मुंबई | Mumbai
एकनाथ शिंदे हे नरेंद्र मोदी यांच्या डस्टबीनमध्ये होते. आम्हाला कळलेच नाही, अशी टीका शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. याला एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत बोलताना उत्तर दिले असून चांगलाच समाचार घेतला आहे. काही लोक मिस्टर बिन आहेत. मिस्टर बिन आहेत ना, सर्वसामान्य शिवसैनिकांना कचरा समजण्याची जी वृत्ती आहे त्यामुळेच सगळेजण गेले. कचऱ्यातून जी एनर्जी निर्माण झाली त्याचा हायव्होल्टेज शॉक बसला आहे, असा टोला एकनाथ शिंदेंनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
डस्टबीनमध्ये कोण बसले होते ते कुणी पाहिले नाही. पण बाहेर आल्यावर घाम कुणाला फुटला हे पाहिले, तीन ग्लास पाणी प्यायले, चहा मागवा सांगितले. चहा कुठला होता? वाघबकरी चहा. मला जास्त बोलायला लावू नका. बात निकली तो दूर तक जाएगी. असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
पुढे शिंदे म्हणाले, विरोधक दररोज सकारात्मक गोष्टींकडे, विकासाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहेत. संविधान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा विरोधकांकडून नेहमी मारल्या जातात. पण संविधानावर कारभार आम्ही करत आहोत. असे म्हणत महाविकास आघाडीच्या कार्यकाळात काय घडले त्याचा पाढाच एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेत वाचला.
“मर्चंट नेव्हीच्या अधिकाऱ्याला मारताना कुठे होते तुमच्या हातातले संविधान? प्रदीप मोरेला मारले तेव्हा संविधान कुठे होते? केतकी चितळेला तुरुंगात डांबले तेव्हा संविधान कुठे होते? मलिष्काच्या गाण्यामुळे तुम्हाला पोटदुखी झाली तेव्हा संविधान कुठे होते? हनुमान चालीसा म्हंटली म्हणून राणा दाम्पत्याला तुरुंगात धाडले तेव्हा संविधान कुठे होते? खोट्या केसेस करुन देवेंद्र फडणवीसांना तुरुंगात पाठवण्याचे षडयंत्र रचले तेव्हा कुठे होते संविधान? उद्योजकाच्या घरासमोर बॉम्ब पेरताना कुठे होते संविधान? वाझे हा काही लादेन नाही म्हणताना संविधान आठवले नाही का? नारायण राणेंना अटक करताना संविधान आठवले नाही का? कंगनाच्या ऑफिसवर बुलडोझर चालवला तेव्हा कुठे होते संविधान? फडतूस म्हणाले त्यांच्या पायाशी लोटांगण घालताना संविधान कुठे होते?” असे प्रश्न एकनाथ शिंदेंनी उपस्थित केले.
कोण काम करतय हे लोकांनी दाखवून दिले
एकनाथ शिंदे म्हणाले, “कार्यकर्त्यांनो पेटवा मशाल आम्ही बंगल्यात झोपतो खुशाल..बाळासाहेब ठाकरे कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहायचे. त्यामुळे शिवसेना उभी राहिली. मात्र, रोज आरोप केले जातात. परंतु, कोण काम करतेय, हे लोकांनी दाखवून दिले आहे.”
डांबरात हात काळे करण्याची संधी मिळणार नाही
“मुंबईत सिंमेटचे रस्ते होत असताना अनेकांना जळफळाट होतोय. ७०१ किलोमीटर रस्त्यांचे काम सुरू आहे. आता मुंबईकरांची थोडी गैरसोय होतेय. पण, ३० वर्षे मुंबई खड्डेमुक्त होणार आहेत. गेली १० ते १५ वर्षे रस्ते दुरूस्तीच्या नावाखाली तीन हजार कोटी रूपये लोकांचे वाया गेले. याला जबाबदार कोण? आता डांबरात हात काळे करण्याची संधी मिळणार नाही. राजाचा जीव पोपटात असतो, तसा काहींचा जीव मुंबईच्या रस्त्यात आहे. सिंमेंटच्या रस्त्याची चौकशी करावी, अशी काहीजण मागणी करतायेत. चौकशी तर झालीच पाहिजे. परंतु, १५ वर्षांत डांबरचे सांबर कुणी खाल्ले, हे सुद्धा समोर आले पाहिजे,” असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा