Tuesday, July 23, 2024
Homeनगरवह्या-पुस्तकांसह शैक्षणिक साहित्य महागले; कच्चा माल अन् वाहतूक खर्च वाढीचा परिणाम

वह्या-पुस्तकांसह शैक्षणिक साहित्य महागले; कच्चा माल अन् वाहतूक खर्च वाढीचा परिणाम

धामोरी । वार्ताहर

- Advertisement -

यावर्षीच्या शैक्षणिक सत्रात नववी, दहावी सह इंग्रजी माध्यमाच्या खालच्याही वर्गातील पुस्तके, वह्या, बॅग, कंपास पेटी, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली यांच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कच्च्या मालाच्या दरात झालेली वाढ व इंधनाच्या वाढलेल्या दराचा आर्थिक फटका विक्रेत्यांबरोबर पालकांना बसत आहे.

गेल्यावर्षी देखील शैक्षणिक साहित्याच्या किमतींमध्ये २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली होती. यंदाही बाजारात शैक्षणिक साहित्याच्या किमतीत १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. नववी व दहावीसाठी लागणाऱ्या दोन्ही पुस्तकांचा विषय निहाय संच उपलब्ध आहे. नववीचा ८ पुस्तकांचा संच हा गतवर्षी ६५० रुपयांना मिळत होता तो आता ७२९ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. दहावीच्या ९ पुस्तकांचा संच ७५० रुपयांवरून ८४४ रुपये इतका झाला आहे.

हे देखील वाचा : धक्कादायक! कृषी विभागाचे बियाणे उगवलंच नाही; शेतकऱ्यांवर कोसळले संकट

कंपास पेटी ७० रुपयांपासून ते १५० रुपयांपर्यंत, जेवणाचा डबा (प्लास्टिक) २० रुपयांपासून ते ३०० रुपयांपर्यंत, पाण्याची बाटली ५० ते २५० रुपयांपर्यंत, दफ्तर २०० ते ७०० रुपये, १०० पानांची वही २५ रुपये, २०० पानांच्या वहीची किमत ३५ रुपये आहे. यंदा ५ ते ७ रुपये प्रतिवही मागे वाढले आहेत. १०० पानांची मोठी वही ४० रुपये, तर २०० पानांची ८० रुपयांना मिळत आहे. प्रत्येक मोठ्या वही मागे १० ते १५ रुपये यंदा वाढले आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा दरात वाढ झाली आहे.

नर्सरी, प्ले ग्रुपमध्ये जाणाऱ्या चिमकुल्यांचा शैक्षणिक खर्च देखील यंदा वाढलेला दिसून येत आहे. विशेषतः लहान मुलांच्या स्कूल बॅग, वॉटर बॅग महागल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक शाळेचे वेगवेगळे कोट व गणवेश आहेत. शाळांनी पालकांना गणवेश व इतर साहित्याची लिस्ट पाठवून दिली आहे. त्यामुळे खरेदीला सुरुवात झाली आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे गणवेश देखील महाग झाल्याचे दिसून येत आहेत.

हे देखील वाचा : पावसाच्या खंडामुळे धाकधूक वाढली; खरीप हंगामाच्या किती हेक्टरवर पेरण्या पूर्ण?

गतवर्षीच्या तुलनेत यंदा शैक्षणिक साहित्याच्या भावात थोडीशी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे लहान मुलांच्या शैक्षणिक साहित्याच्या किमतीत दरवर्षी काही ना काही वाढ होत असते. प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यावर या साहित्यांच्या खरेदीमध्ये वाढ झाली आहे.

इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या मुला-मुलींच्या शैक्षणिक साहित्याचे दर वाढल्याने बजेटवर परिणाम होत आहे. सरकारचे महागाईवर नियंत्रण नसल्याचे दिसून येते. दिवसेंदिवस शिक्षणाचा खर्च करणे पालकांना असह्य होत आहे.

गोरख दरेकर, पालक

जिल्हा परिषदेच्या शाळेत मोफत दर्जेदार शिक्षण मिळत असून शहर असो की ग्रामीण भागातील पालकांनी आपल्या पाल्यांना जवळच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतच प्रवेश घ्यावा, शासन जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून मोफत व दर्जेदार शिक्षण देत आहे.

चंद्रशेखर कडवे, मुख्याध्यापक
- Advertisment -

ताज्या बातम्या