्विकार करणे एवढेच आपल्या हातात असते. मात्र जाणीवपूर्वक भेदाभेद घडवून विषमता निर्माण केली जाणार असेल तर आपण त्याकडे दुर्लक्ष न करता ती नष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. शिक्षकाच्या नजरेत समानते पेक्षाही समतेचा दृष्टीकोन अधिक सदृढ असतो हे लक्षात घेण्याची गरज आहे.

- Advertisement -

कठीण आहे वाट परी…

कोणाही व्यक्तीने शिक्षक म्हणून शाळेच्या आवारात प्रवेश केल्यानंतर शिक्षकांची दृष्टी भेदाभेदाच्या पलिकडे गेलेली पहावयास मिळते. शिक्षक अध्ययन, अध्यापन, मूल्यमापन करताना तो समान पातळीवरचे अध्ययन अनुभवाची रचना करतो. अध्ययन, अध्यापन, मूल्यमापन करतांना त्यांच्या दृष्टीत कोणताच भेदाभेद असत नाही. शिक्षकांच्या अंतकरणात केवळ विद्यार्थ्याचे हित सामावलेले असते. आपला विद्यार्थी अधिक गुणवत्तेच्या शिखरावर असावा अशी त्यांची धारणा असते. कोणत्याही प्रकारे भेद करण्याची शिक्षकांची मानसिकता नाही. शिक्षकासाठी ही निरपेक्षता म्हणजे त्यांचा गुणच असतो. तो जर शिक्षक असलेल्या व्यक्तीत नसेल तर त्याला शिक्षक कसे म्हणावे हा खरा प्रश्न आहे.

आपण शाळेत आलेल्या मुलांना जेव्हा वाचत जातो तेव्हा ती कितीतरी विविधतेने नटलेली असतात याचा अनुभव येतो. मुलांची भाषा, संस्कार, परंपरा, जात, धर्म, रूढी अशा कितीतरी गोष्ट भिन्न असतात. ही भिन्नता बाहय वर्तनाच्या अंगाने जशी असते तशी अंतरंगाने देखील त्यात विविधता असते. कधीकाळी आपण एकाच प्रकारच्या बुध्दिमत्ते बददल बोलत होतो. मात्र आज प्रत्येक मुलात असलेली बुध्दिमत्ता ही भिन्न असल्याचे दिसते. कोणी सचिन तेंडूलकराच्या दिशेने प्रवास करतो. कोणी लता मंगेशकराच्या गायन कलेच्या दिशेन प्रवास करीत असतो, कोणी शिवाजीराव भोसले तर कोणी बाबासाहेब पुरेंदर असतो.. कोणी एम.एफ.हुसनेही असतो. ही विविधता प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये असते.

घर हीच शाळा…

ही विविधता हेच प्रत्येक विद्यार्थ्यांचे बलस्थान असते. त्यांची ओळख बुध्दिमत्तेच्या जोरावरती होतांना पाहवयास मिळते. आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची शारीरिक रचनेच्या दृष्टीने शास्त्रीय दृष्टीकोनातून समानता अधोरेखित होत असली तरी बुध्दीमत्तेच्या आणि शरीराच्या विविध अवयवांच्या ठेवणीतील भिन्नता मात्र अधोरेखित होते. ही भिन्नता आपल्याला विद्यार्थ्यांची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक परीस्थितही दिसते. त्याच बरोबर अभिरूची, विद्यार्थ्यांचा कल यातही प्रतिबिंबीत होते. या भिन्नतेची मुले शाळेत आली तरी शिक्षक सर्वांवरतीच निंतात प्रेम करीत असतो.

अशी विविधता असलेल्या प्रत्येकाला गरजे प्रमाणे अध्ययन अऩुभव देणे आणि विकासाची संधी देणे हे शिक्षकाचे कर्तव्य असते. हे काम शिक्षक अत्यंत निष्ठेने करीत असतो. त्याच्यात जे शिक्षकत्व सामावलेले आहे त्याचाच तो परीपाक असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्यामध्ये असलेल्या विभिन्न वैशिष्टयांची ओळख करीत त्यांचा स्वीकार करणे आणि त्यांना जाणून घेणे शिक्षकाला करावे लागते. अर्थात शिक्षकाचे सत्व ज्यांनी जोपासले आहे त्यांने ते करणे हे आपले कर्तव्य वाटत आले आहे.

तुम्ही फक्त इतकेच करा..!

