शिक्षित आणि अशिक्षित माणसं यात नेमका फरक काय? शिकलेली माणस लिहिती आणि वाचती असतात आणि अशिक्षित माणसांना अक्षर साक्षरतेचा स्पर्श नसतो इतकाच काय तो फरक. असं साधारण साक्षर निरक्षर व्यक्तीच्या संदर्भाने वर्तमानात सामान्य माणसाचे मत असते. शिक्षणाच्या प्रक्रियेतून फक्त अक्षर साक्षरता साध्य होणे अपेक्षित आहे का? तेवढाच अर्थ असेल तर मग शाळा महाविद्यालयाची गरजच उरणार नाही.
एखादा शिकवणीचा वर्गही पुरेसा ठरेल.अभ्यासक्रम,पाठयपुस्तक, शाळा यांची फारशी गरज उरणार नाही. शिक्षण आणि साक्षरता हे नाते फार वरवरचे आहे. साक्षरता ही किमान अपेक्षा आहे. त्यापलिकडे शिक्षणाचा खोल अर्थ दडलेला असतो. शिक्षण हे जीवन उन्नतीचे साधन आहे. ज्ञान निर्मितीची प्रक्रिया त्यातून घडणे अपेक्षित आहे. सत्याचा शोध घेण्याची गरज आहे. त्याचवेळी जीवनाचा अर्थ आणि हेतू उलगडण्याची शक्ती शिक्षणातून येण्याची गरज आहे.
शिक्षणाच्या उदात्त हेतूचा एकत्रित विचार करण्याची वेळ आता जणू आली आहे. पुस्तका पलिकडे जे असते ते खरे शिक्षण. मग पुस्तकाच्या पलिकडे असलेले मानवी जीवन आणि त्याचा विकास यांचे काही नाते असते. त्या नात्याला बहरवणे, फुलविणे, आनंदाचे डोही आऩंद तरंग निर्माण करणे हे शिक्षण असते. अशी वाट तर तेव्हा निर्माण होते जेव्हा शिक्षण ज्ञान निर्मितीची वाट चालू लागेल. ज्ञान म्हणजे विवेक, चांगले काय वाईट काय याचा विचार करण्याची क्षमता. अशा विचार करण्यासाठी शक्ती शिक्षण देत असेल तर ते शिक्षण हे माणसांसाठी अंजन आहे. डोळ्यात अंजन घातले की आपली दृष्टी विस्तारते.त्याप्रमाणे शिक्षण घेतलेल्या माणसांची जगण्याविषयी, जीवन व्यवहाराविषयीची दृष्टी विस्तारण्याची गरज आहे. शिक्षण म्हणजे ज्ञान आहे. ज्ञानाची साधना करणा-या प्रत्येकाला जीवनाचा अर्थ सापडलेला असतो. जे शिक्षण जीवनाला अर्थ प्राप्त करून देत नाही ते शिक्षण कुचकामी आहे. शिक्षण घेतल्यानंतरही आपल्याला स्वतःचा शोध लागत नाही तेव्हा आपण कागदाची भेंडोळी घेऊन केवळ पदवीधर झालो आहोत, साक्षर झालो आहोत इतकाच काय तो अर्थ.
शिक्षण घेतल्यानंतर जीवनाचा नेमका अर्थ काय याचा शोध घेण्याची गरज असते. जीवनाचा अर्थ केव्हा जाणता येतो? तर जेव्हा शिक्षणाची प्रक्रिया माहितीच्या प्रक्रियेपासून दूर जात ज्ञानाची वाट चालू लागते तेव्हा. शिक्षणाने व्यक्ती ज्ञानसंपन्न होण्याची गरज आहे. ती ज्ञानसंपन्नता आपल्याला जीवनाचा अर्थ उलगडून दाखविण्याचे काम करते. जगातील अऩेक तत्वज्ञ, शास्त्रज्ञ, विचारवंत, साहित्यिक, उद्योजक यांनाही जीवनाचा शोध लागला होता. सॉक्रेटीस यांना जीवनाचा नेमका अर्थ सापडला होता. त्यांना जेव्हा सांगितले की, तुम्ही जर सत्याची कास सोडली नाही तर मृत्यूच्या मार्गाने जावे लागेल. सत्याचा विचार सोडला जीवन जगता येईल. खरेतर जगण्यासाठी, जीवनाचा आऩंद घेण्यासाठी आपल्याला केवळ सत्याचा त्याग करायचा होता. वर्तमानात लोक सत्यासाठी तर सोडा सत्तेसाठी काय काय सोडता आहेत हे आपण पाहतो आहोत. सत्तेसाठी सत्याचा त्याग करण्याची हिम्मत वर्तमानात आहे. सत्याचे फारशे मोल उरलेले नाही. मात्र सॉक्रेटीस यांच्यासाठी सत्याची वाट म्हणजे विषाचा प्याला होता.
