नवी दिल्ली | New Delhi
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दिल्लीत विधानसभा निवडणुक (Delhi Assembly Election) होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी दिल्ली विधानसभेच्या मतदानाची आणि निकालाची तारीख जाहीर केली. यंदा आप, काँग्रेस आणि भाजप यांच्यात दिल्ली काबीज करण्यासाठी तिरंगी लढत होणार आहे.
यावेळी बोलतांना राजीव कुमार म्हणाले की, “दिल्लीत एकूण ०१ कोटी ५५ लाख २४ हजार ८५८ मतदार नोंदणीकृत आहेत. त्यापैकी ८४ लाख ४९ हजार ६४५ पुरुष मतदार आहेत, तर ७१ लाख ७३ हजार ९५२ महिला मतदार आहेत. दिल्ली विधानसभेच्या एकूण जागा ७० जागा असून त्यात ५८ सर्वसाधारण जागा आणि १२ राखीव जागा आहेत. त्यानुसार दिल्ली विधानसभेसाठी ०५ फेब्रुवारीला मतदान (Voting) होणार असून ०८ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.
पुढे ते म्हणाले की, “दिल्ली विधानसभेच्या एकूण ७० जागांसाठी १३ हजार ३३ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच यंदा २.०८ लाख मतदार (Voter) प्रथमच मतदान करणार असून दिल्लीत २० ते २९ वर्षे वयोगटातील २५.८९ लाख मतदार आहेत”, असे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटले. निवडणुकीच्या तारखांची घोषणा होताच दिल्लीत आजपासून आचारसहिंता लागू झाली आहे. तर दिल्ली विधानसभेची मुदत २३ फेब्रुवारी रोजी संपणार आहे.
तसेच दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान घेतले जाणार आहे. यासाठी अर्ज दाखल तारीख १० जानेवारी २०२५ आहे. तर अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत १७ जानेवारी पर्यंत असणार आहे. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २० जानेवारीपर्यंत असणार आहे. तर विधानसभा निवडणुकीसाठी मतदान ५ फेब्रुवारी २०२५ रोजी होईल तर निकाल ८ फेब्रुवारीला लागणार आहे, असेही राजीव कुमार यांनी सांगितले.
दिल्लीत यंदा तिरंगी लढत
दिल्ली विधानसभेची निवडणूक आप या पक्षाने सलग दोनवेळा जिंकली आहे. भाजपाला ‘दिल्ली’ काबीज करायची आहे. त्यामुळे भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात तुरुंगात जावं लागल्याने त्यांनी आता लोक निवडून देतील तेव्हाच मी मुख्यमंत्री होईन असं म्हणत आतिशी यांना ते पद दिलं. या दरम्यान काँग्रेस आणि आप बरोबर आहेत असं वाटत असतानाच अजय माकन यांनी अरविंद केजरीवाल यांना देशद्रोही म्हटले.दोन्ही पक्षांमधला वाद विकोपाला गेल्याचे दिसून येतं आहे. त्यामुळे या तिरंगी लढतीत नेमकं काय होणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.