या विभिन्नतेबरोबर शारीरिक विभिन्नता जी असते त्यात कोणी दुर्बल असतो, कोणी अंध असते. कोणी तर प्रचंड तेजस्वी आणि कोणी मागासही असेल. ही भिन्नता सुध्दा स्विकारावी लागते. त्याच बरोबर कोणी कुरूप असते कोणी सुंदर असते. कोणी गोरे तर कोणी काळे असते म्हणून शिक्षकाच्या मानसिकतेवर कोणताच फरक पडत नाही. शिक्षकाला एकच ठाऊक असते ते म्हणजे सर्व मुले समान असतात. शिक्षक तर मुलांच्या आत जे काही दडले आहे त्यांच्या विकासाचा विचार करतो. शिक्षकांचा या बाहय भिन्नतेपेक्षाही अंतरिक विकासावर अधिक भर असतो. आतील प्रेरणा जीवंत असेल तर बाहय भिन्नतेचा विचार न करता आपल्याला कोणत्याही समस्येवरती मात करता येते.

एकदा एक फुगेवाला विविध रंगाचे फुगे विकत होता. त्याचेकडे काळे, लाल, हिरवे, पिवळे, निळे अशा विविध रंगाचे फुगे होते. एक काळ्या रंगाचा छोटासा मुलगा धावत धावत त्या फुग्यावाल्या जवळ गेला. खरेतर त्याचा रंग काळा होता म्हणून त्याच्या वाटयाला ब-यापैकी अवहेलना आली होती. त्यांच्या मनात न्युनगंड निर्माण झाला होता. मग तो फुगा हवा म्हणून फुग्यावालाला सांगू लागला. त्यावेळी त्याला कोणता फुगा हवा? असे त्या फुग्या विक्रेत्यांने विचारले. तर मुलाने उलटा प्रश्न केला की लाल फुगा उडेल.. हिरवा उडेल.. पण तो काळा फुगा उडेल का? तेव्हा तो फुगा विक्रेता म्हणाला कोणत्याही रंगाचा फुगा उडवू शकतो. फुग्याचे उडणे बाहेरच्या रंगावर नाही तर त्याच्या आत असलेल्या वायूवरती अवलंबून आहे.

आत्मनिर्भयतेच्या दिशेने..

माणसांची उंचभरारी देखील बाहय भेदावर नाही तर अंतरिक असलेल्या शक्तीवर अवलबून असते.शिक्षणाने बाहय भेदाचा विचार न करता अंतरिक शक्ती विकसित करण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. कारण प्रत्येकाच्या आत एक शक्ती असते. ती शक्ती प्रत्येकाला उंच भरारी घेण्यासाठी शक्ती बहाल केलेली असते. शिक्षणाची व्याख्या आपण जेव्हा अनुभवतो तेव्हा मस्तकाच्या आत जे काही आहे ते बाहेर काढणे म्हणजे शिक्षण. मुलांच्या मस्तकात प्रचंड शक्ती सामावलेली असते. तिचा विकास महत्वाचा आहे. ती काही भिन्नतेवर अथवा भेदावर अवंलबून असत नाही.

मानवी जीवनात सौंदर्य आणि कुरूपता हा संकल्पना देखील सापेक्षच आहे. कोणाच्या दृष्टीत बाभळीच्या झाडातही प्रचंड सौंदंर्य सामावलेले पाहवयास मिळते. त्याच्यातही त्याचे शब्द बहरतात आणि कविता जन्म घेते. कोणाला गुलाबाच्या फुलात सौंदर्य़ अनुभवास मिळते. कोणाला गो-या रंगाचे आकर्षण तर कोणाला शामल, गव्हाळ रंगाचे आकर्षण असते. ही भिन्नता विकासावर परीणाम करीत नाही. त्यामुळे शिक्षक त्या मुलांच्या बाहय सौंदर्यापेक्षाही आतील सौंदर्यावरती प्रेम करीत असतो. वर्गात येणारे विद्यार्थी कसे आहेत हे त्याच्यासाठी महत्वाचे नाहीत. ते शिकण्यासाठी आले आहेत हे महत्वाचे. त्याच्या दृष्टीने हुशार, मठठ असा विचारही महत्वाचा नसतो.

आपण मुलांना गृहित का धरतो?

खरा शिक्षक तर समग्र विकासाची अपेक्षा ठेऊन असतो. तो विद्यार्थ्याना एकांगी विकासाच्या प्रक्रियेत मोजत नाही. वर्गातील मार्काच्या हुशारीला विद्यार्थी कधीच जबाबदार असत नाही. याचे कारण शिक्षक विद्यार्थ्यांच्या भिन्नता लक्षात घेऊन जितक्या विविध प्रकारचे अनुभव देईल तितके शिकणे परीणाम कारक होत असते. त्या परीणामकारकतेवर विद्यार्थ्यांचा संपादन स्तर अवलंबून असतो. त्या संपादनस्तरावरती वर्गातील हुशारी अवंलबून असते याचा अर्थ ते सर्व शिक्षकांवरती अवलंबून आहे. खरा शिक्षक ही धारणा मनापासून स्विकारत असतो.