सत्यापासून दूर जाणे म्हणजे जीवंत राहणे होते. यातील काय निवडावे? यासाठीचा विवेक म्हणजे ज्ञान. हे ज्ञान जेव्हा व्यक्तीला प्राप्त होते तेव्हा श्रेयस आणि प्रेयस काय याचा नेमका अर्थ उलगड जाताना दिसतो. जीवन जगण्याचे आपले नेमके प्रयोजन काय? याची जाणीव झालेली असते. सत्याचा लोप करीत आपण जीवन जगणे हा एक प्रकारचा मृत्यू आहे. सत्याशिवाय आपण चालू शकत नाही. सत्य हाच आत्मा आहे. ही जाणीव झाल्यानंतर सॉक्रेटीस यांनी विषाचा प्याला पिणे पसंत केले. सत्याशिवाय जगण्याला तसा कोणताही अर्थ नाही ही त्यांची जाणीव शिक्षणाचे मोल सांगते. त्यांनी जी वाट निवडली ती शिक्षणातून येणे अपेक्षित आहे. आज काय सोडायचे असा प्रश्न आला तर सत्य कितीतरी वेळा सोडलेले परवडले. कारण त्याशिवाय सत्तेची वाट चालता येत नाही. आज सामान्य माणूस सहजपणे म्हणणे पसंत करेल “शिर सलामत तर पगडी पचास..” पण जीवनाचा अर्थ म्हणजे सत्य ही जाणीव सॉक्रेटीस यांना झाली होती. त्यामुळे त्यांनी सहजतेने मृत्यू पत्करला. शिक्षणाने नेमकपणाने जीवनाचा अर्थ जाणून द्यायचा असतो.
अनेकदा शिक्षण घेतल्यानंतरही जीवनाचे प्रयोजन लक्षात येत नाही. कितीही पदव्या घेतल्या आणि बुके शिकल्यानंतरही जगण्याचा अर्थ कळत नाही. मात्र ज्यांना अर्थ गवसला ती माणसं जीवनाची वाट अधिक प्रकाशमान करीत चालत असतात. संत तुकाराम महाराजानी त्यांच्याकडून ज्यांनी ज्यांनी कर्ज घेतले होते त्यांच्या हिशोबाच्या लिहिलेल्या अनेक वहया इंद्रायनीत बुडविल्या. दुष्काळात आपल्याकडे जे काही होते ते लोकांना वाटून दिले. जीवनाच्या अंतिम क्षणी सोबत काही येत नाही याची त्यांना पुरेपुर ओळख झाली होती. माणसांने माणसावरती प्रेम करणे हा धर्म असतो. मंदीर, मशिद, गुरूव्दार, चर्चमध्ये तसा कोणताही धर्म नसतो. त्यामुळे धर्मस्थळे नाकारणारी अनेक माणसं अंतरिक ईश्वरवादी असल्याचे दिसते. ते सत्यात,जन सेवेत, कर्मात देव शोधत असतात. त्यांच्या दृष्टीने चांगले जे जे म्हणून असेल ते पेरत राहणे हीच ईश्वराची पूजा. त्यासाठी अट्टहास करीत लोकांमध्ये शहाणपण पेरण्याचे काम शहाणी माणसं करत गेले. त्यांना धनाने मोहित केले नाही.धन, सौंदर्य, तारूण्य या गोष्टी केव्हांकेव्हा संपणा-या आहेत. याची जाणीव असल्याने अऩेकानी आपल्या जीवनाचा प्रवास योग्य दिशेने सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
अर्थात हे काही इतिहासात घडले असे नाही वर्तमानातही असे अनेक माणसं आहेत ते आपल्याजवळ जे आहे ते देण्यात धन्यता मानता आहेत. जे जे म्हणून देण्यासारखे असेल ते देत राहवे ही धारणाच जीवनाच्या यशाचे रहस्य आहे. विनोबांनी आईला विचारले होते “आई देव म्हणजे काय ग..? ” तेव्हा जीवनाच्या शाळेत जीवनाचा अर्थ शोधणारी आई म्हणाली होती, “देतो त्याला देव म्हणतात आणि ठेवतो त्याला राक्षस म्हणतात” . किती मोठा अर्थ त्या आईने एका वाक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम म्हणजे विनोबा नावाचा महापुरूष या मातृभूमीला मिळाला. ही माणसं जगली आणि त्यांनी पुढच्या पिढीसाठी अनेक प्रकाशाच्या वाटा निर्माण केल्या. शिक्षणाचे काम मस्तकात प्रकाश पाडणे हेच आहे. अंतकरणातील बदल घडविणे, हदयाचे परिवर्तन करणे. हे काम विवेकाच्या पातळीवर घडते. त्यासाठी अखंड ज्ञानाची साधना लागते हे लक्षात घ्यायला हवे.
