नेवासा |सुखदेव फुलारी|Newasa
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या विरोधात असलेल्या तालुक्यातील विरोधी मतांची विठ्ठलराव लंघे व बाळासाहेब मुरकुटे यांच्यात विभागणी होऊनही गडाखांचा पराभव तर लंघे यांचा विजय झाला. राज्यपातळीवरील मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, हिंदुत्वाचा मुद्दा आणि ओबीसी फॅक्टरने लंघेंचा विजय झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. नेवासा विधानसभा मतदार संघात शंकरराव गडाख, विठ्ठलराव लंघे व बाळासाहेब मुरकुटे यांच्यात तिरंगी लढत झाली. गडाख गटाच्या ताब्यात नेवासा नगरपंचायत, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, पंचायत समिती तसेच सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य असताना व मुळा आणि ज्ञानेश्वर साखर कारखाना जमेची बाजू असताना झालेला पराभव अनेकांना धक्का देणारा ठरला आहे.
निवडणूक प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात उमेदवार लंघे व मुरकुटे यांच्यातच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. हे आरोप-प्रत्यारोप थेट शनि दरबारी पोहचले. विरोधी मतात विभागणी होऊन गडाख विजयी होतील, असे चित्र होते. त्यामुळे गड़ाख यांचे कार्यकर्ते विजयाचा विश्वास व्यक्त करीत होते. मात्र पराभव झाला. या निवडणुकीत गड़ाख यांना 91,423 मते पडली तर विजयी उमेदवार आ. लंघे यांना 95,444 व मुरकुटे यांना 35,331 मते पडली. लंघे-मुरकुटे यांची मते एकत्र केली तर नेवासा तालुक्यात यंदा गडाख विरोधी मतांची गोळाबेरीज 1,30,775 असल्याचे स्पष्ट झाले. आ. विठ्ठलराव लंघे हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असलेले ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे संचालक व भाजपा जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. पालकमंत्री राधकृष्ण विखे पाटील यांचे ते अतिशय निकटवर्तीय, शांत-संयमी म्हणून तालुक्याला परिचित आहेत. तसेच 2004 मध्ये त्यांनी नरेंद्र घुलेंविरुद्ध तर 2009 मध्ये शंकरराव गडाख यांच्या विरुद्ध विधानसभेची निवडणूक लढविली होती. मात्र त्या निवडणुकांत त्यांचा पराभव झाला होता.
या निवडणुकीत ऐनवेळी भाजपाचा मित्रपक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लंघे यांना उमेदवारी जाहीर होताच भाजपाचे माजी आमदार मुरकुटे यांनी बंडखोरी करत प्रहार पक्षाकडून निवडणुकीत उडी घेतली. त्यामुळे तालुक्यातील गडाख विरोधी मतांची लंघे-मुरकुटे यांच्यात विभागणी झाली. तरीही लंघे यांचा 4021 मतांनी विजय झाला.
लंघेंच्या या विजयात तालुक्यातील महायुतीचे पदाधिकारी-कार्यकर्ते यांचा वाटा असला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती आणि राज्यपातळीवरील महायुतीचे प्रचारातील मुद्दे तितकेच कारणीभूत ठरले आहेत. महायुती सरकारने राज्यात सुरु केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून दिवाळीच्या तोंडावर महिलांच्या बँक खात्यात खटाखट पैसे जमा झाले. एसटी प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत दिली, मुलींचे शिक्षण मोफत केले. त्यामुळे महिला वर्गाने राज्यात महायुती उमेदवारांना खटाखट मतदान केले. त्याचबरोबर मुख्यमंत्री योगीनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ हा प्रचार राज्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी उचलून धरला होता.
तसेच मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ओबीसी नेते छगन भुजबळ यांना वैयक्तिक टार्गेट केल्याने सर्व ओबीसी समाज हक्काचे आरक्षण हिसकावले जात असल्याच्या भावनेतून महायुतीच्या पाठीमागे उभा राहिल्याचे चित्र दिसले. राज्यात दिसलेले हे तीन फॅक्टर नेवासा विधानसभा मतदार संघातही लागू झाल्याने विरोधी मतांमध्ये विभाजन झाल्यानंतरही गड़ाख पराभूत तर लंघे विजयी झाले. निवडणूक प्रचाराच्या प्रत्येक सभेत विजयी उमेदवार लंघे यांनी वडील माजी आमदार वकीलराव लंघे यांच्या संस्कारातून नेवासे तालुक्यात लढा देत असल्याचे सांगून सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती म्हणून पदरात घ्यावे, असे आवाहन केले होते. खूप लढलो, आता ही शेवटची लढाई असल्याने योग्य निर्णय घेण्याबाबत केलेले आवाहन भावनेला हात घालणारे ठरले तर निवडणुकीतील रणधुमाळीत नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा महत्त्वाची असल्याने आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या प्रचार यंत्रणेत भाजपाचे विधानसभा संयोजक व जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा, पंचगंगा उद्योग समुहाचे प्रमुख प्रभाकर शिंदे व लाडकी बहीण योजनेसाठी कष्ट घेतलेले अब्दुल शेख यांची राजकीय मदत निर्णायक ठरली.
प्रभावी प्रचार यंत्रणेने लंघे यांच्या विजयाच्या यशाला गवसणी घातली. घोडेगाव, सोनई परिसरात देसरडा यांनी मतदारांपर्यंत लंघे यांच्यासाठी महायुतीच्या जनहिताच्या योजनाची माहिती दारोदार पोहचवली. तालुक्यातील सर्व सभा, प्रचारफेर्या याचे नियोजन केले. स्वतःचा उमेदवारी अर्ज माघारीपासून ते लंघे निवडणुकीत यश घेईपर्यंत देसरडा यांनी आखलेली रणनीती लंघे यांच्यासाठी लाभदायी ठरली. तसेच कुकाण्यातील अब्दुलभाई शेख यांनी लाडकी बहीण योजनेसाठी स्वतः कार्यालय थाटून वीस हजारांहून अधिक महिलांचे अर्ज भरले होते. त्याचा लाभ झाला. शेख यांनीही लंघे यांच्यासाठी स्वतःला राष्ट्रवादीची मिळालेली उमेदवारी मागे घेत लंघे यांना पाठबळ दिले. शिवाय तालुक्यातील महायुतीच्या सभेसाठी महिलांची लक्षणीय उपस्थिती शेख यांच्या परिश्रमाने दिसून आली. शिवसेनेचे बाळासाहेब पवार, भाजपाचे अंकुश काळे, ज्ञानेश्वर पेचे, ऋषिकेश शेटे यांची भूमिका देखील या विजयात महत्वाची ठरली.