Wednesday, July 3, 2024
Homeनगरपुणेवाडीत वीज पडून आठ शेळ्या दगावल्या

पुणेवाडीत वीज पडून आठ शेळ्या दगावल्या

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

- Advertisement -

आज पारनेर तालुक्यातील टाकळी मानुर परिसरात वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील विविध गावांमध्ये शुक्रवारी (दि.10) दुपारी दीड वाजेच्या सुमारास, वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. दरम्यान तालुक्यातील पुणेवाडी येथे वीज पडून श्रीनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शांताराम सोनवणे यांच्या सुमारे दोन लाख रुपये किंमतीच्या आठ शेळ्या दगावल्या. जवळच असलेले सोनवणे सुदैवाने बालंबाल बचावले.

दरम्यान पुणेवाडी पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हात्तलखिंडी परिसरातील ओढे, नाले पहिल्याच पावसात दुथडी भरून वाहू लागले. वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने पारनेरसह, पुणेवाडी, हात्तलखिंडी, विरोली, वडझिरे, जाधववाडी, राऊतवाडीसह विविध गावांतील केशर आंब्यासह इतर सुधारीत वाणांच्या आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. काढण्यास आलेली आंब्याची फळे मोठ्या प्रमाणावर गळून पडली. पुणेवाडी येथील शांताराम सोनवणे आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाखाली बसले होते. जवळच त्यांच्या नऊ शेळ्या चरत होत्या. दुपारी दीड वाजेच्या सुमारास वादळी वार्‍यासह विजांचा कडकडाट सुरू झाला.

पावसाच्या शक्यतेने सोनवणे जवळच असलेला कांदा झाकण्यासाठी गेले. तर विजांच्या आवाजामुळे घाबरलेल्या आठ शेळ्या आंब्याच्या झाडाखाली जमल्या तेवढ्यात आंब्याच्या झाडावर वीज पडल्याने विजेच्या धक्क्याने सर्व आठ शेळ्या मृत्यूमुखी पडल्या. कांदा झाकण्यासाठी गेलेले सोनवणे व दुसर्‍या झाडाखाली थांबलेली एक शेळी सुदैवाने बालंबाल बचावले. घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद रेपाळे व कामगार तलाठी सपना खोचे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या