मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर सुरू असल्याच्या चर्चा आहे.आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित झाले. एकनाथ शिंदे यांनी यावेळी महायुतीमध्ये सुरू असलेल्या वादाच्या चर्चेवर मौन सोडले.
मुंबईत माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, सत्तेच्या खुर्चीसाठी २०१९ मध्येच त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना डॅमेज केले. हिंदुत्वाला डॅमेज केले. शिवसेनेला डॅमेज केले. आता आभाळ फाटलंय त्याला कुठे कुठे ठिगळ लावणार? महाविकास आघाडीसारखा आमचा खुर्चीचा अजेंडा नाही तर महायुतीचा अजेंडा हा सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये बदल घडवणे आणि त्यांना न्याय देणे, राज्याला पुढे नेणे आहे असं त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे समांतरपणे राज्याचा कारभार करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, या राज्याचा विकास करणे हाच महायुतीचा अजेंडा आहे.महायुतीमध्ये कोणतीही समांतर यंत्रणा नाही. उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायत्ता कक्षात वैद्यकीय मदतीचे जे अर्ज येतील, त्यांना मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्ड वॉर नाही तर…
तसेच राज्यातील महत्वाच्या पायाभूत सेवा प्रकल्पांचा आढावा घेणारी एकच वॉर रुम आहे. नवीन व़ॉर रुम उघडली नाही. शिवसेनेच्या मंत्र्यांकडील खात्यांचा आढावा घेण्यासाठी समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. हा कक्ष व़ॉर रुमशी संलग्न आहे. त्यामुळे महायुतीत कोल्ड वॉर नाही तर महाराष्ट्र विकास विरोधी लोकांशी वॉर आहे असा खोचक टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.
हाच महायुतीचा अजेंडा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे म्हटले की, शासन निर्णय ३१ ऑक्टोबर २०२३ नुसार उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या राज्याचा विकास करणे हाच महायुतीचा अजेंडा आहे. महायुतीमध्ये कोणतीही समांतर यंत्रणा नाही. उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायत्ता कक्षात वैद्यकीय मदतीचे जे अर्ज येतील, त्यांना मदत केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी काहीजण मुख्यमंत्री असताना एकदाच मंत्रालयात आले होते याची आठवण उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी करुन दिली.
तुम लढो हम कपडा संभालता है विचारांचा नाही
शिवसेना पक्ष हा बाळासाहेबांच्या विचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. हा पक्ष कार्यकर्त्यांना बळ देणारा आहे. तुम लढो हम कपडा संभालता है या विचारांचा नाही. आज शिवसेनेत मोठ्या संख्येने लोक येत आहेत त्यांचे आम्ही स्वागत करतोय पण ज्यांना सोडून लोक जात आहेत त्यांनी त्यावर आत्मपरीक्षण करायला हवे असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा