Friday, November 22, 2024
Homeब्लॉगबीजांकुरता होतो वृक्ष...

बीजांकुरता होतो वृक्ष…

शिक्षणाबाबत जगातील अनेक प्रगत राष्ट्र अंत्यत संवेदनशीलतेने निर्णय घेत असतात. शिक्षणातून उद्याचा समाज आणि राष्ट्र घडत असते.शिक्षण विचार, मूल्य, विवेक, शहाणपण पेरण्याचे काम करते. शेतकरी शेतात पेरणी करताना उद्याची गरज लक्षात घेतो आणि कोणत्या पिकाला भाव अधिक असणार आहे आणि कोणते पीक जमिणीत चांगले येईल याचा शोध घेत पेरणी करत असतो. तसेच शिक्षणाचे असते. उद्याचे राष्ट्र आपल्याला कसे हवे आहे त्याचा विचार शिक्षणाच्या प्रक्रियेत केला जात असतो. त्यादृष्टीने शिक्षणात केली जाणारी पेरणी महत्वाची असते. त्यामुळे शिक्षण प्रक्रियेतून आपण जे काही पेरत असतो, जे बीजारोपन करत असतो त्या बीजाचा उदया वृक्ष होणार असतो हे लक्षात घ्यायला हवे.

शिक्षण प्रक्रियेत झालेली छोटीसी चूक देखील कुटुंब आणि समाजाला बरबाद करू शकते. त्यामुळे आपल्याकडे म्हटले जाते की, इंजिनिअर चुकला तर एखादी इमारत पडेल.. डॉक्टर चुकला तर एखादा रूग्न दगावेल. एखादा वकील चुकला तर एखादा खटला हरला जाईल मात्र, एखादा शिक्षक चुकला तर शेकडो कुटुंबाचे आयुष्यच बिघडले जाईल. शिक्षक जर चुकिची पेरणी करेल तर राष्ट्रासाठी धोक्याचा इशारा आहे. एखाद्या देशाचे नुकसान चुकीच्या अर्थव्यवस्थेच्या निर्णयाने होत नाही त्यापेक्षा अधिक नुकसान चुकीची व गुणवत्ताहीन शिक्षणाची व्यवस्था करत असते. याचा अर्थ शिक्षणाची व्यवस्था किती महत्वाची आहे हे लक्षात घ्यायला हवे. शिक्षणातील पेरणीचा विचार अंधिक गंभीरपणे करण्याची गरज आहे. भौतिक विकासासाठी कोटयावधी रूपयाची पेरणी केली तर फार फार तर इमारती उभ्या राहतील. रस्ते घडतील मात्र त्या पैशातून माणूस उभा राहाणार नाही. हा सारा विकास ज्या माणसासाठी केला जातो आहे तोच माणूस जर घडला नाही तर त्या विकासाच्या चाकांना कोणताच अर्थ उरत नाही. विकासासाठी लागणारी मानसिकता ही शिक्षणातून निर्माण केली जात असते हे लक्षात घ्यायला हवे.

- Advertisement -

आपण चांगले बीज लावले तर त्याला चांगले फुल आणि फळे लागण्याची शक्यता अधिक असते. पेरणी जर चांगल्या बीयांची झाली नाही तर उत्तम उगवन होण्याची शक्यता नसते. त्या अर्थाने शिक्षणातून आपण अधिक चांगले पेरण्याचा प्रयत्न करायला हवा असतो. जगाच्या विकासाचा महामार्ग हा शिक्षणाच्या महाव्दारातून जात असतो. एकदा छोटयाशा झाडाच्या बुंद्याला एका ठिकाणी छोटीशी खूण पडली होती. त्यानंतर तेथे बसणारा साधू चिंता करू लागला. बाकीचे उपस्थित असणारे लो म्हणाले “त्यात काय एवढे .चिंता करण्यासारखे काय आहे त्यात..? छोटीशी तर खूण आहे..” साधूला लोंकाच्या बोलण्याचे फारच आश्चर्य वाटले. साधू म्हणाला “ आज ही छोटीशी खूण आहे. मात्र झाड जसे मोठे होत जाईल तशी तशी ती खूण अधिक मोठी होत जाणार आहे, मला आजच्या छोटयाशा खूणेची चिंता नाही, त्यापेक्षा ‌अधिक चिंता उद्याची आहे”. शिक्षणाचेही तसेच आहे. आज आपण शिक्षणात एखादी छोटीशी चूक केली तर त्यात काय एवढे असे वाटण्याची शक्यता अधिक आहे. मात्र आज केलेली छोटीशी चूक उद्या उदया गंभीर स्वरूप धारण करू शकते हे लक्षात घ्यायला हवे.

