अहिल्यानगर (प्रतिनिधी)
मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका वृध्द महिलेला दोन अज्ञात इसमांनी फसवून तिच्याकडील एक लाख 26 हजार 315 रूपये किमतीचे 33 ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन पलायन केल्याची घटना सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्ता परिसरात गुरूवारी (11 सप्टेंबर) सकाळी घडली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रजनी अशोक कुद्रे (वय 73, रा. पंकज कॉलनी, समतानगर, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रजनी कुद्रे या बीएसएनएल मधून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्या नेहमीप्रमाणे गुरूवारी सकाळी आठच्या सुमारास गुलमोहर रस्त्यावर वॉकसाठी गेल्या होत्या. त्या स्वामी समर्थ मंदिराजवळ पोहोचल्यावर, दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात इसमांपैकी एकाने त्यांना थांबवत सांगितले की, पुढे खून झाला आहे, तुम्ही पुढे जाऊ नका.
तुमच्या अंगावरील दागिने काढून टाका. या खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवून रजनी यांनी आपल्या अंगावरील सर्व सोन्याचे दागिने काढून दिले. त्यामध्ये सोन्याच्या अंगठ्या, साखळी आणि मंगळसूत्र असा एकूण 33 ग्रॅम वजनाचे एक लाख 26 हजार 315 रूपये किमतीचे दागिने होते. इसमाने ते एका पिशवीत ठेवून सुरक्षित ठेवण्याचे सांगून आपल्या साथीदारासह दुचाकीवरून पसार झाला.
या घटनेनंतर घाबरलेल्या महिलेने तात्काळ पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. पोलिसांनी अज्ञात दोन इसमांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
तोफखाना पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, अशा प्रकारच्या खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सार्वजनिक ठिकाणी अनोळखी व्यक्तींना दागिने किंवा मौल्यवान वस्तू देऊ नयेत. सावेडी उपनगरात अशा घटना वारंवार घडत आहे.




