Sunday, November 17, 2024
Homeब्रेकिंग न्यूजNashik Political : उदय सांगळे यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून द्या

Nashik Political : उदय सांगळे यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून द्या

टाकेद येथील जाहीर सभेत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे आवाहन

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

आम्ही तुडवा-तुडवीची भाषा करत नाही. मात्र आमच्या नादी कुणी लागले तर त्याला सोडत नाही. समोरच्या उमेदवाराकडून खूप पैसा येणार आहे. त्यांनी खाल्लाच एवढा आहे, त्यामुळे येणारच आहे. मात्र, पैशापेक्षा, सत्तेच्या माजापेक्षा सर्वसामान्यांची ताकद मोठी असते हे राजाभाऊ वाजे यांच्या निवडणुकीत इथल्या मतदारांनी दाखवून दिले आहे. महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी भाजपला महाराष्ट्राच्या भूमीतून हद्दपार करण्याचा निर्धार केला असून त्यासाठी प्रत्येक आमदार महत्त्वाचा आहे. इथे स्वत: पवार साहेब उभे आहेत. तुम्ही स्वत: उमेदवार आहात असा विचार करून उदय सांगळे यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणा, असे आवाहन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केले.महाविकास आघाडी व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार उदय सांगळे यांच्या प्रचारार्थ टाकेद येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

- Advertisement -

या वेळी व्यासपीठावर खासदार राजाभाऊ वाजे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब वाघ, जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक भारत कोकाटे, अखिल भारतीय आदिवासी सेनेचे दि.ना. उघाडे, माजी नगराध्यक्ष संजय इंदूलकर, किरण डगळे, नईम खान, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. संजय सोनवणे, प्रदेश सचिव राजाराम मुरकुटे, गोकुळ पिंगळे, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, काशिनाथ कोरडे, दिनेश धात्रक, संजय सोनवणे, संजय सानप, संगीता गायकवाड, समाधान वारुंगसे, राष्ट्रवादी काँग्रेस आदिवासी सेलचे जयवंत वानोळे, युवासेनेचे तालुकाप्रमुख भाऊसाहेब वाजे, अपंग सेनेचे तालुकाप्रमुख विलास कानकटे, स्टाईसचे माजी चेअरमन पंडित लोंढे, अरुण चव्हाणके, संचालक बाबासाहेब दळवी, पंढरीनाथ आरोटे, उमेश खातळे यांच्यासह महाविकास आघाडी व मित्रपक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

इथले महायुतीचे उमेदवार सिन्नरला शरद पवारांचा पॅटर्न चालणार नाही, अशी भाषा करतात. मात्र त्यांना माहीत नाही की त्यांच्या नेत्याचे विचार जिथे संपतात तेथून शरद पवारांचे विचार सुरू होतात, असा टोला रोहित पवार यांनी लगावला. शरद पवारांचे राजकारण संपले असे राज्यातले सर्वात खोटारडे नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मात्र थोड्याच दिवसात लोकसभेच्या 48 पैकी 31 जागा जिंकून राज्यात वस्ताद कोण आहे हे शरद पवार यांनी दाखवून दिले आहे. दिल्लीत बसलेल्या गुजरातमधील नेत्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांवर ईडीची कारवाई केली. नेते विकत घेऊ, पक्ष तोडू, पण सत्तेत येऊच असे स्वप्न पाहिले होते. लोकसभा निवडणुकीत त्यांच्यात काय जोश बघायला मिळत होता. त्यांच्या पैशाचा माज, जोश, अहंकार महाराष्ट्रातील स्वाभिमानी मतदारांनी मोडून काढला आणि राजाभाऊ वाजेंसारखे महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून दिल्याचे ते म्हणाले.

राज्यात महाविकास आघाडीचीच सत्ता येणार आहे. त्यावेळी शरद पवार माझ्यावर छोटी-मोठी जबाबदारी टाकतील. त्यावेळी खा. राजाभाऊ वाजे यांना सोबत घेऊन उदय सांगळे व मी सिन्नर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करू, असा शब्द आ. पवार यांनी दिला. राज्यात आघाडीची सत्ता आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत शेतकर्‍यांचे तीन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येईल. महायुतीची लाडकी बहीण योजना केवळ खुर्चीसाठी होती. मात्र महाविकास आघाडी महालक्ष्मी योजना घेऊन आली असून राज्यातल्या माता-भगिनींना या योजनेतून दरमहा तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्याशिवाय या माता भगिनींच्या मुला-मुलींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठीही आघाडी सरकार कटिबद्ध असणार आहे.

