Friday, May 31, 2024
Homeब्लॉगशिक्षणातून विवेक...

शिक्षणातून विवेक…

शिक्षणातून मुले निर्भयी बनावेत अशी अपेक्षा असते. समाज उत्तम आणि समृध्द होण्यासाठी निर्भयी विचाराची गरज असते. निर्भय नागरिकांच्यामधून निर्भय समाज आणि राष्ट्र उभे राहात असतो. इंग्रज राजसत्तेचा सूर्य जगावर मावळत नव्हता.. मात्र तो सूर्य महात्मा गांधी नावाच्या एका माणंसाच्या विचारशक्ती आणि प्रेरणेच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या लढाईतून मावळतीला गेला.

गांधीनी अखंड जीवनभर सामान्याच्या कल्याणासाठी सामान्यांचे संघटन उभे करीत गेले. त्यांच्या समग्र आंदोलनात निर्भयता सामावलेली होती.हेतू स्वच्छ आणि प्रामाणिक होता.त्यामुळे इंग्रजासाठी भारतात गांधीजी हेच एक नंबरचे शत्रू होते.त्यांचा संपूर्ण लढा हा वन मॅन अर्मी असाच होता.त्यांच्या अंतकरणात ही निर्भयता कोठून आली..? हा खरा प्रश्न आहे.मुळात लहान वयात असेलले गांधीजी भित्रे होते.मात्र विवेकाचा प्रवास सुरू झाल्यावर ते अधिक निर्भय झाले. आपण आपल्या अवतीभोवती असलेल्या बालकांच्या मुक्त आणि स्वातंत्र्याच्या वातावरणात अभिव्यक्त होण्याला प्रतिबंध करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भिती पेरत असतो. . त्या भितीने आपण समाजाच भितीयुक्त करीत असतो. त्यामुळे अन्यायाच्या विरोधात लढण्याची हिम्मतच गमावणे घडते.वर्तमानात अन्यायाची जाणीव हरवत चालली आहे.अन्याय झाला तरी तो होतच असतो हा विचार करीत माणूस आपला जीवन प्रवास सुरू ठेवतो.परीस्थितीला शरण जाणे सातत्याने घडत चालले आहे.त्यामुळे विषमतेचा आलेख उंचावत राहिल आणि समाज सत्वहिन बनतो.

- Advertisement -

खरेतर जीवन निर्भय असायला हवे असेल तर तो प्रवास विवेकाच्या दिशेने आणि सोबतीने घडायला हवा.शिक्षणातून विवेक पेरला गेला तरच भिती नष्ट होते.सत्याची कास धरणार की मृत्यू पत्करणार ? असा प्रश्न जेव्हा सॉक्रेटीस यांना विचारला गेला तेव्हा ते म्हणाले “ सत्य सोडण्यापेक्षा मी विषाचा प्याला घेणे पसंत करेल ” .बागेत भूत येते असे जेव्हा नरेंद्र दत्त यांनी सांगण्यात आले तेव्हा त्यांनी रात्री खरच येते का ? हे पाहाण्यासाठी तेथे जाणे पसंत केले.हसत हसत फासावर जाणारे क्रांतीकारक या मातीने पाहिले आहे.आपली मुले भारतीय स्वातंत्र्यासाठी आहुती देत आहेत…प्राण अर्पण करता आहेत..तेव्हा त्या मातेच्या डोळ्यात अश्रूचा बांध दाटून येतो.त्याचे कारण आपली मुले फासावर जाता आहेत हे नाही,तर आता स्वातंत्र्याच्या लढाईसाठी देण्यास आपल्याकडे पूत्र नाही. मृत्यूला कवटाळतांना देखील हसत हसत जाणारी क्रांतीकारक माणंस या मातीत होती. हसत हसत स्वतःच्या छातीवर इंग्रजाच्या गोळ्या झेलणारी माणंसही इतिहासाने दिली .या माणंसाना ही शक्ती कोठून येत होती ? त्याचे कारण त्यांच्या मध्ये निर्भयता सामावलेली होती.त्यामुळे त्यांना मृत्यूची भिती वाटत नव्हती.जेथे मृत्यूचीच भिती नाही तेथे माणंसानी माणंसावरती अन्याय केला तरी अन्यायाच्या विरोधात माणंस उभी टाकली जात होती.अन्याय हा अन्याय असतो त्यामुळे त्या विरोधात लढतांना शक्ती मनगट आणि मस्तकात भरली जात होती.इतिहासात छोटया छोटया अन्यायाच्या विरोधात माणंस संघर्ष करतांना दिसत होती. न्याय हा अधिकार आणि हक्क मानला जात होता.त्या जाणीवांची पेरणी मनात झालेली होती.आज मनातच भितीचे घर आहे. व्यक्तीगत जीवनाबरोबर आपल्या सामाजिक जीवनातही भिती पेरली जाते.त्याचा परिणाम म्हणून समाजात भ्रष्टाचार वाढत जातो.कामासाठी पैसे दिले जातात याचे कारण आपले काम होणार नाही ही भिती असते. कामात अडचणी निर्माण केल्या जातील.कामात अडथळा निर्माण करून त्यास उशीर होईल यासारखी भिती निर्माण होत गेल्यांने लोक भ्रष्टाचाराच्या प्रवाहात सहभागी होतात.जीवनात प्रवाहपतीत होण्याची जी वेळ येते त्याचे कारण भिती हेच असते.मनात भिती पेरल्यांने आणि ती स्थिरावल्यांने अनेकांच्या आय़ुष्यातील आनंदही गमावला आहे.

