लोणी |वार्ताहर| Loni
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यात एकल महिलांसाठी सुरू केलेल्या उपक्रमाचे कौतुक करून महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी अंमलबजावणीची माहिती जाणून घेतली. एकल महिलांच्या उत्कर्षासाठी अहिल्यानगर जिल्ह्याने विशेष पुढाकार घेतला आहे. ना. आदिती तटकरे यांनी लोणी येथील ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा कार्यालयास सदिच्छा भेट दिली. ना. विखे पाटील यांच्यासह डॉ. विखे पाटील, कारखान्याचे व्हा. चेअरमन सोपानराव शिरसाठ, प्रवरा बँकेचे व्हा. चेअरमन मच्छिंद्र थेटे यांनी स्वागत केले. आ. काशिनाथ दाते, आ. अमोल खताळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अतिरीक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्यासह महिला व बाल कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात महिला व बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेताना ना. विखे पाटील यांनी जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती देताना जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून एकल महिलांच्या उत्कर्षासाठी सुरू केलेल्या कामाची माहिती ना.आदिती तटकरे यांना दिली. जिल्ह्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 1 लाख 27 हजार एकल महिलांची संख्या आढळून आली. यासाठी समिती गठीत करण्यात आली असून महिलांच्या आवडीनुसार उमेद अभियान, महिला बचतगट, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने प्रशिक्षण देवून प्रोत्साहन दिले जात आहे. आतापर्यंत एक हजाराहून अधिक महिलांना आर्थिक सक्षम करण्यात यश आल्याची माहिती ना. विखे पाटील यांनी ना. तटकरे यांना दिली.
महिला व बाल कल्याण विभागाच्या कार्यालयाकरिता 32 गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात आली असून जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून 12 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. महिला व बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभारण्यात येणार असून अहिल्यानगर जिल्ह्यातील भवनही त्या दृष्टीने उभारण्यात यावे. यासाठी पुण्यातील भवनाच्या इमारतीचा आराखडा पाहण्याच्या सूचना मंत्री तटकरे यांनी महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकार्यांना केल्या.




