मुंबई । Mumbai
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला निर्विवाद बहुमत मिळालं असून गुरुवारी (५ डिसेंबर) देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर, एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
राज्यात सरकार स्थापन झालं असलं तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार बाकी आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे अनेकाचं लक्ष लागलं आहे. सध्या सर्व खाती ही एकट्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहेत. दुसरीकडे, भाजपा आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गृहमंत्री पदासाठी रस्सीखेच चालू असल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, विधानपरिषदेचे महायुतीचे सभागृह नेता म्हणून एकनाथ शिंदे होण्याची शक्यता आहे. सध्या देवेंद्र फडणवीस हे विधानपरिषदेचे सभागृह नेता आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री हा दोन्ही सभागृहाचा नेता असतो. कामकाजाच्या सोयीसाठी हे पद नियमानुसार मंत्री महोदयाकडे जाऊ शकते. शिंदे हे मंत्री झाल्यावर सभागृहातील त्यांना कामकाजात सहभागी होता येईल. परंतु त्यांना मतदानाचा अधिकार नसेल.
प्रोटोकॉलनुसार महायुती सरकारमध्ये एक नंबरला देवेंद्र फडणवीस आहेत. त्यानंतर दोन नंबरला एकनाथ शिंदे आणि तीन नंबरला अजित पवार आहेत. एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्या क्रमांकावर शपथ घेतली आहे. त्यानुसार त्यांच्याकडे हे पद गेल्यास काही वावगं ठरत नाही. दुसरीकडे, महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महापरिषदेची मोठी बैठक होऊ शकते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात मंत्रिमंडळ खात्यांबाबत चर्चा होणार आहे. यानंतर 11 किंवा 12 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपकडे गृहखाते मागितल्याचा शिवसेना आमदार भरत गोगावले यांचा दावा खरा नसून विभागांच्या विभाजनाबाबत चर्चा सुरू आहे.