आंनद हा भितीमुक्ततेतून प्राप्त होत असतो.त्यामुळे भितीमुक्त विचाराच्या पेरणीची गरज असते.अगदी लहानवयापासून आपण मुलांच्या मनात भितीचे घर निर्माण करीत असतो.बालकांच्या वर्तनावरती निर्बंध आणण्यासाठी आणि त्यांच्या चौकस वृत्तीला खतपाणी घालण्याऐवजी त्याला प्रश्न पडू नये म्हणून भितीची पेरणी केली जाते.खरेतर शिक्षण तेव्हा होते , जेव्हा बालकांना प्रश्न पडत असतात.ज्ञानरचनावादी तत्वाज्ञानानुसार आपण जेव्हा अध्ययन अनुभवाची रचना करीत असतो , तेव्हा त्या अध्ययन अनुभवातून विद्यार्थ्यांच्या मनात जितके प्रश्न अधिक निर्माण होतील तितके शिकणे परिणामकारक आणि अध्ययन अनुभव समृध्द झाला असे मानले जाते.मात्र शिकतांना जर बालकांच्या मनात भिती असेल तर प्रश्नांची निर्मिती होत नाही.शिकण्यासाठी लागणारी भावनिक आणि मानसिक प्रक्रिया घडत नाही.त्याचा परिणाम नकारात्मक असतो.जोवर घरातील बालक लहान असते आणि ते प्रश्न विचारते तेव्हा घरातील सर्वांना कौतूक वाटत असते.जेव्हा कौतूक होते तेव्हा ते वातावरण शिकण्यास प्रोत्साहित करणारे असते.कौतूक याचा अर्थ आनंद आणि आनंद याचा अर्थ भितीमुक्तता.त्यामुळे कृष्णमूर्ती यांनी देखील शिक्षणातून भिती नष्ट करण्याची गरज सातत्याने व्यक्त केली होती.

