मुंबई । Mumbai
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेणार की नाही यावर कालपर्यंत बराच सस्पेन्स कायम होता, मात्र अखेर काल संध्याकाळच्या सोहळ्यात त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्याला पुन्हा दोन उपमुख्यमंत्री लाभले आहेत.
पण आता याच शपथविधी सोहळ्यावरून आणि उपमुख्यमंत्री पदावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेत संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावीच लागणार होती. त्यांच्याशिवाय भाजपने शपथविधीचा तयारी केली होती, ही माझी माहिती आहे, असे विधान संजय राऊत यांनी केलेय. संजय राऊत दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला.
तसेच, शिंदेंचं युग संपले आहे. दोन वर्षांचं होतं. त्यांची गरज होती, ती पूर्ण झाली आहे; आता त्यांना फेकून देण्यात आले आहे. आता शिंदे या राज्यात कधीच मुख्यमंत्री बनणार नाहीत. हे लोक शिंदेंचा पक्षही फोडू शकतात. भाजपची राजकारणात कायम ही भूमिका राहिली आहे. जे लोक त्यांच्यासोबत काम करतात, त्यांचा पक्ष फोडतात. संपवतात, असे राऊत म्हणाले.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, आजपासून देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होतील. त्यांच्याकडे बहुमत आहे. बहुमत असूनही १५ दिवसांपासून हे सरकार स्थापन करू शकले नाही. याचा अर्थ असा आहे की, पक्षात किंवा त्यांच्या महायुतीमध्ये काही ना काही गडबड आहे. आणि उद्यापासून ही गडबड आपल्याला दिसायला लागेल, असे म्हणत राऊतांनी महायुतीत धुसफूस सुरू असल्याचा दावा केला. हे सगळे महाराष्ट्र किंवा देशाच्या हितासाठी काम करत नाहीयेत. हे आपापला जो स्वार्थ आहे, त्या स्वार्थासाठी हे लोक एकत्र आलेले आहेत. आणि सरकार चालवण्याची भाषा करतात, त्यात महाराष्ट्राचं हित काहीच नाहीये, असे म्हणत राऊतांनी महायुतीच्या प्रमुख नेत्यांवर टीका केली.