शिक्षकांची वृत्ती समतेची असते.समानतेची धारणा तो फारशी वर्गातील प्रक्रियेत अवलंबत नाही. शाळेत जर इतकी विविधता आणि भिन्नता असणार असेल तर ती विविधता लक्षात घेऊन अध्ययन अनुभव द्यावे लागणार आहे. ज्याला ज्या स्वरूपाचे अनुभव गरजेचे आहे त्या स्वरूपाचे अऩुभव देणे महत्वाचे आहे. सर्व वर्गाला आणि विद्यार्थ्यांना एकाच प्रकारचे अनुभव देणे ही समानता शिक्षणात गुणवत्ता आणू शकणार नाही. त्या करीता भिन्नता लक्षात घेऊन अऩुभव देणे ही समता निश्चित गुणवत्तेला आलेख उंचावणारा ठऱणारा आहे. शाळेत तर विद्यार्थी कधी मस्तीखोर, वात्य आणि धूर्त असतात. पण शिक्षकासाठी हे गुण डोळ्यात भरणारे कधीच असत नाही.

मुलं हाच आरसा..

मुळात मुले मस्ती, बेशिस्त, व्रात्य, धूर्तपणे का वागतात याचा विचार शिक्षक करीत असतो. मुलांना मस्ती घालण्याची, धूर्तपणे वागण्याची हौस नसते. हे समाजासाठी वाईट दिसणारे गुण हे शिक्षकाच्या लेखी अपूर्णतेची जाणीव असते. त्याच्या गरजांची परीपूर्ती झाली नाही की मुले बेशिस्त वागतात. मुले कधीच धूर्त असत नाहीत. मात्र त्यांना कोणत्या स्वरूपाचे अनुभव समाज व्यवस्थेने दिले आहेत आणि त्यांचा समाजाने कसा स्विकार केला गेला आहे यावरच त्याचे वर्तन प्रतिसाद अवलबून असतो. खरा शिक्षक मानसशास्त्रीय दृष्टया आणि मानवी दृष्टया विचार करीत असतो. म्हणून त्याच्या लेखी मुलं कसेही असू दे ती त्याच्यासाठी समानच असतात.

जगाच्या पाठीवर जन्माला आलेले कोणतेही बालक कधीच गुन्हेगार, वाईट असत नाही. चांगुलपणा हा प्रत्येकाचा स्वभावधर्म असतो. प्रत्येक बालकांच्या गरजा देखील समान असतात. मात्र त्या गरजाची परीपूर्ती होत नाही. परीस्थिती अभावी मिळणारे अऩुभव जर वाईट असणार असेल तर मुलाचा प्रतिसादही बदलणारा असतो. परीस्थितीने मुले बिघडतात आणि घडतात हे लक्षात घ्यायला हवे. समाजाने मुलांना लहान वयात अधिक आऩंददायी अनुभव मिळतील अशा स्वरूपाची जबाबदारी स्वीकारायला हवी. शेवटी कोणत्याही धर्माची, कोणत्याही जातीचे मुले असले तर ती ईश्वराची लेकरे आहेत.

फुकाची बडबड हवी कशाला?

अर्थात ईश्वर आहे की नाही हे ज्याच्या त्याच्या स्विकृतीवर अवलंबून आहे.. पण जगातील सर्वोत्तम सदगुण युक्त अशी जी शक्ती आहे ती ईश्वर आहे. अशी शक्ती सर्वच धर्माने स्विकारली आहे. त्यामुळे ईश्वराचे नाव फक्त धर्माचा विचार करता बदलले जाते, पण धर्माचे पावित्र आणि धर्म विचार माणूसंपणाची उंची वाढविणे, माणूस घडविणे हाच आहे, विवेकशीलता निर्माण करणे हेच धर्माचे कार्य आहे हे लक्षात घ्यायला हवे.

या विचाराच्या अनुषंगाने गिजूभाई बधेका लिहितात,

सर्व मुले समान आहेत

मुले आहेत विभिन्न वैशिष्ट्यांची:

दुर्बल आणि अंध, तेजस्वी आणि मागास,

सुंदर आणि कुरूप, काळी-गोरी.

काही मुले आहेत हुषार, सुदृढ,

मस्तीखोर, व्रात्य आणि धूर्त

पण खऱ्या शिक्षकासाठी सर्व मुले समान आहेत

सर्व, देवाची मुले.

_संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

मी स्वस्थ कसा बसू?

- Advertisment -

ताज्या बातम्या