Saturday, November 23, 2024
Homeजळगाव…यामुळे खडसेंचेच नुकसान ! – फडणवीस

…यामुळे खडसेंचेच नुकसान ! – फडणवीस

मुंबई  – 

भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी काल गोपीनाथ गडावरून केलेल्या आरोपांवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर दिले आहे. खडसे हे काय बोलले त्याच्यावर मी भाष्य करणार नाही, मात्र खडसे जे बोलले ते बोलायला नको होते असे फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. फडणवीस यांनी पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केल्याचे आरोप खडसे यांनी गोपीनाथगडावरुन केले होते. नाथाभाऊ अनेकदा असे बोलतात ते त्यांच्या मनात नसते पण ते बोलून जातात. मात्र यामुळे त्यांचेच नुकसान होते, असेही फडणवीस म्हणाले.

खडसे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाबाबत केलेल्या आरोपावर बोलताना ते म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक झाले नाही असा आरोप करण्यात आला.

मात्र या आरोपात काही तथ्य नाही कारण गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे डिझाईन तयार होण्यात काहीसा वेळ गेला. ते झाल्यानंतर त्या स्मारकाला सिडकोतून निधी देण्यात आला आणि त्याचे वर्क ऑर्डरही आली. खडसे यांनी उद्धवजींकडे पैसे मागण्याची गरज नाही, त्यांनी स्थगिती दिली असेल तर वेगळी गोष्ट आहे असाही टोला फडणवीस यांनी लगावला.

भाजपा सरकारने गोपीनाथ मुंडे यांच्या चांगल्या स्मारकासाठी 46 कोटींचा निधी मंजूर केला. त्याच्या कामाची सुरुवात होते आहे. आचारसंहिता लागू झाली त्यामुळे काम थांबले. लोकसभा निवडणुकीच्या आधीच स्मारकाचे टेंडर निघाले आहे असंही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

यावेळी फडणवीस यांनी भाजपा हा ओबीसींचाच पक्ष आहे आणि कायम ओबीसींचा पक्ष राहिल असं देखील म्हटलं आहे. सर्वाधिक ओबीसी मंत्री भाजपाच्या सरकारमध्ये होते.

ओबीसी मंत्रालय स्थापन झालं तेदेखील भाजपाच्याच सरकारमध्ये असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच आमच्या काळात ओबीसी मंत्री झाले तेव्हा ते ओबीसी होते म्हणून झाले नाहीत, तर त्यांच्या क्षमतेमुळे ते मंत्री झाले. एवढंच नाही तर भाजपमध्ये मी माझा एकही गट तयार केला नाही. भाजपचे सगळे आमदार आमचेच आहेत असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले.

खडसे महाआघाडीच्या संपर्कात?

भाजपमध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे महाआघाडीच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. पक्षाकडून दखल घेतली जात नसल्यामुळे खडसे नाराज आहेत.

गोपीनाथ गडावर काल एकनाथ खडसेंनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केली. नाराज खडसे पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत असल्याची माहिती आहे. गोपीनाथ गडावरील भाषणात देखील त्यांनी याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर

राष्ट्रवादी काँग्रेसनेही खडसे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. सुनील तटकरे यांनी शुक्रवारी तसे सांगितले. यावेळी त्यांनी म्हटले की, एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत आल्यास त्यांचे स्वागतच होईल.

त्यांच्या अनुभवाचा फायदा राष्ट्रवादीला होईल. खडसे यांच्यामागे मोठा समाज आहे. त्यामुळे खडसे ज्या पक्षात जातील त्यांना फायदाच होईल, असे तटकरे यांनी सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या