मुंबई । Mumbai
महाविकास आघाडीतील एकाही पक्षाकडे विरोधीपक्ष नेतेपदाची खुर्ची मिळण्याइतके संख्याबळ नाही. त्यामुळे विरोधकांची स्पेस खाण्याची महायुतीची तयारी सुरु आहे का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर ट्वीट करत खळबळ उडवून दिली आहे. एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते होणार का? असा प्रश्न दमानियांनी उपस्थित केला आहे.
अंजली दमानिया यांनी दोन पोस्ट टाकून सत्तास्थापनेबाबत वेगळाच दावा केला आहे. त्या म्हणाल्या, विरोधी पक्षच संपवण्याचा हा भाजपचाच का कट आहे का? सत्ता पण आमचीच आणि विरोधी पक्ष पण आमचाच. बाकी पक्ष / विरोधी पक्ष नेते अस्तित्वात ठेवायचे नाहीत. गावी जाणे, ताप येणे, पुन्हा घरी येणे, पुन्हा बरे न वाटणे ही भाजपाची स्क्रिप्ट वाटते.
या दमानिया यांनी आणखी एक पोस्ट केली आहे. ज्यात त्या म्हणतात, एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? परवाच संध्याकाळी, आमच्या काही कार्यकर्त्यांना मी एक पत्रकार भाऊंशी झालेला संवाद सांगत होते. ४ दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन भाजपाला समर्थन देणारे शिंदे अचानक गावी गेले, मग ताप काय आला, मग घरी काय आले, दाल मे कूछ काला है.