मुंबई | Mumbai
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर नालासोपारा येथे पैसे वाटल्याचा आरोप बविआचे आमदार, उमेदवार क्षितीज ठाकूर यांनी केला आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाने आता लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
पैसे वाटल्याच्या आरोपांवर विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. हा आपल्याविरुद्धचा कट असून निवडणूक आयोगाने याची निःपक्षपातीपणे चौकशी करावी, असे तावडे यांनी सांगितले आहे. मी कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो, मी काही चुकीचे केले नाहीये. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कट रचला असल्याचा आरोप विनोद तावडेंनी आपल्या स्पष्टीकरणात केलाय. आता पोलीस आणि निवडणूक आयोगाने याचा तपास करावा असे तावडे म्हणालेत.
नेमके काय घडले?
विरार पूर्व भागातील मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये बविआ-भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. दुपारी १ ते १.३० च्या सुमारास ही घटना घडली. यात बविआच्या हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडेंवर पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणानंतर हॉटेलमध्ये मोठा पोलिस फाटा तैनात करावा लागला, तसेच पोलिसांनी हॉटेल सील केल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, विनोद तावडे यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.
आमचा मित्र पक्ष आहे, ते म्हणतायत की मी पैसे वाटत होतो. हे ठाकूर मला ओळखतात मी ४० वर्षे पक्षाचे काम करतो. नालासोपारामध्ये वाड्याहून परतत असताना कार्यकर्त्यांची बैठक होती. मतदानाच्या दिवशीच्या आचारसंहितेचे नियम काय आहेत ते सांगण्यासाठी मी इथे आलो होतो. आमच्या समोरच्या पक्षाचा असा समज झाला की मी पैसे वाटायला आलो. सगळे चेक करा काहीच करायला हरकत नाही असे मी म्हटले, असे तावडे म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा