मुंबई | Mumbai
सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येत असल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधकांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्न आणि आरोपांना आज गुरुवारी (दि.१७ जुलै) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत उत्तर दिले. ‘कुणावर भ्रष्टाचाराचे आरोप करता?’ असे शिंदे यांनी म्हणत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
मिठी नदीतला गाळ काढण्याचे कंत्राट मराठी माणसाला का दिले नाही, असा सवाल करत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत विरोधकांवर भडकले. आता त्या डिनोने तोंड उघडले तर कितीतरी लोकांचा मोरया होईल, असा इशारा शिंदेंनी दिला. विरोधकांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर त्यांनी उत्तर दिले. “काँक्रीटचे रस्ते केल्यानंतर त्यात 25 वर्षे दुरुस्ती करावी लागत नाही. मग दरवर्षी दुरुस्ती करून, काळ्याचे पांढरे करून, त्यामध्ये दुरुस्तीची कामे काढून पैसे लुबाडण्याचे काम कोण करत होते? आम्ही तर डीप क्लीन ड्राइव्हने रस्ते धुवायला गेलो, तुमच्या लोकांनी तर तिजोऱ्या धुतल्या,” अशी खरमरीत टीका त्यांनी विरोधकांवर केली.
जो खुद शिशे के घर मे रहते है…
आम्हाला पण बोलायला येते, मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम कोणत्या ठेकेदाराला दिले होते? मग त्या ठिकाणी मराठी माणूस दिसला नाही का? मग तर त्या कामासाठी डिनो मोरिया दिसला. आता जर त्या डिनोने तोंड उघडले तर कितीतरी लोकांचा ‘मोरया’ होईल”, आरोप करताना असे करा.. जो खुद शिशे के घर मे रहते है, वो दुसरों पर पत्थर नहीं फेका करते. जेव्हा तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप करता, तेव्हा तुम्हाला आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. टेंडर टेंडर करून मुंबईला विकणारा वेंडर कोण, ते पण सांगा. सगळी यादी काढा, मग मराठी माणसाबद्दल बोला.” असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे.
मविआच्या काळात मराठी माणसाला ठेंगा दाखवण्याचे काम
मतदानाच्या आधी म्हणायचे मराठी- मराठी आणि निवडून आल्यावर म्हणायचे कोण रे तू? अशीही शिंदे यांनी टोलेबाजी करत ठाकरेंवर निशाणा साधला. महाविकास आघाडीच्या काळात सर्व ठप्प होते. मराठी माणसाला ठेंगा दाखवण्याचे काम केले. काही लोकं नेहमी म्हणतात मुंबई तोडणार. पण आम्ही मुंबई तोडण्याचे नाही तर जोडण्याचे काम करतोय. मी इतिहासात जात नाही. कोणी स्थगिती आणली? कोणी काय केले?, अशी टीका शिंदेंनी ठाकरेंवर केली. आमच्यासाठी मुंबईकर फर्स्ट आहेत. काहींसाठी कंत्राटदार…. अशी टीकाही त्यांनी आदित्य ठाकरेंवर केली.
काहींनी सोन्याची अंडी देणारी पालिका समजून
“मुंबईतील सफाई कर्मचाऱ्यांसाठी आपण एक योजना देखील सुरू केली. पण काहींनी सोन्याची अंडी देणारी पालिका समजून मुंबईत काही लोकांनी काम केले. तसेच गिरणी कामगारांच्या लोकांच्या प्रश्नाबाबत आजपर्यंत कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. पण त्याच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पण पत्राचाळ, बॉडी बॅग, खिचडी कंत्राटामध्ये कोणी पैसे खाल्ले”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. सभागृहात ठाकरे गटाच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांना आणि टीकेला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




