मुंबई | Mumbai
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोकणात मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ख्याती असलेले नेते राजन साळवी यांनी अखेर ठाकरेंची अधिकृतपणे साथ सोडली आहे. साळवी यांनी ठाकरेंच्या पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजन साळवी लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिला.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
“जे लोकं येतील त्यांचे स्वागतच आहे. कारण गेल्या अडीच वर्षात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या विचारांच्या शिवसेनेत आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषदेतील अनेक नेते शिवसेनेत दाखल झाले. बाळासाहेबांची शिवसेना पुढे न्यायची आहे. वाढवायची आहे म्हणून बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार आम्ही स्थापन केले. आम्ही अडीच वर्षे काम केले. हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे लोकं कामावर विश्वास दाखवत आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, हे काम करणारे सरकार आहे, घरी बसणारे नाही. हे रिझल्ट देणारे सरकार आहे. प्रत्यक्ष मैदानात उतरून २४ तास ७ दिवस काम करणारे सरकार आहे. मी मुख्यमंत्री असताना, एवढे निर्णय केले, एवढे प्रकल्प मार्गी लावले, लोकाभिमुख कल्याणारी योजना आणल्या. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडका ज्येष्ठ असे अनेक निर्णय आम्ही घेतले. विकासाचा अजेंडा पुढे घेऊन सरकार आणि शिवसेना जात आहे. यामुळेच अनेक जण शिवसेनेत येत आहेत. त्या सर्वांचे स्वागत करतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
त्यांच पोटशूळ उठलेले आहे
“अतिशय दुर्दैवी वक्तव्य आहे. महादजी शिंदे महापराक्रमी योद्धा होते. त्यांनी दिल्लीच्या तख्तावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा डौलाने फडकवला. त्या महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या नावाचा राष्ट्रगौरव पुरस्कार माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिला हे माझे भाग्य आहे. पण हे सर्व विरोधक आहेत त्यांचे पोटशूळ उठलेले आहे. ते द्वेषाने पछाडलेले आहेत. त्या द्वेषात ते काय बोलतात हेही त्यांना कळत नाही. त्यांनी महादजी शिंदे यांचा अपमान केलाय. एका महापराक्रमी योद्ध्याचा अपमान केलाय. त्याचबरोबर साहित्यिकांना दलाल म्हटले आहे”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासूनच राजन साळवी यांच्या पक्षांतराच्या चर्चांना तोंड फुटले होते. पण, त्या त्यांनी फेटाळून लावल्या होत्या. शिवसेना फुटीनंतरही साळवी ठाकरेंसोबत राहिल्याने त्यांना मातोश्रीचे निष्ठावंत समजले जात होते. पंरतु पक्षातीलच स्थानिक नेत्यासोबत खटके उडाल्याने ते नाराज होते.मिळालेल्या माहितीनुसार, राजन साळवी हे गुरूवारी म्हणजे १३ फेब्रुवारी रोजी दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित पक्ष प्रवेश करणार आहेत. परंतु, राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाबाबत सामंत बंधू नाराज असल्याची चर्चाही आहे. त्यावर आता एकनाथ शिंदे कसा मार्ग काढतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा