Thursday, September 12, 2024
Homeमुख्य बातम्याभुताळा-डाकीण ठरवलेल्या दाम्पत्याची आरोपातून मुक्तता

भुताळा-डाकीण ठरवलेल्या दाम्पत्याची आरोपातून मुक्तता

नाशिक । प्रतिनिधी Nashik

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्ते या आदिवासी खेड्यातील अंधश्रद्धेतून भुताळा-डाकीण ठरवलेल्या भीमा बारकू तेलवडे व त्यांच्या पत्नी भागीबाई भीमा तेलवडे या वृद्ध दाम्पत्याची अंनिसने आरोपातून मुक्तता केली आहे.

- Advertisement -

भीमा बारकू तेलवडे व त्यांच्या पत्नी भागीबाई भीमा तेलवडे यांना त्यांच्या भाऊबंदकीतील काही व्यक्तींनी फेब्रुवारी महिन्यात अंधश्रद्धेतून भुताळा- डाकीण ठरवल्याची तक्रार महाराष्ट्र अंनिसच्या नाशिक जिल्हा शाखेकडे प्राप्त झाली होती. त्यावेळी पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांना भेटून, जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम सादर झालेल्या एफ.आय.आर.मध्ये लावण्याची मागणी महाराष्ट्र अंनिसने केली होती.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

मात्र, तेलवडे कुटुंबीयांचा त्रास कमी न झाल्यामुळे मंगळवारी (दि.18) हरसूल, पोलीस स्टेशनचे ए. पी.आय.गणेश म्हस्के साहेब यांच्या तीन सहकार्‍यांसह महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य सदस्य प्रल्हाद मिस्त्री, नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. श्यामसुंदर झळके, त्र्यंबकेश्वर शाखेचे कार्याध्यक्ष संजय हरळे ,नाशिक शहर शाखेच्या कार्यकर्त्या विजया गोराणे हे सर्व कळमुस्ते (हरसूल) ह्या आदिवासी गावात पोहोचले. पीडित कुटुंब आणि सामनेवाले यांना समोरासमोर आणून दोन्ही बाजूंकडील म्हणणे त्यांनी ऐकून घेतले. यावेळी गावचे सरपंच हिरामण चावरे, पोलीस पाटील चिंतामण शिंदे हेही उपस्थित होते.

त्यानंतर महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी डाकिण- भुताळीण या अनिष्ट, अघोरी प्रथेबद्दल आणि एकूणच आदिवासी भागातील अंधश्रद्धा याबद्दलची कारणमीमांसा स्पष्ट केली. डॉ. गोराणे यांनी काही चमत्कार प्रात्यक्षिके सादर करून लोकांचे प्रबोधन केले. अंनिसच्या इतर कार्यकर्त्यांनीही यथोचित प्रबोधन केले. पोलीस हवालदार एस. के. ठाकरे, एच. पी. गवळी, पोलीस नाईक, आर. बी. गवळी यांनी जादूटोणा विरोधी कायदा व सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा याबाबत सविस्तर माहिती दिली.

यानंतर डॉ. गोराणे यांनी पीडित कुटुंबाच्या घरातील भात मागविला. तो सर्वांसमोर सेवन केला. जर पीडित कुटुंब हे जादूटोणा, करणी- भानामती करते तर आम्हालाही त्यांच्या घरातील अन्न सेवन केल्याने त्रास होईल. तरी आम्ही ते स्वेच्छेने सेवन करीत आहोत. आमचा असा विश्वास आहे की, अशा प्रकारचा जादूटोणा, मंत्र, तंत्र, करणी भानामती असे काही नसते. तेव्हा आपणही अशा अवैज्ञानिक,कालबाह्य गोष्टींवर विश्वास ठेवू नये, असे कार्यकर्त्यांनी उपस्थितांना सांगितले आणि सोबत भात खाण्याचे आवाहन केले.

त्यानंतर उपस्थितांपैकी पोलिसांनी आणि काही जणांनी कार्यकर्त्यांसमवेत भात खाल्ला. त्यामुळे वातावरण अतिशय हलकेफुलके झाले. नंतर पीडित कुटुंब आणि सामनेवाले यांना समोरासमोर आणून एकमेकाला साखर भरवण्यास कार्यकर्त्यांनी विनंती केली. सर्वांनी आनंद व्यक्त केला. डाकिण- भुताळीण या आरोपातून मुक्त झाल्याने वृद्ध दाम्पत्याच्या चेहर्‍यावर आनंद दिसत होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या