सिन्नरचा इंडिया बुल्स प्रकल्प सुरू झाला असता तर मतदारसंघातील 20 हजार युवकांना रोजगार मिळाला असता. मात्र भाजपला महाराष्ट्राचा नाही तर गुजरातचा विकास करायचा असल्याचा टोला आ. पवार यांनी लगावला. दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांपुढे महाराष्ट्रातील महायुतीचे नेते इतके लाचार झाले आहेत की, गेल्या साडेसात वर्षांत 8-9 लाख कोटींची गुंतवणूक असणारे प्रोजेक्ट त्यांनी गुजरातला दिले. आपले हक्काचे पाणी गुजरातला पळवले. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा त्यांनी केली. प्रत्यक्षात 10 वर्षांपूर्वी असणारा भावही शेतकर्‍यांच्या शेतमालाला मिळत नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.

सभांमध्ये मी कमी बोललो की जास्त बोललो असा विचार करून कुणीही गैरसमज करून घेऊ नये. मी जे बोलतो ते नेटाने बोलतो, खरे बोलतो, प्रामाणिकपणाने बोलतो असे खा. राजाभाऊ वाजे म्हणाले. माझ्याकडे ना आर्थिक ताकद होती, ना राजकीय ताकद होती. मनी, मसल पॉवर यापैकी काहीच नव्हते. मतदारांचे प्रेम एवढीच माझी ताकद होती. त्याच जोरावर आजपर्यंतचा माझा राजकीय प्रवास झाला असल्याचे ते म्हणाले. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येण्यासाठी एक-एक जागा महत्त्वाची आहे. सत्ता आली नाही तर मी खासदार होऊन काही उपयोग होणार नाही. त्यामुळे उदय सांगळे यांना प्रचंड मतांनी निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.

मतदारसंघामध्ये फिरत असताना मतदारांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळत असून तालुक्यात मतदार परिवर्तन करणार असा विश्वास उदय सांगळे यांनी व्यक्त केला. 20 वर्षांपासून नेतृत्व करणार्‍या लोकप्रतिनिधीकडून मतदारांचा भ्रमनिरास झाला आहे. मागच्या वेळी दोन हजारांच्या निसटत्या मतांनी ते निवडून आले. मात्र त्यातही शरद पवार यांच्या सातार्‍यातील पावसातील सभेचा तो परिणाम होता. त्यांनी नोंदवलेल्या खोट्या-नाट्या मतदारांमुळे त्या निवडणुकीत राजाभाऊंचा पराभव झाला. ती सल मनात होती म्हणूनच लोकसभा निवडणुकीत तालुक्याने अभूतपूर्व असे मतदान करत राजाभाऊंना जिल्ह्याचे खासदार केले, असे सांगळे म्हणाले. आज तालुक्यात हजारो कोटींचा निधी आणल्याचे सांगितले जात आहे. मात्र हा निधी केवळ कागदावरच दिसत आहे. खरा विकास कुठेच दिसत नाही. टाकेद गटात रस्ते धड नाहीत. विजेचा प्रश्न मोठा आहे.

खोटे स्वप्न दाखवणारे मागच्या निवडणुकीत सिन्नर तालुक्यात पडले होते. मात्र टाकेद गटाने त्यांना 4 हजारांची आघाडी दिल्याने ते 2 हजाराने निवडून आल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. टाकेद परिसरातील भूमी ही आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची भूमी आहे. त्यांच्या स्मारकाचे दोन वेळा नारळ फोडण्यात आले. मात्र आजपर्यंत काम सुरू झालेले नाही. ही केवळ आदिवासींची फसवणूक नाही तर महापुरुषांचाही अपमान असल्याचे सांगळे म्हणाले. विद्यमान आमदारांनी 2019 च्या जाहीरनाम्यात तालुक्यात शिवसृष्टी उभारण्याचे जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात एक खडीही कुठे पडलेली दिसत नाही. काहीही बोलायचे, पण रेटून बोलायचे ही त्यांची सवय असून तालुक्यातून अजितदादांना दीड लाख मतांनी निवडून आणण्याची भाषा ते करत आहेत. पण जे स्वत:च दोन हजार मतांनी निवडून आले ते अजितदादांना एवढ्या मोठ्या फरकाने कुठून निवडून आणणार असा प्रश्न सांगळे यांनी केला.

टाईट व्यक्तीला फाईट द्या
भारत कोकाटेंना मी भेटलो. कोकाटे जॅकेट नाहीतर कोट घालतात. यांचा झब्बा-पायजमा पाहून चांगले वाटले. मला वाटले हे टाईट असतील. यांच्या कुटुंबातला एकजण माझ्याबरोबर आमदार म्हणून काम करत होता. फार टाईट होता. तुम्हाला पाहून बरे वाटले. टाईट असणार्‍या व्यक्तीला चांगली फाईट देऊन आपले उमेदवार उदय सांगळे यांना निवडून आणायचे आहे. उदय तर निवडून येणार आहेच, मात्र त्यानंतर टाकेद गटासह तालुक्याच्या पूर्व भागाचाही खासदार राजाभाऊ वाजे यांना सोबत घेऊन विकास करू. त्यावेळी भारत कोकाटेंना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलेही काम होणार नाही, असा शब्द आ. रोहित पवार यांनी दिला.

निवडणुकीला गालबोट लावू नका
चुकीची भाषा वापरून विरोधी नेत्याचा अनादर करणे, चारित्र्याचे वाभाडे काढणे लोकशाहीला अशोभनीय आहे. तुम्ही तुमचे कर्तृत्व सांगा, तुम्ही काय करणार ते सांगा, तुमचा जाहीरनामा सांगा. निवडणुकीच्या काळात चुकीच्या पद्धतीने भाषा वापरून निवडणुकीला गालबोट लावण्याचे काम करू नका, असे आवाहन दत्ता वायचळे यांनी केले. उदय सांगळे यांनी एकलव्यांचे स्मारक उभे केले आहे. त्यांनी बौद्धविहार बनवले. राष्ट्रीय महापुरुषांचे स्मारक, पुतळे उभारले. धोंडवीरनगरला महात्मा फुले यांचा पुतळा तर डुबेरेमध्ये छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभारल्याकडे वायचळे यांनी लक्ष वेधले.

रोहितदादा, दोन हत्ती द्या
विद्यमान आमदारांचे वय झाले असून भाषणात कधी कधी त्यांचा बॅलन्स जातो. मला हत्तीच्या पायाखाली घालण्याची भाषा ते करत आहेत. रोहितदादा, तुम्ही मला विधानसभेचे तिकीट दिले. आता 23 तारखेला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल तेव्हा मला दोन हत्ती द्या. एका हत्तीवर राजाभाऊ व दुसर्‍यावर मी बसून विजयी मिरवणूक काढेल, असे उदय सांगळे म्हणाले. पदाचा आणि सत्तेचा प्रचंड अहंकार, माणसे मारण्याची, तुडवण्याची, मातीत घालण्याची भाषा लोकप्रतिनिधीला शोभत नाही. हे कोणत्या काळात राहतात तेच त्यांना समजत नाही. हे 2024 आहे. हत्तीच्या पायाखाली घालण्याचे दिवस गेले. तुम्ही विकासावर बोला. मात्र जिथे विकास व जनसंपर्क थांबतो तिथे जातीचा आधार घेतला जातो, असा टोला मारत उदय सांगळे यांनी तुम्हाला लोकांना दम देणारा लोकप्रतिनिधी पाहिजे का? असा सवाल मतदारांना केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना एक मत देण्याचा अधिकार दिला असून हे मतदार तुमची आमदारकीची झालर केव्हा काढून घेतील हे तुम्हालाही कळणार नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर तुमचा सालदार, सेवक म्हणून काम करेल व खासदार राजाभाऊ वाजे यांच्या साथीने मतदार संघाच्या विकासाचा गाडा पुढे घेऊन जाईल, असा शब्द उदय सांगळे यांनी दिला.

तरुण कार्यकर्त्याला संधी द्या
उदय सांगळे माझे जुने मित्र आहेत. 15-20 वर्षांपूर्वी काँग्रेस संघटनेच्या माध्यमातून आम्ही एकाचवेळी आमच्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. उदय रायुकाँचे जिल्हाध्यक्ष होते, तेव्हा मी प्रदेशवर काम करत होतो. त्यावेळी राजकारणापुरते मर्यादित न राहता आमच्यात मित्रत्वाचे व कौटुंबिक संबंध झाल्याचे आमदार सत्यजित तांबे म्हणाले. मी ‘ना आघाडीचा, ना युतीचा’ आमदार आहे. मी अपक्ष आमदार आहे. मात्र चांगला माणूस पाहून मी उदय यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे आ. तांबे म्हणाले.

ते आमच्या नगर जिल्ह्याचे जावई आहेत याचा आम्हाला अभिमान असल्याचे ते म्हणाले. जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांच्या पत्नी शीतल सांगळे यांनी तालुक्याच्या प्रत्येक गावात विकासाची गंगा पोहोचवण्याचे काम केले, त्यावेळी त्यांच्यामागे उदय खंबीरपणे उभे राहिले. मतदारसंघाचा विकास करण्यासाठी उदय यांच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला संधी मिळणे गरजेचे असून मतदारांनी त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन आ. तांबे यांनी केले.

गुंडशाही थांबवा
आता मतदारसंघात अफवांचे पीक येणार आहे. त्यामुळे सावध राहा. देवपूर गटात काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी आमच्या गाड्या अडवल्या. गाड्या चेक केल्या. अरे, आमच्याकडे पैसे नाहीत. पण तुमच्या गाड्या आम्ही चेक केल्या तर बंडलच्या बंडल तेथे सापडतील याची आम्हाला खात्री आहे. निवडणूक आहे, ती लोकशाही मार्गाने लढा. दमबाजी करण्याचा प्रयत्न करू नका. तसा प्रयत्न केला तर तो प्रयत्न जनता हाणून पाडेल, असा इशारा भारत कोकाटे यांनी दिला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या