जी माणस ज्ञान उपासक असतात त्यांना धन, संपत्तीचा मोह होत नाही. त्यांना जीवनभर भ्रष्टमार्गाने पैसे मिळवावे वाटत नाही. दुस-याची निंदा, नालस्ती करण्यात त्यांना वेळ वाया घालवावा वाटत नाही. आपली कोणी निंदा केली तरी त्याचा परिणाम त्यांचेवर होत नाही. आपल्या भोवतालचा प्रकाश अधिक मूल्यांचा असावा यासाठी ते प्रयत्न करत राहतात. आपल्या भोवताल मध्ये अज्ञानाचा अंधकार होऊ नये यासाठी प्रयत्न करतात. त्यांना जीवनाचा शोध लागलेला असतो. जेव्हा जगण्याचे प्रयोजन कळते तेव्हा समजावे की, शिक्षण यशस्वी झाले आहे. शिक्षणाचा विचार इतक्या उंचीने करण्याची गरज विचारवंतानी सातत्याने व्यक्त केली होती. मात्र वर्तमानात शिक्षणातून ज्ञानापर्यंतचा प्रवास घडविण्याऐवजी आपला सारा प्रवास माहितीसंपन्नतेने घडतो आहे. त्यामुळे विवेकाचा प्रकाश मस्तकात होताना दिसत नाही. तो ज्ञानाचा प्रकाश मस्तकात पडेल तर अंधश्रध्दा निर्मूलनाची गरजही पडणार नाही. शेवटी अंधश्रध्दा निर्मूलन म्हणजे काय तर विवेकाची पाऊलवाट आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत म्हणतात की,
जैसें डोळ्यां अंजन भेटे । ते वेळीं दृष्टीसी फांटा फुटे ।मग वास पाहिजे तेथ । प्रगटे महानिधी ॥ २३ ॥
ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीने डोळ्यात अंजन घातले की दृष्टी विकसित होते.मग ती व्यक्ती भूमिगत द्रव्याचा सहज सुगावा लागून द्रव्याचा मोठा खजिना दृष्टीला दिसू लागतो. याचा अर्थ जेव्हा ज्ञानाचे अंजन व्यक्तीच्या डोळ्यात घातले जाते तेव्हा त्या जीवना संदर्भाने वरवर असलेल्या अपेक्षा संपुष्टात येतात.व्यक्तीगत सुखापेक्षा समाजाचे सुख मोठे वाटू लागते.भौतिक सुखात त्याचे मन न रमता तो ख-या सुखाच्या शोधात धावू लागतो .म्हणजे अक्षऱ साक्षरतेने मिळणा-या ज्ञानापेक्षा ज्ञानसाधनेने ज्ञान झाल्यानंतर त्याला जीवनाच्या ख-या समाधानाचा शोध लागत जातो.ज्ञान नसताना ज्यात सुख वाटते ते सुख ज्ञान झाल्यावर वाटेनासे होते.त्यामुळे शिक्षणाने निश्चित केलेली ध्येय आणि उददीष्टे साध्य झाली तर समाजातील संघर्ष संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही. शांतीचा मार्ग निर्माण होऊन राष्ट्र निर्मितीची प्रक्रिया होणे सुलभ होईल. शिक्षणाचा हेतू साध्य झाला तर अवघे जगात आनंदाचे तरंग निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.
संदीप वाकचौरे
(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे.)