आज झालेल्या छोटयाशा चूकीची चिंता नाही करायची असे जरी आपण ठरविले पण, उदया ही चूक राष्ट्राला, समाजाला भोगावी लागू शकते हे लक्षात घ्यायला हवे. चार्ल्स शोभराज नावाचा गुन्हेगार हा शाळेत असताना आपल्या सहकारी विद्यार्थ्यांच्या पेन, पेन्सिली, पुस्तके चोरायचा. त्यावेळी त्याला जर कोणी अडविले असते तर जगाला एवढा मोठा गुन्हेगार मिळाला नसता. खरंतर जगाच्या पाठीवर कोणीच जन्मजात मोठा गुन्हेगार नसतो. त्याची बीजे ही अत्यंत लहान लहान घटनांनी युक्त असतात. ती छोटीशी चूक आपण योग्यवेळी दुरूस्त करू शकलो नाही तर त्या चुकांचा वृक्ष होणार आहे हे निश्चित. तो वृक्ष समाज व राष्ट्रासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे शिक्षक काय पेरतो हे महत्वाचे आहे. शालेय वयातील विद्यार्थ्यांचा जितका विश्वास आई बाबांवर असत नाही त्यापेक्षा अधिक विश्वास हा शिक्षकांवर असतो. अनेकदा एखादी गोष्ट शिक्षकांनी सांगितली आणि ती चुकीची आहे म्हणून आईबाबांनी मुलाच्या लक्षात आणून दिली तर मुले तात्काळ म्हणतात, “आमच्या शिक्षकांनी हे सांगितले आहे.ते बरोबर आहे..तुमचे नाही”. हा विश्वास किती मोठा असतो. त्यामुळे शिक्षक जे पेरत जातात ते उगवते हे महत्वाचे.

कलामाच्या आयुष्यातील पाच शिक्षक या संदर्भात त्यांनी आठवणी लिहिल्या आहेत. त्या शिक्षकांनी त्यांच्या आयुष्याला दिलेले संस्काराने ते जीवनात यशस्वी झाले आहे. शिक्षक बालकाच्या मनात पुस्तकाची पाने अथवा त्यावरील मजकूर पेरत नसतो. त्यावर असलेले शब्द हे तर मुके असतात. त्या मुक्या शब्दांची पेरणीने फार काही नाही होणार. मात्र त्या शब्दांचा अर्थ पेरण्याचे काम शिक्षक करत असतो. त्या शब्दांत प्राण शिक्षक भरत असतो. त्यामुळे ते प्राण भरलेले शब्द बालकांच्या अंतकरणाला स्पर्श करत जातात. त्यातून आपणही शिक्षकांच्या वाटेने जावे असे वाटत जाते. विद्यार्थी हा शिक्षक काय शिकवतात यापेक्षा शिक्षक काय करतात यावर अधिक लक्ष ठेऊन असतात. त्यामुळे त्याच वाटेने जाणे पसंत करत असतात. याचे कारण शिक्षकाचे जगणे, वागणे, चालणे, बोलणे हेच बालकांच्या मनात भविष्याचे बीजे रोवत असतात. अय्यर नावाच्या गुरूजींने पेरलेली स्वप्न कलामाना संशोधकाच्या वाटेपर्यंत घेऊन गेली.

