अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सफाई काम करणार्या वृध्दाला दोन अनोळखी व्यक्तींनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मच्छिंद्र माधव बोठे (रा. वाळकी, भोलेनाथ वाडी, ता. अहिल्यानगर) असे मारहाण झालेल्या वृध्दाचे नाव आहे. 8 मेच्या मध्यरात्री ही घटना घडली असून जखमी बोठे यांनी 11 मेच्या सायंकाळी दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
बोठे यांनी दिलेल्या जबाबानुसार, ते 7 मे रोजी रात्री जेवण करून व थोडी दारू पिऊन नीलक्रांती चौकातील अभिनव पान शॉप जवळ झोपले होते. 8 मे रोजी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना उठवले. तुझ्याकडे काम आहे असे सांगत त्यांना दुचाकीवर बसवून वारूळाचा मारूती रस्त्याने एका शेतात नेले. तिथे खड्डा खोदण्यास सांगितले असता, बोठे यांनी कशाने खोदू? असे विचारल्याने संतप्त झालेल्या दोघांनी त्यांना मारहाण केली. त्यातील एकाने डोक्याच्या मागील बाजूस व नाकावर टणक वस्तूने वार केला, तसेच छाती व पायावरही मारहाण केली.
नंतर त्यांना दुचाकीवरून जिल्हा रुग्णालयात नेऊन उपचार केले आणि पहाटे 3.30 च्या सुमारास सिध्दीबागेसमोरील रस्त्यावर सोडून दिले. त्याचबरोबर, कोणालाही काही सांगू नको, अपघात झाल्याचे सांग, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत 60 रुपये देऊन संशयित आरोपी निघून गेले असल्याचे जबाबात नमूद केले आहे. या प्रकरणाची माहिती दुसर्या दिवशी त्यांचे मालक गौरव आल्हाट यांनी घेतली आणि त्यांनी बोठे यांना उपचारासाठी पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
देहरे येथे वृध्द महिलेला मारहाण
देहरे (ता.अहिल्यानगर) गावात 70 वर्षीय वृध्द महिलेला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिराबाई अंबादास तोडमल असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. 5 मे रोजी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सुरेश अंबादास तोडमल, कोमल सुरेश तोडमल (दोघेही रा. देहरे) आणि मधुकर थोरात (पूर्ण नाव, पत्ता नाही) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.