बालकाच्या आय़ुष्यात भितीचे घर कधीच नसते.ते बांधण्याचे काम मोठी माणंस करीत असतात.रात्री घराच्या बाहेर पडू नये म्हणून बाहेर भूत असते अशी खुळचट कल्पनांची पेरणी करीत बालकांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो. अनेकदा बालक मोठयांसोबत बोलू पाहाते,राहू पाहाते..करू पाहाते..पण मोठयांसाठी लहान मुले अडचणीचे ठरतात.त्यांचे प्रश्न,त्यांचा संवाद , त्यांची चौकस वृत्ती मोठयांच्या पंरपरेला छेद देणारी ठरतात.त्यामुळे त्यांना त्यांची सोबत असणे अडचणीचे असते.त्यामुळे त्या बालकांना झोपायला पाठविणे पंसत केले जाते.ते जर जात नसेल तर त्याला वेगवेगळ्या कारणे पुढे करीत भिती दाखविली जाते.एखादा बागुलबुवा येईल..तुला घेऊन जाईल..तो माणंस खातो..माणंसाना मारतो असे सारे काल्पनिक पेरणी करण्यात मोठयांना धन्यता वाटते.बालक जेव्हा त्याला खावे वाटत असते तेव्हा ते खाते पण घरातील मोठय़ांना आम्ही भरू तेव्हा तेव्हा खायला हवे असे वाटत असते.लहान्याना अन्नाची गरज नसते आणि मोठयांना बालकांची चिंता असते.त्यातून दिलेले खात राहावे याकरीता मोठी माणंस कोणीतरी येईल आणि तुला घेऊन जाईल.कधी म्हतारा,म्हतारी..तर कधी भोतीबाबा घेऊन जाईल अशी पेरणी करतात..त्या भितीने मुलं दिलेले सर्व खाते..पण ते केवळ भितीपोटी.पण मनात भिती असतांना ते खालेले अन्न पचावे म्हणून शरीरात लागणारे स्त्राव तयार होत असतील का ? भितीने खालेले अन्न खरच पचनी पडत असेल का ? मोठयांसाठी फक्त अन्न खाणे हे महत्वाचे पण त्यापेक्षा बालकांची वाढ आणि विकासाला किती मदत झाली हे अधिक महत्वाचे आहे.अनेकदा घरात कुत्रे येईल..चिऊ येईल..काऊ येईल यासारखे विविध प्राण्यांची नावे घेऊन भिती पेरली जाते.मुलांनी चूका करू नये. मोठयांच्या दृष्टीने चूका केल्या तर बालकांना पोलींसाची भिती दाखविली जाते.त्याभितीने पोलीस हे कायमच भितीचे साधन बनले आहे.ते जनसेवक आहेत.आपल्या मदतीकरीता आहेत या जाणीवा विकसित करण्यात आपल्याला अपयश आले आहे.त्यामुळे पोलीस कितीही चांगले असले तरी त्यांच्या बददलची भिती मनात कायम राहाते. नागरिक आणि पोलीस यांच्यात संवाद होण्याऐवजी कायम विवादाचे क्षण वाटयाला येतात.पोलीस हाही माणूस आहे त्यांनाही भावभावना आहेत.त्यांच्या बददल आत्मियता उंचावण्याची गरज आहे , पण आत्मियता उंचावत नाही. याचे कारण इतक्या लहान वयात मुलांच्या मनात पोलीसांबददलची भिती भरवली जाते.त्यामुळे ती प्रतिमा कायमच नकारात्मक बनते. माणंस मोठी झाली तरी पोलीसाबददलची भिती कायम राहाते.लहानवयात जे पेरले जाते ते जीवनभर कोरले जाते. अनेकदा शांत राहा नाहितर कोंडील अशी धमकी दिली जाते. अनेकदा ते कोंडणे घडते देखील.त्याचा परिणाम एकटे असणे म्हणजे शिक्षा असे वाटू लागते.घर खायला उठते त्या भावनेतूनच.खरेतर आपल्याला एकांताची गरज असते.त्या एकांतातून शहाणपणाची पेरणी होत असते.मात्र तो एकांतच खायला उठतो. एकांत ही शिक्षा वाटण्याची सवय अंगी बानलेली असते.अभ्यास आनंदाने करणारी माणंस तर आपल्याला अभावाने दिसतात.अजिबात नाही असेही नाही . अनेकदा अभ्यास ही जाणीवपूर्वक करण्याची गोष्ट आहे असे मानले जाते.मुलांना अभ्यास करावा वाटेल असा अध्ययन अनुभव,प्रेरणा नसेल तर त्यांना अभ्यास करणे,पाठयपुस्तक वाचने ही शिक्षा वाटते.मुलांना चित्र काढणे,खेळायला जाणे.हाताने कागदकाम,मातीकाम करणे ही शिक्षा वाटत नाही.उलट तो त्यांचा आनंदाचा भाग बनतो.मात्र अभ्यास करावा वाटत नाही…मोठयांच्या दृष्टीने अभ्यास सक्तीने करायची गोष्ट बनते.सहा तास शाळेत गेल्यानंतर पुन्हा शिकवणीचे तीन तास जरी गृहित धरले तरी 24 तासातील 9 तास शिकणे होत असेल तर शरीर आणि मनाला थकवा येणारच.या सर्व शिकल्यानंतर अभ्यास करणे इतक्या लहानवयात कंटाळवाणे होणार नाही का ? याचा विचार करायला हवा.शाळांना मैदाने नाही..कार्यानुभव,कला आणि शारीरिक शिक्षण केवळ विषयच उरले आहेत.त्यांची प्रभावी अमंलबजावणी होतांना दिसत नाही. दिवसातील बारा बारा तास एकाच प्रक्रियेसाठी देणे बालकाला शक्य आहे का ? याचा विचार करायला हवा. मोठयांना शिकण्यापेक्षा परीक्षा महत्वाच्या वाटातात.जीवन विकासात गुणांऐवजी मार्क महत्वाचे वाटतात. अभ्यासाला बसविण्यासाठी पुन्हा भिती पेरली जाते.अनेकदा अभ्यास केला नाही म्हणून शिक्षा करण्यात येते. घरातील असू दे नाही तर शाळेतील, मोठया माणंसांनी शिक्षा हाच रामबाण उपाय वाटत असतो. मुलांनी अभ्यास करावा म्हणून अनेकदा बालकाला मारहान होते.मुले भितीपोटी अभ्यासाला बैठक मारून बसत असले तरी त्यातून खऱच अभ्यास होतो का ? याचा विचार करायला हवा. पुस्तके घेऊन तासंतास मुले बसली तरी अभ्यास करतात का ? केवळ हा आभास असतो ? अभ्यासासाठी भिती नाही तर प्रेरणा जागृत करायची असते.ती किती जागे करतो याला महत्व आहे . अशा स्वरूपाच्या भितीने मुलांवरती संस्कार होतात असे वाटते..पण त्यामुळे आपण मुलांचा विचारशील जडणघडणीचा प्रवास रोखत असतो.या संदर्भाने गिजूभाई लिहितात..

’झोपायला जा नाहीतर बागलुबवुा येईल

आणि तुला घेऊन जाईल’

’खा नाहीतर म्हातारा तुला उचलून नेईल’

’वाघ येणार आहे

’भूत येईल कधीही’

पोलिस येतील’

’शातं रहा नाहीतर खोलीत कोंडून ठेवेन’

’पुस्तके वाच नाहीतर चागंले धपाटे खाशील’

जे मुलांना या पद्धतीने घाबरवतात तेच खरे मुलांचे शत्रु असतात.

या स्वरूपाची भिती पेरण्याचे काम जी माणंस करतात ती मुले घडवित नाही तर ते बिघडवत असतात.भितीने संस्कार होतात असे वाटते पण त्यातून मुलांचा वाईट दिशेचा प्रवास सुरू होतो.त्यामुळे अधिक शिक्षेने मुले संवेदनशील,शहाणी होत नाही तर अधिक असंवेदनशील बनतात. या भितीने आपला समाज आपण कोणत्या दिशेने जातो आहे हे पाहात आहोत . त्यामुळे भितीमुक्त समाज म्हणजे उन्नत व प्रगत समाज असतो.

संदीप वाकचौरे

लेखक- शिक्षण शास्त्राचे अभ्यासक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या