अनेकाच्या आयुष्याला गुरूजींनी दिशा दाखविली आहे.त्याबददल अत्यंत कृतज्ञेतेने अनेकानी लिहिले देखील आहे. खरंतर शिक्षकांच्या आत बरेच काही असते आणि तेच तो पेरत असतो हे लक्षात घ्यायला हवे. आत जे आहे त्या पलिकडे काहीच पेरले जाण्याची शक्यता नसते. त्यामुळे शिक्षकांच्या अंतकरणातील विचाराची बीजे आणि त्यांने पाहिलेली स्वप्ने यामुळे आपल्या समृध्द समाज उभा करता येणार आहे. त्यातून प्रगत राष्ट्र घडणार आहे. शिक्षक किती मोठी व उन्नत स्वप्न पाहातात त्यावर देशाचे भविष्य अवलंबून असते. एकदा अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष बराक ओबामा हे अरब राष्ट्रांच्या दौ-यावर गेले होते. तेव्हा तेथील राष्ट्रप्रमुखानी त्यांच्या देशात बराक ओबामा यांचे भाषण आयोजित केले होते. मात्र त्यांनी ते भाषण तेथील लोकप्रतिनिधींसाठी नाही आयोजित केले तर, ते त्या देशातील शिक्षक, प्राध्यापक, कुलगुरूसांठी आयोजित केले.त्यामागील कारण होते, उद्याचे राष्ट्र निर्माण करण्याचे काम शाळां, महाविद्यालयांच्या खोल्यांमधून घडत असते. त्या खोल्यामध्ये काम करणारी माणसं जे पेरतील तेच उगवणार आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांपेक्षा त्या चार भिंतीच्या आत स्वप्न पेरणारी माणसं अधिक महत्वाची आहेत हे लक्षात घेऊन ओबामा यांच्या दृष्टीकोन बिंबविण्यासाठीचा प्रयत्न म्हणून ते घडत होते.

आपण या लोकांसाठी किती समृध्दतेची वाट निर्माण करतो हे महत्वाचे आहे. ही माणसं वैचारिक दारिद्यात, चिंतेत असतील तर वैचारिक उंचीचा समाज कसा बर घडणार? हेही लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे आपण विकासाच्या नावाखाली मोठया प्रमाणावर खर्च करत आहोत. मात्र तो विकास ज्यांच्यापर्यंत पोहचायला हवा आहे त्या मानसिकतेचा समाज आपण उभा करू शकलो नाही तर त्या विकासाला काहीच अर्थ उरत नाही. आपण रस्ता तयार केला पण तो रस्ता माझ्या देशातील सामान्य माणसांच्या करातून उभा राहीला आहे. त्यामुळे तो खराब होणार नाही याची मीच काळजी घ्यायला हवी. त्यासाठी सरकारवर अवलंबून राहाण्यापेक्षा मीच प्रयत्न करेल. रस्ता खराब होणे याचा अर्थ आहे देशाचा पैसा वाया जाणे. देशात मागण्यांकरीता आंदोलन केले जाते तेव्हा सरकारी बसेस, कार्यालय,सरकारी व्यवस्थेवर हल्ला होत असतो. त्यात आपले काय जाते असे सामान्य माणसाला वाटत जाते. मात्र ते होणारे नुकसान सरकारचे म्हणजे पर्यायांने आपल्या सवांचे आहे हे लक्षात घ्यायला हवे. ही दृष्टी आणि शहाणपण लक्षात येण्यासाठीची पेरणी शिक्षणातूनच केली जात असते. आपण विकासावर खूप खर्च करत असलो तरी दृष्टीकोन निर्माण करणा-या व्यवस्थेकडे होणारी डोळेझाक आपल्याला फार काही साध्या पर्यंत पोहचू देत नाही. त्यामुळे समाज चांगल्या विचारांचा घडायला हवा म्हणजे विकासाचा आनंद आणि सुख उपभोगता येईल.

संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की,

पाहे हा आंरबी बीज एकले../ मग ते विरूढलिया बुड जाहले

बुडी कोंब निघाले/ खांदियाचे

प्रथम एक बीज असते. मग त्याला अंकुर फुटतो आणि बुंधा तयार होतो. त्याला अनेक फांदया फुटतात. त्या फांद्यापासून अनेक फाटे फुटून फळे आणि फुले येतात. एकच बीज किती विस्तारते. अगदी तसे शिक्षणाचे आहे. आपण एक विचार पेरतो, त्या छोटयाशा मूल्य विचांराचा उद्या वटवृक्ष होणार आहे. त्या वृक्षालाच अनेक चांगुलपणाची फळे, फुले लागतील. त्यामुळे शिक्षणातील पेरणीवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. शिक्षणाकडे होणारे दुर्लक्ष म्हणजे आपण आपल्या पायावर धोंडा पाडून घेणे आहे. येथे चुकीचा विचार पेरला तर त्याची कटू पळे देशाला, समाजाला भोगावी लागणार आहेत याचा सतत विचार करायला हवा.

संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण शास्त्राचे अभ्यासक आहे)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या