जळगाव –
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे हे महिनाभरात पक्ष सोडण्याच्या तयारीत असून
दुसर्या पक्षात काय पद मिळते, केवळ याची प्रतिक्षा आहे असा संवाद असणारी ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर आरोप झाल्याने त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांनी थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षातील काही जणांना षडयंत्राचा आरोप केला होता. तेव्हापासून खडसे हे पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीतही स्थान न दिल्यामुळे त्यांची नाराजी अधिकच वाढली. त्यात त्यांना काही कार्यकर्ते फोन करून योग्य निर्णय घ्या अशी मागणी करीत आहेत.
अशाच प्रकारे भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील रोशन भंगाळे या एका कार्यकर्त्याने एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधून पक्ष सोडण्याविषयी चर्चा केली. या चर्चेची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
दरम्यान, याबाबत खुलासा करत ही चर्चा निरर्थक असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे. तो कॉल चुकीचा आहे. अशा बाबी गांभीर्याने घेण्याची गरज नाही. दिवसभर शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अनेक कॉल येतात, भाऊ भूमिका घ्या, असा आग्रह धरतात असे खडसे यांनी स्पष्ट केले आहे.
असा आहे व्हायरल संवाद
रविंद्र भंगाळे : भाऊ आता राष्ट्रीय कार्यकारणीतही डावलण्यात आल्याने पक्ष सोडा व योग्य निर्णय घ्या.
एकनाथ खडसे : हो निर्णय घ्यायचा आहे. दुसरीकडे काय पद मिळते, ते तर बघू दे. दुसरीकडे जाऊन का नुसतेच बसायचे, काही तरी पद मिळाले पाहिजे की नाही, असे सांगत महिनाभरात निर्णय घेऊ.