मुंबई | Mumbai
स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराने (Kunal Kamra) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर विडंबनात्मक गाणं रचून ते शोमध्ये सादर केल्याने नवा वाद उफाळला आहे. या गीताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान झाल्याचा दावा करत शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खार येथील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील हॅबिटॅट स्टुडिओची नासधूस केली, तर मुंबई महापालिकेनेही (Mumbai NMC) योग्य मुहूर्त साधत हॉटेल आणि स्टुडिओच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली.
या प्रकरणावर राज्यभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते बीबीसी मराठीने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “मी आरोपांवर उत्तर देत नाही. मी आरोपांवर कामाने उत्तर देतो. त्याचा फायदा आरोप करणाऱ्यांना लोकांनी घरी बसवलं आणि काम करणाऱ्यांना लोकांनी सत्ता दिली. आम्हाला जनतेने ८० पैकी ६० जागा विजय मिळवून दिला. मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेला (Shivsena UBT) केवळ २० जागा निवडून आणता आल्या”, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरअर्थ आणि गैरफायदा घेण्यात आला. मी विडंबन समजू शकतो. विडंबन अनेक कवी करायचे. पण हे व्यभिचार, स्वैराचार आणि सुपारी घेऊन बोलण्याचे काम आहे. माझ्यावरील आरोपांकडे मी दुर्लक्ष केले. मी यासंदर्भात कोणालाही प्रतिक्रिया दिली नाही. पण कार्यकर्त्यांच्या भावना असतात. पण याच माणसाने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्याबाबत काय म्हटलं बघा, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत काय म्हटलं, लाडकी बहीण अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविषयी काय म्हटलं बघा, पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याबरोबर भांडला त्यामुळे त्याला दोन तीन एअरलाईन्समध्ये बाहेर केलं. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. हे कोणाची सुपारी घेऊन आरोप केलेले आहेत, त्यामुळे मी काही प्रतिक्रिया दिली नाही. मी बोलणार सुद्धा नाही, मी काम करणारा माणूस आहे”, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
तसेच तुमच्या कार्यकर्त्यांनी (Worker) केलेली तोडफोड योग्य आहे का? याबाबत विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले की, “मी तोडफोडीचे समर्थन करत नाही. समोरच्याने देखील आरोप करताना कुठल्या स्तराला जातो, हे बघितले पाहिजे. अॅक्शनला रिअॅक्शन असते, मी संवेदनशील आहे. मला सहन करण्याची खूप ताकद आहे. मी कुणालाही बोलत नाही. शांत राहणे, काम करणे, कामावर फोकस केंद्रीत करणे आणि लोकांना न्याय देण्याचे काम मी करतो. त्यामुळेच देदिप्यमान असे यश आम्हाला मिळाले”, असेही त्यांनी सांगितले.