मुंबई । Mumbai
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप अजूनही पूर्णपणे जाहीर झालेले नाही. भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. काल शिवसेनेकडून ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ९ मंत्र्यांचा आणि बहुतांश आमदारांचा समावेश आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यापूर्वी गुवाहाटीला दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब गुवाहाटीमधील कामाख्या देवीचे दर्शन घेतले आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा तिसरा गुवाहाटी दौरा आहे. या दौऱ्यानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांनीही उधाण आलं आहे.
गुवाहाटी पोहोचताच एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना आम्ही कामाख्या देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी गुवाहाटीला आलो असल्याचे त्यांनी सांगितलं. तसेच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून दुसरी यादीही लवकरच जाहीर होईल, अशी माहिती त्यांनी दिली. पुढे बोलताना त्यांनी विधानसभा निवडणुकीत विजयाचा विश्वासही व्यक्त केला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विजय निश्चित आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्रात मोठे राजकीय भूकंप झाला होता. शिवसेनेत उभी फुट पडली होती. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठे बंड पुकारत आपल्यासोबतच्या सर्व आमदारांना गुवाहाटीत नेले होते. तिथे काही दिवस प्रचंड अभूतपूर्व अशा नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर घडून आले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत एकत्रित येऊन राज्यात सरकार स्थापन केले आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी पुन्हा गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीची पूजा केली होती. त्यावेळी, त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे आमदार देखील होते. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे आता पुन्हा गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेतले आहे.